Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date
– 06 June 2025
Time
7.10 AM to 7.20 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०६ जून २०२५ सकाळी ७.१० मि.
****
·
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जम्मू-काश्मीर दौऱ्यावर, ४६ हजार कोटींहून
अधिक विकासकामांचं उद्घाटन आणि लोकार्पण करणार
·
राज्यात ३१ ऑक्टोबर पर्यंत राष्ट्रीय प्लास्टिक प्रदूषण
निर्मूलन मोहीम, विविध उपक्रमांनी काल पर्यावरण दिन साजरा
·
समृद्धी महामार्गाच्या इगतपुरी ते आमणे या ७५ किलोमीटरच्या
अखेरच्या टप्प्याचं लोकार्पण
·
गेल्या ११ वर्षात सेवा, सुशासन आणि गरीब
कल्याण या तत्वांच्या माध्यमातून नागरिकांच्या जीवनमानात आमुलाग्र परिवर्तन,
समृद्ध सांस्कृतिक वारसा जतनाला सरकारचं प्राधान्य
आणि
·
राज्यात पुढील तीन दिवसांत तुरळक ठिकाणी वादळी वारे, मेघगर्जना
आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा हवामान विभागाचा इशारा
****
पंतप्रधान
नरेंद्र मोदी आज जम्मू आणि काश्मीरला भेट देणार असून, या भेटीत
ते उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल्वे लिंक हा २७२ किलोमीटर लांबीचा महत्त्वाकांक्षी
प्रकल्प राष्ट्राला समर्पित करतील. सुमारे ४४ हजार कोटी रुपये खर्चाचा हा प्रकल्प काश्मीर
खोऱ्याला सर्व हंगामात देशाच्या उर्वरित भागाशी जोडणारा महत्त्वाचा दुवा ठरणार आहे.
या प्रकल्पामुळे या प्रदेशातल्या दळणवळणात क्रांती घडून येईल, तसंच सामाजिक आणि आर्थिक एकात्मतेला मोठी चालना मिळेल असं पंतप्रधानांनी समाज
माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे.
या प्रकल्पाअंतर्गतच्या
चिनाब या जगातल्या सर्वात उंच कमानी रेल्वे पूलाचं तसंच तारांच्या सहाय्याने स्थिर
केलेल्या अर्थात केबल स्टेड अंजी, या भारतातल्या पहिला रेल्वे पूलाचं उद्घाटनही
पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. यासोबतच कटरा इथं ४६ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त
किमतीच्या अनेक विकास प्रकल्पांची पायाभरणी, उद्घाटन आणि राष्ट्रार्पणही
त्यांच्या हस्ते होणार आहे.
****
देशभरात
काल जागतिक पर्यावरण दिन विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून साजरा करण्यात आला. ‘प्लास्टिकमुळे
होणाऱ्या प्रदूषणावर मात’ ही यंदाच्या पर्यावरण दिनाची मुख्य संकल्पना आहे.
मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा या शासकीय निवासस्थानी वृक्षारोपण केलं. पर्यावरण दिनाच्या
या वर्षीच्या संकल्पनेनुसर पर्यावरणाला प्लास्टिक मुक्त करणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी
आहे, असं त्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. राज्य शासनानं आजपासून
३१ ऑक्टोबर पर्यंत राष्ट्रीय प्लास्टिक प्रदूषण निर्मूलन मोहिमेचं आयोजन केलं असल्याचं
त्यांनी सांगितलं.
बाईट – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
या निमित्तानं
मुंबईत काल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वातावरण बदलाबाबत जनजागृती करण्यासाठी जागतिक
प्रचार मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला. राज्य सरकारच्या १० कोटी वृक्षलागवड मोहिमेत
नागरिकांनी सहभागी होण्याचं आवाहन त्यांनी केलं.
**
पर्यावरण
आणि वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत मुंबईत गिरगाव चौपाटी इथं
एकल प्लास्टिक निर्मूलन मोहीम राबवण्यात आली. वसुंधरेच्या संरक्षणासाठी पर्यावरण विभागाने
पाऊलं उचलली असून नागरिकांनी एकल वापराच्या प्लास्टिकचा वापर टाळण्याचं आवाहन त्यांनी
यावेळी केलं.
**
छत्रपती
संभाजीनगरमध्ये पर्यावरण जागरूकतेसाठी आयोजित केलेल्या सायकल रॅलीचं उद्घाटन खासदार
भागवत कराड यांनी केलं. जिल्ह्यातल्या प्रत्येक ग्रामपंचायतीत आणि शहर हद्दीतही काल
वृक्ष लागवडीस सुरुवात करण्यात आली.
****
गेल्या
११ वर्षात सेवा, सुशासन आणि गरीब कल्याण या तत्वांच्या माध्यमातून देशातल्या नागरिकांच्या
जीवनमानात आमुलाग्र परिवर्तन घडून आलं आहे. गेल्या ११ वर्षातील प्रमुख क्षेत्रांत झालेल्या
बदलांचा आढावा आकाशवाणी तुमच्यासाठी घेऊन येत आहे. आज, आपण देशाच्या
समृद्ध सांस्कृतिक वारसा जतन याविषयीची माहिती घेणार आहोत.
‘‘गेल्या दशकात
देशाच्या सांस्कृतिक क्षेत्रात समृद्ध वारशाला नवी ऊर्जा प्रदान करण्यात आली आहे.
अयोध्येतील राम मंदिर हे देशाची एकता आणि श्रद्धेचे प्रतिक बनले आहे. तर,वाराणसीतील
काशी विश्वनाथ धाम कॉरिडोर असंख्य भाविकांना काशी विश्वनाथ मंदिर आणि गंगा नदीचे
दर्शन घडवत आहे. उज्जैनमधील महाकाल लोक प्रकल्पात आध्यात्मिक शांतीबरोबरच जागतिक
दर्जाच्या सुविधा पुरवण्यात आल्या आहेत. तर, हिमालयाच्या कुशीतल्या
केदारनाथ आणि बद्रीनाथ पुनर्विकास प्रकल्पानं मंदिरांचं पावित्र्य जपत
प्रवाशांच्या सुरक्षेची काळजी घेतली आहे. स्वदेश दर्शन योजनेअंतर्गत ७६
प्रकल्पांसाठी पाच हजार कोटी रुपये मंजूर केले आहेत. तर वारसा शहर विकास आणि जतन
प्रकल्पांतर्गत १२ वारसा स्थळांचा विकास करण्यात येत आहे. केवळ मंदिरंच नाही तर
शिख गुरुद्वारा, बौद्ध विहारं, जैन
मंदिरं, सुफी दर्गा आणि आदिवासींची पवित्र स्थळं याकडंही लक्ष
पुरवलं आहे. पीएम गती शक्ती आणि भारतमाला उपक्रमांतर्गत पवित्र स्थळांना जोडणारे
उत्तम रस्ते, रोपवे तयार करण्यात आले आहेत.
परदेशातून भारताने ३५० मुर्ती आणि ऐतिहासिक वस्तू परत मिळवल्या आहेत.’’
****
हिंदुहृदयसम्राट
बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग राज्याच्या विकासात महत्वाची भूमिका बजावणार
असून, हा महामार्ग राज्याच्या समृद्धीचा कॉरिडॉर ठरणार असल्याचं,
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. समृद्धी महामार्गाच्या
इगतपुरी ते आमणे या ७५ किलोमीटरच्या अखेरच्या टप्प्याचं उद्घाटन केल्यानंतर ते काल
बोलत होते.
बाईट – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
राज्यातले
२४ जिल्हे जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरणाशी जोडणाऱ्या समृद्धी महामार्गानं राज्याचं
एकीकरण केलं. लवकरच हा महामार्ग नव्याने तयार होत असलेल्या वाढवण बंदराशीही जोडला जाईल, यामुळे बंदर-केंद्रित
विकास राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचेल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी
व्यक्त केला. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यावेळी उपस्थित होते.
समृद्धी
महामार्गाच्या या टप्प्यामुळे नागपूर ते मुंबई हा प्रवास फक्त आठ तासांत करता येणार
आहे. नाशिक आणि ठाणे जिल्ह्यांमधून जाणारा हा शेवटच्या टप्पा सह्याद्रीच्या पर्वतरागांमधून
बोगदे आणि पुलांद्वारे पूर्ण केला आहे. यात जवळपास ११ किलोमीटर लांबीचे ५ बोगदे असून, इगतपुरीतला
१७ मीटरपेक्षा जास्त रुंद आणि ९ मीटरपेक्षा जास्त उंचीचा बोगदा राज्यातला सर्वात लांब
आणि रुंद बोगदा आहे. या बोगद्यात बसवलेल्या जनरेशन व्हेइकल एक्सिट सिस्टम चा वापर भारतात
पहिल्यांदाच करण्यात आला आहे.
****
अखिल भारतीय
मराठी नाट्य परिषदेच्या पुरस्कारांची घोषणा काल करण्यात आली. यावर्षी ज्येष्ठ अभिनेत्री
नीना कुलकर्णी आणि ज्येष्ठ अभिनेते सुरेश साखवळकर यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात
येणार आहेत. सर्वोत्कृष्ट व्यावसायिक नाटक पुरस्कार असेन मी नसेन मी या नाटकाला जाहीर
झाला आहे. यासह नाट्य क्षेत्रातल्या इतर पुरस्कारांचं वितरण येत्या १४ तारखेला मुंबईत
होणार आहे.
****
येत्या
२१ जून रोजी ११ वा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात येणार आहे. योग दिनाला १५ दिवस
बाकी आहेत. आज जाणून घेऊया, भारतीय योग संस्थानचे जिल्हा प्रधान अधिकारी दिनेश देशपांडे यांनी
दिलेली, सेतुबंधासनाविषयी माहिती.
बाईट – दिनेश देशपांडे
****
छत्रपती
संभाजीनगर मधल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात विद्यार्थ्यांसाठी तयार
करण्यात आलेल्या अत्याधुनिक व्यायामशाळेचं उद्घाटन काल पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या
हस्ते झालं. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातले विद्यार्थी, डॉक्टर्स
आणि कर्मचाऱ्यांनी स्वतःच्या आरोग्याची देखभाल करणं आवश्यक असल्याचं, शिरसाट यावेळी म्हणाले.
****
इंडोनेशिया
खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरीत सात्विक साईराजरँकी रेड्डी आणि चिराग शेट्टी
यांच्या जोडीने उपान्त्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. काल झालेल्या सामन्यात त्यांनी
डेन्मार्कच्या जोडीचा दोन - एक असा पराभव केला. महिला एकेरीत भारताच्या पी व्ही सिंधुला
उप-उपान्त्यपूर्व फेरीत थायलंडच्या खेळाडुकडून २२-२०, १०-२१,
१८-२१ असा पराभव पत्करावा लागला.
****
राज्यात
येत्या तीन दिवसात तुरळक ठिकाणी वादळी वारे, मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा
इशारा हवामान विभागाने दिला आहे. ३० पेक्षा अधिक जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात
आला आहे. शेतकऱ्यांनी सतर्क राहावं असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. मराठवाड्यात छत्रपती
संभाजीनगर, जालना, बीड, हिंगोली, परभणी, धाराशिव या जिल्ह्यांना
हवामान विभागानं यलो अलर्ट दिला आहे.
****
No comments:
Post a Comment