Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 06 June 2025
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती
संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०६ जून २०२५ सायंकाळी ६.१०
****
· उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल्वे प्रकल्प हा भारताच्या नव्या सामर्थ्याचा जयघोष
- पंतप्रधानांचं प्रतिपादन; चिनाब या जगातल्या सर्वात उंच
कमानीवरच्या रेल्वे पुलाचं उद्घाटन
· रिझर्व्ह बँकेच्या द्वैमासिक पतधोरण आढाव्यात रेपो दरात अर्धा टक्के कपात
· नीट पीजी परीक्षा येत्या ३ ऑगस्टला एकाच सत्रात घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाची
परवानगी
आणि
· छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त सर्वत्र विविध कार्यक्रम
****
जम्मू काश्मीरमध्ये सुरू होणारा उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल्वे
प्रकल्प हा भारताच्या नव्या सामर्थ्याचा जयघोष आहे, असं
प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. ते आज जम्मू आणि कश्मीरमध्ये ४६ हजार
कोटी रुपये खर्चाच्या विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांचं उद्घाटन केल्यानंतर बोलत होते.
यावेळी त्यांनी उधमपूर-श्रीनगर- बारामुल्ला रेल्वे प्रकल्पाचं राष्ट्रार्पण केलं. तसंच
या प्रकल्पांतर्गत येणाऱ्या आणि जगातला सर्वात उंच कमानीवरचा रेल्वे पूल असलेल्या चिनाब
आणि देशातला सर्वात उंच केबलवरचा पूल असलेल्या अंजी पुलाचं उद्घाटनही त्यांच्या हस्ते
झालं. हा रेल्वे प्रकल्प पूर्ण करणं अत्यंत आव्हानात्मक होतं, पण आपल्या सरकारने हे आव्हान पूर्ण केलं. या मार्गावरचे दोन्ही पूल जम्मू काश्मीरच्या
समृद्धीचा मार्ग बनतील, पर्यटनासह अर्थव्यवस्थेच्या
इतर घटकांनाही याचा लाभ होईल, असं पंतप्रधानांनी नमूद केलं.
आजचा हा कार्यक्रम भारताच्या एकता आणि इच्छशक्तिचा उत्सव असल्याचं ते म्हणाले –
बाईट – पंतप्रधान नरेंद्र मोदी
तत्पूर्वी, पंतप्रधानांनी कटरा इथं श्री
माता वैष्णोदेवी-श्रीनगर वंदे भारत गाडीला हिरवा झेंडा दाखवला.
****
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीनं रेपो दरात अर्धा टक्के
कपात केली असून,
आता रेपो दर साडेपाच टक्के झाला आहे. मुंबईत बँकेच्या पतधोरण
समितीच्या बैठकीनंतर गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी द्वैमासिक पतधोरण जाहीर केलं. समितीनं
फेब्रुवारीपासून सलग तिसऱ्यांदा व्याजदरात कपात केली असून, या
कालावधीत रेपो दर एकूण एक टक्क्यानं कमी झाला आहे. चालू आर्थिक वर्षात चलनफुगवट्याचा
दर ३ पूर्णांक ७ दशांश टक्के पर्यंत आटोक्यात राहील असा सुधारित अंदाज पत धोरण समितीनं
आढाव्यात व्यक्त केला आहे.
****
गडचिरोली इथं आज सी-60 जवानांचा सत्कार आणि नक्षलवाद्यांच्या आत्मसमर्पणाचा कार्यक्रम
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झाला. मार्च २०२६ पर्यंत नक्षलवाद पूर्णपणे
संपून जाईल,
असं सांगतानाच त्यांनी नक्षलग्रस्त भागाच्या विकासावर सरकार
लक्ष केंद्रीत करत असल्याचं सांगितलं.
बाईट – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
****
राष्ट्रीय परीक्षा मंडळाला तीन ऑगस्ट रोजी एकाच सत्रात नीट पीजी
प्रवेश परीक्षा घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं परवानगी दिली आहे. मंडळानं याबाबत
परीक्षा केंद्रांची संख्या आणि वेळ वाढवण्याची मागणी करणारा अर्ज दाखल केला होता. नीट
पीजी परीक्षा तीन ऑगस्ट रोजी घेण्यामागची कारणं योग्य असल्याचं सांगत, ही परीक्षा घेण्यासाठी राष्ट्रीय परीक्षा मंडळाला आणखी वेळ दिला जाणार नाही, असं सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. याआधी ही परीक्षा १५ जूनला होणार होती.
****
गेल्या ११ वर्षात सेवा, सुशासन
आणि गरीब कल्याण या तत्वांच्या माध्यमातून देशातल्या नागरिकांच्या जीवनमानात आमुलाग्र
परिवर्तन घडून आलं आहे. गेल्या ११ वर्षातील प्रमुख क्षेत्रांत झालेल्या बदलांचा आढावा
आकाशवाणी तुमच्यासाठी घेऊन येत आहे. आज, आपण देशाच्या समृद्ध
सांस्कृतिक वारसा जतन याविषयीची माहिती घेणार आहोत.
गेल्या
दशकांत देशाच्या सांस्कृतिक समृद्ध, ऐतिहासिक वारसा आणि देशातील वैविध्याचा जागतिक पातळीवर ठसा उमटला आहे. सरकारनं
देशातल्या सच्च्या राष्ट्रनिर्मात्यांचा गौरव करण्यासाठी आझादी का अमृत महोत्सव साजरा
केला. तसंच दीर्घकाळापासून प्रलंबित प्रधानमंत्री संग्रहालय, राष्ट्रीय पोलीस स्मारक, आदिवासी स्वातंत्र्य सैनिक संग्रहालय, भारत मंडपम आणि संसदेची नवीन इमारत या वास्तूंचं काम पूर्ण करुन या वास्तूंना देशाच्या
एकात्मेतंच प्रतिक बनवलं. एक भारत-श्रेष्ठ भारत, काशी तमिळ संगम आणि ऐतिहासिक विक्रम नोंदवणारा महाकुंभमेळा-२०२५ यामुळे सांस्कृतिक
परिदृश्य बदलले. बौद्ध परिषद आणि शिख गुरुंचा प्रकाश पर्व यामुळं भारताचा सांस्कृतिक
वारसा जागतिक पातळीवर पोहोचला आहे. मनोरंजन क्षेत्रातील भारतीय प्रतिभा वेव्हजच्या
माध्यमातून जागतिक मंचासमोर सादर करण्यात आली. भारताची समृद्ध संस्कृती आता जगभर ठसा
उमटवत आहे.
****
छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकदिनानिमित्त आज विविध
कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. हिंदवी स्वराज्याची राजधानी रायगडावर विशेष कार्यक्रम
होत आहे. संभाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक
करण्यात आला. जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या उपस्थितीत शासकीय मानवंदना देण्यात आली.
'जागर शौर्य भक्ती'चा कार्यक्रम, युद्धाचं
प्रात्यक्षिक,
ढोलताशांचा गजर आणि लेझीमची प्रात्यक्षिके यासारखे विविध कार्यक्रम
योवळी सादर करण्यात आले.
****
परभणी जिल्हा परिषदेत fशिवराज्यभिषेक
दिनानिमित्त विविध कार्यक्रम घेण्यात आले. जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या हस्ते
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं पूजन करण्यात आलं. मुख्य कार्यकारी अधिकारी
नतिशा माथुर यांच्या हस्ते शिवशक राजदंड स्वराज्यगुढीची उभारणी करण्यात आली. यावेळी
उपस्थितांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरित्र ग्रंथाचे वाटप करण्यात आलं.
****
नांदेड जिल्हा परिषदेत शिवराज्यभिषेक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात
पालकमंत्री अतुल सावे सहभागी झाले होते. शिवस्वराज्याची प्रेरणा नव्या पिढीला नवचैतन्य
देणारी असल्याचं ते म्हणाले. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, मुख्य
कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक मेघना कावली यांनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार
अर्पण केला तसंच शिवशक राजदंड आणि गुढीची पूजा केली. शाहीर रमेश गिरी आणि त्यांच्या
समुहाने शिवचरित्रावर आधारित पोवाडा आणि गीत सादर केली.
****
छत्रपती संभाजीनगर शहरात जय जय रघुवीर समर्थ सेवाभावी संस्था
वतीने शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष सुहास ठोसर यांच्या
हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर
सामुहीक गीत गायनाचा कार्यक्रम सादर झाला.
****
पुण्यात अखिल भारतीय शिव महोत्सव समिती, मराठा सेवा संघ आणि इतर शिवप्रेमी संघटनांच्या वतीनं लाल महाल इथं शिवराज्याभिषेक
सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे. यानिमित्त राज्यातल्या विविध गड किल्ल्यांवर विविध
कार्यक्रम होत आहेत.
****
येत्या २१ जून रोजी ११ वा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात
येणार आहे. योग दिनाला १५ दिवस बाकी आहेत. आज जाणून घेऊया, भारतीय
योग संस्थानच्या गटप्रमुख वर्षा देशपांडे यांनी दिलेली, उष्ट्रासनाविषयी
माहिती.
बाईट – वर्षा देशपांडे
****
राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी नागरिकांना बकरी ईदनिमित्त
शुभेच्छा दिल्या आहेत. ईद अल - अधा हा सण सर्वांच्या जीवनात सुख, शांती आणि समृद्धी घेऊन येवो, असं राज्यपालांनी आपल्या संदेशात
म्हटलं आहे.
****
राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसस्थानक आणि बस आगार परिसराच्या
जागांचा विकास करून उत्पन्नाचे स्त्रोत निर्माण करण्याच्या सूचना परिवहन मंत्री प्रताप
सरनाईक यांनी दिल्या. एस.टी महामंडळाच्या मध्यवर्ती कार्यालयात या संदर्भात झालेल्या
आढावा बैठकीत ते आज बोलत होते. बसस्थानकांच्या विकास कामांमध्ये सुधारणा करून तातडीने
या संदर्भातील कार्यवाही पूर्ण करण्याचे निर्देशही सरनाईक यांनी यावेळी दिले.
****
महावितरणच्या विसाव्या वर्धापन दिनानिमित्त साजरा होणाऱ्या
‘शून्य अपघात महावितरण, शून्य अपघात महाराष्ट्र’ या
संकल्पनेतून सुरक्षा सप्ताह साजरा होत आहे. याअंतर्गत आज छत्रपती संभाजीनगर परिमंडलातील
सर्व कार्यालयांमध्ये महावितरण कर्मचाऱ्यांनी विद्युत सुरक्षेची सामूहिक प्रतिज्ञा
घेतली. प्रभारी मुख्य अभियंता मनीष ठाकरे यांच्यासह सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी
यावेळी सुरक्षेची सामुहीक प्रतिज्ञा घेतली.
****
No comments:
Post a Comment