Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date
– 19 April 2025
Time
7.10 AM to 7.20 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १९ एप्रिल २०२५ सकाळी ७.१० मि.
****
·
२०३० पर्यंत देशाची निर्यात ५० हजार कोटींवर-संरक्षण मंत्री
राजनाथसिंह यांच्याकडून विश्वास व्यक्त-छत्रपती संभाजीनगरात डिफेन्स क्लस्टर उभारण्याची
मुख्यमंत्र्यांची मागणी
·
छत्रपती संभाजीनगर इथं महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याचं
अनावरण तर पुण्यात क्रांतीवीर चापेकर बंधू स्मारकाचं लोकार्पण
·
राज्यातील शिक्षकांसाठी लवकरच गणवेश अनिवार्य-शालेयशिक्षण
मंत्री दादा भुसे यांची घोषणा
·
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या तीळाच्या नव्या
वाणाला केंद्र सरकारची मान्यता
·
निलंबित पोलिस उपनिरीक्षक रणजीत कासले सेवेतून बडतर्फ
आणि
·
शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार राज्यपालांच्या हस्ते
समारंभपूर्वक प्रदान
****
२०३० पर्यंत
देशातून होणारी निर्यात ५० हजार कोटींपर्यंत पोहोचेल, असा विश्वास
संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांनी व्यक्त केला आहे. ते काल छत्रपती संभाजीनगर इथं चेम्बर
ऑफ मराठवाडा इंडस्ट्रीज ॲण्ड ॲग्रीकल्चर-सीएमआयएच्या 'मराठवाडा-आत्मनिर्भर
भारत की रक्षाभूमि' या संवाद सत्रात बोलत होते. मोदी सरकारच्या
कार्यकाळात निर्यातीत चाळीस पटीने वाढ झाल्याकडे संरक्षणमंत्र्यांनी लक्ष वेधलं. ते
म्हणाले...
बाईट – संरक्षणमंत्री राजनाथ सिंह
सीएमआयएचे
अध्यक्ष अर्पित सावे यांनी छत्रपती संभाजीनगर औद्योगिक परिसराची यावेळी ओळख करून दिली.
सीएमआयएने आपला प्रस्ताव नवी दिल्लीत आपल्या मंत्रालयात सादर करावा, त्यावर विचार
करण्याचं आश्वासन संरक्षण मंत्र्यांनी दिलं.
मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी बोलतांना, छत्रपती संभाजीनगर परिसरात डिफेन्स क्लस्टर
तयार करून उद्योजकांच्या क्षमतांना चालना द्यावी, अशी मागणी केली.
दहा हजार एकरावर उभारलेल्या दिल्ली मुंबई इंडस्ट्रीयल कॉरीडॉर-डीएमआयसी प्रकल्पाच्या
विस्तारासाठी आणखी आठ हजार एकर जमीन संपादित केली जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
सीएमआयएच्या उद्योजकांमध्ये सामुहिक विकासाची भावना असल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी समाधान
व्यक्त केलं. ते म्हणाले..
बाईट – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
या संवाद
सत्रानंतर वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांच्या अश्वारूढ पुतळ्याचं राजनाथसिंह यांच्या
हस्ते अनावरण करण्यात आलं. मेवाड राजघराण्याचे वंशज लक्ष्यराजसिंह, राजस्थानचे
राज्यपाल हरिभाऊ बागडे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,
यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. हा पुतळा सर्वांसाठी प्रेरणास्थळ
असल्याचं राजनाथसिंह यांनी नमूद केलं.
बाईट – संरक्षणमंत्री राजनाथ सिंह
मेवाडचे
राजे लक्ष्यराजसिंह यांनी आपल्या भाषणात महाराणा प्रताप आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या
शौर्याचं स्मरण करत, हा पुतळा उभारल्याबद्दल आभार व्यक्त केले..
बाईट – राजे लक्ष्यराजसिंह
दरम्यान, मुख्यमंत्री
आज बीड जिल्हा दौऱ्यावर आहेत. घाटशीळ पारगाव इथं नारळी सप्ताह सांगता समारंभाला ते
उपस्थित राहणार आहेत.
****
पुण्यात
चिंचवड इथं क्रांतीवीर चापेकर बंधू स्मारकाचं लोकार्पण आणि राष्ट्रीय संग्रहालयाच्या
कामाचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते काल झाला.उपमुख्यमंत्री
अजित पवार यावेळी उपस्थित होते. या संग्रहालयासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, असं आश्वासन
अजित पवार यांनी दिलं.
****
आयुष्मान
भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेतल्या
अंगीकृत रुग्णालयांची संख्या एक हजार ७९२ वरून ४ हजार १८० पर्यंत वाढवण्याचा निर्णय
राज्य सरकारनं घेतला आहे. आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या
बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. अपघातग्रस्त रुग्णांसाठी एक लाख रुपयांपर्यंत कॅशलेस
उपचार देण्यासाठी कार्यवाही करण्याचे निर्देश आबिटकर यांनी दिले आहेत.
****
राज्यातील
शिक्षकांसाठी लवकरच गणवेश अनिवार्य केला जाणार असल्याचं शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
यांनी सांगितलं आहे. नाशिक जिल्ह्यात अजंग जिल्हा परिषद शाळेत एका कार्यक्रमात काल
ते बोलत होते. या निर्णयामुळे शिक्षकांवर आर्थिक भार पडू नये यासाठी विशेष निधीची तरतूद
केली जाणार असल्याचंही भुसे यांनी स्पष्ट केलं.
****
जेईई मेन
२०२५ सत्र-२ चा निकाल आज जाहीर होणार आहे. राष्ट्रीय चाचणी संस्थेनं काल या परीक्षेची
अंतिम उत्तर यादी जारी केली.
दरम्यान, आजपासून २७
एप्रिलदरम्यान, छत्रपती संभाजीनगर विभागात अभियांत्रिकी तंत्रशिक्षणाच्या
अभ्यासक्रमांसाठी एमएचटी-सीईटी होणार आहे. विभागात ७२ हजार ६०३ विद्यार्थी ही परीक्षा
देणार आहेत.
****
परभणीच्या
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या लातूर इथल्या तेलबिया संशोधन केंद्रानं
विकसित केलेल्या तिळाच्या टीएलटी-दहा या नव्या वाणाला केंद्र सरकारने मान्यता दिली
आहे. यामुळे देशातील तीळ उत्पादनात आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नात लक्षणीय वाढ होणार
आहे. या वाणाचं बियाणं लवकरच देशभरात विक्रीसाठी उपलब्ध होईल.
****
निलंबित
पोलिस उपनिरीक्षक रणजीत कासले याला सेवेतून बडतर्फ करण्यात आलं आहे. कासले याचं वर्तन
अशोभनीय असून त्याच्या बेजबाबदार वक्तव्यामुळे पोलीस दलाची प्रतिमा मलीन झाल्याचं विशेष
पोलीस महानिरीक्षक वीरेन्द्र मिश्र यांनी याबाबतच्या आदेशात म्हटलं आहे.
दरम्यान
कासले याला बीड पोलिसांनी काल पुण्यातून अटक केली. न्यायालयानं त्याला तीन दिवसांची
पोलिस कोठडी सुनावली आहे.
****
शिवछत्रपती
राज्य क्रीडा पुरस्कार काल राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते प्रदान करण्यात
आले. बालेवाडी इथं झालेल्या या सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री
अजित पवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. बॅडमिंटन प्रशिक्षक म्हणून प्रदीप
गंधे आणि कबड्डीपटू शकुंतला खटावकर यांना यावेळी जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात
आला. तर विविध क्रीडा स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी केलेल्या खेळाडू, संघटक, प्रशिक्षकांचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार
देऊन गौरव करण्यात आला.
****
बीड जिल्ह्याच्या
अंबाजोगाई तालुक्यात महिला वकिलाला सनगावचे सरपंच आणि त्याच्या साथीदारांनी मारहाण
केल्याची घटना काल निदर्शनास आली. याप्रकरणी सरपंचासह दहाजणांविरोधात युसुफवडगाव पोलिस
ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्य महिला आयोगानं या प्रकरणी सखोल चौकशीचे
आदेश बीड पोलिसांना दिले आहेत.
****
महाराष्ट्र
पोलीस प्राधिकरणाच्या मदतीने गेल्या आठ वर्षांमध्ये राज्यात सहा हजार दोनशे प्रकरणांचा
निपटारा केल्याची माहिती पोलीस प्राधिकरणाचे न्यायिक सदस्य उमाकांत मिटकर यांनी दिली.
ते काल धाराशिव इथं जिल्हा पत्रकार संघाच्या मिट द प्रेस कार्यक्रमात बोलत होते. पीडित
लोकांसाठी काम करता आल्याबद्दल मिटकर यांनी समाधान व्यक्त केलं.
****
लातूर तालुक्यात
चाडगाव इथं शक्तिपीठ महामार्गाच्या आखणीला शेतकऱ्यांनी काल जोरदार घोषणाबाजी करत मोठा
विरोध केला. या महामार्गाची आखणी करण्यासाठी कुणीही गावात फिरकू नये असा इशारा या शेतकऱ्यांनी
दिला आहे.
****
शीख धर्मियांचे
नववे गुरू तेगबहादूर यांची जयंती काल भक्तीभावाने साजरी झाली. छत्रपती संभाजीनगर इथं
काल लंगर आणि नगरकीर्तनसह विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले.
****
शिवसेना
उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं काल छत्रपती संभाजीनगर इथं पाणी आंदोलन करण्यात
आलं. महिला आघाडीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची या आंदोलनात लक्षणीय उपस्थिती
होती.
****
हवामान
राज्यात
काल सर्वाधिक ४४ पूर्णांक एक अंश सेल्सिअस तापमान अकोला इथं नोंदवलं गेलं. मराठवाड्यात
धाराशिव इथं ४० पूर्णांक पाच अंश, छत्रपती संभाजीनगर तसंच बीड इथं ४२ पूर्णांक
चार अंश, परभणी इथं ४२ पूर्णांक एक, तर
नांदेड इथं ४१ पूर्णांक दोन अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
****
No comments:
Post a Comment