Sunday, 1 June 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 01.06.2025 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date - 01 June 2025

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०१ जून २०२ दुपारी १.०० वा.

****

दहशतवादाविरोधी भूमिका स्पष्ट करण्यासाठी भारताची सात सर्वपक्षीय शिष्टमंडळे विविध देशांना भेटी देत आहेत. कॉंग्रेसचे खासदार शशी थरूर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ आज ब्राझीलमध्ये पोहोचलं. या शिष्टमंडळाने ब्राझीलच्या राष्ट्रपतींचे मुख्य सल्लागार, परराष्ट्र व्यवहार महासचिव आणि वरिष्ठ ब्राझिलच्या नेत्यांशी संवाद साधत दहशतवादविरोधातील भारताचा दृढसंकल्प व्यक्त केला.

इंडोनेशियाचा यशस्वी दौरा पूर्ण केल्यानंतर जनता दल युनायटेडचे खासदार संजय कुमार झा यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ आज मलेशियातील क्वालांलांपूर इथं पोहोचलं. हे शिष्टमंडळ मलेशियातल्या मंत्री, संसद सदस्यांसह भारतीय समुदायाची भेट घेऊन भारताविरुद्धच्या दहशतावादाविरोधात लढण्यासाठी दृढ संकल्प व्यक्त करणार आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं आज इथियोपियात खासदार तसंच आफ्रिकन संघ आयोगाच्या सदस्यांशी चर्चा केली. पहलगाम हल्ल्यानंतर सुरू करण्यात आलेले ऑपरेशन सिंदूर हे दहशतवादाविरुद्ध भारताच्या वचनबद्धतेचं प्रतिबिंब असल्याचं शिष्टमंडळानं म्हटलं आहे. भारतीय जनता पक्षाचे खासदार रविशंकर प्रसाद यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ हे फ्रांस, इटली आणि डेन्मार्क नंतर लंडनला पोहोचलं आहे. शिष्टमंडळाला इतर देशांसारखंच ब्रिटनकडूनही सहकार्य मिळेल असा विश्वास खासदार प्रसाद यांनी व्यक्त केला. तर भाजपचे खासदार बैजयंत पांडा यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं अल्जेरियातल्या भारतीय समुहाशी चर्चा केली. द्रमुक खासदार कणिमोई करुणानिधी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ स्पेनमध्ये आहे.

****

नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बालाजी कल्याणकर यांची प्रकृती काल मध्यरात्री अचानक बिघडल्यानं त्यांना तातडीनं पुढील उपचारासाठी मुंबईला हलविण्यात आलं आहे. आमदार कल्याणकर यांनी काही दिवसांपूर्वीच नांदेडच्या एका रुग्णालयात सलग पाच दिवस उपचार घेतला. त्यांना अतिउच्च तापासह रक्तदाबाचा त्रास सुरू झाल्यामुळे उपचारासाठी तातडीनं मुंबईच्या रुग्णालयात उपचार घेण्याचा डॉक्टरांनी सल्ला दिला.

****

भंडारा जिल्ह्यातल्या लाखनी वन परिक्षेत्रातील, बिट निलागोंदी इथं राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनाअंतर्गत झाडे झुडपे साफसफाई करताना फॉलिडोटा वर्गातल्या एका मॅनिस प्रजातीतील दुर्मिळ सस्तन खवले मांजर हा वन्यप्राणी आढळून आला. वन्यजीवाची ओळख असणाऱ्या रामकृष्ण मेश्राम रोहयो या मजुराला हा दुर्मिळ प्राणी आढळून आला. निलागोंदी इथले रोजगार सहाय्यक खुशाल भुरे यांनी ही माहिती वन विभागास दिली. त्यानंतर वन विभागाचे बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. खवले मांजरास बिळातून काढून ताब्यात घेत त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. या खवले मांजरास वनक्षेत्रात सोडून जीवनदान देण्यात आलं.

****

कला, सामाजिक, राजकारण अशा विविध विभागांमध्ये आपला ठसा उमटवणाऱ्या व्यक्तींच्या कार्याचा गौरव मीडिया एक्सलेन्स अवॉर्ड्स २०२५देऊन केला जाणार आहे. दादर इथल्या स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह इथं ३ जून रोजी दुपारी ३ वाजता हा पुरस्कार सोहळा रंगणार आहे. विधान परिषद सभापती प्रा.राम शिंदे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पद्मश्री, महाराष्ट्र भूषण ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे माजी अध्यक्ष, अभिनेते विजय पाटकर, बालरंगभूमी परिषदेच्या अध्यक्षा नीलम शिर्के-सामंत आदी मान्यवरांचा यावेळी विशेष सत्कारकेला जाणार आहे. विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांना साहित्य क्षेत्रातल्या ऐतिहासिक कार्यासाठी मीडिया एक्सलन्स अवॉर्ड आणि पत्रकारिता जीवनगौरव मीडिया एक्सलन्स अवॉर्डपुरस्कारानं नीतिन केळकर यांना गौरविण्यात येणार आहे. मीडिया एक्सलन्स अवॉर्डनं अभिनेते, सामाजिक कार्यकर्ते सयाजी शिंदे, अभिनेत्री वैदेही परशुरामी, वरिष्ठ पत्रकार किशोर आपटे, ज्येष्ठ छायाचित्रकार मोहन बने, ज्येष्ठ पत्रकार श्रीकांत बोजेवार यांना सन्मानित करण्यात येणार आहे.

****

आयपीएल क्रिकेटच्या दुसऱ्या क्वालिफायरमध्ये, मुंबई इंडियन्सचा आज अहमदाबादमध्ये पंजाब किंग्जशी सामना होणार आहे. हा सामना संध्याकाळी साडेसात वाजता सुरू होईल. मंगळवारी अहमदाबादमध्ये होणाऱ्या अंतिम सामन्यात या सामन्यातील विजेत्या संघाचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी होईल. मुंबई इंडियन्सने आतापर्यंत पाच जेतेपदे जिंकली आहेत तर पंजाबला एकदाही जेतेपद मिळालेले नाही.

****

नॉर्वेतील बुद्धिबळ स्पर्धेत महिला विभागात भारताच्या कोनेरू हम्पीने काल नॉर्वेच्या स्टॅव्हेंजरमध्ये चीनच्या लेई टिंगजी हिला पराभूत केलं. या विजयासह साडेआठ गुण मिळवित तिनं या स्पर्धेत आघाडी घेतली आहे. आणखी एक भारतीय ग्रँडमास्टर आर. वैशालीनं सारा खादेमला पराभूत करीत साडेसहा गुणांसह ती चौथ्या स्थानावर पोहोचली. पुरुष खुल्या गटात विश्वविजेता डी. गुकेश टाय-ब्रेकमध्ये पराभूत झाल्यानंतर त्याची पाचव्या स्थानावर घसरण झाली. अर्जुन एरिगाईसीने जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या हिकारू नाकामुराविरुद्ध मोठा विजय मिळवला आणि चौथ्या स्थानावर राहिला.

****

देशाच्या पूर्वोत्तर राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.

****

No comments: