Thursday, 17 April 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 17.04.2025 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 17 April 2025

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक १७ एप्रिल २०२५ सकाळी ७.१० मि.

****

या शैक्षणिक वर्षापासून पहिलीसाठी सीबीएसई आधारित अभ्यासक्रम लागू करण्याचा शासन आदेश जारी 

आगामी सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या नावाची शिफारस 

राज्यातल्या तमाशा आणि कलाकेंद्र कलावंतांच्या तक्रारींचं निवारण करण्यासाठी दोन स्वतंत्र समित्या स्थापन

अंबाजोगाई हे कवितांचं गाव म्हणून ओळखलं जाणार-मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांची घोषणा 

आणि

यंदाचा लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार ज्येष्ठ उद्योजक कुमार मंगलम बिर्ला यांना जाहीर 

****

राज्यात सीबीएसईच्या धर्तीवर नवीन अभ्यासक्रम लागू करण्याचा शासन आदेश काल जारी झाला. या शैक्षणिक वर्षापासून पहिलीसाठी, पुढच्या शैक्षणिक वर्षापासून दुसरी, तिसरी, चौथी आणि सहावीसाठी, २०२७-२८ पासून पाचवी, सातवी, नववी आणि अकरावीसाठी, तर २०२८-२९ ला आठवी, दहावी आणि बारावीसाठी CBSE अभ्यासक्रमाची अंमलबजावणी केली जाणार आहे. 

आधीच्या प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक या स्तराऐवजी नव्या शैक्षणिक धोरणानुसार पायाभूत स्तर, पूर्वतयारी स्तर, पूर्व माध्यमिक स्तर आणि माध्यमिक स्तर अशी रचना करण्यात आली आहे. या धोरणाअंतर्गत अभ्यासक्रमासाठी राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने तयार केलेली NCERT आधारित पुस्तकं लागू होणार आहेत. 

****

शैक्षणिक सुविधा लोकाभिमुख करण्यासाठी ‘महाज्ञानदीप’ या देशातल्या पहिल्या शिक्षण पोर्टलचं काल मंत्रालयात उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते लोकार्पण झालं. डिजिटल शिक्षणाच्या दिशेनं महाराष्ट्राची वाटचाल सुरू झाल्याचं ते यावेळी म्हणाले. 

****

सरन्यायाधीश न्यायमूर्ती संजीव खन्ना यांनी पुढचे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या नावाची शिफारस केंद्रीय कायदा मंत्रालयाकडे केली आहे. गवई सध्या सर्वोच्च न्यायालयाचे दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात वरिष्ठ न्यायाधीश आहेत. सरन्यायाधीश खन्ना हे येत्या १३ मे रोजी सेवानिवृत्त होणार आहेत. 

****

राज्य परिवहन महामंडळाच्या प्रवाशांना आरोग्यदायी आणि किफायतशीर सुविधा न देणारे हॉटेल-मोटेल थांबे रद्द करण्याचे निर्देश, परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत. लांब पल्ल्याच्या मार्गावर एसटीच्या सर्व थांब्याचं सर्वेक्षण करून त्याचा अहवाल पुढील १५ दिवसात सादर करण्याची सूचना त्यांनी केली. प्रवाशांच्या आरोग्याशी तडजोड न करता अशा थांब्यावर कारवाईचे निर्देश सरनाईक यांनी दिले. 

****

राज्यातल्या तमाशा आणि कलाकेंद्र कलावंतांच्या विविध तक्रारींचं निवारण करण्यासाठी दोन स्वतंत्र समित्या गठित करण्याचा निर्णय, सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी घेतला आहे. या समित्या फडमालक आणि कलावंतांच्या समस्या समजून घेऊन, उपाययोजना सुचवतील, अशी माहिती त्यांनी दिली. 

****

बीड इथं जिल्हा गुंतवणूक परिषद काल घेण्यात आली. उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या परिषदेच्या माध्यमातून स्थानिक उद्योजकांनी ९०० कोटी रुपये गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला. यातून असंख्य रोजगार निर्मिती होईल, असा विश्वास सामंत यांनी व्यक्त केला. बीड इथं कौशल्य विकास केंद्र उभारण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. 

दरम्यान, अंबाजोगाई हे कवितांचं गाव म्हणून जाहीर करणार असल्याची घोषणा मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी काल केली. ऐकूया या संदर्भातला हा विशेष वृत्तांत.. 

मराठीचे आद्यकवी मुकुंदराज यांची कर्मभूमी असलेलं अंबाजोगाई हे कवितांचं गाव म्हणून ओळखलं जाणार आहे. अमरावती इथल्या नियोजित मराठी विद्यापीठाची सहा उपकेंद्रं राज्यभरात होणार आहेत, त्यापैकी एक उपकेंद्र अंबाजोगाई इथं व्हावं, अशी विनंती उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांना करणार असल्याचं सामंत यांनी सांगितलं. मुकुंदराजांच्या विवेकसिंधू या ग्रंथाची शासनामार्फत उपलब्धता तसंच राज्य शासनाच्या विविध वाङ्गमय पुरस्कारांमध्ये मुकुंदराजांच्या नावे पुरस्कार देण्यासंदर्भातही सामंत यांनी माहिती दिली.

बाईट – उदय सामंत, मराठी भाषा मंत्री


प्रसिद्ध साहित्यक दगडू लोमटे यांनी या निर्णयाबद्दल आनंद व्यक्त करत, या निर्णयामुळे वाचन संस्कृतीला अधिक चालना मिळेल, तसंच वाचकांना आणि मराठी साहित्याच्या अभ्यासकांना याचा मोठा लाभ होईल, असा विश्वास व्यक्त केला. 

बाईट – दगडू लोमटे


अंबाजोगाईत गेली वीस वर्ष पुस्तक वाचक चळवळ चालवणारे आणि त्यातूनच पुस्तकपेटी उपक्रम राबवणारे अभिजीत जोंधळे यांनी या निर्णयाबद्दल समाधान व्यक्त केलं आहे. 

बाईट – अभिजीत जोंधळे

****

मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानच्या वतीनं दिला जाणारा यंदाचा लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार, आदित्य बिर्ला समूहाचे अध्यक्ष पद्मविभूषण कुमार मंगलम बिर्ला यांना जाहीर झाला आहे. बिर्ला यांच्या दूरदर्शी नेतृत्वासाठी आणि भारताच्या विकासाच्या गाथेत दिलेल्या प्रचंड योगदानासाठी त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कारांची घोषणाही काल करण्यात आली. अभिनेत्री श्रद्धा कपूर, सोनाली कुलकर्णी, अभिनेते सुनील शेट्टी, सचिन पिळगावकर, शरद पोंक्षे गायिका रीवा राठोड, यांच्यासह दिग्गज व्हायोलिन वादक पद्मभूषण डॉ. एन.  राजम आणि साहित्यात श्रीपाल सबनीस यांनाही गौरवण्यात येणार आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते २४ एप्रिलला मुंबईत या पुरस्कारांचं वितरण होणार आहे.

****

धावत्या रेल्वेगाडीत ए टी एम सुविधेला कालपासून प्रारंभ झाला. मुंबई - मनमाड मार्गावर धावणारी पंचवटी एक्सप्रेस ही एटीएम सुविधा असलेली देशातली पहिली रेल्वे गाडी ठरली आहे. मध्य रेल्वेचा भुसावळ विभाग आणि बँक ऑफ महाराष्ट्राच्या सहकार्याने ही सुविधा वातानुकूलित डब्यात लावण्यात आली असून, काल त्याची चाचणी यशस्वी झाली. 

****

धाराशिव जिल्ह्यात उद्योगाच्या वाढीस चालना देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात एक खिडकी योजना सुरू करण्यात येणार असल्याची माहिती, जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी दिली. काल धाराशिव इथं जिल्हा गुंतवणूक परिषद २०२५ चं उद्घाटन केल्यानंतर, ते बोलत होते. या परिषदेमध्ये जिल्ह्याच्या औद्योगिक विकासासाठी आवश्यक असलेल्या बाबींवर सखोल चर्चा झाली. 

****

टाटा टेक्नॉलॉजी कंपनीने बीड जिल्ह्यासाठी १९१ कोटी रुपये खर्चून नवीन ‘सेंटर फॉर इन्व्हेंशन, इनोव्हेशन,  इक्युबेशन अॅन्ड ट्रेनिंग’ - सी आय आय आय टी स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. तशा आशयाचं पत्र कंपनीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पाठवलं आहे. बीड जिल्ह्यातल्या विद्यार्थी, युवकांना औद्योगिक प्रशिक्षण,  तांत्रिक कौशल्य विकासाच्या माध्यमातून उद्योगक्षम बनवण्यासह रोजगार, स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करुन देण्यासाठी सीआयआयआयटी स्थापन करण्याची घोषणा अजित पवार यांनी केल्यानंतर टाटा टेक्नॉलॉजी कंपनीने हा निर्णय घेतला आहे. नव्या सेंटरमधून दरवर्षी सात हजार युवकांना प्रशिक्षित केलं जाणार आहे. 

****

धाराशिव जिल्ह्यातल्या ६२१ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी सरपंच पदाची आरक्षण सोडत काल काढण्यात आली. यात अनुसूचित जाती प्रवर्गासाठी १००, अनुसूचित जमातीसाठी १३, नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी १६६ तर खुल्या प्रवर्गासाठी ३४२ ग्रामपंचायतींचं सरपंच पद असेल.

****

नांदेडच्या समाज कल्याण विभागामार्फत जिल्ह्यातल्या अनुसूचित जाती आणि नवबौद्ध विद्यार्थांची शैक्षणिक सहल काल नांदेडहून श्रीहरिकोटाकडे रवाना झाली. माहूर, हदगाव, उमरी, नायगाव तालुक्यातले ६० विद्यार्थी या सहलीत सहभागी झाले आहेत. 

****

ऑल इंडिया पर्सनल लॉ बोर्डच्या वतीने काल बीड इथं वक्फ सुधारणा विधेयकाच्या विरुद्ध आंदोलन करण्यात आलं. यावेळी मानवी साखळी करून नव्या वक्फ कायद्याविरुद्ध घोषणा देण्यात आल्या. 

****

नांदेड पोलीस परिक्षेत्रीय कार्यालयाच्या संकेतस्थळाचं काल स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांच्या हस्ते लोकार्पण झालं. या संकेतस्थळामुळे पोलीस विभाग समाजाभिमुख होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

****

लातूर जिल्ह्यात पाणीटंचाई निवारणासाठी केल्या जाणाऱ्या कामांना प्राधान्य देण्याचे निर्देश, जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिले. त्यांनी काल दूरदृश्य प्रणालीद्वारे झालेल्या बैठकीत जिल्ह्यातल्या विविध विकास कामांचा आढावा घेतला. ज्या वाड्या, वस्ती आणि गावांमध्ये पाणीटंचाई असेल, तिथे तातडीने उपाययोजना राबवण्याची सूचना भोसले यांनी केली. 

****

छत्रपती संभाजीनगर इथं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं काल पाणीप्रश्नी आंदोलन करण्यात आलं. विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे, माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्या नेतृत्वाखालील या आंदोलनादरम्यान विविध ठिकाणच्या भिंतीवर पाणी समस्येसंदर्भातल्या घोषणा, रिकाम्या हंड्यांचे तोरण लावण्यात आले.

****

हवामान 

राज्यात काल सर्वाधिक ४३ पूर्णांक सात अंश सेल्सिअस तापमान अकोला इथं नोंदवलं गेलं. मराठवाड्यात धाराशिव इथं ४० पूर्णांक आठ अंश, छत्रपती संभाजीनगर इथं ४१ पूर्णांक सहा तर परभणी इथं ४१ पूर्णांक आठ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. 

****


No comments:

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 30.12.2025 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 30 December 2025 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छ...