Monday, 2 June 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 02.06.2025 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 02 June 2025

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०२ जून २०२ सकाळी.०० वाजता

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सायंकाळी आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक संघटना, आयटीएच्या ८१ व्या सर्वसाधारण सभेला संबोधित करणार आहेत. नवी दिल्ली इथं भारत मंडपमध्ये कालपासून या सर्वसाधारण सभेला सुरुवात झाली. जागतिक पातळीवर हवाई क्षेत्राला भेडसावत असलेल्या समस्यांवर यात उहापोह होत आहे. ४२ वर्षानंतर भारत आयटीएच्या सर्वसाधारण सभेचं यजमानपद भूषवत आहे. या परिषदेसाठी जागतिक हवाई वाहतूक उद्योग क्षेत्रातील आघाडीचे उद्योजक, सरकारी अधिकारी आणि आंतरराष्ट्रीय माध्यमांचे प्रतिनिधी यांच्यासह 1600 पेक्षा जास्त प्रतिनिधी एकत्र आले आहेत.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी पॅराग्वेचे अध्यक्ष सँटियागो पेना पॅलासिओस यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. दोन्ही नेते परस्परसंबंधांचा नव्यानं आढावा घेतील, असं वृत्तसंस्थेनं म्हटलं आहे. पॅराग्वेचे अध्यक्ष आजपासून तीन दिवसीय भारत दौऱ्यावर आहेत. पेना यांची ही पहिलीच भारत भेट आहे, तर पॅराग्वेच्या अध्यक्षांची दुसरी भारतभेट आहे.

****

भारतीय तंत्रशास्त्र संस्था-इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी कानपूरचा पदवीपूर्व अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीच्या संयुक्त प्रवेश परीक्षा - जेईई अॅडव्हान्स्ड परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. result25.jeeadv.ac.in या वेबसाइटवर निकाल पाहता येईल. जेईई अॅडव्हान्स्ड ही इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आणि इतर सहभागी तांत्रिक शिक्षण संस्थांमधील पदवीपूर्व अभ्यासक्रमांसाठीची प्रवेश परीक्षा आहे.

****

विविध देशांमध्ये गेलेल्या बहुपक्षीय शिष्टमंडळांपैकी, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखालचं शिष्टमंडळ इजिप्तची राजधानी कैरो मध्ये दाखल झालं.

भाजपा नेते रविशंकर प्रसाद यांच्या नेतृत्वाखालचं  शिष्टमंडळ  फ्रांस, इटली आणि डेन्मार्कचा दौरा आटोपून लंडनला पोहोचलं आहे. याशिवाय भाजप खासदार बैजयंत पांडा यांचं शिष्टमंडळ सध्या अल्जेरियाच्या दौऱ्यावर असून, त्यांनी तिथल्या भारतीय समुदायाशी संवाद साधला, तर द्रमुकच्या खासदार कनिमोळी यांच्या नेतृत्वाखालचं शिष्टमंडळ स्पेनमधल्या माद्रिद इथं पोहोचलं आहे.

****

विकसित कृषी संकल्प अभियानाच्या चौथ्या दिवशी काल केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी उत्तर प्रदेशातील मेरठ येथे शेतकऱ्यांशी संवाद साधला. कृषी शास्त्रज्ञांसह त्यांनी थेट शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी ही भेट घेतली. शेतकऱ्यांना आधुनिक शेती पद्धतींची माहिती देणे हा या मोहिमेचा उद्देश असल्याचं चौहान म्हणाले.

****

सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहांमध्ये अत्याधुनिक सुविधा देणार असून राज्यातील १२५ वसतिगृहांसाठी बाराशे कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, असं प्रतिपादन सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी काल केलं. सांगली जिल्ह्यातील मिरज इथे शासकीय वसतिगृहांच्या नूतन इमारतींचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. भविष्यात भाडे तत्त्वावरील वसतिगृहं शासकीय इमारतीत व्हावीत, यासाठी प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

दरम्यान, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जन्मस्थानी सांगली जिल्ह्यातील वाटेगाव इथं राष्ट्रीय दर्जाचं भव्य स्मारक उभारण्यासाठी शासनाकडून २५ कोटीं रुपयांच्या निधीची तरतूद शिरसाट यांनी जाहीर केली आहे. स्मारकाच्या जागेची पाहणी करून, १५ दिवसांत ताब्यात घेण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत. या स्मारकामुळे अण्णा भाऊ साठे यांचं कार्य आणि विचार पुढील पिढ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहचेल असा विश्वास शिरसाट यांनी व्यक्त केला.

****

ईशान्येकडील राज्यांत मुसळधार पावसामुळे पूरस्थिती गंभीर झाली आहे. त्रिपुरा, मणिपूर, सिक्कीममध्ये रस्ते जलमय झाले आहेत तर आसाममध्ये ब्रह्मपुत्रा आणि तिस्ता नद्यांच्या पाणी  पातळीत वाढ झाली आहे. एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि भारतीय सैन्याकडून सतत मदत आणि बचाव कार्य सुरु आहे. गृहमंत्री अमित शहा यांनी आसाम, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश आणि मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून केंद्राकडून सर्वतोपरी सहकार्याचं आश्वासन दिलं आहे.

दरम्यान, सध्या राज्याच्या बहुतांश भागात पावसानं विश्रांती घेतली आहे, या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, असा सल्ला राज्याच्या कृषी विभागानं पुन्हा एकदा दिला आहे. तर, तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल, अशी शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात गेल्या तीन दिवसात ८ पूर्णांक ३ मिलिमीटर तर विभागात ८ पूर्णांक ९ मिलिमिटीर पावसाची नोंद झाली.

****

नॉर्वे इथल्या बुद्धीबळ स्पर्धेत विश्वविजेता डी गुकेशनं मॅग्नस कार्लसनचा पराभव केला. क्लासिकल प्रकारात गुकेशचा कार्लसनवर हा पहिलाच विजय आहे. शेवटच्या टप्प्यात असलेल्या स्पर्धेत गुकेशनच्या विजयामुळं विजेतेपदाची शर्यत आणखी चुरशीची झाली आहे.

****

इंडियन प्रिमियर लीग - आयपीएल क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना उद्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरु आणि पंजाब किंग्ज संघादरम्यान होणार आहे. काल झालेल्या दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात पंजाबच्या संघाने मुंबई इंडियन्सचा पाच गडी राखून पराभव करत अंतिम फेरी गाठली. मुंबईच्या संघाने प्रथम फलंदाजी करत निर्धारित षटकात २०३ धावा केल्या. पंजाब किंग्जने पाच गडी गमावत हे लक्ष्य साध्य केलं.

****

No comments:

Text - آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر‘علاقائی اُردو خبریں: بتاریخ: 22 دسمبر 2025‘ وقت: صبح 09:00 تا 09:10

  Regional Urdu Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 22 December-2025 Time: 09:00-09:10 am آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر علاقائی خب...