Sunday, 20 April 2025

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक: २० एप्रिल २०२५ सकाळी ७.१० मि.

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date: 20 April 2025

Time: 7.10 to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक: २० एप्रिल २०२५ सकाळी ७.१० मि.

****

विविध योजनांच्या माध्यमातून मराठवाड्याला दुष्काळमुक्त करण्याच्या संकल्पाचा मुख्यमंत्र्यांकडून पुनरुच्चार-टंचाईग्रस्त जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना उपाययोजना राबवण्याचे आदेश 

गडचिरोली जिल्ह्यात चार जहाल नक्षलवाद्यांना पोलिसांकडून अटक 

अनियमितता, गैरव्यवहार आणि नियमांचं उल्लंघन होत असल्याबद्दल राज्यातल्या सर्व ५७ वाळू डेपोंना सरकारची नोटीस 

रत्नागिरी जिल्ह्यातल्या मालगुंड इथं पुस्तकाचं गाव उपक्रमाचं आज उद्घाटन 

आणि 

मराठवाड्यात सर्वत्र तापमान ४२ पार

समुद्रात वाहून जाणारं त्रेपन्न टीएमसी पाणी गोदावरीच्या खोऱ्यात आणण्याची योजना प्रगतीपथावर असून, या वर्षाअखेर किंवा पुढच्या वर्षाच्या प्रारंभी हे काम सुरू होईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. बीड जिल्ह्यातल्या घाटशील पारगाव इथं ‘नारळी सप्ताह’ सांगता समारोहात ते काल बोलत होते. कृष्णा कोयनेच्या पुराचं पाणी मराठवाड्यात आणण्याच्या योजनेलाही मंजुरी दिली असून, पुढच्या महिन्यात याची निविदा काढली जाईल, असं त्यांनी सांगितलं. या योजनांच्या माध्यमातून मराठवाड्याला दुष्काळमुक्त करण्याचा संकल्प मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. ते म्हणाले... 

बाईट – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, आमदार सुरेश धस, आमदार नमिता मुंदडा, आमदार मोनिका राजळे, यांच्यासह अनेक मान्यवर या सोहळ्याला उपस्थित होते. गहिनीनाथ गडाच्या विकासाचा मुद्दा पंकजा मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांसमोर मांडला. त्याला मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत, गडासह गडावर येणाऱ्या भाविकांच्या विकासाची ग्वाही दिली. ते म्हणाले...  

बाईट – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी छत्रपती संभाजीनगर इथं वार्ताहरांशी संवाद साधला. राज्यातल्या अनेक भागातली पाणी टंचाई दूर करण्यासाठी आराखडा तयार करत असून, टंचाईग्रस्त जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना यावर उपाययोजना करण्याचे आदेश दिल्याचं त्यांनी सांगितलं. 

****

गडचिरोली जिल्ह्यातल्या भामरागड तालुक्यात फेब्रुवारी महिन्यात झालेल्या चकमकीत सहभागी असलेल्या चार जहाल नक्षलवाद्यांना, गडचिरोली पोलिसांनी काल अटक केली. त्यात रघु आणि जैनी या दाम्पत्यासह झाशी तलांडे आणि मनिला गावडे यांचा समावेश आहे. या चारही नक्षलवाद्यांवर ४० लाख रुपये बक्षीस होतं, अशी माहिती पोलिसांनी दिली. 

****

मराठीसाठी आणि महाराष्ट्राच्या हितासाठी सगळी किरकोळ भांडणं सोडून सर्व मराठी माणसांनी एकत्र यावं, असं माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. काल मुंबईत कामगार सेनेच्या मेळाव्यात ते बोलत होते. महाराष्ट्र मोठा आहे आणि त्याच्या अस्तित्वाच्या समोर उद्धव ठाकरे यांच्यासोबतची भांडणं फार किरकोळ असल्याचं मत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी एका मुलाखतीत व्यक्त केलं होतं, त्यावर उद्धव ठाकरे यांनी नाव न घेता ही प्रतिक्रिया दिली. 

****

राज्यातल्या वाळू डेपोंमधली अनियमितता, गैरव्यवहार आणि नियमांचं उल्लंघन होत असल्याचं निदर्शनास आल्यानं, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यातल्या सर्व ५७ वाळू डेपोंना नोटीस बजावली आहे. त्यांनी विभागीय आयुक्तांमार्फत राज्यातल्या डेपोंचा वस्तुस्थितीदर्शक अहवाल तीन दिवसांत मागितला असून, नियमांचं पालन न करणारे डेपो रद्द करण्याचा इशारा दिला आहे. नदीच्या वाळूवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी कृत्रिम वाळू धोरण लवकरच मंत्रिमंडळापुढे सादर करण्यात येईल, असंही बावनकुळे यांनी सांगितलं. 

****

संविधान अमृत महोत्सव आणि भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त आज मुंबईत गेटवे ऑफ इंडिया इथं सांगितिक मानवंदना कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमात अनेक मान्यवर कलाकार सहभागी होत आहेत. 

****

ईस्टर संडे आज साजरा होत आहे. ख्रिस्ती धर्मानुसार, प्रेषित येशू ख्रिस्ताने सुळावर चढवल्यानंतर तिसऱ्या दिवशी मृत्यूतून पुनरुत्थान केल्याचं मानलं जातं. त्याची आठवण म्हणून ईस्टर संडे साजरा केला जातो. राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी ईस्टरनिमित्त राज्यातल्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. ईस्टरनिमित्तानं ठिकठिकाणच्या चर्चमधून विशेष प्रार्थनेसह अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. 

****

रत्नागिरी जिल्ह्यातल्या मालगुंड इथं पुस्तकाचं गाव या उपक्रमाचं आज, मराठी भाषा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते उद्घाटन हस्ते होणार आहे. कोकणातल्या साहित्यिकांची माहिती देणाऱ्या कोकण साहित्य सन्मान दालनाचं उद्घाटनही या वेळी होणार आहे. यासंदर्भात अधिक माहिती देणारा हा वृत्तांत... 

बाईट – अनिकेत  कोंकर रत्नागिरी वार्ताहर

****

जागतिक वारसा दिनानिमित्त राज्याचे मुख्य पोस्टमास्टर जनरल अमिताभ सिंग यांनी विशेष कॅन्सलेशन शिक्का जारी केला आहे. महाराष्ट्र बारव मोहिमेचे समन्वयक रोहन काळे तसंच मराठवाडा प्राचीन वास्तु संवर्धन समितीचे श्रीकांत उमरीकर यांनी याबाबत दिलेल्या माहितीवर आधारित हा विशेष वृत्तांत... 

बाईट – हर्षवर्धन  दीक्षित

****

केंद्र आणि राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागामार्फत राबवल्या जाणाऱ्या योजनांचा लाभ प्रत्येक पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोवण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याच्या सूचना, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केल्या आहेत. ते काल लातूर इथं बोलत होते. शिष्यवृत्ती योजनेपासून कोणताही पात्र विद्यार्थी वंचित राहू नये तसंच वसतिगृहात चांगल्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, असं आठवले यांनी सांगितलं. 

****

धाराशिव जिल्ह्यातल्या तुळजापूर इथल्या तुळजाभवानी महाविद्यालयात काल पदवीप्रदान समारंभ झाला. डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे सिनेट सदस्य तथा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष देविदास पाठक यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जीवन पवार यांच्यासह शिक्षक आणि विद्यार्थी यावेळी उपस्थित होते. 

****

जालना जिल्ह्यात महावितरणच्या वीजचोरी विरोधातल्या कारवाईत तब्बल ४८९ वीजचोऱ्या पकडण्यात आल्या. यामध्ये २५३ जणांनी वेगवेगळ्या माध्यमातून २ लाख ४७ हजार ४३३ युनिट वीजेची चोरी केली. या सर्वांना ३७ लाख ८० हजार रुपयांची देयकं देण्यात आली आहेत. 

****

मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेंर्तंगत हिंगोली जिल्ह्यातल्या आठशे भाविकांना घेऊन हिंगोली - अयोध्या ही रेल्वे काल रवाना झाली. या भाविकांसोबत एक वैद्यकीय अधिकाऱ्यांसह सात जणाचं आरोग्य पथक आणि २५ कर्मचारी पाठवण्यात आले आहेत. 

****

परभणी इथं इकबाल नगरमध्ये काल लहान मुलांच्या किरकोळ वादातून दगडफेकीची घटना घडल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. यामुळे या भागात काही काळ तणाव निर्माण झाला होता. यात वाहनांचं नुकसान झालं. पोलिस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांच्या नेतृत्वात पोलिस पथकानं घटनास्थळी जाऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. 

****

एप्रिल महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात उन्हाचा पारा आता ४२ अंश सेल्सिअसच्या पुढे जात आहे. उन्हाच्या या वाढत्या तीव्रतेमुळं पैठण इथल्या जायकवाडी धरणाच्या पाण्याचं मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन होत आहे. मागीलवर्षी समाधानकारक पाऊस झाला होता, त्यामुळे जायकवाडी धरण १०० टक्के भरलं होतं. 

****

राज्यात काल सर्वाधिक ४४ पूर्णांक दोन अंश सेल्सिअस तापमान अकोला इथं नोंदवलं गेलं. मराठवाड्यातही सर्वत्र तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे. काल छत्रपती संभाजीनगर तसंच नांदेड इथं सुमारे ४२ अंश, परभणी इथं ४२ पूर्णांक तीन, तर बीड इथं ४३ पूर्णांक चार अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. 

****


No comments: