Wednesday, 16 April 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 16.04.2025 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 16 April 2025

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक १६ एप्रिल २०२ सकाळी ७.१० मि.

****

·      नवजात अर्भक चोरी झाल्यास संबंधित रुग्णालयाचा परवाना रद्द करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश

·      कैद्यांच्या कोठडीतल्या मृत्यूप्रकरणी भरपाईला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी-लातूरच्या पूरणमल लाहोटी तंत्रनिकेतनमध्ये अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाला मान्यता

·      जलसंपदा विभागाच्या जल व्यवस्थापन कृती पंधरवड्याला प्रारंभ

·      शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार जाहीर, छत्रपती संभाजीनगरची ज्युदोपटू श्रद्धा चोपडेला पुरस्कार

आणि

·      मराठवाड्यासह राज्यात पुढील आठवड्यात कमाल तापमानात दोन ते तीन अंश सेल्सिअसची वाढ होण्याची शक्यता

****

एखाद्या रुग्णालयातून नवजात अर्भकाची चोरी झाल्यास सर्वात आधी त्या रुग्णालयाचा परवाना रद्द करण्यात यावा, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत. उत्तर प्रदेशातल्या बाल तस्करीच्या प्रकरणात आरोपींकडून दाखल जामीन अर्जावर, काल न्यायालयात सुनावणी झाली. बाल तस्करीच्या प्रकरणांची सुनावणी सहा महिन्यांमध्ये पूर्ण करण्याचे निर्देश उच्च न्यायालयांनी कनिष्ठ न्यायालयांना द्यावेत, असं न्यायमूर्ती जे.बी.पारडीवाला आणि आर. महादेवन यांच्या पीठानं सांगितलं. याशिवाय, या प्रकरणांची सुनावणी दररोज करावी, आणि हे निर्देश पाळण्यात कुचराई झाल्यास तो न्यायालयाचा अवमान समजला जाईल, असा इशाराही सर्वोच्च न्यायालयानं दिला आहे.

****

देशात पथकर वसुलीसाठी नवी यंत्रणा केंद्र सरकारच्या विचाराधीन असल्याचं, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलं आहे. मुंबईत काल दादरच्या अमर हिंद मंडळाच्या वसंत व्याख्येनमालेत ते बोलत होते. उपग्रहाच्या मदतीनं मुक्त पथकर प्रणाली तयार केली जात असून, प्रवासाच्या एकूण मार्गाचा पथकर थेट वाहन मालकाच्या बँक खात्यामधून कापला जाईल, असं त्यांनी सांगितलं.

****

नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिकांनी ग्रामीण भागात स्वेच्छा सेवा दिल्यास त्यासाठी त्यांना क्रेडीट पॉईंट द्यावेत, अशी सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेला केली आहे. या सूचनेनुसार सातत्यपूर्ण वैद्यकीय शिक्षण अर्थात सी एम ई प्रणालीत काही महत्त्वपूर्ण सुधारणा केल्याची माहिती परिषदेनं दिली आहे. डॉक्टरांना वैद्यकीय परवान्याचं नूतनीकरण करताना या पॉइंट्सची मदत होईल, तसंच ग्रामीण भागातल्या लोकांना तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचारही मिळणार आहेत.

****

राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाच्या निर्देशानुसार, कैद्यांच्या कोठडीतल्या मृत्यूप्रकरणी भरपाई देण्याच्या धोरणाला राज्य मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. काल मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या धोरणानुसार कारागृहात काम करताना झालेला अपघात, वैद्यकीय अधिकाऱ्यांचा निष्काळजीपणा, कारागृह कर्मचाऱ्यांची मारहाण किंवा कैद्यांच्या आपापसातील भांडणामुळे कैद्याचा मृत्यू झाल्यास, तसंच संबंधित प्रकरणात प्रशासनाचा निष्काळजीपणा चौकशीतून सिद्ध झाल्यास, कैद्याच्या वारसांना पाच लाख रुपयांची भरपाई दिली जाणार आहे. राज्यातल्या सर्व कारागृहांमध्ये हे धोरण लागू असेल. इतरही अनेक निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आले..

महानगरपालिकांच्या स्थावर मालमत्ता नगरपरिषदा, नगरपंचायती, औद्योगिक नगरीतील मालमत्ता भाडेपट्ट्याने देण्याच्या नियमांमध्ये एकवाक्यता आणण्यात येणार हे. त्याकरिता नवीन दरांबाबत अधिसूचना काढण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. या भागांतल्या मालमत्ता करांची वसुली व्हावी, यासाठी यावरचा दंड अंशतः माफ करण्याची अभय योजना लागू करण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला.

नगरपरिषदा, नगरपंचायती आणि औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ मध्ये सुधारणा करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतला. नगर परिषदा, नगरपंचायती तसंच औद्योगिक नगरींच्या नगराध्यक्षांना बहुमतानं हटवण्याच्या तरतुदींना मंत्रिमंडळानं या बैठकीत मान्यता दिली.

लातूरच्या पुरणमल लाहोटी शासकीय तंत्रनिकेतन मध्ये आगामी शैक्षणिक वर्ष २०२५-२६ पासून अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने या बैठकीत घेतला आहे.’’

****

राज्यातल्या शिधावाटप दुकानदारांच्या कमिशनमध्ये प्रतिक्विंटल २० रुपयांची वाढ करुन ते १५० रुपयांवरुन १७० रुपये करण्यात येणार आहे. उपमुख्यमंत्री तथा अन्न आणि नागरीपुरवठा मंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. केंद्राची मान्यता असलेल्या आणि नाफेडमार्फत उपलब्ध होणाऱ्या दहा जीवनावश्यक वस्तूंची विक्री शिधावाटप दुकानातून करण्यास परवानगी देण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला.

****

शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कार २०२३-२४ क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांनी काल जाहिर केले. माजी राष्ट्रीय कबड्डीपटू, संघटक शंकुतला खटावकर यांना जीवनगौरव तर पॅरा ऑलिम्पिक पदक विजेता सचिन खिलारी, जागतिक विजेते आदिती स्वामी, ओजस देवतळे, क्रिकेटपटू शिवम दुबे, ऋतुराज गायकवाड, यशस्वी जयस्वाल आणि छत्रपती संभाजीनगरची ज्युदोपटू श्रद्धा चोपडे यांना शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारानं गौरवलं जाणार आहे. एकूण ८९ पुरस्कारांची घोषणा काल करण्यात आली. येत्या शुक्रवारी पुण्यात राज्यपलांच्या हस्ते या पुरस्कारांचं वितरण होणार आहे.

****

नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी सक्तवसुली संचालनालयानं मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी आणि इतरांविरुद्ध आरोपपत्र दाखल केलं आहे. विशेष न्यायाधीश विशाल गोगणे यांनी या आरोपपत्राची तपासणी केली आणि पुढची प्रक्रिया येत्या २५ तारखेला होईल, असं सांगितलं. आरोपपत्रातल्या इतर नावांमधे काँग्रेसनेते सॅम पित्रोदा आणि सुमन दुबे यांचाही समावेश आहे.

****

जलसंपदा विभागामार्फत राज्यात ३० एप्रिल पर्यंत जल व्यवस्थापन कृती पंधरवडा २०२५चं आयोजन करण्यात आलं आहे. छत्रपती संभाजीनगर, परभणी, लातूर, हिंगोली, नांदेड आणि बीडसह ठिकठिकाणच्या जिल्हा मुख्यालयांमध्ये, या जल व्यवस्थापन कृती पंधरवड्याचं उद्घाटन काल करण्यात आलं. छत्रपती संभाजीनगर इथं जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन तसंच जलपूजन करण्यात आलं. उपस्थितांना यावेळी जलबचत प्रतिज्ञा देण्यात आली. या पंधरवड्यात राबवल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांबाबत गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक संतोष तीर्मनवार यांनी अधिक माहिती दिली...

बाईट – संतोष तीर्मनवार

****

बीड जिल्ह्यात तीन ठिकाणी पुरावे नसताना बोगस पद्धतीनं मोठ्या प्रमाणावर जन्मदाखले देण्यात आल्याचे प्रकार झालेले असून, परळीतलं महसूल प्रशासन यात आघाडीवर असल्याचा आरोप, भाजप नेते किरीट सोमैय्या यांनी केला आहे. त्यांनी काल परळी पोलीस ठाण्याला भेट देत, सर्व संबंधितांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. याप्रकरणी दोन- तीन दिवसात गुन्हा दाखल करण्यात येईल असं आश्वासन पोलीस अधिकाऱ्यांनी दिल्याचं सोमैय्या यांनी प्रसार माध्यमांना सांगितलं.

दरम्यान, बांगलादेशी घुसखोरांच्या नावाखाली मुस्लिम समाजाला लक्ष्य केलं जात असल्याचा आरोप करत, सोमय्या यांना काल परळीत काही जणांनी काळे झेंडे दाखवल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

छत्रपती संभाजीनगर इथं महाराणा प्रताप यांच्या अश्वारूढ पुतळ्याचं अनावरण येत्या १८ तारखेला संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांच्या हस्ते होणार आहे. खासदार डॉ भागवत कराड यांनी काल पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. शहरात कॅनॉट परिसरातल्या उद्यानात हा पुतळा उभारण्यात आला आहे.

****

बीड इथं आज राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा गुंतवणूक परिषद होत आहे. या परिषदेत उद्योजकांनी सहभागी व्हावं, असं आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक किरण जाधव यांनी केलं आहे.

****

छत्रपती संभाजीनगर शहरात स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशनच्या वतीने चालवण्यात येण्याऱ्या शहर बस सेवेच्या तिकीटाच्या दरामध्ये २० टक्के वाढ करण्यात आली आहे. ही दरवाढ आजपासून लागू झाली.

****

हिंगोली जिल्ह्यात सेनगाव तालुक्यातल्या आडोळ इथं कार्यरत असलेला ग्रामसेवक मोहन जाधव याला पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडलं. सिंचन विहिरीच्या तसंच काकांच्या घरकुलाच्या देयकावर स्वाक्षरी करण्यासाठी त्यानं ही लाच मागितली होती.

****

यंदा जून ते सप्टेंबर या कालावधीत सरासरीच्या पाच टक्के अधिक पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. भारतीय हवामान विभागाचे महासंचालक डॉक्टर मृत्यूंजय मोहपात्रा यांनी नवी दिल्ली इथं पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. देशातल्या अनेक भागात सामान्य ते सामान्यापेक्षा अधिक पाऊस पडेल, तसंच ईशान्य आणि वायव्य भारतात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे.

****

मराठवाड्यासह राज्यात सर्वत्र उन्हाचा जोर असून, पुढच्या चार ते पाच दिवसात कमाल तापमानात दोन ते तीन अंशांची वाढ होण्याची शक्यता मुंबईच्या प्रादेशिक हवामान केंद्रानं वर्तवली आहे. मात्र येत्या सतरा तारखेपर्यंत नांदेड, धाराशिव, लातूर जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह हलका पाऊस होण्याची शक्यताही आहे.

दरम्यान, राज्यात काल सर्वाधिक ४३ अंश सेल्सिअस तापमान अकोला इथं नोंदवलं गेलं. मराठवाड्यात बीड इथं सुमारे ४२ अंश, धाराशिव इथं सुमारे ४० अंश, छत्रपती संभाजीनगर इथं ४० पूर्णांक आठ तर परभणी इथं ४१ पूर्णांक सहा अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

****

No comments: