Regional
Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 04 June
2025
Time 7.10
AM to 7.20 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०४ जून २०२५ सकाळी ७.१० मि.
****
·
महाराष्ट्र राज्य अनुसूचित
जमाती आयोगाची स्थापना करण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय
·
केंद्र सरकारकडून राज्याला
प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेअंतर्गत १० लाख २९ हजार ९५७ अतिरिक्त घरांची
मंजूरी
·
राज्यात इयत्ता पहिलीपासून
विद्यार्थ्यांना मूलभूत लष्करी प्रशिक्षण, शालेय शिक्षण मंत्री दादा
भुसे यांची घोषणा
·
पिकं आणि कीडरोग मुक्त रोपं
निर्मितीसाठीचा स्वच्छ वनस्पती कार्यक्रम देशभरात राबवणार - केंद्रीय कृषीमंत्री
शिवराज सिंह चौहान यांची माहिती
आणि
·
आयपीएल क्रिकेट स्पर्धेत १८
वर्षांनंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाला
विजेतेपद
****
महाराष्ट्र राज्य अनुसूचित जमाती आयोगाची स्थापना करण्याचा
निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यांच्या अध्यक्षतेखाली काल ही बैठक झाली. यासह इतर निर्णयांची माहिती देणारा हा
संक्षिप्त वृत्तांत,
या आयोगाची रचना राज्य अनुसूचित जाती आयोगाप्रमाणेच एक अध्यक्ष आणि चार
अशासकीय सदस्य अशी राहील. आयोगाकरता नव्याने २६ पदे निर्माण करण्यात येणार आहेत.
या पदांसाठीचे तसंच आयोगाचे सदस्य यांचं वेतन, भत्ते आणि इतर अनुषंगिक खर्चासाठी चार कोटी २० लाख रुपयांच्या तरतुदीस मान्यता
देण्यात आली. अनुसूचित जाती आयोग देखील स्वतंत्रपणे कार्यरत राहणार आहे. या दोन्ही
आयोगांना घटनात्मक दर्जा मिळावा, यासाठी
मंत्रिमंडळाने तत्त्वतः मान्यता दिली.
छत्रपती संभाजीनगर इथं राज्य कामगार विमा योजनेच्या रूग्णालयासाठी १५ एकर जमीन
देण्यासही मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. छत्रपती संभाजीनगर शहरातल्या
औद्योगिक विस्तार आणि वाढत्या कामगारवर्गाच्या आरोग्य गरजांचा विचार करून, कर्मचारी राज्य विमा निगमचं २०० खाटांचं रुग्णालय उभारण्यात येणार आहे. यासाठी
मौजे करोडी इथली १५ एकर गायरान जमीन देण्यास या बैठकीत मान्यता देण्यात आली.
राज्यात अन्य नऊ ठिकाणी अशी रुग्णालयं उभारण्याचं प्रस्तावित आहे.
त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला पथकराच्या सवलतीसाठी भरपाई
देण्याचा आणि मुंबईच्या प्रवेशद्वाराच्या पाच पथकर स्थानकावर सवलत दिल्यानं
महामंडळाला भरपाई देण्याचा निर्णयही मंत्रिमंडळाने घेतला आहे.
दरम्यान, मंत्रिमंडळ बैठकीत राज्यात अवकाळी
पावसामुळे झालेल्या नुकसानाचा आढावा घेण्यात आला. या पावसामुळे कापणी झालेल्या
पिकांच्या नुकसानासाठीही शेतकऱ्यांना भरपाई देण्याबाबत
विचार केला जाईल,
असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. मदत आणि
पुनर्वसन विभागाच्या प्रधान सचिव सोनिया सेठी यांनी सादरीकरणाद्वारे राज्यातल्या
अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची आणि मदतीची माहिती दिली. राज्यातल्या पाणी
टंचाईच्या परिस्थितीमध्ये सुधारणा झाली असून, छत्रपती संभाजीनगर आणि
जालना या दोन जिल्ह्यांमध्ये टॅंकरने पाणीपुरवठा सुरू असल्याचं यावेळी सांगण्यात
आलं.
****
केंद्र सरकारनं राज्याला प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण
अंतर्गत १० लाख २९ हजार ९५७ अतिरिक्त घरांसाठी मंजूरी दिली आहे. मुख्यमंत्री
फडणवीस यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात ही माहिती दिली. या निर्णयाबद्दल त्यांनी, पंतप्रधान
नरेंद्र मोदी आणि केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांचे आभार मानले.
नव्या मंजूरीमुळे राज्यात २०१६ मध्ये योजनेला सुरुवात झाल्यापासून एकूण ४४ लाख ७०
हजार ८२९ घरांना मंजूरी मिळाली आहे.
दरम्यान, काल पुण्यात प्रधानमंत्री आवास
योजनेअंतर्गत ग्रामीण लाभार्थी मेळाव्यात बोलताना मुख्यमंत्र्यांनी, राज्यातल्या
३० लाख बेघर जनतेला आवास योजनेअंतर्गत घरे मिळवून देणारं महाराष्ट्र हे पहिलं
राज्य असल्याचं सांगितलं.
****
राज्य मार्ग परिवहन - एसटी महामंडळातल्या कर्मचाऱ्यांना मूळ
वेतनाच्या त्रेपन्न टक्के महागाई भत्ता देण्याची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
यांनी केली. मुंबईत एसटी महामंडळाच्या विविध संघटनांच्या प्रतिनीधींसोबत झालेल्या
बैठकीत ते काल बोलत होते. हा निर्णय या महिन्यापासून लागू होणार असल्याचं त्यांनी
सांगितलं. याशिवाय महामंडळातल्या कर्मचाऱ्यांना एक कोटी रुपयांचं अपघाती विमा कवच
लागू करण्याचा,
त्यांना महात्मा फुले जनआरोग्य योजना किंवा धर्मवीर आनंद
दिघे वैद्यकीय प्रतिपूर्ती योजना यापैकी एक निवडण्याचा पर्याय, तसंच
सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोफत प्रवास पास नऊ ऐवजी १२ महिन्यासाठी देण्याचा
निर्णयही या बैठकीत घेण्यात आला.
****
राज्यात इयत्ता पहिलीपासून विद्यार्थ्यांना मूलभूत लष्करी
प्रशिक्षण देण्याची घोषणा शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी काल केली. शाळेतले
क्रीडा शिक्षक,
एनसीसीचे सदस्य, स्काऊट्स आणि गाईड्स
यांच्यासोबतच निवृत्त सैनिकही या प्रशिक्षणात महत्वाची भूमिका बजावतील, असं
त्यांनी सांगितलं. विद्यार्थ्यांमधलं देशप्रेम वाढीस लागावं, याकरता, तसंच
त्यांना व्यायामाची कायमची सवय आणि शिस्त लागावी, या दृष्टीनं हा
निर्णय घेतल्याचं भुसे यांनी सांगितलं.
****
पिकं आणि कीडरोग मुक्त रोपं निर्मितीसाठीचा स्वच्छ वनस्पती
म्हणजे क्लीन प्लांट कार्यक्रम देशभरात राबवण्याची घोषणा, केंद्रीय
कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी केली. विकसित कृषी संकल्प अभियानाअंतर्गत
पुण्यात आयोजित कृषी हॅकेथॉनच्या समारोप समारंभात ते काल बोलत होते. क्लिन प्लांट
कार्यक्रमार्तंगत देशात नऊ प्रयोगशाळा उभारण्यात येणार असून, त्यासाठी
तीनशे कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यापैकी द्राक्षासाठी पुणे, संत्र्यासाठी
नागपूर आणि डाळिंबासाठी सोलापूर इथं या प्रयोगशाळा उभारण्यात येणार असल्याची
माहिती चौहान यांनी दिली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित
पवार यावेळी उपस्थित होते. शेती क्षेत्रासमोर अनेक समस्या असताना शेतकऱ्याला
साहाय्य करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर हा एकमात्र उपाय असल्याचं
मुख्यमंत्री म्हणाले. हे तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणं गरजेचं असून, त्यासाठी
कृषी विभागानं पुढाकार घेऊन कृषी महाविद्यालयांमध्ये इन्क्युबेशन केंद्रं तयार
करावीत, असं त्यांनी केलं.
बाईट
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
****
दहशतवादाविरोधात भारताची भूमिका स्पष्ट करण्यासाठी जगातल्या
विविध देशांना भेट देण्यासाठी रवाना झालेली बहुपक्षीय शिष्टमंडळं मायदेशी परतत
आहेत. अल्जेरिया,
सौदी अरेबिया, कुवेत आणि बहरीन या देशांना
भेट देऊन परतलेल्या भाजपा खासदार बैजयंत पांडा यांच्या नेतृत्वाखालच्या
शिष्टमंडळानं काल नवी दिल्ली इथं परराष्ट्र मंत्री डॉ. एस जयशंकर यांची भेट घेतली, आणि
आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना सादर केल्या. द्रमुक खासदार कनिमोळी करुणानिधी
यांच्या नेतृत्वाखालचं शिष्टमंडळ रशिया, लाटविया, स्लोव्हेनिया, ग्रीस
आणि स्पेनचा दौरा करून मायदेशी परतलं.
****
विकसित कृषी संकल्प अभियानांतर्गत छत्रपती संभाजीनगर इथल्या
कृषी विज्ञान केंद्रानं काल पैठण तालुक्यात शेतकरी मार्गदर्शन कार्यक्रमांचं आयोजन
केलं होतं. बिडकीन,
शेकटा, तोंडोळी, लोहगाव, लोहगाव
आणि मुलानी वडगाव या गावांमध्ये जाऊन शास्त्रज्ञांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठानं विकसित केलेल्या तंत्रज्ञानाचा जास्तीत
जास्त शेतकरी बांधवांनी अवलंब करावा, असं आवाहन कृषी शास्त्रज्ञ
डॉ राकेश अहिरे यांनी केलं. या अभियानात खरीप हंगाम पूर्व नियोजन, पशुधन
व्यवस्थापन,
शासनाच्या विविध योजना, शेतीसाठी
ड्रोनचा वापर अशा विविध विषयावर शास्त्रज्ञांनी मार्गदर्शन केलं.
****
विकसित भारत कृषी संकल्प अभियानांतर्गत जालना तालुक्यातल्या
भाटेपुरी इथं काल शेतकऱ्यांना सोयाबीन पीक व्यवस्थापन, खंतांचा
संतुलित वापर,
बीबीएफ तंत्राचा वापर तसंच कृषी विभागामार्फत राबवण्यात
येणाऱ्या विविध योजनांची माहिती देण्यात आली.
****
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं १८ वर्षांनी इंडियन प्रीमियर लीग
- आयपीएलचं जेतेपद पटकावलं आहे. काल अहमदाबाद इथं झालेल्या अंतिम सामन्यात
बंगळुरुच्या संघाने पंजाब किंग्जचा सहा धावांनी पराभव केला. बंगळुरुच्या संघाने
प्रथम फलंदाजी करत निर्धारित षटकात नऊ बाद १९० धावा केल्या. प्रत्युत्तरात पंजाबचा
संघ १८४ धावाच करु शकला.
गुजरात टायटन्सच्या साई सुदर्शनला सर्वाधिक धावा केल्यामुळे
ऑरेंज कॅप,
तर प्रसिद्ध कृष्णाला सर्वाधिक बळी घेतल्याबद्दल पर्पल कॅप
पुरस्कार देण्यात आला.
****
माजी केंद्रीय मंत्री, भाजपचे ज्येष्ठ नेते
गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त काल सर्वत्र त्यांना अभिवादन करण्यात
आलं. बीड जिल्ह्यात गोपीनाथ गडावर झालेल्या कार्यक्रमात मंत्री पंकजा मुंडे, आमदार
धनंजय मुंडे,
माजी खासदार प्रितम मुंडे यांच्यासह त्यांचे कुटुंबिय आणि
कार्यकर्त्यांनी गोपिनाथ मुंडे यांना अभिवादन केलं.
****
जालना जिल्ह्यातल्या जाफ्राबाद तालुक्यातल्या वरुड बुद्रुक
इथं एका कुटुंबातल्या सात ते चौदा वर्षं वयोगटातल्या तीन भावंडांचा शेततळ्यात
बुडून मृत्यू झाल्याची घटना काल उघडकीस आली. यश जोशी, दिपाली
जोशी आणि रोहन जोशी अशी मृत भावंडांची नावं आहेत. हे तिघं परवा सकाळी या
परिसरातल्या महादेव मंदिरात दर्शनासाठी म्हणून गेले होते, ते
न परतल्यामुळे शोध घेतला असता काल शेततळ्यात तिघांचे मृतदेह आढळून आले.
****
नांदेड जिल्ह्यात किनवट तालुक्यातल्या दोन महिला तलाठ्यांना
१६ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आलं. भाग्यश्री तेलंगे आणि
सुजाता गवळे या दोघींनी,
एका शेतकऱ्याच्या पत्नीच्या नावे शेती करण्यासाठी ही लाच
मागितली होती. याप्रकरणी किनवट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
****
No comments:
Post a Comment