Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date
– 05 June 2025
Time
7.10 AM to 7.20 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०५ जून २०२५ सकाळी ७.१० मि.
****
·
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पंतप्रधानांच्या उपस्थितीत
दिल्लीत वृक्षारोपण मोहीम, राज्यातही विविध कार्यक्रमांचं आयोजन
·
राज्यात वनाच्छादनाची टक्केवारी वाढवण्यासाठी हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र
अभियानाअंतर्गत १० कोटी वृक्ष लागवडीचं उद्दिष्ट
·
संसदेचं पावसाळी अधिवेशन येत्या २१ जुलैपासून सुरु होणार
आणि
·
बंगळुरुमध्ये आयपीएल विजेतेपदाच्या सत्कार सोहळ्यात झालेल्या
चेंगराचेंगरीत ११ जणांचा मृत्यू
****
जागतिक
पर्यावरण दिन आज साजरा होत आहे. यानिमित्त पर्यावरणाचं जतन, संवर्धन करण्यासंदर्भात
सर्वत्र जनजागृतीपर कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.
पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत नवी दिल्लीतल्या भगवान महावीर वनस्थली उद्यानात आज
विशेष वृक्षारोपण मोहिमेचा शुभारंभ करण्यात येणार आहे. एक पेड मां के नाम या मोहिमेअंतर्गत
ते यावेळी वडाचं झाड लावणार आहेत.
दरम्यान, पर्यावरण
दिनानिमित्त राज्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. आज सकाळी मंत्रालयातले
अधिकारी आणि कर्मचारी त्यांच्या वापरातील एकल प्लास्टिक टाकून देणार असून, प्लास्टिक वापरणार नाही अशी शपथ घेणार आहेत. पर्यावरण आणि वातावरणीय बदल मंत्री
पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार असून, यावेळी
कापडी पिशव्यांचं वाटप करण्यात येणार आहे.
****
राज्यात
वनाच्छादनाची टक्केवारी वाढवण्यासाठी या अभियानाअंतर्गत यावर्षी १० कोटी वृक्ष लागवड
करण्यात येणार असल्याची घोषणा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र या मोहिमेच्या आढावा बैठकीत
ते काल बोलत होते. वृक्षारोपण ही लोकचळवळ झाली तरच ही मोहीम यशस्वी होईल, त्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करण्याचं आवाहन त्यांनी केलं. मराठवाड्यात
विशेषतः बीड, लातूर सारख्या जिल्ह्यात सर्वात कमी वृक्ष लागवड
असून, तिथे झाडांची संख्या वाढवण्यासाठी वन विभागाने विशेष मोहीम
राबवण्याची सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.
****
छत्रपती
संभाजीनगचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी नागरीकांना पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा
दिल्या असून, पर्यावरणाचं जतन करण्यासाठी जिल्हा प्रशासन राबवत असलेल्या योजनांची
माहिती दिली. ते म्हणाले,
बाईट
- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी
****
लातूर जिल्ह्यात
वृक्षारोपण मोहीम राबवली जाणार असून, जिल्ह्यातले नागरिक आणि स्वयंसेवी संस्थांनी
यामध्ये सहभागी होवून ही मोहीम लोकचळवळ बनवावी, असं आवाहन जिल्हाधिकारी
वर्षा ठाकूर-घुगे यांनी केलं. जागतिक पर्यावरण दिनाच्या पूर्वसंध्येला आयोजित कार्यक्रमात
त्या काल बोलत होत्या.
दरम्यान, लातूर शहर
मनपा आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, उप प्रादेशिक कार्यालय
यांच्या वतीने पर्यावरण दिनानिमित्त प्लास्टिक प्रदूषण निर्मूलन आणि कापडी पिशवी वापराबाबत
काल जनजागरण रॅली काढण्यात आली. भाजी आणि फळ विक्रेत्यांकडे आलेल्या नागरिकांना प्लास्टिक
पिशव्या न वापरण्याचं आवाहन करून २०० नागरिकांना यावेळी कापडी पिशव्यांचं वाटप करण्यात
आलं.
****
संसदेचं
पावसाळी अधिवेशन येत्या २१ जुलैपासून सुरु होणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या संसदीय
कामकाज समितीची बैठक संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या अध्यक्षतेखाली काल नवी दिल्लीत
झाली, त्यानंतर संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी वार्ताहरांना
ही माहिती दिली. हे अधिवेशन येत्या १२ ऑगस्टपर्यंत चालणार आहे.
****
गेल्या
११ वर्षात सेवा, सुशासन आणि गरीब कल्याण या तत्वांच्या माध्यमातून देशातल्या नागरिकांच्या
जीवनमानात आमुलाग्र परिवर्तन घडून आलं आहे. गेल्या ११ वर्षात प्रमुख क्षेत्रांत झालेल्या
बदलांचा आढावा आजपासून आकाशवाणी तुमच्यासाठी घेऊन येत आहे. आज आपण कौशल्य विकास आणि
रोजगार निर्मिती-अमृत पिढीचं सबलीकरण याविषयीची माहिती घेणार आहोत.
‘‘देशातील ६५
टक्क्यांहून अधिक लोकसंख्या ३५ वर्षांखालील वयोगटात आहे. देशाच्या भविष्यासाठी
कौशल्य आणि युवकांचे सक्षमकरण महत्त्वाच्या बाबी आहेत. सरकारने यात लक्ष
घातल्यामुळे महाविद्यालयीन रोजगारक्षम विद्यार्थ्यांचे प्रमाण २०१४ मध्ये ३४ टक्के
होते ते वाढून सध्या ५१ टक्क्यांपर्यंत पोहचलं आहे. पीएम कौशल्य विकास योजनेच्या
माध्यातून गेल्या दहा वर्षांत एक कोटी ६३ लाख युवकांना प्रशिक्षित करण्यात आले
आहे. स्कील इंडिया मिशनद्वारे उद्योगप्रणीत प्रशिक्षण देण्यात येत आहे. २०२२ मध्ये
रोजगार मेळाव्याची सुरुवात झाली, याअंतर्गत १५
कार्यक्रमांतून १० लाख युवकांना नियुक्तीपत्रं देण्यात आली आहेत. मुद्रा योजनेच्या
माध्यमातून लघु उद्योजकांना पतपुरवठा सुलभ झाला आहे. स्टार्टअप इंडिया मोहिमेमुळं
स्टार्टअप उद्योगांत महिलांचे प्रमाण लक्षणीय वाढलं आहे. कौशल्य, रोजगारक्षमता आणि उद्योजकतेची सांगड घालून नवी पिढी देशाच्या उज्ज्वल
भवितव्याच्या प्रवासाला चालना देत आहे.’’
****
बंगळुरु
मधल्या चिन्नास्वामी स्टेडियमजवळ झालेल्या चेंगराचेंगरीत किमान ११ जणांचा मृत्यू झाला
आहे. तर ३३ जण जखमी झाले आहेत. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा पहिला आयपीएल विजय साजरा करण्यासाठी
जमलेल्या हजारो चाहत्यांनी विविध गेटमधून घाईघाईनं स्टेडियममध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न
केला तेव्हा चेंगराचेंगरी झाली. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामैय्या यांनी या घटनेबद्दल
दु:ख व्यक्त केलं असून, मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी दहा लाख रुपये मदत जाहीर केली
आहे. स्टेडियमची मर्यादा ३५ हजार असताना, जवळपास एक लाख लोक याठिकाणी
आले होते, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
****
नागपूर
- मुंबई समृद्धी महामार्गावरच्या इगतपुरी ते आमणे या शेवटच्या टप्प्याचं उद्घाटन आज
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि
अजित पवार यावेळी उपस्थित असतील. सायन - पनवेल महामार्गावरील तिसर्या ठाणे खाडी पुलाचं
लोकार्पणही यावेळी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून होणार आहे.
****
नैसर्गिक
आपत्तीमुळे पडझड, नुकसान झालेल्या घरांच्या दुरुस्ती, पुनर्बांधणीसाठी
आपत्तीग्रस्तांना तातडीने आर्थिक मदत करण्यासाठी सर्व विभागीय आयुक्तांना ४९ कोटी रुपये
इतका निधी वितरीत करण्यास मान्यता देण्यात आली आहे. यासंदर्भातला शासन निर्णय काल जारी
करण्यात आला. या निर्णयानुसार राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या मानकानुसार अंतर्गत सद्यःस्थितीत
छत्रपती संभाजीनगर आणि पुणे विभागाला प्रत्येकी १२ कोटी रुपये, नागपूर विभागाला १० कोटी, तर नाशिक आणि अमरावती विभागाला
प्रत्येकी पाच कोटी रुपये इतका निधी वितरीत करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
****
येत्या
२१ जून रोजी ११ वा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात येणार आहे. योग दिनाला १६ दिवस
बाकी आहेत. आज जाणून घेऊया, भारतीय योग संस्थानचे राज्यातले उप प्रांत अधिकारी प्राध्यापक
डॉ. उत्तम काळवणे यांनी, भद्रासनाविषयी दिलेली माहिती,
बाईट
- प्राध्यापक डॉ. उत्तम काळवणे
****
विकसित
कृषी संकल्प अभियानाअंतर्गत नांदेड जिल्ह्यात काल शास्त्रज्ञ आणि कृषी मार्गदर्शकांनी
अनेक गावांचा दौरा करुन, शेतकऱ्यांना जैविक शेती, मृदा आरोग्य,
नैसर्गिक खतांचा वापर आणि जलवायु अनुकूल शेती तंत्रज्ञान याबद्दल माहिती
दिली. देगलूर तालुक्यातल्या कुषावाडी, होट्टल, काठेवाडी आणि धर्माबाद तालुक्यातल्या पाटोदा खुर्द, पाटोदा
बुद्रुक आणि चिकना या गावी हे अभियान प्रभावीपणे पार पडलं. शेतीतील जैविक संसाधनांचा
प्रभावी वापर केल्यास उत्पादनाची गुणवत्ता वाढते तसंच मृदाची सुपीकता आणि जलसंधारण
सुधारते, अशी माहिती वैज्ञानिकांनी यावेळी दिली.
****
नांदेडच्या
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातर्फे १३ दिवसात पदवी परीक्षेचं निकाल जाहीर
करण्यात आले. विद्यापीठातर्फे यावर्षी पेपरच्या मूल्यांकनासाठी प्रथमच अद्यावत तंत्रज्ञानाचा
वापर करण्यात आला. यामध्ये जवळपास साडे आठ लाख उत्तरपत्रिकांचं स्क्रीनिंग करून त्या
चार जिल्ह्यातल्या ७६ मुल्यांकन केंद्रावर ऑनलाईन पाठवण्यात आल्या होत्या. त्यामुळे प्राध्यापकांना
तात्काळ मूल्यांकन करता आलं. पदवी आणि पदव्युत्तरच्या एकूण १८३ अभ्यासक्रमाची परीक्षा
विद्यापीठातर्फे घेण्यात आली होती.
****
बुलढाणा
जिल्ह्यातल्या चिखली मेहकरदरम्यान भरधाव जाणाऱ्या ट्रकमुळे झालेल्या अपघातात तिघेजण
मृत्यूमुखी पडले. वेगात जाणाऱ्या ट्रकने चारचाकीला धडक दिली आणि ती चारचाकी दुचाकीवर
आदळली, दुचाकीवरचे दोघे आणि चारचाकीतल्या एकाचा मृतांमध्ये समावेश आहे.
जखमींवर चिखली इथल्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
****
हवामान
मराठवाड्यात
बहुतांश भागात पुढील दोन दिवस हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यात हवामान
विभागानं व्यक्त केली आहे. तर, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासाठी आज यलो
अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसंच शुक्रवार आणि शनिवारी छत्रपती
संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट
जारी केला आहे.
****
No comments:
Post a Comment