Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 22 April 2025
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक २२ एप्रिल २०२५ दुपारी १.०० वा.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी सौदी
अरेबियाच्या दोन दिवसांच्या भेटीसाठी आज सकाळी रवाना झाले. भारत सौदी अरेबियाबरोबरच्या
आपल्या दीर्घ आणि ऐतिहासिक संबंधांना मोठं महत्व देतो, असं पंतप्रधानांनी प्रस्थानापूर्वी म्हटलं असून, या संबंधांमध्ये गेल्या काही वर्षात अधिकच मजबुती आणि गती आली
असल्याचं सांगितलं आहे. सौदी अरेबियाच्या अरब न्यूज या वृत्तसंस्थेशी बोलताना पंतप्रधानांनी
भारत-सौदी अरब संबंधांना, विश्वसनीय मित्र आणि रणनीतिक भागीदार, असं संबोधलं. आपली ही भेट म्हणजे सौदी अरेबियासोबत संबंध दृढ
करण्याच्या भारताच्या प्रतिबद्धतेची निदर्शक असल्याचं त्यांनी या वृत्तसंस्थेशी बोलताना
सांगितलं.
****
चार दिवसांच्या भारत दौऱ्यावर असलेले अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जे. डी. व्हान्स यांचं
आज जयपूर इथं सहकुटुंब आगमन झालं असून, ते जयपूरच्या अंबर किल्ल्याला भेट देणार आहेत. त्यानंतर जयपूर इथल्या राजस्थान
आंतरराष्ट्रीय केंद्रात व्हान्स यांचं, अमेरिका-भारत संबंध, या विषयावर व्याख्यान होणार आहे. आज ते आग्र्यालाही
भेट देणार आहेत.
****
आज जागतिक वसुंधरा दिन आहे.
पर्यावरणाबाबतची जागरुकता वाढवण्यासाठी १९७० पासून दरवर्षी २२ एप्रिल रोजी वसुंधरा
दिनानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. आपल्या पृथ्वीचं रक्षण करण्यासाठी
कृतीशील राहाण्यासाठी प्रेरणा देणं तसंच स्वच्छता आणि वृक्षारोपण यासारख्या सामुदायिक
प्रयत्नांना चालना देणं हा यामागचा उद्देश आहे. ‘आपली वसुंधरा, आपली ऊर्जा’ ही या वर्षीच्या वसुंधरा दिनाची संकल्पना आहे.
वसुंधरा दिनानिमित्त मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांनी, निसर्गासाठी सर्वानी एकत्रित येत एक पाऊल पुढे टाकावं
असं आवाहन केलं आहे. या दिनाचं औचित्य साधत, राज्यात पर्यावरण, हवामान बदल विभागातर्फे आजपासून वसुंधरेची आराधना
करण्यासाठी विविध उपक्रम राबवण्यात येणार आहेत.
****
कैलास मानससरोवर तीर्थयात्रा
कोवीड महामारीनंतर चार वर्षांनी येत्या तीस जूनला पुन्हा सुरू होणार आहे. उत्तराखंडमार्गे
जाणाऱ्या या यात्रेच्या व्यवस्थापनाची
जबाबदारी कुमाऊं मंडळ विकास निगमावर सोपवण्यात आली असून, या यात्रेवर उत्तराखंड सरकार आणि परराष्ट्र मंत्रालय संयुक्तपणे
देखरेख ठेवणार आहेत. बावीस दिवस चालणाऱ्या या आध्यात्मिक यात्रेत एकूण अडीचशे भाविक पन्नास पन्नास जणांच्या गटात प्रवास
करणार आहेत.
****
चित्रमहर्षी दादासाहेब फाळके
यांच्या ‘राजा हरिश्चंद्र’ या चित्रपटाचं प्रदर्शन एकशे बारा वर्षांपूर्वी २१ एप्रिलला मुंबईत गिरगाव इथं
ऑलिम्पिया थिएटरमध्ये झालं होतं, या दिवसाचं महत्व
लक्षात घेत दरवर्षी याच काळात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या, चित्रपताका, या मराठी चित्रपट महोत्सवाचं आयोजन करण्यात येईल, अशी घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी केली. काल
मुंबईत पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या रवींद्र नाट्य मंदिर सभागृहामध्ये
यावर्षीच्या या महोत्सवाचं उद्घाटन झालं, त्यावेळी ते बोलत होते. तंत्रज्ञानातल्या आव्हानांवर मात करण्यासाठी मराठी चित्रपट
निर्माते आणि दिग्दर्शकांना राज्य सरकारकडून आर्थिक पाठबळ देण्यात येईल, असंही शेलार यांनी यावेळी जाहीर केलं.
****
काँग्रेस नेते आणि भोर विधानसभा
मतदारसंघाचे माजी आमदार संग्राम थोपटे यांनी आज मुंबईत आपल्या कार्यकर्त्यांसह भारतीय
जनता पक्षात प्रवेश केला. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांचं पक्षात
स्वागत केलं. महत्वाच्या पदांवर संधी असूनही अनेकदा काँग्रेस पक्षाकडून डावलण्यात आल्याचा
आरोप करत थोपटे यांनी दोन दिवसांपूर्वी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला होता.
****
ऍग्रीस्टॅक योजनेअंतर्गत सर्व
शेतकऱ्यांना फार्मर आयडी अनिवार्य करण्यात आला आहे. त्यासंदर्भात धाराशिवचे जिल्हाधिकारी
कीर्ती किरण पुजार यांनी शेतकऱ्यांना लवकरात लवकर हे आयडी काढून घेण्याचं आवाहन केलं.
बाईट – किर्ती किरण पुजार, जिल्हाधिकारी,
धाराशिव
[$D0505249-BF62-4EE1-8EE0-A377EED325B7$(null) - Dharashiv DC - ]
****
येत्या २८ एप्रिल रोजी सेवा
हक्क कायद्याची दशकपूर्ती आणि पहिल्या सेवा हक्क दिनानिमित्त छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात
विविध उपक्रम प्रभावीपणे राबवण्याचे निर्देश विभागीय आयुक्त दिलीप गावडे आणि राज्य
लोकसेवा हक्क आयोग छत्रपती संभाजीनगर विभागाचे आयुक्त डॉ. किरण जाधव यांनी दिले. यासंदर्भातल्या
बैठकीत ते आज बोलत होते.
****
नांदेड शहरात महापालिका आणि
पोलीस दलाच्या वतीने शहरातल्या जुन्या नांदेड भागात काल अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात
आली. उपायुक्त अजित पालसिंघ संधू यांच्यासह शहर उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार
नायक यांच्या प्रमुख उपस्थितीत ही मोहीम राबवण्यात आली असून, जवळपास दीडशे अतिक्रमणं या मोहिमेत हटवण्यात आली.
****
नांदेड जिल्हा परिषदेच्या वतीने
आधार कार्ड विषयीच्या तक्रारी सोडवण्यासाठी क्यू आर कोड तयार करण्यात आला आहे. क्यू
आर कोड स्कॅन केल्यानंतर दिसणाऱ्या अर्जात आवश्यक माहिती भरल्यानंतर तक्रार दाखल होऊन
ती निकाली काढल्या जात असल्याचं, याबाबतच्या वृत्तात
म्हटलं आहे.
****
पेरूमध्ये झालेल्या नेमबाजी
विश्वकरंडक स्पर्धेत भारताच्या सिमरनप्रीत कौर हिनं महिलांच्या २५ मीटर पिस्तुल स्पर्धेत
रौप्यपदकाला गवसणी घातली. तिचं हे पहिलंच आंतरराष्ट्रीय पदक आहे. दोन सुवर्ण आणि एका
कांस्यपदकासह भारताचं हे या स्पर्धेत, चौथं रौप्य पदक आहे.
****
No comments:
Post a Comment