Tuesday, 15 April 2025

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 15.04.2025 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date: 15 April 2025

Time: 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक: १५ एप्रिल २०२५ सकाळी ११.०० वाजता.

****

भारतीय संविधान वेळोवेळी काळाच्या कसोटीवर सिद्ध झालं असून, यामुळे देश सुदृढ, स्थिर आणि एकजुट असल्याचं सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत काल डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्राद्वारे आयोजित पहिल्या आंबेडकर स्मारक व्याख्यानात ते बोलत होते. मागील काही वर्षात देशाने बाहेरील दबाव आणि अंतर्गत अस्वस्थतेचा सामना केला, मात्र तरीही देशातली ही एकात्मता कायम असल्याचं गवई यांनी नमूद केलं. 

****

गेल्या आर्थिक वर्षात, डिसेंबर अखेर देशातल्या औषध आणि वैद्यकीय उपकरण निर्मिती क्षेत्रात, ११ हजार ८८८ कोटी रुपयांची थेट परकीय गुंतवणूक झाली आहे. याशिवाय ब्राउनफिल्ड प्रकल्पांमधल्या सात हजार २४६ लाख रुपयांच्या परदेशी गुंतवणूक प्रस्तावांना मान्यता देण्यात आली. यामुळे या क्षेत्रातली एकूण विदेशी गुंतवणूक १९ हजार १३४ कोटी रुपये झाली असल्याची माहिती, औषधनिर्माण विभागानं दिली आहे. सरकारच्या उत्पादन संलग्न प्रोत्साहन योजनेमुळे देशांतर्गत औषध उत्पादनाला चालना मिळाली असून, परकीय गुंतवणुकीचा ओघही वाढला आहे. 

****

आरक्षण कायद्यात अनुसूचित जातीत वेगळी वर्गवारी करुन त्याची अंमलबजावणी करणारं तेलंगणा हे देशातलं पहिलं राज्य ठरलं आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचं औचित्य साधत काल तेलंगणा सरकारनं आरक्षण कायद्याचा शासन आदेश जारी केला. यानुसार तेलंगणातल्या ५६ अनुसूचित जाती आता तीन गटात वर्गीकृत केल्या आहेत. या उपगटांमुळे अनुसूचित जातींना असलेल्या आरक्षणांचा लाभ समान पद्धतीने मिळू शकेल. 

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०४७ पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्याचं ध्येय समोर ठेवलं असून, या विकसित राष्ट्राच्या जडणघडणीत  भारतीय राजस्व सेवा - आय आर एस ची भूमिका ही महत्त्वाची असल्याचं, केंद्रीय अर्थराज्यमंत्री पंकज चौधरी यांनी म्हटलं आहे. नागपूर मधल्या प्रत्यक्ष कर अकादमी - एन ए डी टी इथं ७७ व्या तुकडीतील भारतीय आय आर एस च्या दीक्षांत समारंभात तसंच सेवापूर्व प्रशिक्षणाच्या समारोपाच्या प्रसंगी ते काल बोलत होते. भारत ही वेगाने वाढणाऱ्या निवडक अर्थव्यवस्थांपैकी एक असून,  देशाच्या वित्तीय प्रशासनाचा  भारतीय राजस्व सेवा  हा कणा असल्याचं सांगून, चौधरी यांनी, भारतीय राजस्व सेवेचं महत्त्व अधोरेखित केलं. या कार्यक्रमात रॉयल भूतान सेवेच्या दोन अधिकाऱ्यांसह ८४ आय आर एस अधिकारी प्रशिक्षणार्थींनी १६ महिन्यांचं सेवा पूर्व प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर कर प्रशासकाची शपथ घेतली. 

****

सिंधुदुर्गमधल्या सिंधुदुर्ग, पद्मदुर्ग, राजकोट, आणि सर्जेकोट या चार किल्ल्यांचा अभ्यास करण्यासाठी मुंबई विद्यापिठात स्वतंत्र अध्यासन केंद्र सुरू करणार असल्याची घोषणा, सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी केली. त्यासाठी सांस्कृतिक कार्य विभागातर्फे ५० लाख रुपयांचा निधी देण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. सिंधुदुर्ग किल्ल्याला, १२ एप्रिल रोजी ३५८ वर्षे पूर्ण झाली, त्यानिमित्त मुंबईत आयोजित कार्यक्रमात ते काल बोलत होते. या चार किल्ल्यांबद्दल अजूनही मोठ्या प्रमाणात माहिती जनतेसमोर येणं आवश्यक असल्याचं शेलार म्हणाले. 

****

छत्रपती शिवाजी महाराज यांचं स्मारक अरबी समुद्रापेक्षा मुंबईत राजभवन परिसरातल्या ४० एकर जागेत व्हावं, अशी मागणी खासदार उदयनराजे भोसले यांनी केली. ते काल सातारा इथं बोलत होते. साताऱ्यात डॉ. आंबेडकर राहत होते त्या जागेवर स्मारक होण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. महापुरुषांविषयी अवमानकारक वक्तव्य करणाऱ्याविरोधात कडक कायदा होण्याबाबत लवकरच निर्णय होईल, असंही उदयनराजे यांनी सांगितलं. 

****

नाशिकमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त साकारण्यात आलेल्या त्यांच्या आठ फुटी पेनच्या प्रतिकृतीची गोल्डन बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद झाली आहे. सेवादलाचे अध्यक्ष डॉ. वसंत ठाकूर यांच्या संकल्पनेतून ही प्रतिकृती साकारण्यात आली. डॉ. आंबेडकर यांनी देशाचं संविधान ज्या पेननं लिहिलं, त्या पेनच्या या प्रतिकृतीचं पूजन खासदार डॉ. शोभा बच्छाव आणि मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं. 

****

अरबी समुद्राजवळ भारतीय सागरी सीमेजवळ गुजरात दहशतवाद विरोधी पथक आणि भारतीय तटरक्षक दलाने नुकत्याच केलेल्या कारवाईत, एक हजार ८०० कोटी रुपये किमतीचे ३०० किलो अंमली पदार्थ जप्त करण्यात आले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यानी या कारवाईबाबत भारतीय तटरक्षक दल आणि गुजरात पोलिसांचं अभिनंदन केलं आहे. 

****

मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी सात कोटी ८५ लाख रुपये किमतीचे ७८५ ग्रॅम अंमली पदार्थ जप्त केले. याप्रकरणी एका परदेशी नागरिकाला अटक करण्यात आली आहे.

****

अमेरिकेत फ्लोरिडा इथं सुरू असलेल्या तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत पुरुषांच्या वैयक्तिक रिकर्व प्रकारात भारताच्या धीरज बोम्मदेवरानं कांस्य पदक पटकावलं. पुरुषांच्या या स्पर्धेतलं धीरजचं हे दुसरं पदक आहे. या विजयासह या स्पर्धेत एक सुवर्ण, एक रौप्य आणि दोन कांस्य अशा एकंदर चार पदकांसह भारत पदकतालिकेत चौथ्या स्थानावर राहिला. 

****


No comments: