Tuesday, 15 April 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक: १५ एप्रिल २०२५ सकाळी ७.१० मि.

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date: 15 April 2025

Time: 7.10 to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक: १५ एप्रिल २०२५ सकाळी ७.१० मि.

****

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती देशभर उत्साहात साजरी 

डॉ आंबेडकर यांचं कार्य सरकारच्या प्रेरणास्थानी- पंतप्रधानांचं प्रतिपादन 

न्याय प्रणाली जनकेंद्री आणि वैज्ञानिक बनवण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नरत, केंद्रीय गृहमंत्र्यांची माहिती 

‘संवाद मराठवाड्याशी’ या उपक्रमाअंतर्गत छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्त आज नागरीकांशी वेबिनारद्वारे संवाद साधणार 

आणि

नांदेड, लातूर, धाराशिव जिल्ह्यांत आज अवकाळी पावसाची शक्यता

****

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबसाहेब आंबेडकर यांची १३४वी जयंती काल सर्वत्र उत्साहात विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून साजरी करण्यात आली. 

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचं कार्य सरकारच्या प्रेरणास्थानी असल्याचं प्रतिपादन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. काल हरियाणात हिसार इथल्या जाहीर सभेत ते बोलत होते, 

बाईट - पंतप्रधान नरेंद्र मोदी

****

डॉक्टर आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी दादरच्या चैत्यभूमीवर, तसंच नागपूरमध्ये दीक्षाभूमीवर हजारो अनुयायांनी दाखल झाले होते. राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चैत्यभूमीवर बाबासाहेबांना अभिवादन केलं.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक क्रांतीचे जनक होते, समानता प्रस्थापित करण्यात त्यांनी मोलाची भूमिका बजावली आणि आधुनिक भारताचा पाया रचला, असं राज्यपाल यावेळी म्हणाले. जातीयवाद हा अभिशाप असून विकसित भारताचं उद्दिष्ट गाठण्यासाठी आंबेडकरांना अभिप्रेत जातीविरहित समाज निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे, असं मत त्यांनी व्यक्त केलं. छत्रपती शिवाजी महाराजांनी परकीय आक्रमणापासून देशाला वाचवलं, तर बाबासाहेबांनी समतेसाठी आपलं जीवन वेचलं, असं राज्यपाल म्हणाले. 

****

एकसंघ भारताचं श्रेय डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी साकारलेल्या संविधानाला जातं, असं मत मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केलं. कुठल्याही परिस्थितीत संवैधानिक मूल्यांपासून दूर न होता, संविधानानुसारच संकल्प करण्याचं आवाहन त्यांनी केलं, ते म्हणाले..

बाईट -  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

****

विधान भवन परिसरात विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी डॉ आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केलं.

****

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या 'आम्ही बाबासाहेबांचे पाईक' या विशेष जनजागृतीपर उपक्रमाला काल सुरुवात झाली. मुंबईत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी ही माहिती दिली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेल्या मानवी हक्क समता, न्याय आणि बंधुता या मूल्यांचं महात्म्य जनतेपर्यंत पोहोचवणं, भारतीय राज्यघटनेच्या उद्देशिकेचं महत्त्व अधोरेखित करणं, तसंच नव्या पिढीपर्यंत त्यांच्या विचारांचं प्रभावीपणे प्रबोधन करणं, ही या उपक्रमाची उद्दीष्टं आहेत. 

****

छत्रपती संभाजीनगर शहरातल्या भडकल गेट इथं डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विविध पक्ष आणि संघटनांच्या वतीनं अभिवादन करण्यात आलं. पालकमंत्री संजय शिरसाट, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, खासदार भागवत कराड यांनी बाबासाहेबांना आदरांजली वाहिली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातही व्याख्यान, रक्तदान शिबिर असे विविध कार्यक्रम घेण्यात आले. शहरात अनेक ठिकाणी काढण्यात आलेल्या मिरवणुकीत नागरीकांनी मोठ्या संख्येनं सहभागी होत महामानवाला आदरांजली वाहिली.

जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, तसंच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक अंकित यांनी डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं, तसंच 'वाचन कट्टा' या उपक्रमाचंही उद्घाटन केलं.

****

मराठवाड्यात ठिकठिकाणी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. त्याचा आमच्या प्रतिनिधीनं घेतलेला आढावा.

नांदेडमध्ये जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, महापालिका आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन केलं. 

बीड शहरात डॉ आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. शहरातल्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळा इथून सकाळी अभिवादन रॅली काढण्यात आली. 

जालना शहरात मस्तगड इथल्या डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्याला विविध पक्ष, संघटनांसह राजकीय पदाधिकाऱ्यांनी अभिवादन केलं. या ठिकाणी रक्तदान शिबिर तसंच इतर सामाजिक उपक्रमांसह मिरवणूकीचं आयोजन करण्यात आलं होतं. 

परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर, जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, यांनी डॉ आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी भिक्खू संघाच्या वतीनं सामूहिक महावंदना घेण्यात आली तसंच पंचशील ध्वजारोहण समता दलाची आणि शहरातल्या सर्व धर्मीय दिव्यांग समाज बांधवांची अभिवादन रॅली काढण्यात आली.

 

धाराशिव इथं डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपपरिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला संचालक डॉ. प्रशांत दीक्षित, राज्यपाल नियुक्त अधिसभा सदस्य देविदास पाठक यांनी पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. सेवानिवृत प्राध्यापक डी. डी. मस्के यांचं यावेळी "संविधान निर्मिती, परिचय आणि न्याय" या विषयावर व्याख्यान झालं.  

लातूर शहरात ठिकठिकाणी अभिवादन करून मिरवणुका काढण्यात आल्या. ज्यात तरुणाईचा मोठा उत्साह आणि जल्लोष दिसून आला. शहरातल्या डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अनेकांनी अभिवादन केलं.

हिंगोली इथंही विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. 

****

रत्नागिरी जिल्ह्याच्या मंडणगड तालुक्यातल्या आंबडवे या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूळ गावी, सामाजिक न्याय आणि विशेष साहाय्य विभागाच्या वतीनं डॉक्टर आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. याठिकाणी आंबेडकर यांचं भव्य-दिव्य स्मारक उभारलं जाईल अशी ग्वाही, सामंत यांनी यावेळी दिली.  

****

केंद्र सरकार देशातली न्याय प्रणाली जनकेंद्री आणि वैज्ञानिक बनवण्याचा प्रयत्न करत असल्याचं प्रतिपादन, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलं. नवी दिल्ली इथं आयोजित अखिल भारतीय न्यायवैद्यक शिखर परिषदेत ते काल बोलत होते. सरकार कालबद्ध रितीनं योग्य न्याय देण्याच्या दिशेनं प्रयत्नरत असल्याचं शहा म्हणाले,

बाईट - केंद्रीय गृहमंत्री अमित शहा

****

राष्ट्रीय अग्निशमन दिनानिमित्त काल मुंबईत, राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्या उपस्थितीत राज्यस्तरीय अग्निशमन सेवा सप्ताहाचा शुभारंभ करण्यात आला. वाढती लोकसंख्या, महानगरांची ऊर्ध्वदिशेनं होणारी वाढ आणि वाढती औद्योगिक क्षेत्रं, यामुळे अग्निशमन सेवेचं कार्य आव्हानात्मक झालं आहे. त्यावर उपाय म्हणून नव्या नगररचनेचा अभ्यास करणारी अग्निशमन संशोधन संस्था स्थापन केली जावी, असं राज्यपाल यावेळी म्हणाले. महानगरांमध्ये बांधल्या जाणाऱ्या निवासी सोसायट्यांमध्ये अग्निशमनाविषयी जनजागृती केली जावी, विद्यापीठांमध्ये युवकांसाठी अग्निशमन अभ्यासक्रम सुरु करावा, नियमांचं काटेकोर पालन केलं जावं अशा सूचनाही त्यांनी दिल्या. राज्यातल्या अग्निशमन दलात उत्कृष्ठ कार्य करणाऱ्या आठ अग्निशमन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना यावेळी राष्ट्रपती पदक प्रदान करण्यात आले. मुंबईत डॉकयार्ड इथं १९४४ रोजी झालेल्या जहाजावरील स्फोटात प्राण गमावलेल्या अग्निशमन अधिकारी आणि जवानांच्या स्मरणार्थ राष्ट्रीय अग्निशमन सेवा दिवस पाळला जातो. 

नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या अग्निशमन आणि आणीबाणी सेवा विभागातही अग्निशमन सेवा सप्ताह सुरु झाला. सेवा बजावताना प्राणांची आहुती देणाऱ्या जवानांच्या स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करण्यात आलं.

****

‘संवाद मराठवाड्याशी’ या नाविन्यपूर्ण उपक्रमाअंतर्गत छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त दिलीप गावडे आज नागरीकांशी वेबिनारद्वारे संवाद साधणार आहेत. नगरपालिका क्षेत्रात वार्ड भेट समस्या समाधान अभियानाच्या माध्यमातून ते नागरिकांशी बोलणार असून, आठही जिल्ह्यातल्या नागरिकांनी यात सहभागी होण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे. 

****

बीड जिल्ह्यातल्या केज तालुक्यात सुरू असलेल्या आवादा कंपनीच्या पवनचक्की  बांधणीच्या ठिकाणी झालेल्या चोरी प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं काल चार जणांच्या टोळीला अटक केली. त्यांच्याकडून ११ लाख ५८ हजार रूपयांचा मुद्देमाल आणि चारचाकी वाहन जप्त करण्यात आलं असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधिक्षक नवनीत काँवत यांनी दिली.

****

मध्य महाराष्ट्रात काल तुरळक ठिकाणी गारांचा पाऊस पडला. मराठवाड्यातही काही ठिकाणी पाऊस झाला. नांदेड, लातूर, धाराशिव जिल्ह्यांत आजही अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. 

दरम्यान, राज्यात आज सर्वात जास्त ४२ पूर्णांक ४ अंश सेल्सिअल तापमान अकोला इथं नोंदवलं गेलं. मराठवाड्यात धाराशिव इथं ३९ पूर्णांक सहा, तर छत्रपती संभाजीनगर आणि परभणी इथं सरासरी ४० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. 

****


No comments: