Wednesday, 1 January 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 01.01.2025 रोजीचे सकाळी 07.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 01 January 2025

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०१ जानेवारी २०२५ सकाळी ७.१० मि.

****

सरत्या वर्षाला निरोप देऊन नववर्षाचं सर्वत्र जल्लोषात स्वागत 

नाट्यमय घडामोडींनंतर वाल्मिक कराड शरण-१४ दिवसांची सीआयडी कोठडी  

राज्यात अवैधरित्या राहणाऱ्या ४३ बांगलादेशी लोकांना डिसेंबर महिन्यात अटक

शेतकऱ्यांना सोयाबीन खरेदीसाठीची नोंदणी सहा जानेवारीपर्यंत करता येणार

शाकंभरी नवरात्रोत्सवापूर्वी तुळजाभवानी मातेच्या मंचकी निद्रेला प्रारंभ

आणि

छत्रपती संभाजीनगर इथं गुंठेवारी नियमितीकरण योजनेला ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ

****

सरत्या वर्षाला निरोप देऊन नववर्षाचं काल सर्वत्र जल्लोषात स्वागत करण्यात आलं. नव्या वर्षाचं स्वागत करण्यासाठी राज्यातली विविध पर्यटन स्थळं गर्दीनं फुलून गेली आहेत. ठिकठिकाणी स्थानिक प्रशासनानं यासाठी जय्यत तयारी केली आहे.

राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, तसंच राज्यपालांनी नववर्षानिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नववर्षाच्या शुभेच्छा देतांना, प्रगतीशील महाराष्ट्राला आणखी गतीशील करण्यासाठी 'महाराष्ट्र आता थांबणार नाही' अशी प्रतिज्ञा करण्याचं आवाहन नागरिकांना केलं.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात नव्या वर्षात दुप्पट नव्हे, तिप्पट जोमाने राज्यातल्या जनतेच्या सुखसमृध्दीसाठी काम करण्याची ग्वाही दिली.


नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी मुंबईच्या गेट वे ऑफ इंडिया आणि मरीन लाईन चौपाटीवर नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. देशाच्या विविध भागातून नागरिक हा नजारा पाहण्यासाठी आले होते. यावेळी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.


नाशिक शहरात काल सायंकाळी स्वामी मेळा मित्र मंडळाच्या वतीने पंचवटीतील रामकुंड इथं सहस्रदीप प्रज्वलित करण्यात आले. याशिवाय विविध मंदिरांवर विद्युत रोषणाई करण्यात आली होती. नव्या वर्षाच्या स्वागताच्या निमित्ताने मद्यपान करू नये हा संदेश देण्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने दूध वाटप करण्यात आलं, तसंच नशाबंदी मंचच्या वतीने व्यसनाच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करण्यात आलं.


छत्रपती संभाजीनगर इथं सर्वत्र उत्साह दिसून आला. मध्यरात्री बारा वाजता तरुणाईनं जल्लोष करून नव्या वर्षाचं स्वागत केलं. या निमित्त आतिषबाजीही करण्यात आली.

**

बीड इथं काल सरत्या वर्षाला निरोप देताना व्यसनमुक्ती फेरी काढण्यात आली. शिवसंग्रामच्या अध्यक्ष ज्योती मेटे यांच्या नेतृत्वात बाल वारकरी आणि विद्यार्थ्यांसह नागरिक या फेरीत सहभागी झाले होते.

जालना इथं नवीन वर्ष स्वागताच्या पार्श्वभूमीवर मद्यपान करून वाहन चालवणाऱ्यांची पोलिसांकडून तपासणी करण्यात आली.

****

पुणे जिल्ह्यातल्या कोरेगाव भीमा इथं दोनशे सातावा शौर्य दिन आज साजरा होत आहे. राज्यभरातून तसंच परराज्यातून आंबेडकर अनुयायी मोठ्या संख्येनं कालपासून कोरेगाव भीमा इथं दाखल झाले आहेत. पुणे पोलिसांकडून याठिकाणी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

****

बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या तसंच पवनऊर्जा प्रकरणात खंडणीचा आरोप होत असलेले वाल्मिक कराड यांना केज न्यायालयानं १४ दिवसांची कोठडी सुनावली आहे.

कराड यांनी काल नाट्यमय घडामोडींनंतर पुण्यात सीआयडी कार्यालयात शरणागती पत्करली. सीआयडीने त्यांना काल रात्रीच केज न्यायालयात हजर केल्याचं, आमचे प्रतिनिधी रवी उबाळे यांनी कळवलं आहे...

‘‘काल पुण्यात सीआयडी समोर शरण आलेले वाल्मिक कराड यांना सीआयडी ने जुजबी चौकशीनंतर पुण्यातून केज इथं आणलं. आणि उप जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करून त्यांना केज न्यायालयात हजर करण्यात आलं. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेत, कराड यांना १४ दिवसांची सीआयडी कोठडी सुनावली आहे.’’

रवी उबाळे, आकाशवाणी बातम्यांसाठी - बीड


दरम्यान, सीआयडीसमोर हजर होण्यापूर्वी कराड यांनी स्वतःची एक ध्वनिचित्रफीत प्रसिद्ध करून संतोष देशमुख हत्येसह स्वतःवरील सर्व आरोप फेटाळून लावले. राजकीय द्वेषापोटी आपल्याविरोधात आरोप केले जात असून, पोलिस तपासात दोषी आढळल्यास न्यायालय जी शिक्षा देईल, ती भोगण्यासाठी आपण तयार असल्याचं कराड यांनी या संदेशात म्हटलं आहे.

या नाट्यमय घडामोडीनंतर विरोधी पक्षांकडून तपास यंत्रणेवर टीका होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते, आमदार जितेंद्र आव्हाड यांनी काल मुंबईत पत्रकार परिषदेत बोलतांना, मस्साजोगसोबतच परभणीच्या प्रकरणातही सरकारने न्याय मिळवून देण्याची मागणी केली.

खासदार सुप्रिया सुळे यांनीही मुंबईत पत्रकारांशी बोलताना, परभणी आणि बीड या दोन्ही जिल्ह्यात घडलेल्या या घटनांमध्ये राजकारण न आणता दोन्ही कुटुंबाना न्याय मिळाला पाहिजे, असं मत व्यक्त केलं. संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणात मुख्यमंत्र्यांनी न्याय द्यावा, अशी मागणी सुळे यांनी केली.

आमदार सुरेश धस यांनी या प्रकरणात थेट कारवाई केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे आभार मानले आहेत. कराड यांच्या मालमत्तेवर लवकरात लवकर टाच आणावी, अशी मागणी धस यांनी केली. ते म्हणाले..

“या राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे त्यांच्या प्रॉपर्टी सीझ करण्याच्या संदर्भात सीआयडी त्यांच्या पाठीमागे फार जोरामध्ये लागले आणि त्यांना शरण येण्यास भाग पाडलेलं आहे. लवकरात त्यांच्या प्रॉपर्टी ह्या अटॅच झाल्या पाहिजे. प्रॉपर्टी अटॅच झाल्या शिवाय अन्य गुन्हे करत होते, ते उघडे पडणार नाही.’’

**

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, या प्रकरणी पुराव्याच्या आधारावर पुढील कारवाई केली जाईल असं स्पष्ट केलं आहे. ते काल मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. ज्याच्या विरूद्ध पुरावा असेल त्याच्या विरोधात कडक कारवाई केली जाईल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. ते म्हणाले…

‘‘काय वाट्टेल ते झाले तरी सगळे दोषी शोधून आणि जोपर्यंत ते फासावर लटकत नाही, तोपर्यंतची सगळी कारवाई पोलीस करतील, हा विश्वास मी त्यांना दिला आहे. जे जे पुरावे आहेत त्याच्या आधावर कुणालाही सोडणार नाही, हे मी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. या संदर्भात पोलीस वेळोवेळी निर्णय करतील, पोलीस ब्रिफींग करतील. जाणीवपूर्वक ही केस सीआयडीला देण्यात आली आहे. त्यांना पूर्ण स्वायत्तता देण्यात आली आहे. कोणाचाही त्यांच्यावर दबाव चालून घेतला जाणार नाही. कुठलाही दबाव राहणार नाही.’’


दरम्यान, संतोष देशमुख हत्येप्रकरणी राज्यभरातल्या सर्व ग्रामपंचायतींचं कामकाज उद्यापर्यंत बंद राहणार आहे. या प्रकरणातल्या आरोपींवर कठोर कारवाई करावी आणि लोकप्रतिनिधींवर होणाऱ्या हल्ल्यांना आळा बसावा, यासाठी कडक निर्बंध बसवावेत, या मागणीकरता, सरपंच संघटनेनं राज्यभरात कालपासून काम बंद आंदोलन पुकारलं आहे.

****

राज्यात अवैधरित्या राहणाऱ्या ४३ बांगलादेशी लोकांना डिसेंबर महिन्यात अटक करण्यात आली आहे. राज्य दहशतवादविरोधी पथक-एटीएसने छत्रपती संभाजीनगर आणि नांदेडसह अकोला, नाशिक आणि मुंबईत विक्रोळी भागात शोधमोहीम राबवून, ही कारवाई केली. यापैकी नऊ लोक गेल्या चार दिवसांत पकडल्याचं एटीएसच्या पत्रकात म्हटलं आहे.

****

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी प्रकल्पाला अधिक गती देण्याचे निर्देश, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. या प्रकल्पासंदर्भात काल मुंबईत झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यासंदर्भातला अहवाल १५ दिवसांमध्ये मुख्यमंत्री कार्यालयाकडे सादर करावा, तसंच हा प्रकल्प वेळेत पूर्ण होऊन कार्यान्वित होईल, याकडे सर्वांनी जबाबदारीपूर्वक लक्ष देण्याच्या सूचना फडणवीस यांनी यावेळी दिल्या.

****

राज्यातल्या शेतकऱ्यांना सोयाबीन खरेदीच्या नोंदणीसाठी सहा जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पणन मंत्री जयकुमार रावल यांनी, विभागाचा पदभार स्वीकारल्यानंतर ही माहिती दिली. नोंदणीची ही मुदत काल संपणार होती. नाफेड आणि एनसीसीएफ मार्फत नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांच्या सोयाबीनची खरेदी १२ जानेवारीपर्यंत केली जाणार असल्याची महितीही रावल यांनी यावेळी दिली. आतापर्यंत राज्यात ६ लाख ६९ हजार शेतकऱ्यांनी नोंदणी केली असून, तीन लाख ३४ हजार ३३१ मेट्रिक टन सोयाबीनची खरेदी झाली आहे. राज्यात सध्या ५६१ खरेदी केंद्र सुरू आहेत.

****

तुळजाभवानी मातेच्या शाकंभरी नवरात्रोत्सवापूर्वीच्या मंचकी निद्रेला कालपासून प्रारंभ झाला. सायंकाळच्या अभिषेक पूजेनंतर तुळजाभवानी माता शेजगृहातील चांदीच्या पलंगावर विसावली. येत्या सात जानेवारीला पहाटे तुळजाभवानी माता पुन्हा सिंहासनारूढ होऊन घटस्थापनेने शाकंभरी नवरात्र महोत्सवाची सुरुवात होईल. ११ जानेवारीला शाकंभरी नवरात्र महोत्सवातील प्रमुख आकर्षण असलेली जलयात्रा काढण्यात येणार आहे.

****

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका क्षेत्रात गुंठेवारी नियमितीकरण योजनेला येत्या ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. ही मुदत काल संपणार होती, गुंठेवारी वसाहतीमधल्या मिळकत धारकांनी आपले नियमितीकरणाचे प्रस्ताव विहित मुदतीत महानगरपालिकेच्या गुंठेवारी विभागात सादर करावे, नियमितीकरण न केलेल्या मालमत्तांवर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.

****

लातूर शहर महानगरपालिकेच्या वतीनं सुरू असलेल्या महिलांसाठी मोफत बस प्रवास योजनेसाठी महिलांना स्मार्ट कार्ड देण्यात येत आहेत. यासाठी नोंदणीची मुदत १० जानेवारीपर्यंत वाढवण्यात आली आहे. ही मुदत काल संपणार होती.

****

छत्रपती संभाजीनगर शहर बस सेवेत लवकरच ३२ इलेक्ट्रिक बस दाखल होणार आहेत. स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी जगदीश मिनियार यांनी ही माहिती दिली. या बससाठी चार्जिंग व्यवस्थेसह इतर कामं प्रगतीपथावर असल्याचं, मिनियार यांनी सांगितलं. ते म्हणाले..

‘‘छत्रपतीसंभाजीनगरमध्ये ३२ इलेक्ट्रीक बसेस, प्लस प्रधानमंत्री योजनेच्या आपल्याकडे आणखी १०० सिटी बस येणार आहेत. परंतू या बसेस येण्यापुर्वी आपल्याला त्याची जी पुर्वतयारी पाहिजे ज्याच्यामध्ये चार्जिंग पाँईट असणे अपेक्षीत आहे. त्याचं काम सध्या प्रगतीपथावर आहे. आणि जाधववाडी या ठिकाणी जो आता सिटीबसचा डेपो बनतोय त्याठिकाणी ते होणार आहे.आणि त्यामाध्यमातून आपल्याकडे बसेस येतील आणि त्यानुसार आपले रुट पण वाढतील आणि लोकांना अधिकाधिक चांगल्या सेवा आपल्याला त्याच्या माध्यमातून देता येतील.’’

****

महावितरणच्या छत्रपती संभाजीनगर शहर आणि ग्रामीण मंडल अंतर्गत येणाऱ्या वीजग्राहकांसाठी सर्व उपविभाग कार्यालयांत दोन आणि तीन जानेवारीला वीजबिल दुरुस्ती मेळावा आयोजित करण्यात आला आहे. सकाळी दहा ते दुपारी तीन या वेळेत हा मेळावा होणार आहे.

****

No comments: