Tuesday, 15 April 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 15.04.2025 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 15 April 2025

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ५ एप्रिल २०२ दुपारी १.०० वा.

****

भारतातून हज यात्रेला जाणाऱ्या भाविकांचा कोटा वाढवून, तो यावर्षी एक लाख पंच्याहत्तर हजार इतका करण्यात आला आहे. २०१४ मध्ये ही संख्या एक लाख छत्तीस हजार इतकी होती. अल्पसंख्यक मंत्रालयानं सामाजिक माध्यमावरच्या एका संदेशातून ही माहिती दिली. या कोट्यापैकी एक लाख बावीस हजार भाविकांना हज समितीच्या माध्यमातून तर उरलेल्या भाविकांना खाजगी यात्रा कंपन्यांकडून पाठवण्यात येणार आहे. सौदी अरेबियाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार हज यात्रेसाठी वाहतूक, निवास शिबिरं यासह अन्य सर्व तयारी पूर्ण झाल्याचं, अल्पसंख्याक मंत्रालयानं या संदेशातून कळवलं आहे.

****

यावर्षी तीन जुलै ते नऊ ऑगस्ट या कालावधीत होणार असलेल्या अमरनाथ यात्रेसाठीची नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. या यात्रेला जाऊ इच्छिणाऱ्या भाविकांना श्री अमरनाथजी श्राइन बोर्डाच्या, जेके एस ए एस बी डॉट एन आय सी डॉट इन, या संकेतस्थळावर नोंदणी करता येणार आहे. नोंदणीचं शुल्क प्रति व्यक्ती दोनशे वीस रुपये, इतकं आहे. या संकेतस्थळाशिवाय, देशभरातल्या पाचशे चाळीस अधिकृत केंद्रांवरही भाविकांना ही नोंदणी करता येणार आहे.

****

पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद जिल्ह्यात झालेल्या हिंसाचार प्रकरणात, पश्चिम बंगालचे राज्यपाल डॉक्टर सीव्ही आनंद बोस यांनी हस्तक्षेप करावा, अशी मागणी भारतीय जनता पक्षानं केली आहे. या प्रकरणी भाजपनं सर्वोच्च न्यायालयातही एक याचिका दाखल केली असून, न्यायालयाच्या देखरेखीखाली विशेष तपास पथकाकडून या प्रकरणाचा तपास व्हावा, अशी मागणी केली आहे.

****

सक्तवसुली संचालनालय-ईडी आज राजस्थानचे माजी मंत्री प्रतापसिंह खाचरियावास यांच्या निवासस्थानासह अन्य पंधरा स्थानांवर छापे घालून तपासणी करत आहे. मेसर्स पी ए सी एल या कंपनीशी संबंधित अठ्ठेचाळीस हजार कोटी रुपयांच्या मोठ्या गुंतवणूक घोटाळ्याप्रकरणी ही तपासणी सुरू आहे.

****

केंद्र सरकारने कायदेशीर मापनशास्त्र सामान्य नियम, २०११ अंतर्गत गॅस मीटरसाठी मसुदा नियम तयार केले आहेत. या नियमांनुसार, घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक वापरासाठी गॅस मीटरची चाचणी, पडताळणी आणि मुद्रांकन करणं बंधनकारक करण्यात आलं आहे. या नियमांचं उद्दिष्ट गॅसच्या मोजमापात अचूकता, पारदर्शकता आणि विश्वासार्हता सुनिश्चित करणं हा आहे, तसेच वापराच्या दरम्यान पुनर्पडताळणी देखील आवश्यक असेल.

****

केंद्र सरकारच्या वतीने देण्यात येणारे राष्ट्रीय महामार्ग सर्वोत्तम पुरस्कार आज नवी दिल्लीत प्रदान करण्यात येणार आहेत. राष्ट्रीय महामार्ग बांधण्यात तसंच त्याची कायम गुणवत्ता राखून देखभाल करताना उत्तम कामगिरी करणाऱ्या व्यावसायिक संस्था आणि व्यक्तींना या पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. तसंच यानिमित्ताने दिवसभर विविध चर्चासत्र आणि परिसंवाद आयोजित करण्यात आले आहे.

****

डिजिटल अरेस्ट प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये सहभाग असल्यामुळे केंद्रीय अन्वेषण संस्था - सीबीआयनं चार व्यक्तींना अटक केली आहे. अशा प्रकरणांच्या तपासासाठी सीबीआयनं ऑपरेशन चक्र- व्ही, हे अभियान सुरू केलं असून, त्याअंतर्गत झालेल्या या कारवाईत मुंबई आणि उत्तर प्रदेशातल्या मोरादाबाद इथून प्रत्येकी दोन व्यक्तींना ताब्यात घेण्यात आलं. या चार जणांना न्यायालयानं पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. डिजिटल अरेस्टच्या गुन्ह्यांमागची यंत्रणा उध्वस्त करणं, हा ऑपरेशन चक्र-व्ही, या अभियानाचा उद्देश आहे.

****

गडचिरोली पोलिसांनी राबवलेल्या विविध लोकोपयोगी उपक्रमांमुळे प्रभावीत होऊन शरण आलेल्या नक्षलवाद्यांसाठी पोलिसांनी प्रोजेक्ट संजीवनी हा नवा उपक्रम सुरु केला आहे. या उपक्रमांतर्गत शरण आलेल्या नक्षलवाद्यांना हक्काचं निवासस्थान मिळावं यासाठी चार रो-हाऊसेस तयार करण्यात येणार आहेत; त्याचं भूमिपूजन पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांच्या हस्ते काल झालं. राज्य शासनाने २००५ पासून नक्षल्यांसाठी आत्मसमर्पण योजना सुरु केली. ही योजना आणि गडचिरोली पोलिसांनी राबवलेले लोकोपयोगी उपक्रम बघून आतापर्यंत ७०४ नक्षल्यांनी पोलिसांपुढे शरणागती पत्करली आहे. यातल्या बहुतांश जणांचं पुनर्वसन पोलिसांनी केलं आहे.

****

लातूर शहरात इंडियानगर तसंच अंबाजोगाई रोड परिसरात अनेक भागात काही दिवसांपासून लातूर महापालिकेच्या नळांमधून कधी कधी पिवळ्या आणि काळसर रंगाच्या पाण्याचा पुरवठा होत असल्यानं आरोग्याचा प्रश्न उद्भवण्याची शक्यता आहे. सतत असं पाणी येत असतानाही महानगरपालिका काहीही उपाययोजना करत नसल्याचा आरोप, लातूरचे नागरिक करत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

बुलढाणा जिल्ह्यात खामगाव-नांदुरा रस्त्यावर आमसरी गावाजवळ, विटांनी भरलेला ट्रक आणि मध्यप्रदेश परिवहन मंडळाची बस, यांची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात चार जण जागीच मृत्युमुखी पडले तर अन्य १० जण गंभीर जखमी झाले आहेत. आज सकाळी नऊच्या सुमारास ही दुर्घटना घडली.

****

No comments: