Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 01 January 2025
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०१ जानेवारी २०२५ दुपारी १.०० वा.
****
उच्च शिक्षण संस्थांमधले विद्यार्थी, शिक्षक आणि संशोधकांना एकाच मंचावर विद्वत्तायुक्त संशोधन लेख आणि संशोधन अभ्यास प्रकाशनांची देशव्यापी उपलब्धता निर्माण करणाऱ्या, वन नेशन वन सबस्क्रिप्शन ही योजना आजपासून देशभरात लागू झाली. एका साध्या, वापरकर्त्या स्नेही आणि संपूर्णपणे डिजिटल प्रक्रियेद्वारे ही योजना राबवली जाणार आहे. सरकारी उच्च शिक्षण संस्था आणि केंद्र सरकारच्या संशोधन आणि विकास प्रयोगशाळांसाठी ही सुविधा असेल. पुढच्या तीन वर्षासाठी एक नवी केंद्रीय योजना म्हणून सुमारे सहा हजार कोटी रुपयांची तरतूद यामध्ये करण्यात आली आहे. उच्च शिक्षण विभागाच्या वन नेशन वन सबस्क्रिप्शन या एकीकृत पोर्टलवर संबंधित संस्थांना हे लेख आणि संशोधन अभ्यास उपलब्ध करुन देण्यात येणार असून, या वैशिष्ट्यपूर्ण सुविधेचा लाभ जास्तीत जास्त विद्यार्थी, शिक्षक समुदाय आणि सर्व सरकारी संस्थांमधल्या संशोधकांनी घ्यावा, असं आवाहन शिक्षण मंत्रालयानं केलं आहे.
****
राज्यभरात नवीन वर्षाचं जल्लोषात स्वागत करण्यात येत आहे. काल रात्रीपासून ठिकठिकाणच्या पर्यटन तसंच धार्मिक स्थळांवर नागरीकांनी गर्दी केली आहे. अनेक ठिकाणी आजचा सूर्योदय पाहण्यासाठी देखील नागरीकांचा उत्साह दिसून आला.
नववर्षानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातल्या जनतेला शुभेच्छा दिल्या. हे वर्ष सर्वांच्या जीवनात सुख, समाधान आणि समृद्धी घेऊन येवो, महाराष्ट्राच्या प्रगतीची पताका अखंडीत फडकत ठेवण्याची ऊर्जा आणि उर्मी मिळत राहो, असं त्यांनी म्हटलं आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात, नवीन वर्ष सर्वांना विकासाच्या नव्या संधी उपलब्ध करुन देणारं आणि राज्याला सर्वांगीण विकासाच्या, प्रगतीच्या वाटेवर नेणारं ठरेल, असा विश्वास व्यक्त केला.
ठाणे शहरात छत्रपती शिवाजी महाराज मैदान इथं शिवसेनेच्या वतीनं नववर्षानिमित्त रक्तदान शिबिर घेण्यात आलं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यात सहभागी झाले होते. धर्मवीर आनंद दिघे यांनी सुरू केलेल्या या उपक्रमात हजारो शिवसैनिकांनी रक्तदान केलं.
नववर्षानिमित्त जगभरातल्या हजारो भाविकांनी नांदेडमध्ये श्री सचखंड गुरुद्वारात हजेरी लावली.
नंदुरबार शहरातल्या श्रॉफ हायस्कुलच्या विद्यार्थ्यांनी सामुहिक सूर्य नमस्काराद्वारे नववर्षाचं स्वागत केलं. यातून वर्षभर आरोग्य समृद्धीचा संदेश देण्यात येतो.
****
पुणे जिल्ह्यातल्या कोरेगाव भिमा इथं दोनशे सातावा शौर्य दिन आज साजरा होत आहे. राज्यभरातून तसंच परराज्यातून लाखो आंबेडकर अनुयायी कालपासून कोरेगाव भिमा इथं दाखल झाले आहेत. याठिकाणी पुणे पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. केंद्रीय समाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले, वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख डॉ. प्रकाश आंबेडकर तसंच राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी आज विजय स्तंभास अभिवादन केलं.
****
धान उत्पादक शेतकऱ्यांनी येत्या १५ जानेवारीपर्यंत नजीकच्या केंद्रामधून ऑनलाईन शेतकरी नोंदणी प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी, असं आवाहन अन्न, नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी केलं आहे. या नोंदणीसाठीची मुदत १५ जानेवारी करण्यात आली आहे, याआधी ही मुदत कालपर्यंत होती.
****
ऊस उत्पादक शेतकऱ्यांची मुकादम, वाहतुकदार यांच्याकडून आर्थिक पिळवणूक होत असल्याच्या तक्रारी यंदाच्या गाळप हंगामात येणार नाहीत याची दक्षता घ्यावी, असे निर्देश साखर आयुक्त डॉक्टर कुणाल खेमनार यांनी दिले आहेत. पुण्यात काल यासंदर्भातल्या बैठकीत ते बोलत होते. कार्यकारी संचालक आणि खाजगी साखर कारखान्यांच्या व्यवस्थापक, मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी याबाबत दक्षता घ्यावी असं त्यांनी सांगितलं. ऊस तोडणीसाठी पैशाची मागणी केल्यास ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असं आवाहन प्रादेशिक उपसंचालक विश्वास देशमुख यांनी केलं आहे.
****
बीडमधल्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना तात्काळ अटक करण्याची मागणी करत मस्साजोग इथं ग्रामस्थांनी आज जलसमाधी आंदोलन सुरु केलं आहे. संतोष देशमुख यांची हत्या होऊन आता २२ दिवस उलटले, मात्र तीन आरोपी अद्याप फरार आहेत, याबद्दल गावकर्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
****
नांदेड जिल्ह्यातल्या किनवटचे माजी आमदार प्रदीप नाईक यांचं आज हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झालं, ते ६८ वर्षांचे होते. प्रदीप नाईक यांनी १९९९ मध्ये किनवट विधानसभा मतदारसंघातून पहिली निवडणूक लढवली, मात्र त्यांना त्यात पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर २००४, २००९ आणि २०१४ मध्ये झालेल्या निवडणुकीत सलग तीन वेळा त्यांनी किनवट मतदार संघात विजय मिळवला होता. नाईक यांच्या पार्थिव देहावर उद्या किनवट तालुक्यातल्या दहेली तांडा इथं अंत्यसंस्कार होणार आहेत.
****
राज्य शासनाच्या वतीने आजपासून ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ हा उपक्रम राबवण्यात येत आहे. १५ जानेवारी पर्यंत चालणार्या या उपक्रमात अनेक ठिकाणी ग्रंथ प्रदर्शनासह विविध कार्यक्रम राबवण्यात येणार आहेत.
यानिमित्त हिंगोली इथल्या शासकीय जिल्हा ग्रंथालयात ग्रंथ प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती जिल्हा ग्रंथालय अधिकारी आशिष ढोक यांनी दिली. जिल्ह्यात या पंधरवड्यात या उपक्रमांतर्गत सामूहिक वाचन, वाचन कौशल्य, कार्यशाळा, वाचन संवाद, साहित्यिकांच्या मुलाखती, चर्चा, पुस्तक परीक्षण आणि कथन स्पर्धा आयोजित करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.
****
No comments:
Post a Comment