Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 26 January 2025
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक २६ जानेवारी २०२५ सकाळी ७.१० मि.
****
• देशभरात ७६ व्या प्रजासत्ताक दिनाचा उत्साह, नवी दिल्लीत मुख्य सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ध्वजारोहण
• आर्थिक सुधारणांसाठीच्या धाडसी आणि दूरदर्शी निर्णयांमुळे देशाचा विकासदर कायम राहणार -राष्ट्रपतींचं प्रतिपादन
• शौर्य चक्रासह देशभरात ९४२ कर्मचाऱ्यांना शौर्य पदकं तसंच सेवा पदकं जाहीर
• पद्म पुरस्कारांची घोषणा; सात पद्मविभूषण, २६ पद्मभूषण आणि ११३ जणांना पद्मश्री सन्मान
• १५ वा राष्ट्रीय मतदार दिन विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा
आणि
• ज्येष्ठ साहित्यिक निवृत्त न्यायमूर्ती नरेंद्र चपळगांवकर यांच्या पार्थिव देहावर छत्रपती संभाजीनगर इथं अंत्यसंस्कार
****
देशाचा ७६ वा प्रजासत्ताक दिन आज साजरा होत आहे. नवी दिल्लीत साजऱ्या होत असलेल्या मुख्य सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ध्वजारोहण होईल. इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्रबोवो सुब्रियांतो हे या संचलन सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. यावर्षीच्या संचलनात इंडोनेशियाच्या १६० सैनिकांची एक तुकडी आणि १९० जणांचं लष्करी बॅंड पथक सहभागी होत आहे. भारतीय राज्यघटनेला ७५ वर्ष पूर्ण झाल्या निमित्तानं देशाच्या विविध राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे ३१ चित्ररथ सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमासाठी देशभरातून विविध ३४ क्षेत्रातल्या दहा हजार मान्यवरांना आमंत्रित करण्यात आलं आहे.
****
आर्थिक सुधारणांसाठीच्या धाडसी आणि दूरदर्शी निर्णयांमुळे देशाचा विकासदर कायम राहिल, असा विश्वास राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी व्यक्त केला आहे. काल राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात त्या बोलत होत्या. गेल्या काही वर्षात वाढत्या विकास दरामुळे युवकांसाठी रोजगाराच्या संधी वाढल्याचं राष्ट्रपतींनी नमूद केलं. त्या म्हणाल्या...
‘‘हाल के बर्सों मे आर्थिक विकास की डोर लगातार ऊंची रही है, जिससे हमारे युवाओं के लिये रोज़गार के अवसर पैदा हुये हैं. किसानों और मज़दुरों के हाथों मे अधिक पैसा आया है, तथा बडी संखिया मे लोगों को गरीबी से बाहर निकाला गया है, साहसिक और दूर्दशी आर्थिक सुधारों के बल पर आनेवाले वर्षों मे प्रगती की ये रफतार बनी रहेगी.’’
गेल्या ७५ वर्षांच्या काळात राज्यघटनेच्या मार्गदर्शनाशिवाय देशाची गौरवपूर्ण वाटचाल शक्य झाली नसती, असं राष्ट्रपतींनी नमूद केलं. राज्यघटना ही आपल्या सामुहिक अस्मितेचा मूलभूत आधार असल्याचं, त्यांनी म्हटलं आहे.
****
सैन्यदलात अतुलनीय धाडस आणि पराक्रमासाठी राष्ट्रपतींनी काल शौर्य चक्र जाहीर केले. यामध्ये कार्पोरेल दाभी संजय हिफ्फाबाये, फ्लाईट लेफ्टनंट अमनसिंह हंस यांचा समावेश आहे. वायू सेनेसाठीची सात वीरता पदकंही जाहीर झाली आहेत.
****
देशभरातल्या ९४२ कर्मचाऱ्यांना शौर्य पदकं तसंच सेवा पदकं काल जाहीर झाली. यामध्ये पोलिस, अग्निशमन, गृहरक्षक दल तसंच नागरी सुरक्षा आणि कारागृह प्रशासनातल्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. यामध्ये महाराष्ट्रातल्या एकूण ४३ पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना गौरवलं जाणार आहे. यासह रविंद्रकुमार सिंघल, दत्तात्रय कारळे, सुनील फुलारी आणि रामचंद्र केंडे या पोलीस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती विशिष्ट सेवा पदक जाहीर झालं आहे. तर ३९ पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना गुणवत्तापूर्ण सेवा पदक तर कारागृह सेवेतल्या पाच जणांना उत्कृष्ट सेवा पदक जाहीर झालं आहे.
जीवन रक्षा पदकंही काल जाहीर झाले. महाराष्ट्रातले शशिकांत गजबे यांना ‘उत्तम जीवन रक्षा पदक’ तर दादाराव पवार आणि ज्ञानेश्वर भेदोडकर यांना ‘जीवन रक्षा पदक’ पुरस्कार जाहीर झाला आहे.
****
छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस दलातले उपनिरीक्षक नजीर नसीर शेख यांना गुणवत्ता पूर्ण सेवेबद्दल राष्ट्रपती पदक जाहीर झालं आहे. आज छत्रपती संभाजीनगर इथं प्रजासत्ताक दिन सोहळ्यात पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते शेख यांना हे पदक प्रदान करण्यात येणार आहे.
****
पद्म पुरस्कार काल जाहीर झाले. प्रसिद्ध गायिका दिवंगत शारदा सिन्हा आणि प्रसिद्ध उद्योजक दिवंगत ओसामा सुझुकी यांच्यासह सात जणांना पद्मविभूषण, २६ पद्मभूषण आणि ११३ पद्मश्री पुरस्कारांचा यात समावेश आहे. लोकसभेचे माजी अध्यक्ष दिवंगत मनोहर जोशी, दिवंगत गायक पंकज उधास आणि भाजपचे ज्येष्ठ नेते दिवंगत सुशीलकुमार मोदी यांना मरणोत्तर पद्मभूषण सन्मान जाहीर झाला आहे. चित्रपट दिग्दर्शक शेखर कपूर, साध्वी ऋतंभरा आणि हॉकीपटू पी. आर. श्रीजेश यांनाही पद्मभूषण सन्मान घोषित झाला आहे. पद्मश्री पुरस्कार विजेत्यांमध्ये सुलेखनकार अच्युत पालव, उद्योजिका अरुंधती भट्टाचार्य, अभिनेता अशोक सराफ, शास्त्रीय गायिका अश्विनी भिडे - देशपांडे, सामाजिक कार्यकर्ता चैत्राम पवार, गायक अरिजीत सिंह, गायिका जसपिंदर नरुला, अरण्यऋषी मारुती चितमपल्ली, बासरीवादक रोणु मुजुमदार, कृषीतज्ज्ञ सुभाष शर्मा, डॉ. विलास डांगरे, चित्रकार वासुदेव कामत, आणि क्रिकेटपटू रविचंद्रन अश्विन यांचा यात समावेश आहे.
****
१५ वा राष्ट्रीय मतदार दिन काल देशभरात उत्साहात साजरा झाला. नवी दिल्ली इथं झालेल्या मुख्य कार्यक्रमात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते सर्वोत्तम निवडणूक पद्धती पुरस्कार प्रदान करण्यात आले. राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाला, निवडणुकीच्या सर्वोत्तम नियोजनासाठीचा पुरस्कार देण्यात आला, मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
राज्यातही राष्ट्रीय मतदार दिन विविध कार्यक्रमांनी साजरा झाला, राज्याचा मुख्य कार्यक्रम पुण्यात झाला. या निमित्तानं नागरिकांना मतदार शपथ देण्यात आली. या कार्यक्रमात छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त दिलीप गावडे आणि जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांना टपाली मतपत्रिका देवाण-घेवाण कार्यवाहीसाठी उत्कृष्ट नियोजनाचा पुरस्कार तसंच लातूरच्या जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांना उत्कृष्ट निवडणूक निर्णय अधिकारी २०२५ पुरस्कार प्रदान करण्यात आला.
बीड, परभणी, हिंगोलीसह सर्वत्र मतदार जनजागृती फेरी, रांगोळी स्पर्धा तसंच विविध कार्यक्रम घेण्यात आले. नांदेड इथं स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठातही विशेष कार्यक्रम घेण्यात आला. एक जानेवारी २०२५ रोजी वयाची १८ वर्षे पूर्ण करणाऱ्या तरुणांनी आपली नावे मतदार यादीत नोंदवावीत, असं आवाहन कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांनी यावेळी केलं.
****
ज्येष्ठ साहित्यिक निवृत्त न्यायमूर्ती नरेंद्र चपळगांवकर यांच्या पार्थिव देहावर काल सायंकाळी छत्रपती संभाजीनगर इथं शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. चपळगांवकर यांचं काल पहाटे निधन झालं, ते ८८ वर्षांचे होते. साहित्य, कला, राजकीय, सामाजिक, प्रसारमाध्यमं, विधी आणि न्याय, उद्योग, वैद्यकीय, प्रशासन आदी क्षेत्रातल्या मान्यवरांनी चपळगांवकर यांचं अंत्यदर्शन घेऊन त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चपळगावकर यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.
****
शिवसैनिकांनी शासकीय योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहचवावी, असं आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. जालना इथं शिवसेनेच्या आभार मेळाव्यात ते काल बोलत होते. गाव तिथे शाखा, घर तिथे शिवसैनिक, असं अभियान राबवण्याचं आवाहन शिंदे यांनी केलं.
****
मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी काल पुन्हा अंतरवाली सराटी इथं आमरण उपोषणाला सुरुवात केली. मराठा समाजाला ओबीसीतून कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं, सगेसोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी तातडीनं करावी, आदी मागण्यांचा जरांगे यांनी पुनरुच्चार केला आहे.
****
राष्ट्रीय पर्यटन दिन काल सर्वत्र साजरा झाला. छत्रपती संभाजीनगर इथं पर्यटन क्षेत्रात कार्यरत मराठवाडा पर्यटन विकास संघटनेकडून विविध सामाजिक कार्यक्रम सातत्याने राबवले जातात, मराठवाड्यातल्या सांस्कृतिक, धार्मिक, ऐतिहासिक स्थळांचा प्रसार आणि प्रचार करण्यासोबतच स्थानिक कलावंतांना व्यासपीठ देण्यासाठी आपली संघटना कार्यरत असल्याचं, संघटनेचे अध्यक्ष जयंत गोरे यांनी सांगितलं. ते म्हणाले...
‘‘ह्या संस्था उभ्या करण्यामागचा हाच उद्देश होता की, मराठवाड्यातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये असणारे पर्यटनस्थळे त्याचप्रमाणे आपला सांस्कृतिक धरोवर जपणारी लोकं, सांस्कृति कार्यक्रम करणारी लोकं, कलाकार यांना सगळ्यांना लोकल प्लॅटफॉर्म मिळाला पाहिजे आणि त्यामुळे मराठवाड्यात पर्यटन ह्या संस्थेची सुरवात झाली. आज या संस्थेमार्फत अनेक कार्य केले जातात. आपल्या जिल्ह्यामध्ये असणारे छोटे छोटे मंदिरं आहेत, किंवा त्या मंदिरांमध्ये जो जीर्णोद्धार असेल, किंवा त्याच्या व्यतिरिक्त असणारे सांस्कृतिक छोटे छोटे कलाकार आहेत, त्यांचे कार्यक्रम्स असतील, तर या सगळ्यांना कसा प्लॅटफॉर्म तयार करून देता येईल यावर सगळ्यात जास्त भर दिला जातो.’’
****
दुसऱ्या टी - ट्वेंटी क्रिकेट सामन्यात भारताने इंग्लंडवर दोन गडी राखून विजय मिळवला. काल चेन्नई इथं झालेल्या या सामन्यात इंग्लंडच्या संघाने दिलेलं १६६ धावांचं लक्ष्य भारतीय संघाने विसाव्या षटकाचे चार चेंडू आणि दोन गडी शिल्लक असतांना पूर्ण केलं. ७२ धावा करणारा तिलक वर्मा सामनावीर ठरला. या विजयाबरोबरच भारत पाच सामन्यांच्या मालिकेत दोन - शून्यनं आघाडीवर आहे. मालिकेतला तिसरा सामना येत्या २८ तारखेला राजकोट इथं खेळला जाईल.
****
धाराशिव जिल्ह्यात आगामी पाच वर्षात गाव तिथे एसटी बस सुरू करण्याचा प्रयत्न करणार असल्याचं, राज्याचे परिवहन मंत्री तथा धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितलं आहे. ते काल धाराशिव इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. धाराशिव बस स्थानकाचं काम एप्रिल अखेर पर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या असून, धाराशिव जिल्ह्याला ५० नवीन एसटी बस देणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
****
लातूरमध्ये पालकमंत्री छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या उपस्थितीत काल संविधान गौरव सभा पार पडली. सर्व जाती, धर्माच्या लोकांना एकत्रित बांधून ठेवण्याचं काम भारतीय संविधानाने केल्याचं, भोसले म्हणाले.
****
ऑल इंडिया योगा आणि कल्चर फाउंडेशनच्या राष्ट्रीय योगासन स्पर्धेत अंबाजोगाईचे योगगुरू उत्रेश्वर पांचाळ यांनी रौप्यपदक मिळवल्यानं आंतरराष्ट्रीय योगासन स्पर्धेसाठी ते पात्र ठरले आहेत.
****
मनमाड-येवला महामार्गावर अनकवाडेजवळ रेल्वे पुलावरून एक कठडा तोडून रेल्वे ट्रॅकवर जाऊन ट्रॅक कोसळला. त्यामुळे मनमाडकडून पुण्याकडे जाणारी रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. रात्री उशिरापर्यंत रेल्वे ट्रॅकवरून अपघातग्रस्त ट्रक हटवण्याचे काम सुरू होतं. या अपघातात सुदैवाने चालक बचावला असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
नांदेड इथल्या प्रजासत्ताक दिन सोहळ्यात आज, जिल्हा क्रीडा अधिकारी -जिल्हा पुरस्कार प्रदान होणार आहेत. गेल्या चार वर्षांचे पुरस्कार आज देण्यात येतील.
****
No comments:
Post a Comment