Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 18 April 2025
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १८ एप्रिल २०२५ सायंकाळी ६.१०
****
· संरक्षण मंत्री राजनाथसिंह छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर-सीएमआयच्या उद्योजकांशी
साधला संवाद
· पुण्यात चिंचवड इथं क्रांतीवीर चापेकर बंधू स्मारकाचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यांच्या हस्ते लोकार्पण
· अपघातग्रस्तांवर वेळेवर उपचारांसह अन्य बाबतीत दक्षता बाळगण्याचे सार्वजनिक आरोग्य
मंत्र्यांचे निर्देश
· वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या टीएलटी-दहा या तीळाच्या नव्या वाणाला
केंद्र सरकारची मान्यता
आणि
· निलंबित पोलिस उपनिरीक्षक रणजीत कासले सेवेतून बडतर्फ
****
संरक्षण मंत्री राजनाथसिंह आज छत्रपती संभाजीनगरच्या
दौऱ्यावर आले आहेत. विमानतळावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मान्यवर लोकप्रतिनिधी
आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी संरक्षणमंत्र्यांचं स्वागत केलं. त्यानंतर संरक्षण मंत्री
राजनाथसिंह यांनी चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रीज ॲण्ड ॲग्रीकल्चर-सीएमआयए संघटनेच्या
उद्योजकांशी संवाद साधला.
बाईट – संरक्षणमंत्री राजनाथ
सिंह
सीएमआयएचे अध्यक्ष अर्पित सावे यांनी छत्रपती
संभाजीनगर औद्योगिक परिसराची यावेळी ओळख करून दिली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी
बोलतांना, दहा हजार एकरावर उभारलेल्या दिल्ली मुंबई इंडस्ट्रीयल कॉरीडॉर-डीएमआयसी प्रकल्पाच्या
विस्तारासाठी आणखी आठ हजार एकर जमीन संपादित केली जाणार असल्याचं सांगितलं. सीएमआयएच्या
उद्योजकांमध्ये सामुहिक विकासाची भावना दिसून येत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
ते म्हणाले –
बाईट – मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस
राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे, खासदार
डॉ भागवत कराड,
पालकमंत्री संजय शिरसाट, इतर मागास आणि बहुजन कल्याण
मंत्री अतुल सावे यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.
या संवाद सत्रानंतर संरक्षण मंत्र्यांच्या
हस्ते वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांच्या अश्वारूढ पुतळ्याचं अनावरण होणार आहे. छत्रपती
संभाजीनगरात कॅनॉट परिसरातल्या उद्यानात हा अश्वारूढ पुतळा उभारण्यात आला आहे.
****
पुण्यात चिंचवड इथं क्रांतीवीर चापेकर बंधू
स्मारकाचं लोकार्पण आणि राष्ट्रीय संग्रहालयाच्या कामाचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस यांच्या हस्ते आज झालं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या कार्यक्रमाला दूरदृश्य
संवाद प्रणालीद्वारे संबोधित केलं. आपल्या उद्वाटनपर भाषणात मुख्यमंत्र्यांनी प्रत्येक
शालेय विद्यार्थ्याने हे स्मारक पाहण्याचं आवाहन केलं. ते म्हणाले –
बाईट – मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आणि क्रांतिवीर
चापेकर बंधू स्मारक समितीने राज्य सरकारच्या सहकार्याने हे संग्रहालय उभारलं आहे. उपमुख्यमंत्री
अजित पवार,
उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह अनेक
मान्यवर यावेळी उपस्थित होते. पवार यांनी यावेळी बोलताना, संग्रहालयाच्या
कामासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, असं आश्वासन दिलं.
****
येत्या एक मे पासून उपग्रह-आधारित पथकर संकलन
प्रणाली सुरू करण्याबाबत प्रसिद्धी माध्यमांवरील वृत्तांचं केंद्र सरकारनं खंडन केलं
आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय किंवा भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं
यासंदर्भात कोणताही निर्णय घेतलेला नाही असं या मंत्रालयातर्फे सांगण्यात आलं आहे.
भारतीय राष्ट्रीय राज्यमार्ग प्राधिकरणाने निवडक ठिकाणी ए.एन.पी.आर.कॅमेरे आधारित-
फास्टटॅग आधारित अडथळामुक्त प्रणाली लागू करण्यासाठी निविदा मागवल्या आहेत. देशभरात
त्याच्या अंमलबजावणीचा निर्णय प्रणालीच्या कामगिरी, कार्यक्षमता आणि वापरकर्त्यांकडून
मिळालेल्या अभिप्रायाच्या आधारे घेतला जाईल, असं संबंधित विभागानं सांगितलं
आहे.
****
अपघातग्रस्तांवर वेळेवर उपचारांसह, एक
लाख रुपयांपर्यंतची शासकीय मदत तातडीनं देण्याबाबत सार्वजनिक आरोग्य विभागानं दक्षता
बाळगावी तसंच यात गैरप्रकार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, असे
निर्देश सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले आहेत. मुंबईत यासंदर्भातल्या
आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी योजनेतल्या अंगीकृत रुग्णालयांची संख्या वाढवण्याचा
निर्णय यावेळी घेण्यात आला. तसंच या योजनेतल्या उपचार संख्येत वाढ करणं, दरांमध्ये
सुधारणा, अवयव प्रत्यारोपणासारखे उपचार समाविष्ट करणं, तसंच प्राथमिक आरोग्य
सेवा योजनेत समाविष्ट करण्यासाठी गठित समितीला एक महिन्याच्या आत अहवाल सादर करण्याचे
आदेश त्यांनी दिले. या योजनेतल्या रुग्णालयांची माहिती, खाटांची
उपलब्धता आणि तक्रारी नोंदविण्यासाठी स्वतंत्र मोबाईल ॲप विकसित करण्याचा निर्णयही
यावेळी घेण्यात आला.
****
राज्यातल्या ३३ कारखान्यांची शेतकऱ्यांच्या
ऊसाची ८३१ कोटी ११ लाख रुपयांची रास्त आणि किफायतशीर दर-एफआरपी थकीत आहे. ही रक्कम
संबंधित कारखान्यांनी ३० एप्रिलपर्यंत शेतकऱ्यांच्या बॅँक खात्यावर जमा करावी; अन्यथा
कारवाई केली जाईल,
असा इशारा साखर आयुक्त सिध्दाराम सालीमठ यांनी दिला आहे.
****
जेईई मेन्स परिक्षेचा निकाल उद्या जाहीर
होणार आहे. राष्ट्रीय चाचणी संस्थेकडून ही माहिती देण्यात आली.
****
ख्रिस्ती बांधव आज प्रेषित येशू ख्रिस्ताच्या
स्मरणार्थ गुडफ्रायडे -पवित्र शुक्रवारचं पालन करत आहेत. या दिवशी येशुंना क्रॉस अर्थात
वधस्तंभाच्या सुळावर चढवलं गेलं होतं. विविध ठिकाणच्या चर्चमधून आज विशेष प्रार्थनेसह
धार्मिक कार्यक्रम होत आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुड फ्रायडे
निमित्त प्रभू येशुच्या बलिदानाचं स्मरण केलं आहे. हा दिवस आपल्याला प्रेम, सहानुभूती, दयाळूपणा
आणि करुणेची प्रेरणा देत असल्याचं समाज माध्यमावरच्या संदेशात पंतप्रधानांनी म्हटलं
आहे.
****
संयुक्त राष्ट्र शैक्षणिक, वैज्ञानिक
आणि सांस्कृतिक संस्था- युनेस्कोच्या मेमरी ऑफ द वर्ल्ड रजिस्टर अर्थात जागतिक स्मृती
नोंदणीपुस्तकात,
भगवत् गीता आणि भरतमुनींचं नाट्यशास्त्र यांचा समावेश केल्याबद्दल
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला आहे. गीता आणि नाट्यशास्त्राने शतकानुशतके
संस्कृती आणि चेतना जोपासली असून या समावेशनामुळे जगाला प्रेरणा मिळेल असं त्यांनी
समाजमाध्यमावर एका संदेशात म्हटलं आहे.
****
जागतिक वारसा दिन आज साजरा होत आहे. सांस्कृतिक
आणि नैसर्गिक वारशाचा सन्मान आणि संरक्षण करण्यासाठी दरवर्षी १८ एप्रिल रोजी हा दिवस साजरा केला जातो. ‘आपत्ती आणि संघर्षांमुळे धोक्यात
आलेला वारसा’ ही या वर्षीच्या वारसा दिनाची संकल्पना आहे.
गेल्या काही वर्षांत, जागतिक
वारसास्थळांच्या यादीत भारतातल्या स्थळांनी स्थान पटकावलं आहे. जागतिक वारसा यादीत
सध्या भारतातली ४३ स्थळं आहेत. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभाग ए.एस.आय.नं आजच्या
जागतिक वारसा दिनानिमित्त देशभरातल्या सर्व संरक्षित स्मारकांमध्ये मोफत प्रवेश जाहीर
केला आहे.
जागतिक वारसा दिनाच्या निमित्ताने, आपल्या
वैभवशाली संस्कृतीचा ठेवा जपूया, ऐतिहासिक वारसा स्थळांचे संवर्धन करूया, असं
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे.
****
परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या
लातूर इथल्या तेलबिया संशोधन केंद्रानं विकसित केलेल्या तिळाच्या टीएलटी-दहा या नव्या
वाणाच्या क्षेत्रवाढीस अर्थात देशपातळीवर व्यापक लागवडीसाठी केंद्र सरकारकडून अधिकृत
मान्यता मिळाली आहे. याद्वारे, गुणवत्तापूर्ण अधिक उत्पादनशील तीळाच्या
खरीप तसंच रब्बी/उन्हाळी हंगामात लागवडीद्वारे देशातील तीळ उत्पादनात आणि शेतकऱ्यांच्या
उत्पन्नात लक्षणीय वाढ होणार आहे. या वाणाचे बियाणे लवकरच देशभरात विक्रीसाठी उपलब्ध
होणार असल्याचं वृत्त आहे.
****
निलंबित पोलिस उपनिरीक्षक रणजीत कासले याला
सेवेतून बडतर्फ करण्यात आलं आहे. त्याला बीड इथं जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात हजर
करण्यात आलं. स्थानिक गुन्हे शाखेची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कासले याला बीड शहरात
शिवाजीनगर पोलीस स्टेशनला घेऊन जाणार आहेत. बीड येथील शिवाजीनगर पोलीस स्टेशन मध्ये
कासले याच्याविरोधात ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल आहे. पोलीस उपनिरीक्षक रणजीत कासले
यांनी त्यांच्या पदाला न शोभणारं वर्तन केलं असून त्यांनी केलेल्या चुकीच्या, बेताल
आणि बेजबाबदार वक्तव्यामुळे पोलीस दलाची प्रतिमा मलीन झाली असल्याचं विशेष पोलीस महानिरीक्षक
वीरेन्द्र मिश्र यांनी आदेशात म्हटलं आहे.
****
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या
वतीनं छत्रपती संभाजीनगर इथं पाणी आंदोलन करण्यात आलं. रेल्वे स्थानकाच्या उड्डाणपुलाला
रिकाम्या हंड्यांचे तोरण बांधत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. महिला आघाडीच्या पदाधिकारी
आणि कार्यकर्त्यांची या आंदोलनात लक्षणीय उपस्थिती होती.
****
हवामान
राज्यात आज सर्वाधिक ४४ पूर्णांक एक अंश
सेल्सिअस तापमान अकोला इथं नोंदवलं गेलं. मराठवाड्यात धाराशिव इथं ४० पूर्णांक पाच
अंश, छत्रपती संभाजीनगर तसंच बीड इथं ४२ पूर्णांक चार अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
****
No comments:
Post a Comment