Saturday, 28 December 2024

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 28.12.2024 रोजीचे सकाळी: 11.00 वाजताचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 28 December 2024

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक: २८ डिसेंबर २०२४ सकाळी ११.०० वाजता.

****

माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहनसिंह यांच्या पार्थिव देहावर आज दिल्लीत निगमबोध घाटावर पूर्ण शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत. डॉक्टर सिंग यांचा पार्थिव देह आज सकाळी त्यांच्या निवासस्थानाहून काँग्रेस मुख्यालयात आणण्यात आला. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यासह अनेक काँग्रेस नेते, पदाधिकारी तसंच असंख्य कार्यकर्ते आणि नागरिकांनी डॉक्टर सिंग यांचं अंत्यदर्शन घेतलं. काहीवेळापूर्वीच डॉ. सिंग यांची अंत्ययात्रा निगमघाटाकडे निघाली असून या अंत्यसंस्काराचं आकाशवाणीच्या सर्व वाहिन्यांवरुन प्रसारण सुरु आहे.

दरम्यान, डॉ सिंग यांचं यथोचित स्मारक बांधण्यासाठी सरकार जागा देऊ करणार असल्याचं केंद्रीय गृह मंत्रालयानं म्हटलं आहे. स्मारकासाठी जागा देण्याची विनंती काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी काल सरकारकडे केली होती. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर लगेचच गृहमंत्री अमित शहा यांनी सिंग यांच्या कुटुंबियांशी संवाद साधून त्यांना ही माहिती दिली.

****

मुंबईत विविध रस्त्यांची निकृष्ट बांधणी करणाऱ्या कंत्राटदारांसह रस्त्याच्या कामावर देखरेख ठेवण्यासाठी नेमलेल्या गुणवत्ता व्यवस्थापन संस्थांनाही मुंबई महापालिकेनं ५० लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. काँक्रिटच्या रस्त्यांची निकृष्ट दर्जाची कामं करणाऱ्यांवर यापुढेही कारवाई केली जाणार असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलं.

मुंबईतले रस्ते आणि त्यावर पडणारे खड्डे बुजवण्यासाठी पालिकेकडून कोट्यवधी रुपये खर्च केले जात आहेत. मुंबईतील रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी पालिकेने रस्त्यांचे काँक्रिटीकरण हाती घेतलं आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात ३९२ किलोमीटर, तर दुसऱ्या टप्प्यात ३०९ किलोमीटर, असे एकूण मिळून ७०१ किलोमीटर रस्त्यांची कामे सुरू आहेत. या रस्त्यांच्या दर्जाबाबत आलेल्या तक्रारीनंतर शहरात आणि उपनगरात विविध कामांसाठी पालिकेकडून कंत्राटदारांना दंड ठोठावण्यात आला आहे.

****

नववर्षाच्या आगमनाच्या पार्श्वभुमीवर राज्याच्या विविध भागात अवैध वाहतूक तसंच अवैध मद्यविक्रीवर प्रतिबंध घालण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत ३१ डिसेंबरपर्यंत विशेष मोहिम राबवण्यात येत आहे. कोणत्याही अनुज्ञप्तीमध्ये विना परवाना मद्यविक्री किंवा अल्पवयीन तरुणांना मद्य उपलब्ध होत असल्यास, राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून कडक कारवाई केली जाणार आहे. तसंच नागरिकांनादेखील काही तक्रारी असल्यास विभागाशी संपर्क करावा, असं आवाहन राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक डॉ. पराग  नवलकर यांनी केलं आहे.

बुलढाणा जिल्ह्यातही राज्य उत्पादन शुल्क विभागाची, भरारी पथकं  विविध हातभट्टी ठिकाणं, अवैध मद्यविक्री केंद्रावर छापे टाकून कारवाई करत आहेत.

दरम्यान राज्य उत्पादन शुल्क विभागाने राज्यात अवैध विक्री, मद्यनिर्मीती तसंच वाहतुक प्रकरणी गेल्या १ मार्चपासून आतापर्यंत विशेष मोहीम राबवून २ कोटी २८ लाख ४६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून १ हजार २२९ व्यक्तींवर गुन्हे नोंदवले आहेत.

****

बुलढाणा जिल्ह्यातील सर्व घाऊक व्यापारी, किरकोळ व्यापारी, साठवणूकदार यांना नायलॉन मांजाची विक्री तसंच साठवणूक करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी सर्व स्थानिक स्वराज्य संस्था, पोलिस विभाग यांनी स्वतंत्ररित्या पथकं तयार करुन आवश्यक ती कार्यवाही करावी आणि या आदेशाचं पालन न करणाऱ्या व्यक्ती किंवा संस्था शिक्षेस पात्र राहतील, असं जिल्हा दडाधिकाऱ्यांनी याबाबतच्या आपल्या आदेशात नमूद केलं आहे.

****

नोंदणीकृत होमिओपॅथी वैद्यक व्यावसायिकांनी आधुनिक वैद्यकशास्र प्रमाणपत्र -सीसीएमपी अभ्यासक्रम पूर्ण केल्यास, त्यांना आधुनिक वैद्यकशास्त्र वैद्यक -विषमचिकित्सा पद्धतीने व्यवसाय करण्यास परवानगी देण्यात येत असल्याची माहिती अन्न आणि औषध प्रशासनचे आयुक्त राजेश नार्वेकर यांनी दिली आहे. संबंधित व्यावसायिक, महाराष्ट्र समचिकित्सा वैद्यक व्यवसाय अधिनियम अन्वये नोंदणीकृत असणं आवश्यक असणार  आहे.

****

सात लाखाचे बक्षीस असलेल्या जहाल माओवाद्यानं गोंदिया पोलिस दलासमोर आत्मसमर्पण केलं आहे. देवा सुमडो मुडाम असं या माओवाद्याचं नाव असून तो छत्तीसगड राज्यातील बिजापूर इथला आहे. आत्मसमर्पित माओवादी देवा अति नक्षल प्रभावित भागात असल्यानं बालपणापासूनच तो नक्षल चळवळीत सहभागी झाला होता.

****

लातूर महानगरपालिकेच्या कर संकलन आणि कर आकारणी विभागानं २५ डिसेबंर २०२४ ते ०५ जानेवारी २०२५ पर्यंत व्‍याज-शास्‍तीमध्‍ये ७५ टक्‍के सुट दिली आहे. या सवलतीचा लाभ घेऊन मालमत्ताधारकांनी देय असलेल्या मालमत्ताकराचा भरणा करावा आणि जप्ती सारखी कारवाई टाळावी असं आवाहन लातूर महानगर पालिकेचे आयुक्त तथा प्रशासक बाबासाहेब मनोहरे यांनी केलं आहे.

***

छत्रपती संभाजीनगर शहरात आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण आहे. पालघर जिल्ह्यात सध्या धुक्याची चादर पसरली  असून, हवेत गारवा निर्माण झाला आहे.

***

दरम्यान, नंदुरबार जिल्ह्यात काल अनेक ठिकाणी पाऊस झाला. काही भागात तुरळक सरी कोसळल्या, तर धडगाव तालुक्यातल्या काकर्दे इथं अर्धा तास मुसळधार पाऊस झाला. या पावसाचा फटका जिल्ह्यातल्या पिकांना, तसंच आंबा उत्पादनावर होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

***

नांदेड मार्गे जाणाऱ्या हैदराबाद-जयपूर-हैदराबाद आणि काचीगुडा-बिकानेर-काचीगुडा या विशेष रेल्वेगाड्यांना मुदत वाढ देण्याचा निर्णय रेल्वे विभागानं घेतला आहे.  हैदराबाद-जयपूर - हैदराबाद या विशेष रेल्वेगाडीला येत्या तीन जानेवारी पासून, जयपूर-हैदराबाद - जयपूर या विशेष रेल्वेगाडीला येत्या पाच तारखेपासून तर काचीगुडा-बिकानेर-काचिगुडा आणि बिकानेर-काचीगुडा बिकानेर या विशेष रेल्वेगाडीला अनुक्रमे येत्या चार आणि सात तारखेपासून पुढील आदेशापर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

****

No comments:

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 14.08.2025 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 14 August 2025 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी ...