Saturday, 7 June 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 07.06.2025 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 07 June 2025

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ०७ जून २०२५ सायंकाळी ६.१०

****

·      शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी सरकार वचनबद्ध - पंतप्रधानांचं प्रतिपादन, गेल्या ११ वर्षांत विविध सरकारी उपक्रमांमुळे कृषी क्षेत्रात परिवर्तन

·      पारंपरिक जीवनशैलीतून विकसित झालेल्या आहारविषयक सवयींमध्ये शहरीकरणामुळे अनुचित बदल झाल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती

·      देशातल्या सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या आज पाच हजार ७५५

आणि

·      देशभरात बकरी ईदचा सण पारंपरिक पद्धतीने उत्साहात साजरा

****

शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी सरकार वचनबद्ध असल्याचं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या ११ वर्षांच्या कार्यकाळात कष्टकरी शेतकऱ्यांची सेवा करण्याची संधी मिळाली, हे सरकारचं भाग्य असल्याचं त्यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. गेल्या ११ वर्षांत, विविध सरकारी उपक्रमांमुळे शेतकऱ्यांची समृद्धी वाढली असून, कृषी क्षेत्रात परिवर्तन घडून आलं. तसंच मातीचं आरोग्य आणि सिंचन यासारख्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित केल्यामुळे त्याचे चांगले परिणाम दिसत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. आगामी काळातही शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी सरकारचे प्रयत्न सुरु राहतील असं आश्वासन पंतप्रधानांनी यावेळी दिलं.

****

केंद्र सरकारने सुरु केलेल्या स्टार्ट अप इंडिया या योजनेमुळे अनेक नवउद्योजकांना चालना मिळाली. छत्रपती संभाजीनगरचे उद्योजक गणेश शेळके यांना या योजनेमुळे नवीन उद्योग त्यांना सुरु करता आला. याबद्दल ते सांगतात

बाईट – गणेश शेळके, उद्योजक

****

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे दावे निराधार असल्याचं निवडणूक आयोगानं म्हटलं आहे. महाराष्ट्राच्या मतदार यादीवरील त्यांचे आरोप कायद्याच्या नियमाचा अपमान असल्याचंही आयोगानं याबाबत जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाच महिन्यात ३९ लाख मतदार वाढल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला होता. गेल्या वर्षी २४ डिसेंबर रोजी काँग्रेस पक्षाला दिलेल्या उत्तरात आरोपांबाबत सर्व तथ्ये समोर आणली होती, जी आयोगाच्या वेबसाइटवर उपलब्ध आहे. असे मुद्दे वारंवार उपस्थित करताना या तथ्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं जात असल्याचं आयोगानं म्हटलं आहे.

****

पारंपरिक जीवनशैलीतून विकसित झालेल्या आहारविषयक सवयींमध्ये शहरीकरणामुळे अनुचित बदल झाले असल्याचं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. नागपूर इथं आज डायबिटीज केअर अँड रिसर्च सेंटर आणि डायबिटीज केअर फाउंडेशन ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने 'हॅलो डायबिटीज' या बाराव्या आंतरराष्ट्रीय परिषदेचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. आदर्श जीवनशैलीचा स्वीकार करून मधुमेहापासून दूर राहता येणं शक्य असल्याचं ते म्हणाले. भारतात मोठ्या प्रमाणात पसरत जाणारा मधुमेह आणि ओबेसिटी ही गंभीर आणि चिंतेची बाब असल्याचं सांगून मुख्यमंत्र्यांनी, भारत ही मधुमेहाची राजधानी होऊ नये यासाठी आयोजित करण्यात येणाऱ्या अशा जनजागृतीपर परिषदांचे महत्त्वपूर्ण योगदान असल्याचं नमूद केलं. बदलत्या जीवनशैलीमुळे निर्माण होणाऱ्या आजारांना दूर ठेवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फिट इंडिया मुव्हमेंट या सारखे विविध उपक्रम हाती घेतले असून, यातून आरोग्य विषयक जनजागृतीला प्राधान्य दिलं जात असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

****

शासकीय कार्यालयातल्या ई - सेवा केंद्रातून विविध शैक्षणिक दाखले तसंच न्यायालयातील प्रतिज्ञापत्रासाठी शंभर किंवा पाचशे रुपयांच्या स्टॅम्प पेपरची करण्यात येणारी मागणी नियमबाह्य असल्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं आहे. यापुढे अशा स्टॅम्प पेपरची मागणी करण्यात येऊ नये, अशा आशयाचं पत्र त्यांनी, राज्यातल्या सर्वच विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदारांना पाठवलं आहे. विद्यार्थी, पालक, पक्षकार तसंच शेतकऱ्यांच्या हितासाठी दोन महिन्यांपूर्वी जात पडताळणी प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलेयर सर्टिफिकेट, राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र तसंच न्यायालयासमोर दाखल करायच्या सर्व प्रकारच्या प्रतिज्ञापत्रासाठी स्टॅम्प पेपर रद्द करण्यात आले आहेत. साध्या कागदावर स्वयं-प्रमाणित शपथपत्र सादर करणं पुरेसं असल्याचं, बावनकुळे यांनी स्पष्ट केलं.

****

सुरक्षित अन्न आणि औषध प्रत्येक व्यक्तीला मिळावं, यासाठी अन्न आणि औषध प्रशासन विभागाने अन्न सुरक्षा: कृतीत विज्ञानया संकल्पनेला पुढे नेण्याची गरज असल्याचं, या विभागाचे मंत्री नरहरी झिरवाळ यांनी म्हटलं आहे. मुंबईत आज जागतिक अन्न सुरक्षा दिनानिमत्त आयोजित राज्यस्तरीय कार्यक्रमात ते बोलत होते. अन्न आणि औषध प्रशासन विभागाने निकृष्ट दर्जाच्या, बनावट, भेसळयुक्त किंवा प्रतिबंधित केलेल्या अन्न पदार्थ आणि औषध उत्पादनांची विक्री रोखण्याचं काम करावं, असं झिरवाळ यांनी सूचित केलं.

****

देशातल्या सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या आज पाच हजार ७५५ झाली असून, चार जणांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्र, केरळ, मध्य प्रदेश आणि तमिळनाडूमध्ये प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला. केरळमध्ये रुग्णांची संख्या वाढत असून, एका दिवसात १२७ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. गुजरातमध्ये १०२ आणि महाराष्ट्रात २९ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे.

****

येत्या २१ जून रोजी ११ वा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात येणार आहे. योग दिनाला १४ दिवस बाकी आहेत. आज जाणून घेऊया, योग शिक्षिका मोना राजपूत यांनी दिलेली, सर्वांगासनाविषयी माहिती.

बाईट – मोना राजपूत

****

देशभर आज ईद-ऊल-अझहा अर्थात बकरी ईदचा सण पारंपरिक पद्धतीने उत्साहात साजरा होत आहे. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि पंतप्रधानांनी जनतेला ईद च्या शुभेच्छा दिल्या आहेत. मुस्लिम बांधवांनी आज ईदगाह आणि मशिदीत जाऊन ईद निमित्त नमाज पठण करुन, परस्परांना शुभेच्छा दिल्या.

ईदचा सण हा त्याग, श्रद्धा आणि मानवी मूल्यांचं प्रतीक असल्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे. राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी नागरिकांनाईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

****

विकसित कृषि संकल्प अभियान शेतकऱ्यांसाठी फायदेशीर असल्याचं, राहुरी इथल्या महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे यांनी म्हटलं आहे. पारनेर तालुक्यातल्या राळेगणसिद्धी इथं विकसित कृषी संकल्प अभियानाअंतर्गत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी शेतकऱ्यांना खरीप हंगाम नियोजनाबाबत, तसंच सोयाबीन, मका, मू, तू, पिकांबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आलं. सोयाबीन उगवण क्षमता चाचणी आणि बीज प्रक्रिया प्रात्यक्षिकही दाखवण्यात आलं. राळेगणसिद्धी गावातले शेतकरी मोठ्या संख्येनं यावेळी उपस्थित होते.

****

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आत्तापर्यंत छत्रपती संभाजीनगर, पैठण, फुलंब्री, सिल्लोड आणि सोयगाव तालुक्यातल्या शेतकऱ्यांना कृषी संकल्प अभियानाअंतर्गत बीज प्रक्रिया, माती परिक्षण, अत्याधुनिक तंत्रज्ञान, आदींबाबत माहिती देण्यात आली. शहरातल्या कृषी विज्ञान केंद्रातल्या डॉ.दीप्ती पाटगावकर यांनी या अभियानाबाबत अधिक माहिती दिली. त्या म्हणाल्या

बाईट – डॉ.दिप्ती पाटगावकर

****

बीडच्या जिल्हा क्रीडा संकुलात, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आणि जिल्हा क्रिडा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित १२ दिवसीय आपदा मित्र प्रशिक्षणकार्यक्रमाचं उद्घघाटन निवासी जिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांच्या हस्ते आज करण्यात आलं. नैसर्गिक आपत्तींमधून नागरिकांचे प्राण वाचवण्यासाठीचं प्रशिक्षण या कार्यक्रमात दिलं जात आहे.

****

जालना इथं आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने महायुती सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यात आलं. बदनापूर तालुक्यातल्या बाजार गेवराई इथं विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या उपस्थित झालेल्या या आंदोलनात सरकारला विविध आश्वासनांची पूर्तता न केल्याबद्दल जाब विचारण्यात आला. तर जालना इथं पक्षाचे जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर यांच्या नेतृत्त्वात आंदोलन करण्यात आलं.

****

राज्यातल्या अनेक भागात पुढील दोन ते तीन दिवस वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे.

****

No comments: