Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 16 June 2025
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १६ जून २०२५ दुपारी १.०० वा.
****
आजपासून नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात
झाली. राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाच्या वतीने अनेक शाळांमध्ये शाळा प्रवेशोत्सव
साजरा करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांचं पहिल्या दिवशी अनोख्या पद्धतीनं स्वागत करण्याच्या
उद्देशाने अनेक शाळांनी विविध उपक्रम राबवले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज
पालघर जिल्ह्याच्या दौऱ्यावर
असून, दुर्वेस इथल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत शाळा प्रवेशोत्सव
सोहळ्यात ते सहभागी झाले होते.
दरम्यान, पालघर इथं प्रधानमंत्री धरती आबा जनजातीय
ग्राम उत्कर्ष अभियानांतर्गत धरती आबा लोकसहभाग मोहिमेचा आणि विविध विकास कामांचा शुभारंभही
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होत आहे.
****
धाराशिव जिल्ह्यात तुळजापूर नगरपरिषद
प्राथमिक शाळेत नवीन विद्यार्थ्यांचं फेटे बांधून, फुले आणि पेढे देऊन तसंच पावलांचे ठसे घेऊन
स्वागत करण्यात आलं. हैदराबाद इथल्या सत्य शिवम फाउंडेशनच्या वतीनं विद्यार्थ्यांना
शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात आलं.
सोलापूर तालुक्यातल्या इंगळगी जिल्हा
परिषद प्राथमिक शाळेत इयत्ता पहिलीतल्या विद्यार्थ्यांचं आमदार सुभाषबापू देशमुख यांच्या
हस्ते स्वागत करण्यात आलं. यावेळी विद्यार्थ्यांना शालेय साहित्यांचं वितरण तसंच शाळा
परिसरात वृक्षारोपण करण्यात आलं.
लातूर जिल्ह्यात शाळेच्या पहिल्या
दिवशीच विद्यार्थ्यांचं उत्साहात स्वागत करताना पहिलीतल्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकं, गणवेश, बूट आणि
सॉक्स वितरित करण्यात आले. अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांच्या पायांचे ठसे घेण्याचा विशेष
उपक्रमही राबवला जात आहे.
छत्रपती संभाजीनगर इथं पहिल्यांदा
शाळेत येणाऱ्या चिमुकल्यांचं औक्षण करून तसंच फुलांची उधळण करून स्वागत केलं जात आहे.
****
भारत सरकारने २०२७ मध्ये होणाऱ्या
जनगणनेची आणि पहिल्यांदाच समाविष्ट झालेल्या जातीय जनगणनेची अधिकृत अधिसूचना आज राजपत्रात
प्रसिद्ध केली. ही जनगणना तिच्या स्थापनेपासूनची १६वी राष्ट्रीय जनगणना असेल आणि भारताच्या
स्वातंत्र्यानंतरची आठवी असेल. गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली काल दिल्लीत
यासंदर्भातल्या तयारीचा आढावा घेण्यात आला. देशभरात ३४ लाख प्रगणक आणि निरीक्षक, एक लाख तीन हजारांहून अधिक अधिकारी आधुनिक
मोबाईल डिजिटल प्रणालीद्वारे या प्रक्रियेत सहभागी होणार आहेत. जनगणनेच्या पहिल्या
टप्प्यात घरांची यादी, मालमत्ता आणि सुविधा या माहितीचं संकलन,
दुसऱ्या टप्प्यात सामाजिक-आर्थिक आणि जातीय माहिती संकलन करण्यात येणार
आहे. या प्रक्रियेमध्ये डिजिटल अॅप आणि स्व-गणनेची सुविधा देखील उपलब्ध करुन देण्यात
आली आहे. देशातल्या बर्फाळ प्रदेशात एक ऑक्टोबर २०२६ पासून, तर
इतर भागात एक मार्च २०२७ पासून जनगणना सुरू होणार आहे.
****
येत्या २१ जून रोजी साजरा होणाऱ्या
११ व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाची देशभरात जय्यत तयारी सुरु आहे. यानिमित्त देशपातळीवरचा
मुख्य कार्यक्रम विशाखापट्टणम इथं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होणार
आहे. या कार्यक्रमाचा आयुष मंत्रालय आणि राज्य शासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आढावा
घेतला. या कार्यक्रमात जवळपास पाच लाख नागरिकांचा सहभाग असणार आहे. यावेळी आरके बीच, ऋषिकोंडा बीच, आंध्र
विद्यापीठ आणि गिताम विद्यापीठ या स्थळांची पाहणी केली. या ठिकाणी योग आणि सांस्कृतिक
कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.
****
आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे निघालेल्या
शेगाव इथल्या संत श्री गजानन महाराजांच्या पालखीचं आज परभणी शहरात आगमन झालं. काल झिरो
फाटा इथं पुष्पवृष्टी आणि फटाके फोडून नागरिकांनी आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीने पालखी
सोहळ्याचं स्वागत करण्यात आलं. पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी गजानन महाराजांच्या
पालखीचं दर्शन घेतलं. वारी विठोबाची, साथ आरोग्याची या अभिनव उपक्रमातर्गत परभणीच्या
सार्वजनिक आरोग्य विभागाकडून पालखी सोहळ्यातल्या वारकऱ्यांची आरोग्य तपासणी करून उपचार
देण्यात येत आहेत. पालखीच्या मार्गावर ठिकठकाणी आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं
आहे.
****
राज्यातल्या अनेक भागात मुसळधार
पावसाने जनजीवन विस्कळीत झालं आहे. रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू
असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातल्या अनेक नद्यांना पूर आला असून, तीन नद्यांनी इशारा पातळी ओलांडली आहे.
मुसळधार पावसामुळे दापोलीतून दाभोळला जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर झाड कोसळल्यामुळे वाहतूक
काही काळ बंद झाली होती. संगमेश्वर तालुक्यात धामणी आणि संगमेश्वर परिसरातही पूरसदृश
परिस्थिती निर्माण झाली आहे.
पालघर जिल्ह्यातही आज सकाळपासून
जोरदार पाऊस सुरु असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
पुणे जिल्ह्यात मुळशी परिसरात रात्रभर
झालेल्या मुसळधार पावसामुळे स्मशानभूमी पाण्याखाली गेली आहे. पिरंगुट इथल्या पुणे-कोलाड
महामार्गावरील तात्पुरता बांधलेला भराव वाहून गेला असून, नवीन पुलाच्या कठड्यांपर्यंत पाणी आलं
आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात जोरदार पावसामुळे
अनेक बंधारे पाण्याखाली गेले. राजाराम आणि शिंगणापूर बंधारे जलमय झाले असून, पंचगंगा नदीची पाणीपातळी १४ फूटांवर पोहोचली
आहे.
****
येत्या दोन दिवसांत कोकणात बहुतांश
ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा
आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. आज रत्नागिरी, रायगड या जिल्ह्यांना रेड अलर्ट तर पालघर, ठाणे,
पुणे, सातारा, कोल्हापूर,
आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
****
No comments:
Post a Comment