Wednesday, 1 January 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 01.01.2025 रोजीचे सकाळी 11.00 वाजताचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 01 January 2025

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक: ०१ जानेवारी २०२५ सकाळी ११.०० वाजता.

****

देशभरात काल नवीन वर्षाचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. भारत आणि जगासाठी अधिक समावेशक आणि शाश्वत भविष्य घडवण्यासाठी एकत्रितपणे काम करण्याच्या वचनबद्धतेचं पुन्हा स्मरण करण्याचं आवाहन, राष्ट्रपतींनी यानिमित्त नागरीकांना केलं आहे.

२०४७ ला विकसित भारताकडे वाटचाल करताना संविधान निर्मात्यांच्या संकल्पनेला पूर्ण करण्यासाठी पुन्हा समर्पित होण्याची वेळ आली असल्याचं, उपराष्ट्रपती धनखड म्हणाले. तर पंतप्रधान मोदी यांनी, नवीन वर्षात नागरिकांना आरोग्य आणि समृद्धीच्या शुभेच्छा देत, हे वर्ष प्रत्येकाच्या जीवनात नवीन संधी, यश आणि आनंद घेऊन येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली.

****

छत्रपती संभाजीनगर इथं सर्वत्र नवीन वर्षाच्या स्वागताचा उत्साह दिसून आला. मध्यरात्री बारा वाजता तरुणाईनं जल्लोष करून नव्या वर्षाचं स्वागत केलं. या निमित्त आतिषबाजीही करण्यात आली. नववर्षानिमित्त जगभरातल्या हजारो भाविकांनी नांदेडमध्ये श्री सचखंड गुरुद्वारात हजेरी लावली.

जालना इथं नवीन वर्ष स्वागताच्या पार्श्वभूमीवर मद्यपान करून वाहन चालवणाऱ्यांची पोलिसांकडून तपासणी करण्यात आली.

****

पुणे जिल्ह्यातल्या कोरेगाव भिमा इथं दोनशे सातावा शौर्य दिन आज साजरा होत आहे. राज्यभरातून तसंच परराज्यातून लाखो आंबेडकर अनुयायी कालपासून कोरेगाव भिमा इथं दाखल झाले आहेत. याठिकाणी पुणे पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

****

भारताच्या मूलभूत उत्पादन क्षेत्रात गेल्या वर्षी चार पूर्णांक तीन दशांश टक्के वाढ नोंदवण्यात आली. वाणिज्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार सिमेंट, कोळसा, पोलाद, वीज, इंधन आणि खतांच्या उत्पादनात वाढ झाली आहे. दरम्यान, नैसर्गिक वायू आणि कच्च्या इंधनाच्या उत्पादनात सुमारे दोन टक्क्यांची घट झाली आहे.

****

२०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी विलंबित आणि सुधारित प्राप्तीकर परतावा भरण्यासाठी केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळानं १५ जानेवारीपर्यंत मुदतवाढ दिली आहे. ही मुदतवाढ व्यक्तीगत करदात्यांसाठी आहे.

****

रिझर्व्ह बँकेनं मुंबईतल्या सांगली सहकारी बँकेवर लादलेले निर्बंध २७ डिसेंबरपासून मागे घेतले आहेत. जुलै २०२२ मध्ये लावलेले हे निर्बंध, बँकेची आर्थिक परिस्थिती सुधारल्यानं हटवल्याचं, बँकेनं प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलं आहे.

****

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कालही पुढील शंभर दिवसांत करायच्या कामांच्या अनुषंगानं विविध विभागांची आढावा बैठक घेतली. पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभागाच्या कामांचा आढावा घेताना, जल जीवन मिशन योजनेची कामं युद्धपातळीवर पूर्ण करावीत. ही योजना संपूर्णपणे सौरउर्जेवर चालवावी अशा सूचना त्यांनी दिल्या. सहकार विभागाचा आढावा देखील मुख्यमंत्र्यांनी घेतला. साखर गळीत हंगामात ऊस क्षेत्र, ऊस उत्पादन आणि ऊस उत्पादकता याचा अचूक अंदाज येण्यासाठी कृत्रिम प्रज्ञा, रिमोट सेन्सिंग आणि जिओग्राफिक्स इन्फॉर्मेशन सिस्टीमचा वापर करावा, असं त्यांनी सांगितलं.

****

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि ग्रामविकास तसंच पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांनी काल आपापल्या मंत्रालयांचा पदभार स्वीकारला. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला प्राधान्य देणार असल्याचं सांगून, राज्यात दर्जेदार रस्त्यांचं जाळं विकसित करण्याचा शासनाचा प्रयत्न असेल, असं आश्वासन भोसले यांनी दिलं. तर ग्रामीण भागातल्या मूलभूत सोयी-सुविधा अधिक बळकट करण्यावर भर देण्यात येणार असून, गरिबांसाठीच्या घरकुल योजनेला बळकटी देण्यासाठी शंभर दिवसांत २० लाख घरकुलांना मान्यता देण्याचा संकल्प असल्याचं गोरे यांनी सांगितलं.

****

राज्य शासनाच्या वतीने आजपासून ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ हा उपक्रम राबवण्यात येत आहे. १५ जानेवारी पर्यंत चालणार्या या उपक्रमात अनेक ठिकाणी ग्रंथ प्रदर्शनासह विविध कार्यक्रम राबवण्यात येणार आहेत.

यानिमित्त हिंगोली इथल्या शासकीय जिल्हा ग्रंथालयात ग्रंथ प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती जिल्हा ग्रंथालय अधिकारी आशिष ढोक यांनी दिली. जिल्ह्यात या पंधरवड्यात या उपक्रमांतर्गत सामूहिक वाचन, वाचन कौशल्य, कार्यशाळा, वाचन संवाद, साहित्यिकांच्या मुलाखती, चर्चा, पुस्तक परीक्षण आणि कथन स्पर्धा आयोजित करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.

****

केंद्र शासनाच्या एक जिल्हा एक उत्पादन पुरस्कारासाठी राज्यातल्या १४ जिल्ह्यांना नामांकन मिळालं आहे. यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या काजू प्रक्रिया उद्योगाचा समावेश आहे. २०१८ मध्ये वेंगुर्ला काजूला जीआय मानांकन मिळालं असून, देशामध्ये काजूप्रक्रिया उद्योगात सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पहिला क्रमांक आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी दिली.

****

महावितरणच्या छत्रपती संभाजीनगर शहर आणि ग्रामीण मंडल अंतर्गत येणाऱ्या वीजग्राहकांसाठी सर्व उपविभाग कार्यालयांत उद्या दोन आणि तीन जानेवारीला वीजबिल दुरुस्ती मेळावा आयोजित करण्यात आला आहे. सकाळी दहा ते दुपारी तीन या वेळेत वीजबिलासंबंधित तक्रार असणाऱ्या ग्राहकांनी संबधित उपविभागीय कार्यालयाशी संपर्क साधावा, असं आवाहन परिमंडलाचे मुख्य अभियंता पवनकुमार कछोट यांनी केलं आहे. 

****

No comments: