Friday, 18 April 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 18.04.2025 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date - 18 April 2025

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक १८ एप्रिल २०२ दुपारी १.०० वा.

****

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आज छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर येत आहेत. दुपारी साडेचार वाजता विशेष विमानाने ते शहरात पोहोचतील, सिडको परिसरात कॅनॉट इथल्या उद्यानात उभारण्यात आलेल्या महाराणा प्रताप यांच्या अश्वारूढ पुतळ्याचं अनावरण सिंह यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमानंतर ते उद्योजकांशी संवाद साधतील. त्यानंतर ते विशेष विमानाने लखनऊ कडे रवाना होणार आहेत.

****

गुडफ्रायडे आज पाळला जात आहे. प्रेषित येशू ख्रिस्ताला आजच्या दिवशी सुळावर चढवल्याचं मानलं जातं. या निमित्तानं विविध ठिकाणच्या चर्चमधून विशेष प्रार्थनेसह अनेक धार्मिक कार्यक्रम होत आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुड फ्रायडे निमित्त प्रभू येशुच्या बलिदानाचं स्मरण केलं आहे. हा दिवस आपल्याला प्रेम, सहानुभूती, दयाळूपणा आणि करुणेची प्रेरणा देत असल्याचं पंतप्रधानांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे.

****

जागतिक वारसा दिन आज साजरा होत आहे. या निमित्तानं भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागानं देशभरातल्या सर्व वारसा स्थळांवर आज मोफत प्रवेशाची घोषणा केली आहे. आपत्ती आणि संघर्षामुळे धोक्यात असलेला वारसा, ही यंदाच्या या दिनाची संकल्पना आहे. जागतिक वारसा दिनाच्या निमित्ताने, आपल्या वैभवशाली संस्कृतीचा ठेवा जपूया, ऐतिहासिक वारसा स्थळांचे संवर्धन करूया, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे.

****

 

युनेस्कोच्या Memory of the World रजिस्टरमध्ये श्रीमद् भगवद्गीता आणि भरतमुनिंचं नाट्यशास्त्र यांचा समावेश करण्यात आला आहे. केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी ही माहिती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याला जगभरातील प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा क्षण असं म्हटलं आहे. गीता आणि नाट्यशास्त्र हे आपल्या चिरंतन ज्ञान, समृद्ध वारसा आणि सांस्कृतिक चेतनेचं प्रतीक आहेत, त्यांचा दृष्टिकोन शतकानुशतके जगाला प्रेरणा देत आला असल्याचं पंतप्रधानांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे.

****

पुण्यात चिंचवड इथं आज क्रांतीवीर चापेकर बंधू स्मारकाचं लोकार्पण आणि राष्ट्रीय संग्रहालयाच्या कामाचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या कार्यक्रमाला दूरदृश्यप्रणालीद्वारे संबोधित केलं. हे स्मारक चापेकर बंधूंच्या अतुलनीय शौर्याचा साक्षीदार असून, प्रत्येक शालेय विद्यार्थ्याने हे स्मारक पाहिलं पाहिजे, यातून प्रेरणा मिळेल, असं मुख्यमंत्री म्हणाले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी बोलताना, संग्रहालयाच्या कामासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, असं आश्वासन दिलं.

****

स्वच्छ भारत मिशन अभियानात आपलं राज्य देशात पहिल्या पाच क्रमांकात येण्यासाठी प्रत्येक अधिकाऱ्याने आपापल्या क्षेत्रातली कामं नियोजनबद्धरित्या आणि वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश, पाणीपुरवठा आणि स्वच्छता राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी दिल्या. यासंदर्भातल्या बैठकीत त्या काल बोलत होत्या. राज्यात स्वच्छता दूत नेमले जाणार असून, त्यांना प्रशिक्षण देऊन कामासाठी सज्ज केलं जाईल, जे अधिकारी उद्दिष्टांप्रती गंभीर नसतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असा इशारा बोर्डीकर यांनी दिला.

****

राज्यातल्या ३३ कारखान्यांची शेतकऱ्यांच्या ऊसाची ८३१ कोटी ११ लाख रूपयांची रास्त आणि किफायतशीर दर - एफआरपी थकीत आहे. ही रक्कम संबंधित कारखान्यांनी ३० एप्रिलपर्यंत शेतकऱ्यांच्या बॅँक खात्यावर जमा करावी; अन्यथा कारवाई केली जाईल, असा इशारा साखर आयुक्त सिध्दाराम सालीमठ यांनी दिला आहे.

****

छत्रपती संभाजीनगर विभागातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये ग्रामीण आणि जिल्हास्तरावर येत्या २८ एप्रिल रोजी सेवा हक्क कायद्याची दशकपूर्ती आणि पहिला ‘सेवा हक्क दिन’ साजरा करण्यात येणार आहे. या दिनाच्या तयारीचा आढावा विभागीय आयुक्त दिलीप गावडे आणि राज्य लोकसेवा हक्क आयोग छत्रपती संभाजीनगर विभागाचे आयुक्त डॉ. किरण जाधव यांनी घेतला. याअंतर्गत शासनाने निर्धारीत केलेले विविध उपक्रम प्रभावीपणे राबवण्याची सूचना त्यांनी यावेळी केली.

****

बीड जिल्हा रुग्णालयात मागील आठवड्याभरात प्रसुतीसाठी दाखल झालेल्या तीन महिलांचा मृत्यू झाल्या प्रकरणी दोषींवर कारवाई करण्याची मागणी, शिवसंग्राम संघटनेच्या अध्यक्षा ज्योती मेटे यांनी केली. त्यांनी आज रुग्णालयाला भेट देत, प्रसूती विभागाची पाहणी करुन, जिल्हा शल्यचिकित्सकांकडे ही मागणी केली.

****

हिंगोली तालुक्यातल्या १११ ग्रामपंचायतीतून अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग तसंच महिला प्रवर्गाच्या सरपंच पदांसाठी आरक्षण सोडत येत्या बुधवारी २३ तारखेला काढण्यात येणार आहे. यासाठी हिंगोली इथं उपविभागीय अधिकारी कार्यालयात दुपारी १२ वाजता सभा आयोजित करण्यात आली असून, या सभेस संबंधितांनी उपस्थित राहण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.

****

भालाफेकपटू नीरज चोप्रानं २०२५ च्या मैदानी हंगामाची शानदार सुरुवात केली आहे. दक्षिण आफ्रिकेतल्या एन डब्ल्यू यू पॉच इनव्हिटेशनल स्पर्धेत नीरजने ८४ पूर्णांक ५२ मीटर भालाफेक करत सुवर्णपदक पटकावलं.

****

No comments: