Monday, 9 June 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 09.06.2025 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date -  09 June 2025

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०९ जून २०२   दुपारी १.०० वा.

****

मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणाऱ्या लोकल रेल्वेतून दिवा-मुंब्रा स्थानकादरम्यान आज सकाळी साडे नऊच्या दरम्यान अकरा प्रवासी खाली पडल्याची घटना घडली. या घटनेत चार प्रवाशांचा मृत्यू झाला, तर दोन प्रवासी गंभीर जखमी आहेत. नऊ जखमी प्रवाशांमध्ये सात पुरुष आणि दोन महिला आहेत. ठाण्याचे नायब तहसीलदार दिनेश पैठणकर यांनी ही माहिती दिली. अपघातानंतर जखमींना तातडीनं शिवाजी हॉस्पिटल, कळवा आणि ठाणे सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेबाबत दु:ख व्यक्त केलं आहे. मृत्यू पावलेल्या प्रवाशांच्या कुटुंबीयांच्या दु:खात सहभागी असून अपघातात जखमी प्रवाशांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा होवो, असं फडणवीस यांनी म्हटलं आहे. रेल्वे विभागानं या अपघाताची चौकशी सुरु केल्याची माहिती त्यांनी दिली.

या अपघातामुळे आपण व्यथित झालो, ही अतिशय दुःखदायक घटना असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. मृताच्या परिवाराच्या दुःखात सहभागी आहे. अपघात कशामुळे झाला हे चौकशीतून समोर येईल असं शिंदे म्हणाले.

अपघाताची घटना दुर्दैवी, क्लेशदायक असून या घटनेतील दिवंगत प्रवाशाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. उपनगरीय रेल्वेसेवा अधिक प्रभावी आणि सुरक्षित करण्यासाठी रेल्वे प्रशासन लवकरात लवकर ठोस पावलं उचलेल, असा विश्वास अजित पवार यांनी व्यक्त केला.

****

गेल्या ११ वर्षांत एनडीए सरकारच्या काळात, १४० कोटी भारतीयांच्या सामूहिक सहभागामुळे सुशासन आणि परिवर्तनावर स्पष्ट लक्ष केंद्रित केलं. त्यामुळं विविध क्षेत्रांमध्ये जलद प्रगती झाल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. 'सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास' या सुत्राच्या माध्यमातून सरकारनं संवेदनशीलतेनं अभूतपूर्व बदल घडवून आणले आहेत. आर्थिक वाढीपासून ते सामाजिक उन्नतीपर्यंत, सरकारनं लोककेंद्री, समावेशी आणि सर्वांगीण प्रगतीला प्राधान्य दिल्याचं मोदी यांनी समाजमाध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. भारत आज केवळ सर्वात वेगानं वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था नाही तर देशानं हवामान कृती आणि डिजिटल नवोपक्रम यासारख्या महत्त्वाच्या मुद्यांवर जागतिक पातळीवर ठसा उमटवल्याचं पंतप्रधान म्हणाले.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात गेल्या ११ वर्षांत झालेला विकास सुवर्णाक्षरांमध्ये नोंद करण्याजोगा असल्याचं भाजपचे अध्यक्ष जे पी नड्डा यांनी म्हटलं आहे. केंद्र सरकारला ११ वर्षे पूर्ण झाली, त्यानिमित्त नड्डा यांनी आज नवी दिल्ली इथं प्रसारमाध्यमांना संबोधित केलं. सरकारनं आपल्या नागरिकांना युक्रेन, अफगाणिस्तान आणि येमेनमधून परत आणलं. तसंच कोविड काळात वॅक्सिन मैत्री मोहिमेअंतर्गत अनेक देशांना मदत केल्याचं नड्डा म्हणाले. देशाची अर्थव्यवस्था १० व्या स्थाहून पाचव्या स्थानी पोहोचली आहे. एवढचं नाही तर नवीन आकडेवारीनूसार लवकरच भारतीय अर्थव्यवस्था चौथ्या क्रमांकाची होईल, असं जे पी नड्डा यांनी सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं कार्य अद्वितीय आहे. पंतप्रधानांनी देशाच्या राजकारणाची संस्कृती कशी बदलली हे आपण लक्षात घेतलं पाहिजे, असं नड्डा म्हणाले.

****

महत्त्वाच्यात अ‍ॅक्सिओम-4 मोहिमेचं प्रक्षेपण उद्या सायंकाळी नासाच्या केनेडी स्पेस सेंटरमधून होणार आहे. हे ऐतिहासिक अभियान अमेरिका, भारत, पोलंड आणि हंगेरी इथल्या चार अंतराळवीरांना १४ दिवसांच्या वैज्ञानिक मोहिमेसाठी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर घेऊन जाईल. यात लखनऊ इथल्या सुभांशू शुक्ला यांचा समावेश आहे. १९८४ मध्ये राकेश शर्मा यांच्यानंतर अंतराळ मोहिमेवर जाणारे सुंभाशू शुक्ला दुसरे भारतीय नागरीक आहेत. हे अंतराळवीर दोन आठवडे अंतराळ स्थानकात मायक्रोगॅविटी आणि इतर बाबींविषयी संशोधन करणार आहेत.

****

आदिवासी समुदायांच्या हक्कांसाठी आणि प्रतिष्ठेसाठी लढणारे धरती आबा म्हणून प्रसिद्ध असलेले भगवान बिरसा मुंडा यांची आज १२५ वी पुण्यतिथी आहे. यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिरसा मुंडा यांना अभिवादन केलं आहे.

****

गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम, आदिवासी आणि नक्षलग्रस्त भागातील शाळांमध्ये स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ह्युंदाई मोटरच्या सहकार्यानं अडीचशे शाळांमध्ये ही सुविधा सुरू झाली आहे. या उपक्रमातून जवळपास २६ हजार विद्यार्थ्यांना स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध झाले आहे. विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या स्वच्छ पाण्यामुळे त्यांचं आरोग्य आणि शिक्षण यामध्ये सकारात्मक सुधारणा होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.

****

मोतीबिंदू जनजागृती मोहिमेअंतर्गत गोंदिया जिल्ह्यातल्या ग्रामीण रुग्णालयात नेत्र तपासणी करण्यात येत आहे. मधुमेह तसंच डोळ्यांचे आजार असलेल्या रुग्णांनी वेळोवेळी नेत्र तपासणी करून घ्यावी असा सल्ला आरोग्य अधिकारी डॉ अमोल जांभुळकर यांनी दिला आहे.

****

राज्यात अनेक भागात पुढील दोन ते तीन दिवस वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे.

****

No comments: