Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 23 April 2025
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक २३ एप्रिल २०२५ दुपारी १.०० वा.
****
जम्मू काश्मीरमधल्या दहशतवादी
हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज पहलगाम इथं घटनास्थळाची
पाहणी केली. याठिकाणी काल झालेल्या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला असून, मृतांमध्ये नौदलाच्या अधिकाऱ्यासह दोन परदेशी पर्यटकांचा समावेश
आहे. या हल्ल्यात २० पर्यटक जखमी झाल्याचं वृत्तसंस्थेनं म्हटलं आहे. शहा यांनी त्यापूर्वी
मृतांच्या कुटुंबियांची भेट घेऊन, मृतांना श्रद्धांजली
अर्पण केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही
आज सकाळी दिल्ली विमानतळावर उच्चस्तरीय बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला. परराष्ट्र
व्यवहार मंत्री एस. जयशंकर आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यासह वरीष्ठ
अधिकारी यावेळी उपस्थित होते.
लष्कर ए तय्यबा या दहशतवादी
संघटनेच्या द रेझिस्टन्स फ्रंट या गटानं या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. या भ्याड
हल्ल्याच्या सूत्रधारांना पकडण्यासाठी सुरक्षा दलांनी आपली शोधमोहीम तीव्र केली आहे.
पर्यटकांवर झालेल्या हल्ल्याचा
निषेध करण्यासाठी काश्मीर खोऱ्यातल्या व्यावसायिकांनी तसंच पर्यटन कंपन्यांनी आज राज्यात
बंद पुकारला आहे.
****
कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून
खरगे आणि कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी या दहशतवादी हल्ल्यासंदर्भात अमित शहा
यांच्याशी चर्चा केली, आणि दहशतवाद विरोधी लढाईत कॉंग्रेस पक्ष, केंद्र सरकारच्या पूर्ण पाठीशी असल्याचं सांगितलं. दहशतवाद्यांना
कडक शासन झालं पाहीजे, असं खरगे यांनी सामाजिक माध्यमावरच्या संदेशात म्हटलं
आहे, तर या हल्ल्यात बळी पडलेल्यांच्या कुटुंबाला न्याय
मिळायला हवा असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.
****
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी या हल्ल्याचा
निषेध केला आहे.
या हल्ल्यात महाराष्ट्रातल्या
सहा पर्यटकांचा मृत्यू झाला. दिलीप डिसले, अतुल मोने, संतोष जगदाळे, हेमंत जोशी, संजय लेले आणि कौस्तुभ गणबोते अशी त्यांची नावं
आहेत. हे मृतदेह आज राज्यात आणले जातील, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. तर पनवेलचे माणिक पटेल आणि एस भालचंद्रराव हे
दोन पर्यटक जखमी झाल्याचं वृत्त आहे.
जम्मू काश्मीरमध्ये छत्रपती
संभाजीनगर जिल्ह्यातले कोणी असतील तर संपर्क साधण्याचं आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन
प्राधिकरणानं केलं आहे. त्यासाठीचे दूरध्वनी क्रमांक पुढीलप्रमाणे, 73 50 33
51 04 आणि 0240 2 33 10 77
****
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनंही
या दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध व्यक्त केला आहे. ही घटना अतिशय गंभीर असून, या प्रसंगात आपण सरकारच्या पाठीशी पूर्णपणे उभं असल्याचं पक्षाचे
अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.
****
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका
अंतर्गत पाणी प्रश्नाचा मुद्दा अत्यंत गंभीर झाला असून, यासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात यावी, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी
एका पत्राद्वारे केली आहे. शहराला दररोज २०० एम एल डी पाण्याची आवश्यकता आहे, मात्र शहरात दर ११ दिवसानंतर १४० एम एल डी पाण्याचा पुरवठा करण्यात
येतो. त्यामुळे नागरिकांना तीव्र पाणी समस्येला सामोरं जावं लागत असल्याचं दानवे यांनी
मुख्यमंत्र्यांच्या सचिवांना लिहिलेल्या या पत्रात म्हटलं आहे.
****
संवाद मराठवाड्याशी, या उपक्रमांतर्गत छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त दिलीप
गावडे आज, पाणीटंचाई आणि पाणीपुरवठा या विषयावर विभागातल्या
नागरिकांशी थेट संवाद साधणार आहेत. आज दुपारी चार वाजता वेबिनारच्या माध्यमातून हे
संवाद सत्र होणार आहे.
****
नांदेड जिल्ह्यातल्या शेतकरी
बांधवांनी बियाणं आणि खतं खरेदी करताना अधिकृत परवाना धारकांकडून पक्की पावती घेऊनच
खरेदी करावी, असं आवाहन नांदेडच्या जिल्हा अधिक्षक कृषि अधिकाऱ्यांनी केलं आहे. बी-बियाणं आणि खतांची विक्री करणारे अनधिकृत विक्रेते
आढळल्यास संबंधित तालुक्याच्या तालुका कृषि अधिकाऱ्यांच्या कार्यालयाशी
संपर्क साधावा, असंही त्यांनी म्हटलं आहे.
****
नांदेड जिल्हा पोलीस दलातर्फे
मिशन उडान अंतर्गत तीन मे रोजी भव्य रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. जिल्हा
पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी काल पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या मेळाव्यात
देशभरातल्या २५ हून अधिक कंपन्यांमध्ये जवळपास दोन हजार बेरोजगार युवकांना रोजगाराची
संधी उपलब्ध होणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
पेरु इथं झालेल्या आयएसएसएफ
नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत भारत सात पदकांसह तिसऱ्या स्थानावर राहीला. यामध्ये दोन सुवर्ण, चार रौप्य आणि एका कांस्य पदकाचा समावेश आहे. काल महिलांच्या
२५ मीटर पिस्टल प्रकारात सिमरनप्रीत कौर ब्रार हीनं रौप्य पदक जिंकलं. या स्पर्देत
चीन पहिल्या, तर अमेरिका दुसऱ्या स्थानावर राहीला.
****
जपान मध्ये आयोजित सुझुकी एरोबिक्स
जिम्नॅस्टिक विश्वचषक स्पर्धेसाठी सहा सदस्यांचा भारताचा संघ रवाना झाला. या संघात
छत्रपती संभाजीनगरचा जिमनॅस्ट आर्य शहा आणि आंतरराष्ट्रीय पंच म्हणून डॉ. मकरंद जोशी
यांचा समावेश आहे.
****
बीड जिल्ह्यात अंबाजोगाई तालुक्यातल्या
जवळगाव इथं गायरान जमिनीत होणारा सौरऊर्जा प्रकल्प इतर ठिकाणी हलवण्याची मागणी करत, ग्रामस्थांनी काल तहसील कार्यालयाच्या परीसरात असलेल्या टॉवरवर
चढून तीन तास आंदोलन केलं.
****
No comments:
Post a Comment