Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date
– 01 April 2025
Time
7.10 AM to 7.20 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०१ एप्रिल २०२५ सकाळी ७.१० मि.
****
·
राष्ट्रपतींच्या उपस्थितीत रिझर्व्ह बँकेच्या ९० व्या
वर्षपूर्ती सोहळ्याचा मुंबईत कार्यक्रम
·
केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना आजपासून एकीकृत निवृत्ती
वेतन योजनेचा पर्याय उपलब्ध
·
औरंगजेबाची कबर हे संरक्षित स्मारक; त्याचं उदात्तीकरण
करू नये- मुख्यमंत्र्यांचा इशारा
·
खासगी शैक्षणिक संस्थांमध्ये SC, ST आणि
OBC साठी राखीव जागांसाठी कायदा करण्याची काँग्रेसची मागणी
·
ईद -उल - फित्र अर्थात रमजान ईदचा सण सर्वत्र उत्साहात
साजरा
आणि
·
एप्रिल ते जून हा कालावधी यंदा जास्त उष्ण राहण्याची शक्यता
हवामान विभागाकडून व्यक्त
****
भारतीय
रिझर्व्ह बँकेच्या ९०व्या वर्षपूर्ती सोहळ्याचा आज समारोप होणार आहे. या समारंभासाठी
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं काल मुंबईत आगमन झालं. विमानतळावर राष्ट्रपतींच्या
स्वागतासाठी राज्यपाल सी पी राधाकृष्णन तसंच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक
मान्यवर उपस्थित होते. त्यानंतर राजभवनात राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा
देऊन राष्ट्रपतींचं स्वागत केलं. राष्ट्रपतींच्या प्रमुख उपस्थितीत आज रिझर्व्ह बँकेचा
९० वा स्थापना दिन साजरा होणार आहे.
****
केंद्र
सरकारी कर्मचाऱ्यांना आजपासून UPS-Unified Pension Scheme अर्थात एकीकृत
निवृत्ती वेतन योजनेचा पर्याय उपलब्ध होत आहे. NPS अर्थात राष्ट्रीय
निवृत्ती वेतन योजनेचे सदस्य असलेल्या कर्मचाऱ्यांना, तीन महिन्यात
NPS किंवा UPS यापैकी एक पर्याय निवडायचा
आहे. एक एप्रिल २००४ नंतर केंद्र सरकारच्या सेवेत रुजू झालेल्या २३ लाख कर्मचाऱ्यांना
यासाठी ऑनलाइन नोंदणी करता येईल. यात किमान २५ वर्ष सरकारी सेवा केलेल्या कर्मचाऱ्यांना
शेवटच्या वर्षभराच्या मूळ वेतनाच्या सरासरीच्या किमान ५० टक्के इतकं निवृत्ती वेतन
मिळेल. सेवानिवृत्त कर्मचाऱ्याच्या निधनानंतर कुटुंबाला निवृत्ती वेतनाच्या ६० टक्के
इतकी रक्कम मिळेल. किमान १० वर्ष सेवा झालेल्या कर्मचाऱ्यांना UPS अंतर्गत किमान १० हजार रुपये निवृत्ती वेतनाची हमी देण्यात आली आहे. दरम्यान,
राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना सुधारित निवृत्ती वेतन योजनेचा पर्याय
निवडण्याची मुदत काल संपणार होती, सरकारने यासाठी आता वर्षभराची
मुदतवाढ दिली आहे.
****
मुगल शासक
औरंगजेबाची कबर हे संरक्षित स्मारक आहे, मात्र त्याचं उदात्तीकरण करू दिलं जाणार
नाही, असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.
ते काल नागपुरात वार्ताहरांशी बोलत होते.
बाईट - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
छत्रपती
संभाजीनगर जिल्ह्यात खुलताबाद इथली औरंगजेबाची कबर काढून टाकण्याची मागणी गेले काही
दिवस हिंदुत्त्ववादी संघटना करत होत्या, त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचं
हे वक्तव्य महत्त्वाचं मानलं जात आहे.
****
देशातल्या
खासगी, बिगरअल्पसंख्यक शैक्षणिक संस्थांमध्येही अनुसूचित जाती,
अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्गीयांसाठी राखीव जागा ठेवाव्यात यासंदर्भात
सरकारनं कायदा आणावा, अशी मागणी काँग्रेसनं केली आहे. या प्रवर्गातल्या
नागरिकांच्या प्रगतीसाठी विशेष कायदे करायचा अधिकार सरकारला देणाऱ्या राज्यघटनेतल्या
कलम १५, पोटकलम १५च्या अंमलबजावणीसाठी शिक्षण, महिला, युवा आणि क्रीडा क्षेत्रातल्या संसदीय समितीनंही
नव्या कायद्याची शिफारस केल्याचं काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी म्हटलं आहे.
****
शिर्डी
औद्योगिक वसाहतीत होणाऱ्या डिफेन्स क्लस्टर प्रकल्पामुळे जिल्ह्याच्या लौकिकात भर पडणार
असल्याचा विश्वास, राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.राधाकृष्ण
विखे पाटील यांनी व्यक्त केला आहे. सावळीविहीर खुर्द इथं डिफेन्स क्लस्टरअंतर्गत निबे
ऑर्डनन्स ग्लोबल लिमिटेड कंपनीच्या भूमिपूजनप्रसंगी ते काल बोलत होते. या क्लस्टरमुळे
शिर्डी परिसराच्या औद्योगिक विकासाला चालना मिळून रोजगारात वाढ होईल, असा विश्वास विखे पाटील यांनी व्यक्त केला.
****
देशभरात
ईद-उल-फित्र अर्थात रमजान ईदचा सण काल उत्साहात साजरा झाला. या सणासाठी चंद्रदर्शन
होताच, मुस्लीम धर्मियांच्या पवित्र रमजान महिन्याच्या तीस दिवसांच्या
उपवासाची सांगता होते.
छत्रपती
संभाजीनगर इथं छावणी तसंच उस्मानपुरा परिसरातल्या ईदगाह मैदानासह विविध ठिकाणी सामुहिक
नमाज पठण करण्यात आलं. यावेळी बंदोबस्तावर असलेले पोलिस अधिकारी तसंच कर्मचाऱ्यांचा
एमआयएम पक्षाकडून सत्कार करण्यात आला.
हिंगोली
इथंही काल सकाळी ईदगाह मैदानावर मुस्लिम बांधवांनी नमाज अदा करून एकमेकांना शुभेच्छा
दिल्या. जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी पोलिसांच्या वतीने ईदच्या शुभेच्छा
दिल्या.
नांदेड
इथं देगलूर नाका परिसरातल्या ईदगाह मैदानावर नमाज अदा करण्यात आली.
जालना शहरातल्या
कदीम जालना इदगाह मैदानावर सामुहिक नमाज अदा करण्यात आली. याठिकाणी आयोजित कार्यक्रमात
आमदार अर्जुन खोतकर यांनी ईदच्या शुभेच्छा दिल्या.
****
बीड जिल्ह्यात
गेवराई तालुक्यातल्या अर्धमसला इथं धार्मिक स्थळ स्फोट प्रकरणी, विजय गव्हाणे
आणि श्रीराम सागडे या दोन संशयित आरोपींना विशेष न्यायालयानं तीन एप्रिलपर्यंत पोलिस
कोठडी सुनावली आहे. हे दोघेही आरोपी अर्धमसला गावातले रहिवासी आहेत.
दरम्यान, दहशतवाद विरोधी
पथक-एटीएस आता या प्रकरणाचा समांतर तपास करणार आहे. आरोपींनी स्फोटासाठी जिलेटिन कुठून
आणलं, या स्फोटामागे नेमका कोणाचा हात आहे, याबाबत चौकशी होणार आहे.
दरम्यान, दोन्ही आरोपींवर
यूएपीए कायदा लागू करावा, अशी मागणी माजी खासदार सय्यद इम्तियाज
जलील यांनी केली आहे. छत्रपती संभाजीनगर इथं रमजान ईदच्या नमाजानंतर ते पत्रकारांशी
बोलत होते. नागपूर हिंसाचारातल्या आरोपीचं घर पाडण्यात आलं, तशीच
कारवाई याही प्रकरणात करावी, असंही त्यांनी म्हटलं आहे.
****
बीड जिल्हा
कारागृहात काल दोन कैद्यांमधे किरकोळ कारणावरुन बाचाबाची, आणि नंतर
हाणामारी झाली. मात्र या मारहाण प्रकरणाशी सुदर्शन घुले, वाल्मीक
कराड यांचा संबंध नाही, असं करागृह अधिक्षक बी.एन. मुलाणी यांनी
सांगितलं. या कारागृहातून चार जणांची काल सायंकाळी छत्रपती संभाजीनगर इथल्या हर्सुल
कारागृहात रवानगी करण्यात आली.
आमदार सुरेश
धस यांनी यासंदर्भात बोलतांना, संतोष देशमुख हत्या प्रकरणातल्या आरोपींना
बीड कारागृहातून अमरावती किंवा नागपूरच्या कारागृहात हलवावं, अशी मागणी केली.
दरम्यान, महायुतीच्या
सरकारच्या काळात राज्यातल्या कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न अत्यंत गंभीर झाल्याची टीका,
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांनी गृहखात्याचा मोह सोडून राज्याला पूर्णवेळ गृहमंत्री द्यावा,
अशी मागणीही त्यांनी केली.
****
संपूर्ण
देशभरात यंदा एप्रिल ते जून हा कालावधी नेहमीपेक्षा जास्त उष्ण राहण्याची शक्यता आहे.
हवामानशास्त्र विभागाचे प्रमुख मृत्युंजय मोहपात्रा यांनी ही माहिती दिली. देशाच्या
मध्य, पूर्व आणि वायव्य भागात या काळात उष्णतेच्या सहसा चार ते सात लाटा
येतात, यंदा त्यांची संख्या दुप्पट होण्याची शक्यता असून केवळ
तुरळक ठिकाणचे अपवाद वगळता तापमान सरासरीपेक्षा जास्त राहील. या काळात वाढलेल्या उष्म्यामुळे
विजेची मागणी देखील ९ ते १० टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे.
दरम्यान, महाराष्ट्रात
काल सर्वात जास्त ४२ पूर्णांक चार अंश सेल्सिअस तापमान चंद्रपूर इथं नोंदवलं गेलं.
मराठवाड्यात धाराशिव इथं ३८ पूर्णांक सात अंश, छत्रपती संभाजीनगर
इथं ३९, परभणी इथं ३९ पूर्णांक नऊ तर बीड आणि नांदेड इथं ४० अंश
सेल्सिअसहून अधिक तापमानाची नोंद झाली.
दरम्यान, जालना जिल्ह्यातल्या
काही भागात काल रात्री मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. घनसावंगी तालुक्यातल्या तीर्थपुरी,
मुरमा, खालापूरी आणि मासेगाव इथं जोरदार वाऱ्यासह
पाऊस झाला. या अवकाळी पावसामुळे काढणीस आलेला गहू आणि इतर पिकांचं नुकसान होण्याची
भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली.
****
वाढत्या
उन्हाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी, असं छत्रपती
संभाजीनगर जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी डॉ अभय धानोरकर यांनी म्हटलं आहे. आकाशवाणीला
दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी हे आवाहन केलं. ते म्हणाले...
बाईट - डॉ अभय धानोरकर
****
परभणी जिल्हा
परिषदेच्या महिला आणि बालविकास विभागाअंतर्गत जिल्ह्यातल्या आदर्श अंगणवाडी सेविका, मदतनीस,
पर्यवेक्षिका आणि बाल प्रकल्प विकास अधिकारी यांना जिल्हा परिषदेच्या
मुख्य कार्यकारी अधिकारी नतिशा माथुर यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. शासनाच्या
मिशन शंभर दिवस, लेक लाडकी आणि पोषण टॅंकर या योजनांची प्रभावीपणे
अंमलबजावणी करणार्या कर्मचार्यांना यात समावेश आहे.
****
No comments:
Post a Comment