Wednesday, 23 April 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 23.04.2025 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 23 April 2025

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक २३ एप्रिल २०२ सकाळी ७.१० मि.

****

·      जम्मू काश्मीरमध्ये पहलगाम इथं पर्यटकांवर दहशतवादी हल्ला, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक

·      महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील मतदानासंदर्भात काँग्रेसचा आरोप निराधार, निवडणूक आयोगाचं मतदान प्रक्रियेवर स्पष्टीकरण

·      नागरी सेवा परीक्षा २०२४ चा अंतिम निकाल जाहीर- पुण्याच्या अर्चित डोंगरेचा देशात तिसरा तर राज्यातून पहिला क्रमांक

·      मत्स्यव्यवसायाला राज्यात कृषीचा दर्जा-शेतीप्रमाणे सर्व लाभ घेण्यात मत्स्य शेतकरी पात्र

आणि

·      मराठवाड्यात तापमानाची सरासरी चाळीशी पार, नांदेड जिल्ह्यासाठी तीन दिवस उष्णतेचा यलो ॲलर्ट जारी

****

जम्मू काश्मीरमध्ये अनंतनाग जिल्ह्यातल्या पहलगाम इथं पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात काही पर्यटकांचा मृत्यू झाला. काल दुपारच्या सुमारास हा हल्ला झाला. हल्लेखोरांना पकडण्यासाठी सुरक्षा दलांनी परिसराला घेराव घातला असून, शोधमोहिम सुरु आहे.

दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा या घटनेनंतर काश्मीरला पोहोचले असून, काल त्यांनी श्रीनगर इथं उच्चस्तरीय बैठक घेतली. शहा आज उपराज्यपाल मनोज सिन्हा यांच्यासोबत घटनास्थळाची पाहणी करणार असून, या हल्ल्यातल्या पिडित नागरीकांशी आणि प्रत्यक्षदर्शींशी संवाद साधणार आहेत.

या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी सौदी अरेबियाचा दौरा अर्धवट सोडून मायदेशी परतले.

या हल्ल्याच्या निषेधार्थ आज काश्मीरमधल्या व्यापार्यांनी बंदची हाक दिली आहे. काही धार्मिक संस्थांनी देखील आज बंद पाळण्याची घोषणा केली आहे.

****

दरम्यान, या हल्ल्याचा सर्वच स्तरातून निषेध व्यक्त करण्यात येत आहे. हल्ल्यातल्या मृतांच्या कुटुंबीयांप्रती राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सहवेदना व्यक्त केल्या आहेत. पर्यटकांवर हल्ला करण्याचा हा प्रकार धक्कादायक आणि वेदनादायक असल्याचं राष्ट्रपतींनी म्हटलं आहे.

जम्मू आणि काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा आणि मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्यासह देशभरातल्या राजकीय नेत्यांनी आणि इतर मान्यवरांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील या हल्ल्याचा निषेध केला असून, हा हल्ला जम्मू-काश्मीरचा विकासाकडे जाणारा प्रवास थांबवण्याचा प्रयत्न असल्याचं म्हटलं आहे. या हल्ल्यात राज्यातल्या दिलीप डिसले, अतुल मोने या दोन पर्यटकांचा मृत्यू झाला असून, दोन जण जखमी झाले आहेत. त्यामध्ये पनवेलचे माणिक पटेल आणि एस. भालचंद्रराव यांचा समावेश असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

****

निवडणूक आयोगानं महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत असामान्य मतदान झाल्याचा काँग्रेसचा आरोप फेटाळला आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर राजकीय पक्ष आणि उमेदवारांच्या मतदान प्रतिनिधींसमोर निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्याचं आयोगानं म्हटलं आहे. तसंच मतदान प्रक्रिया झाल्यानंतर काँग्रेस पक्षाशी आणि उमेदवारांशी संबंधित प्रतिनिधींनी अशाप्रकारची कोणतीही तक्रार रिटर्निंग अधिकारी अथवा निवडणूक निरीक्षकांकडं केली नाही, त्यामुळे असमान्य मतदानाचा आरोप निराधार असल्याचं निवडणूक आयोगानं म्हटलं आहे.

****

केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या नागरी सेवा परीक्षा २०२४ चा अंतिम निकाल काल जाहीर झाला. पुण्याचा अर्चित डोंगरे यानं देशात तिसरा तर महाराष्ट्रात पहिला क्रमांक पटकावला आहे. देशातून शक्ती दुबे हिने पहिला तर हर्षित गोयलनं दुसरा क्रमांक मिळवला आहे. या निवड चाचणीतून एक हजार नऊ उमेदवारांची विविध नागरी सेवांसाठी निवड झाली.

****

राज्यातल्या पहिली ते पाचवीच्या मराठी आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये हिंदी भाषा अनिवार्य नव्हे तर ऐच्छिक ठेवणार असल्याचं, शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी स्पष्ट केलं आहे. ते काल मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. यासंदर्भात तज्ञांशी चर्चा करुन लवकरच शासन निर्णय जारी केला जाईल, असं त्यांनी सांगितलं.

****

मत्स्यव्यवसायाला राज्यात कृषीचा दर्जा देण्याचा निर्णय काल राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी मुंबईत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. राज्यातल्या चार लाख ८३ हजार मत्स्य शेतकऱ्यांना या निर्णयाचा लाभ होणार आहे. कृषीप्रमाणे मासेमारांना अनुदान, तसंच मत्स्य विमा योजना आणि नैसर्गिक आपत्ती आल्यास सरकारकडून मदतही मिळणार आहे.

**

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जन्मगावी सातारा जिल्ह्यात मौजे नायगाव इथं भव्य स्मारक आणि महिला प्रशिक्षण केंद्र उभारण्याचा निर्णय काल मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.

महाराष्ट्र वेतन संहिता नियम, २०२५ आणि महाराष्ट्र औद्योगिक संबंध संहिता नियम, २०२५ ला मान्यता, तात्पुरत्या स्वरुपात स्थापन १६ अतिरिक्त आणि २३ जलदगती न्यायालयांना आणखी दोन वर्ष मुदतवाढ, तसंच विभागीय आयुक्त कार्यालय आणि जिल्हाधिकारी कार्यालयातल्या कंत्राटी विधी अधिकाऱ्यांच्या मानधनात वाढ करण्यालाही कालच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

****

वक्फ कायद्यामुळे गरीब आणि गरजू मुस्लिमांना न्याय मिळेल, अशी ग्वाही केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री किरेन रिजिजू यांनी दिली आहे. ते काल मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. वक्फ सुधारणा कायदा २०२५ चा मूळ उद्देशच पूर्वीच्या कायद्यातील त्रुटी दूर करून वक्फ बोर्डाची कार्यक्षमता वाढवणं, हा असल्याचं त्यांनी सांगितलं,

बाईट – केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू

****

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टंचाईग्रस्त भागात तत्काळ उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यांनी काल राज्यात सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, तसंच मुख्याधिकार्यांची दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक घेत, प्रत्यक्ष फिल्डवर भेटी देऊन पाण्याची सद्यस्थिती जाणून घेण्याचे तसंच १५ जुलैपर्यंत पाणीसाठा पुरेल असं नियोजन करण्याचे निर्देश त्यांनी दिले. तीव्र उन्हाळ्यामुळे पुढील दोन महिने पिण्याचं पाणी जपून वापरण्याचं आवाहनही शिंदे यांनी केलं.

****

पर्यावरण रक्षणात कर्तव्य आणि हक्क या दोन्ही बाबींची योग्य सांगड घालण्याची गरज पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी व्यक्त केली आहे. काल जागतिक वसुंधरा दिनानिमित्त मुंबई इथं पवई तलाव स्वच्छता-संवर्धन अभियानाच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. निसर्गाचं संवर्धन करण्यासाठी शासनाबरोबरच लोकसहभाग आवश्यक असून, यामुळे राज्य नक्कीच प्रदूषणातून मुक्त होईल, असा विश्वास मुंडे यांनी व्यक्त केला. नऊ दिवसाच्या राज्यस्तरीय ‘पर्यावरण वाचवा, वसुंधरा सजवा’ या अभियानाचा शुभारंभही काल करण्यात आला.

****

बीडमध्ये महाविद्यालयीन तरुणींच्या मदतीसाठी आता प्रत्येक महाविद्यालयात बडी कॉप नियुक्त होणार आहे. विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी बीड इथं पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकाऱ्यांची बैठक घेऊन, याबाबतचे निर्देश दिले. या नियुक्तीमुळे पोलिस ठाण्यात न जाता, मुलींना छेडछाडीसारख्या प्रकरणी तक्रार करता येईल, असं गोऱ्हे यांनी सांगितलं. त्या म्हणाल्या...

बाईट – नीलम गोऱ्हे, उपसभापती, विधान परिषद

****

दरम्यान, बीडचे जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांची मत्स्य व्यवसाय विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक म्हणून बदली करण्यात आली आहे, तर त्यांच्या जागी विवेक जॉन्सन यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

****

विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी शेत आणि पाणंद याबाबत नागरिकांशी साधलेल्या संवादातून पुढे आलेल्या अडचणी सोडवण्यासंदर्भात, सस्ती अदालत, या उपक्रमासाठी तालुकास्तरीय समितीची स्थापना करण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी या अदालतीच्या कामकाजाचा नियमितपणे आढावा घेण्याचे निर्देश गावडे यांनी दिले.

****

दरम्यान, संवाद मराठवाड्याशी, या उपक्रमांतर्गत विभागीय आयुक्त गावडे आज दुपारी चार वाजता पाणीटंचाई आणि पाणीपुरवठा या विषयावर विभागातल्या नागरिकांशी वेबिनारद्वारे संवाद साधणार आहेत.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सध्या १३८ गावं आणि १८ वाड्यांना टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. पाणी पुरवठ्यासाठी साठी जिल्ह्यातल्या १४४ खासगी विहिरी अधिग्रहित करण्यात आल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

पोषण आहार पंधरवड्यानिमित्त जालना जिल्ह्यात विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. प्रकल्प अधिकारी कोमल कोरे यांनी याबाबत अधिक माहिती दिली,

बाईट – कोमल कोरे, प्रकल्प अधिकारी

****

छत्रपती संभाजीनगर इथं जनसुरक्षा विधेयकाच्या विरोधात काल विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं. नांदेड तसंच बीड इथंही काल जनसुरक्षा विधेयकाच्या विरोधात जनसुरक्षा विधेयक विरोधी समितीच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं.

****

हवामान

राज्यात काल सर्वाधिक ४५ पूर्णांक सहा अंश सेल्सिअस तापमान चंद्रपूर इथं नोंदवलं गेलं. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर इथं सुमारे ४१ अंश, परभणी इथं ४२ पूर्णांक दोन, तर बीड इथं ४१ पूर्णांक सात अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

मुंबईच्या प्रादेशिक हवामान केंद्रानं नांदेड जिल्ह्यासाठी आज, उद्या आणि परवासाठी उष्णतेचा यलो ॲलर्ट जारी केला आहे. या तीन दिवसांत जिल्ह्यात तुरळक ठिकाणी अधिक उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

****

No comments: