Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 23 April 2025
Time 11.00 to 11.05 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: २३ एप्रिल
२०२५ सकाळी ११.०० वाजता.
****
जम्मू काश्मीरमधल्या दहशतवादी
हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी दिल्ली विमानतळावर
उच्चस्तरीय बैठक घेतली. मोदी आपला सौदी अरेबियाचा दौरा सोडून आज मायदेशी परतले. परराष्ट्र
व्यवहार मंत्री एस. जयशंकर आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यासह वरीष्ठ
अधिकाऱ्यांशी चर्चा करुन त्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला.
दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा काश्मीरमध्ये असून, त्यांनी आज मृतांच्या कुटुंबियांची भेट घेतली. यावेळी त्यांनी
मृतांना श्रद्धांजली अर्पण केली. यानंतर ते पहलगाम इथं घटनास्थळाची पाहणी करणार आहेत.
दरम्यान, या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला असून, मृतांमध्ये नौदलाच्या अधिकाऱ्यासह दोन परदेशी पर्यटकांचा समावेश
आहे. या हल्ल्यात २० पर्यटक जखमी झाल्याचं वृत्तसंस्थेनं म्हटलं आहे. लष्कर ए तय्यबा
या दहशतवादी संघटनेच्या द रेझिस्टन्स फ्रंट या गटानं या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे.
या भ्याड हल्ल्याच्या सूत्रधारांना पकडण्यासाठी सुरक्षा दलांनी आपली शोधमोहीम तीव्र
केली आहे.
पर्यटकांवर झालेल्या हल्ल्याचा
निषेध करण्यासाठी काश्मीर खोऱ्यातल्या व्यावसायिकांनी तसंच पर्यटन कंपन्यांनी आज राज्यात
बंद पुकारला आहे.
****
नागरी विमान वाहतूक मंत्री के.
राम मोहन नायडू यांनी श्रीनगरहून दिल्ली आणि मुंबईसाठी अधिक विमान सोडण्याबाबत गृहमंत्री
अमित शहा यांच्याशी चर्चा केली. या परिस्थितीत भाडेवाढ होऊ नये, याकडे विशेष लक्ष दिलं जाईल, असं नागरी विमान वाहतूक मंत्रालयानं जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे.
दरम्यान, या दहशतवादी हल्ल्यानंतरची परिस्थिती लक्षात घेता, एअर इंडिया आणि इंडिगोसह इतर विमान कंपन्या आज श्रीनगरहून विशेष
उड्डाणं चालवत आहेत.
****
जनतेनं निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींना
संविधानाचा आशय ठरवण्याचा सर्वोच्च अधिकार असल्याचं उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी
म्हटलं आहे. ते काल दिल्ली विद्यापीठात आयोजित कार्यक्रमात बोलत होते. संसद ही सर्वोच्च
स्थानी असून, संविधान कोणत्याही अधिकाराला संसदेच्या वरचं स्थान
देत नाही, असं ते यावेळी म्हणाले. नागरिकांनी आपली अभिव्यक्ती, आकांक्षा आणि इच्छा प्रतिबिंबित करण्यासाठी आपल्या प्रतिनिधींची
निवड केली असून, निवडणुकांमध्ये ते या प्रतिनिधींना जबाबदार धरत
असल्याचं धनखड यांनी सांगितलं.
****
मुंबईत वेव्ह्ज परिषदेचं आयोजन
होत असल्याच्या पार्श्वभूमीवर भारत पेव्हिलियनचं उद्घाटन होणार आहे. भारताचा कथाकथनाचा
वारसा तसंच जागतिक स्तरावर माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रात भारताचा वाढता दबदबा यांचं
प्रतिनिधीत्वि हे पेव्हिलियन करेल. सर्जनशीलता, सौहार्द आणि सांस्कृतिक मुत्सद्देगिरी हे भारतीय कला परंपरेचे अभिन्न अंग आहेत, हे या पेव्हिलियनच्या माध्यमातून दिसून येईल.
****
वाढता उत्पादन खर्च, मर्यादित बाजारपेठ प्रवेश आणि अपुरी भावनिश्चिती प्रणाली यामुळे
कृषी क्षेत्र अधिक अडचणीत येत असतांना भारतीय शेती शाश्वत आणि आर्थिक लाभाची बनवण्यासाठी
कृषी विद्यापीठांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे, असं प्रतिपादन राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांनी केलं आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात
राहुरी इथल्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या अडोतिसाव्या पदवीदान समारंभात ते काल
बोलत होते. विद्यापीठांनी कृत्रिम बुद्धिमत्ता, ड्रोन आणि डिजिटल तंत्रज्ञानाचा उपयोग करून शेतकऱ्यांना योग्य वेळी आवश्यक माहिती
द्यावी, असं राज्यपाल म्हणाले.
****
काँग्रेस पक्षातर्फे राज्यात
संविधान बचाव यात्रा तसंच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीतर्फे सद्भावना यात्रा काढण्यात
येणार असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली. मुंबईत काल झालेल्या
काँग्रेसच्या कार्यकारिणी बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. येत्या २९ एप्रिलला
नाशिक इथं सद्भावना यात्रेचं आयोजन केलं असून एक मे ला सद्भावना सत्याग्रह तर चार आणि
पाच मे ला परभणी इथं सद्भावना यात्रा आणि संविधान बचाव यात्रेचं आयोजन करण्यात आल्याचं
सपकाळ यांनी सांगितलं.
****
नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी काँग्रेस
नेते सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यावर केलेली कारवाई ही मुख्य मुद्यांपासून
नागरीकांचं लक्ष हटवण्यासाठी केली असल्याचा आरोप, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे राष्ट्रीय प्रवक्ते डॉ. अंशुल अविजीत यांनी केला
आहे. ते काल छत्रपती संभाजीनगर इथं वार्ताहरांशी बोलत होते. मोदी सरकारने सूडबुद्धीने
आणि द्वेषपूर्ण राजकारणातून नॅशनल हेराल्ड वृत्तपत्राची मालमत्ता मनमानी पद्धतीने जप्त
केल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.
****
राज्य शासनाच्यावतीनं आयोजित
'कंपोस्ट खड्डा भरू, आपलं गाव स्वच्छ ठेवू' अभियान जालना जिल्ह्यातल्या सर्व ग्रामपंचायतींमध्ये
मोठ्या प्रमाणावर राबवून गावातल्या कचऱ्याचं शास्त्रीय पद्धतीनं व्यवस्थापन करावं, असं आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जगदीश मनियार
यांनी केलं आहे. येत्या एक मे पासून पंधरा सप्टेंबरपर्यंत हे अभियान राबवण्यात येणार
आहे.
****
बीड जिल्ह्यात अंबाजोगाई तालुक्यातल्या
जवळगाव इथं गायरान जमिनीत होणारा सौरऊर्जा प्रकल्प इतर ठिकाणी हलवण्याची मागणी करत, ग्रामस्थांनी काल तहसील कार्यालयाच्या परीसरात असलेल्या टॉवरवर
चढून तीन तास आंदोलन केलं. आठ दिवसांपूर्वी आंदोलक शेतकर्यांनी इशारा देऊनही प्रशासनाने
कुठलीही कारवाई न केल्यामुळे हे आंदोलन करण्यात आलं. महसूल प्रशासनाने आश्वासन दिल्यानंतर
हे आंदोलन मागे घेण्यात आलं.
****
No comments:
Post a Comment