Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date
– 01 June 2025
Time
7.10 AM to 7.20 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०१ जून २०२५ सकाळी ७.१० मि.
****
·
महिला केंद्रित विकास हा आपल्या सरकारच्या प्रत्येक योजनेचा
गाभा असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन
·
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची ३०० वी जयंती सर्वत्र
विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून साजरी
·
डीएपी खताची उपलब्धता मागणीच्या तुलनेत कमी असल्यानं पर्यायी
खतांचा वापर करण्याचं कृषी विभागाचं आवाहन
·
परभणी आणि जालना इथं विकसित कृषी संकल्प अभियानांतर्गत
शेतकऱ्यांच्या समस्यांचं निराकरण
आणि
·
आशियाई ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत २४ पदकांसह भारत
दुसऱ्या स्थानावर
****
महिला केंद्रित
विकास हा आपल्या सरकारच्या प्रत्येक योजनेचा गाभा असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र
मोदी यांनी केलं आहे. मध्य प्रदेशातल्या भोपाळ इथं काल ‘अहिल्यादेवी होळकर महिला सशक्तीकरण
महासंमेलनात’ ते बोलत होते. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे विचार प्रेरणादायी असून, त्यांच्या
विचारांचं अनुकरण करण्याची आज गरज असल्याचं पंतप्रधान म्हणाले. अहिल्यादेवींचं नाव
ऐकताच मनात श्रद्धाभाव निर्माण होतो, आणि कोणत्याही कठीण परिस्थितीत
राज्य कसं पुढे न्यायचं, हे त्यांच्याकडून शिकण्यासारखं आहे,
असंही त्यांनी नमूद केलं. गरीब आणि वंचितांच्या उत्थानासाठी त्यांचं
मोठं योगदान असून, भारतीय वारश्याच्या त्या खूप मोठ्या संरक्षक
होत्या, असं सांगून पंतप्रधानांनी अहिल्याबाईंच्या कार्याला उजाळा
दिला.
बाईट – पंतप्रधान नरेंद्र मोदी
यासोबतच
पंतप्रधानांनी नमो ड्रोन दीदी, ऑपरेशन सिंदूरमधलं महिलांचं योगदान,
आणि अंतराळ-विज्ञानातली महिलांची वाटचाल आदींचा उल्लेख करत आजच्या स्त्री
शक्तिचाही गौरव केला.
अहिल्याबाईंच्या
स्मरणार्थ एका टपाल तिकिटाचं आणि विशेष नाण्याचं प्रकाशन, तसंच अनेक
प्रकल्पांचं आणि योजनांचं लोकार्पण यावेळी करण्यात आलं.
****
पुण्यश्लोक
अहिल्यादेवी होळकर यांची ३०० वी जयंती काल सर्वत्र विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून
साजरी झाली.
अहिल्यानगर
जिल्ह्यातल्या चौंडी या अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मगावी झालेल्या जयंतीच्या कार्यक्रमाला
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे, मंत्री राधाकृष्ण विखे
पाटील, अतुल सावे उपस्थित होते. यावेळी विविध विकासकामांचा शुभारंभ
करण्यात आला.
अहिल्यादेवींनी
केवळ राजकीय नव्हे तर सामाजिक, आर्थिक, धार्मिक
आणि सांस्कृतिक क्षेत्रात क्रांती घडवली, असं सांगून मुख्यमंत्र्यांनी
त्यांच्या कार्याची माहिती दिली. अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रजाहितदक्ष राज्यकारभाराचा
आदर्श समोर ठेऊन, राज्य शासन देखील वंचितांच्या कल्याणासाठी काम
करेल, असं ते म्हणाले.
बाईट - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
अहिल्यादेवींची
महती देशातल्या सर्व भाषिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांच्या जीवनावर बहुभाषिक चित्रपट
निर्माण केला जाणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
सुराज्य
म्हणजे काय हे अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रशासनातून दिसून येतं, त्या महाराष्ट्राच्या
अभिमान होत्या, असं उपमुख्यमंत्री शिंदे यावेळी म्हणाले. यावेळी
जन्मभूमी ते कर्मभूमी म्हणजेच चौंडी ते इंदौर या बस सेवेचा प्रारंभ करण्यात आला.
****
छत्रपती
संभाजीनगर शहरात कोकणवाडी चौक इथल्या अहील्यादेवींच्या पुतळ्याला विविध पक्ष संघटनांच्या
वतीने अभिवादन करण्यात आलं. शहरातल्या अहिल्यादेवींनी जीर्णोद्धार केलेल्या सातारा
खंडोबा मंदिरात सातारा धनगर समाज जयंती उत्सव समितीच्या वतीनं अहील्यादेवींना अभिवादन
करण्यात आलं.
****
परभणी इथं
निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी यांनी अहिल्यादेवींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण
करून अभिवादन केलं.
धाराशिव
जिल्ह्यातल्या तुळजापूर इथं अहिल्यादेवींचं भव्य स्मारक बनवण्यात येणार असल्याचं, आमदार राणा
जगजितसिंह पाटील यांनी सांगितलं. यामध्ये अहिल्यादेवींचा पुतळा लोकसहभागातून उभारण्यात
येणार असून, आमदार पाटील यांनी एक लाख रुपये देऊन निधी संकलनाचा
शुभारंभ केला.
नांदेड
शहरातल्या व्हीआयपी रोडवरील अहिल्यादेवींच्या नियोजित पुतळा ठिकाणी संयुक्त जयंती मंडळाच्या
वतीने शोभायात्रा काढण्यात आली. विविध पक्ष, संघटनांच्या वतीने अभिवादन, अन्नदान असे कार्यक्रम घेण्यात आले.
अहिल्यादेवी
होळकर यांच्या जयंतीनिमित्त जालना शहरासह जिल्ह्यात विविध कार्यक्रम घेण्यात आले. भारतीय
जनता पक्ष, जालना महानगरतर्फे आयोजित मॅरेथॉनला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
मिळाला. माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, आमदार नारायण कुचे
यावेळी उपस्थित होते.
****
राज्यासाठी
साडेपाच लाख मेट्रिक टन डाय- अमोनियम फॉस्फेट म्हणजे डीएपीची मागणी असताना केवळ ९४
हजार मेट्रिक टन खत साठा शिल्लक होता. म्हणजे मागणीच्या तुलनेत केवळ १७ टक्केच उपलब्धता
आहे. परिणामी अनेक जिल्ह्यांमध्ये तुटवडा आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी डीएपीला बाजारात
पर्यायी असलेली खतं वापरावीत, असं आवाहन कृषी विभागानं केलं आहे. डीएपीऐवजी
युरिया अर्धी गोणी आणि एसएसपी तीन गोणी खतांचा वापर डीएपीला चांगला पर्याय आहे. एसएसपीसोबत
संयुक्त खतांचाही वापर करावा असं आवाहन पुणे कृषी संचालक सुनील बोरकर यांनी केलं आहे.
****
परभणी जिल्ह्यातल्या
पेडगाव इथं काल विकसित कृषी संकल्प अभियानाअंतर्गत वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे
कुलगुरु डॉ. इंद्र मणि यांच्या उपस्थितीत कार्यक्रम घेण्यात आला. मृदा आरोग्य चांगलं
रहावं, यासाठी सेंद्रिय शेतीचा अवलंब करावा असं आवाहन कुलगुरुंनी यावेळी
केलं. ड्रोन तंत्रज्ञानाविषयी त्यांनी उपस्थित शेतकर्यांना माहिती दिली.
या कार्यक्रमात
शेतीतील समस्यांचं निराकरण होण्यासाठी मदत होईल असं युवा शेतकरी मंगेश देशमुख आणि प्रियंका
कांबळे यांनी सांगितलं. ते म्हणाले,
बाईट - शेतकरी प्रियंका कांबळे आणि मंगेश देशमुख
****
जालना इथल्या
खरपुडी कृषी विज्ञान केंद्राद्वारे सुरु असलेल्या विकसित कृषी संकल्प अभियानात काल
घनसावंगी तालुक्यातल्या पानेवाडी इथं शेतकऱ्यांना बियाणे उगवणशक्ती चाचणीचं प्रात्यक्षिक
दाखवण्यात आलं. राजगुरुनगर इथल्या राष्ट्रीय कांदा आणि लसूण संचालनालयाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ
डॉ. ए. थंगासामी, कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ राहुल चौधरी यांनी यावेळी मार्गदर्शन
केलं.
****
परभणीच्या
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात संयुक्त कृषि संशोधन आणि विकास समितीच्या ५३
व्या बैठकीचा काल समारोप झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे कृषी मूल्य आयोगाचे
अध्यक्ष पाशा पटेल उपस्थित होते. या बैठकीत महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे आठ वाण, तीन कृषि
यंत्रे अवजारे, ६१ पीक उत्पादन तंत्रज्ञान शिफारशींना मान्यता
देण्यात आली.
****
आशियाई
ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत भारत आठ सुवर्ण, दहा रौप्य आणि सहा कांस्य पदकांसह एकूण
२४ पदकं जिंकून दुसर्या स्थानावर राहीला. काल समारोपाच्या दिवशी भारतीय खेळाडुंनी तीन
रौप्य आणि तीन कांस्य पदकांची कमाई केली. चार हजार मीटर रिले शर्यतीत श्राबनी नंदा,
अभिनय राज राजन, स्नेहा एस एस आणि नित्या गंधे
यांच्या संघानं, पाच हजार मीटर धावण्याच्या शर्यतीत पारुल चौधरीनं,
तर पुरुषांच्या भालाफेक स्पर्धेत सचिन यादवने रौप्य पदक जिंकलं. धावण्याच्या
शर्यतीत पूजा, अनिमेष कुजूर आणि विथ्या रामराज यांनी कांस्य पदक
मिळवलं.
****
जागतिक
तंबाखू विरोधी दिन काल पाळण्यात आला. याअंतर्गत तंबाखूच्या अतिसेवनामुळे होणाऱ्या गंभीर
आजारांविषयी जनजागृती करण्यात येते. छत्रपती संभाजीनगर जिल्हा रुग्णालय आणि मेडिकव्हर
हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमानं काल बाईक रॅली काढण्यात आली. यावेळी तंबाखूजन्य
पदार्थ टाळा, व्यसनमुक्त व्हा, आरोग्य सांभाळा अशी जनजागृती
करण्यात आली.
****
धाराशिव
आणि तुळजापूर तालुक्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची आमदार राणा जगजितसिंह
पाटील यांनी पाहणी केली. या पावसामुळे शेती, फळबागा, जनावरे,
घरे आणि इतर मालमत्तेचंही मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. वीज पडून दोन जणांचा मृत्यू झाला, तर ३६ जनावरे दगावली.
नुकसानीचे तातडीने पंचनामे पूर्ण करून मदतीसाठी अहवाल शासनाकडे सादर करण्याचे निर्देश
आमदार पाटील यांनी प्रशासनाला दिले.
****
येत्या
दोन दिवसांत कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान
विभागानं वर्तवली आहे. या काळात विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडेल, तर मराठवाड्यात
हवामान कोरडं राहील असा अंदाज आहे.
****
No comments:
Post a Comment