Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 16 April 2025
Time 11.00 to 11.05 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: १६ एप्रिल
२०२५ सकाळी ११.०० वाजता.
****
कृत्रिम बुद्धिमत्तेच्या
माध्यमातून प्रशासनात आमूलाग्र सुधारणा घडवून आणण्याच्या दृष्टीनं राज्य शासन आणि आय बी एम टेक्नॉलॉजी यांच्यात मुंबईत सामंजस्य करार करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री
एकनाथ शिंदे, आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते. या कराराअंतर्गत मुंबई, पुणे आणि नागपूर या तीन ठिकाणी एआय कौशल्य आणि उत्कृष्टता केंद्र उभारली जाणार आहेत. मुंबईत भौगोलिक
विश्लेषणासाठी, पुण्यात न्यायवैद्यकीय विज्ञानाच्या पायाभूत सुविधांसाठी तर नागपूरमध्ये प्रगत एआय संशोधना संदर्भातलं केंद्र स्थापन केलं जाणार आहे.
****
राज्यातल्या २० औद्योगीक
प्रशिक्षण संस्थांमध्ये अत्याधुनिक प्रयोगशाळा उभारण्यात येणार आहे. मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांच्या
उपस्थितीत काल कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नावीन्यता विभागाचे तीन सामंजस्य करार करण्यात आले. याअंतर्गत सूक्ष्म आणि लघु उद्योजकांच्या प्रशिक्षणासाठी मेळावे, तसंच आयटीआयमध्ये शिकणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांना तांत्रिक शिक्षण देऊन रोजगाराच्या संधी वाढवण्यात येणार
आहेत. यासाठी २०२५-२६ पासून पुढील चार वर्षांत प्रशिक्षण दिलं जाणार आहे.
****
राज्यातल्या उद्योग
क्षेत्रातल्या गुंतवणूकीच्या संधी, उत्पादनांची निर्यातवृद्धी तसंच औद्योगिक विकासासाठी मुंबईत आज जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषद होत आहे. यामध्ये प्रमुख उद्योग क्षेत्राबाबत चर्चासत्र, क्षेत्रांमधल्या गुंतवणूकीच्या संधी, इतर क्षमता असलेल्या गुंतवणूक आणि व्यवसाय संधीबाबत चर्चा, सामंजस्य करार स्वाक्षरी बाबत कार्यक्रम यांचा समावेश आहे. महाराष्ट्रातले गुंतवणूकदार आणि व्यवसायांना एकत्र व्यासपीठ
उपलब्ध करुन देणं हा या परिषदेचा उद्देश आहे.
****
जलसंपदा विभागामार्फत
राज्यात ३० एप्रिल पर्यंत जल व्यवस्थापन कृती पंधरवडा २०२५चं आयोजन करण्यात आलं आहे. हिंगोली तालुक्यातल्या अंभेरी साठवण तलाव इथं अप्पर जिल्हाधिकारी अनिल माचेवाड यांच्या हस्ते या कृती पंधरवड्याचं उद्घाटन आणि जलपूजन करण्यात आलं.
परभणी इथं जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या उपस्थितीत या पंधरवड्याचं उद्घाटन झालं. सर्वसामान्य नागरिकांनी पुढाकार घेऊन या उपक्रमात सहभागी होण्याचं आवाहन त्यांनी केलं. यावेळी उपस्थितांना जलबचत प्रतिज्ञा देण्यात आली.
लातूर इथं जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या हस्ते जलपूजनाने या पंधरवड्याचं
उद्घाटन झालं. पाण्याची उपलब्धता आणि त्याचा योग्य वापर
याबाबत जनजागृती करणं ही काळाची गरज असल्याचं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं. जल व्यवस्थापन कृती पंधरवड्यांतर्गत गावोगावी चित्ररथाद्वारे जनजागृती केली
जाणार असून, या चित्ररथाला जिल्हाधिकार्यांनी हिरवा झेंडा दाखवून रवाना केलं.
****
अखिल भारतीय मराठी नाट्य
परिषदेचं शंभरावं विभागीय नाट्य संमेलन येत्या २४ एप्रिलपासून नागपुरमध्ये होणार आहे. परिषदेचे अध्यक्ष आणि
अभिनेता प्रशांत दामले यांनी काल नागपूरमध्ये पत्रकार परिषदेत
ही माहिती दिली. या संमेलनात व्यावसायिक नाटक, लोककलेवरील कार्यक्रम, स्थानिक शाखेचे आणि कलावंतांचं सादरीकरण तसंच बालकलावंतांची विशेष प्रस्तुती असणार आहे.
****
नाशिक शहरात द्वारका जवळील काठेगल्ली सिग्नल भागात काल रात्री
बारा वाजेच्या सुमारास जमावाने दगडफेक केल्याने सुमारे २१ पोलीस जखमी झाले असून, तीन पोलीस वाहनांची तोडफोड करण्यात आली. जमावाला पांगवण्यासाठी पोलीसांनी
अश्रुधूराच्या नळकांड्या फोडल्या, त्यानंतर
मध्यरात्री स्थिती नियंत्रणात आली. या सिग्नल जवळ असलेल्या बेकायदेशीर दर्ग्याचं
बांधकाम काल सकाळी महापालिकेच्या मदतीने शांततेत हटवण्यात आलं होतं.
****
महसूल गुप्तचर विभागानं नवी
दिल्लीतल्या इंदिरा गांधी
आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका व्यक्तीकडून ७५ कोटी रुपयांहून अधिक किमतीचं साडेसात किलोपेक्षा जास्त कोकेन जप्त केलं. अंमली पदार्थ विरोधी मोहिमेअंतर्गत काल दुबईवरुन आलेल्या या प्रवाशाची झडती घेतली असता त्याच्याकडे हे कोकेन आढळलं. या कोकेनचा स्रोत, आणि यामागे एखादं तस्करीजाळं आहे का, याचा शोध
घेण्यासाठी महसूल गुप्तचर संचालनालय अधिक तपास करत आहे.
****
कोल्हापूर जिल्ह्यात
माद्याळ या गावातल्या शेतीतून ऊसामध्ये लावलेला दोन लाखाहून अधिक किमतीचा सुमारे बावीस किलो वजनाचा गांजा पोलीसांनी जप्त केला. पोलीसांच्या
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनं ही कारवाई करत, अंमली पदार्थांची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना ताब्यात
घेतलं.
****
बीड जिल्ह्यात अंबाजोगाई तालुक्यात जवळगाव इथं ५० वर्षापासून भुमीहिन दलीत कसत असलेली गायरान जमीन ताब्यात घेण्यासाठी शासनानी
सुरू केलेली दडपशाही थांबवून त्यांची अतिक्रमणं नियमाकुल करण्यात यावी, या प्रमुख मागणीसाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या
वतीने काल परळी इथल्या उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली.
****
पेरु इथं आयोजित आयएसएसफ नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत भारताने काल प्रत्येकी एक सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदकांची कमाई केली. महिलांच्या १० मीटर एयर पिस्टल स्पर्धेत सुरुचि सिंहने सुवर्ण, तर मनु भाकरने रौप्य पदक जिंकलं. तर पुरुषांच्या १० मीटर एयर पिस्टल स्पर्धेत सौरभ चौधरीने कांस्य पदक जिंकलं.
****
No comments:
Post a Comment