Regional
Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 16 June
2025
Time 7.10
AM to 7.20 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १६ जून २०२५ सकाळी ७.१० मि.
****
· राज्यभरात चार घटनांमध्ये ११ जणांना जलसमाधी-यवतमाळ जिल्ह्यातल्या तिघांचा
उत्तराखंडात हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू
· आषाढी एकादशीसाठी पंढरपूरकडे निघालेल्या विविध पालख्यांचं मराठवाड्यातून
मार्गक्रमण
· आजपासून नवीन शैक्षणिक वर्षाला प्रारंभ-शिक्षण विभागाकडून शाळा प्रवेशोत्सवाचं
आयोजन
आणि
· राज्याच्या बहुतांश भागात जोरदार पाऊस-अनेक जिल्ह्यांना खबरदारीच्या सूचना
****
राज्यात काल विविध घटनांमध्ये ११ जण पाण्यात बुडाले. पुणे
जिल्ह्यात मावळ तालुक्यात कुंडमळा या पर्यटनस्थळी इंद्रायणी नदीवरचा लोखंडी पूल
कोसळून काही पर्यटक वाहून गेले. या घटनेत चार जणांचा मृत्यू झाला असून, तर
३२ जण जखमी झाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेबद्दल दु:ख
व्यक्त केलं आहे. मृतांच्या कुटुंबीयांना पाच लाख रुपयांची आर्थिक मदत राज्य
सरकारतर्फे करण्यात येईल,
तसंच जखमींच्या उपचाराचा खर्च सुद्धा राज्य सरकार करेल, असंही
मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं.
गेल्या काही दिवसात झालेल्या जोरदार पावसामुळे नदीच्या
पात्रातील पाण्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. काल रविवारचा सुट्टीचा दिवस
असल्याने पुलावर क्षमतेपेक्षा अधिक गर्दी होऊन पूल कोसळल्याचं प्रत्यक्षदर्शींचं
म्हणणं आहे.
****
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या घटनेबद्दल दु:ख
व्यक्त केलं असून,
अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी राज्यातल्या अशा
जुन्या पुलांचं परीक्षण करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत. पर्यटनस्थळी विशेषत:
सुटीच्या दिवशी होणारी गर्दी लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने आपत्कालिन मदतीसाठीची
यंत्रणा तत्पर ठेवावी अशा सुचनाही शिंदे यांनी दिल्या.
उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी, या
दुर्घटनेमागील कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार असल्याचं सांगितलं.
****
दरम्यान, राज्यात बुलडाणा, रायगड
तसंच जालना जिल्ह्यातही घडलेल्या प्रत्येकी एका घटनेत सात जण बुडाल्याचं आमच्या
वार्ताहरांनी कळवलं आहे.
बुलडाणा जिल्ह्यात मलकापूरजवळ विश्वगंगा नदीत बुडाल्यानं दोन महिलांचा मृत्यू
झाला,
तर चौघांची प्रकृती गंभीर आहे. एकाच कुटुंबातले हे सर्वजण
खामगाव इथले रहिवासी असल्याचं, आमच्या
वार्ताहरानं कळवलं आहे.
दुसरी घटना रायगड जिल्ह्यात माथेरान इथं घडली, नवी मुंबईतल्या कोपरखैरणे इथल्या दहा जणांचा समूह माथेरानमध्ये पर्यटनासाठी
आला होता. यातले तीन जण शार्लोट तलावात पोहण्यासाठी उतरले असता, पाण्याचा अंदाज न आल्यानं तिघंही बुडाले. पोलीस तसंच नगरपालिका प्रशासनाचे
कर्मचारी आणि स्थानिक बचाव पथकांनी शोधमोहिम राबवली, मात्र रात्री उशिरापर्यंत तिघांचा शोध लागला नव्हता.
जालना जिल्ह्यातही दोन बालकांचा तलावात बुडून मृत्यू झाला. जाफ्राबाद
तालुक्यात शनिवारी सायंकाळी ही दुर्घटना घडली.
****
उत्तराखंडमध्ये रुद्रप्रयागच्या गौरीकुंड परिसरात काल
हेलिकॉप्टर कोसळून सात जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये यवतमाळ जिल्ह्यातल्या वणी
इथल्या जयस्वाल कुटुंबियांचा समावेश आहे. हे हेलिकॉप्टर केदारनाथहून गुप्तकाशीला
जात होतं. खराब हवामानामुळे हेलिकॉप्टर कोसळल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी
दिली. या अपघाताची ‘एएआयबी’ अर्थात, ‘विमान अपघात तपास
विभागामार्फत चौकशी होणार आहे. दरम्यान, सुरक्षेच्या कारणास्तव या
प्रदेशातल्या सर्व हेलिकॉप्टर सेवा दोन दिवस स्थगित करण्यात आल्या आहेत.
****
अहमदाबाद विमान अपघातात मृत झालेल्यांच्या नातेवाईकांचे
डीएनएचे २५० नमुने घेण्यात आले आहेत. त्यापैकी ६२ मृतदेहांचे डीएनए नमुने जुळले
असून, आतापर्यंत ३५ मृतदेह कुटुंबांकडे सुपूर्द करण्यात आले आहेत. दरम्यान, या
घटनेत निधन झालेले गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचा डीएनए नमुना जुळला
असून, त्यांच्या पार्थिव देहावर आज राजकोट इथं अंत्यसंस्कार होणार आहेत.
****
गडचिरोली जिल्ह्याच्या अतिदुर्गम, नक्षलग्रस्त
भागातल्या तीन निवासी शाळांमधले १२० विद्यार्थी बंगळूरु इथल्या भारतीय अंतराळ
संशोधन केंद्र - इसरोला भेट देण्यासाठी काल विमानाने रवाना झाले. मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर
या विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांना शुभेच्छा दिल्या.
****
एसटी बसनं प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आजपासून एसटी
महामंडळ एसटी पास थेट तुमच्या शाळेत ही विशेष मोहीम राबवणार आहे. या मोहिमेतून
विद्यार्थ्यांना एसटीचे पास त्यांच्या शिक्षणसंस्थांमधून वितरीत केले जाणार आहेत.
सर्व शाळा महाविद्यालयांनी आपल्या संस्थेत नवीन वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची
यादी तयार ठेवावी अशी सूचना एसटीच्या आगार व्यवस्थापकांनी शिक्षणसंस्थांना केली
आहे.
****
आषाढी एकादशीसाठी पंढरपूरकडे निघालेल्या विविध पालख्या
मराठवाड्यातून मार्गक्रमण करत आहेत. जळगाव जिल्ह्यातल्या मुक्ताईनगर इथली संत श्री
मुक्ताबाईंची पालखी काल जालना जिल्ह्यात दाखल झाली. वाघरुळ जहागीर इथं पालखीचं
उत्साहात स्वागत करण्यात आलं. शेगावच्या संत श्री गजानन महाराजांच्या पालखीचं काल
परभणी जिल्ह्यात पूर्णा तालुक्यातल्या झिरोफाटा इथं आगमन झालं. हजारो भाविकांनी
पालखीचं दर्शन घेतलं.
हिंगोली जिल्ह्यातल्या नरसी नामदेव इथून संत श्री नामदेव
महाराजांच्या पालखी सोहळ्याचं आज प्रस्थान होणार आहे. या सोहळ्यात एक हजाराहून
अधिक वारकरी सहभागी होणार आहेत. नांदेड जिल्ह्यात देगलूर इथल्या गुंडा महराज
संस्थानची दिंडी काल रवाना झाली. या सोहळ्याला सुमारे २३० वर्षांची परंपरा आहे.
****
आजपासून नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात होत आहे. राज्य
शासनाच्या शालेय शिक्षण विभागाच्या वतीने शाळा प्रवेशोत्सव साजरा केला जाणार आहे.
विद्यार्थ्यांचं पहिल्या दिवशी अनोख्या पद्धतीनं स्वागत करण्याच्या उद्देशाने अनेक
शाळांनी विविध उपक्रमांचं आयोजन केलं आहे.
लातूर जिल्ह्यात शाळेच्या पहिल्या दिवशीच विद्यार्थ्यांचं उत्साहात स्वागत
करताना पहिलीतल्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तक, गणवेश,
बूट आणि सॉक्स वितरित केले जाणार आहेत. विद्यार्थ्यांच्या
पायांचे ठसे घेण्याचा विशेष उपक्रमही शाळांमध्ये
राबवला जाणार आहे. जिल्ह्यातल्या सर्व जिल्हा परिषद शाळांमध्ये
विविध मान्यवर भेटी देणार आहेत.
बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन हे बीड तालुक्यातल्या कारेगव्हाण जिल्हा
परिषद शाळेत होणाऱ्या मुलांच्या स्वागताच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.
जालना जिल्ह्यात शाळेची गुणवत्ता वाढवण्यासाठी आणि मुलांची उपस्थिती
वाढवण्याकरता शालेय शिक्षण विभागामार्फत संपूर्ण जिल्ह्यात 'शाळा प्रवेशोत्सव' उपक्रम
साजरा केला जाणार आहे.
छत्रपती संभाजीनगर इथं शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी
करण्यात आली असून, पहिल्यांदा शाळेत येणाऱ्या
चिमुकल्यांचं औक्षण करून तसंच फुलांची उधळण करून त्यांचं
स्वागत केलं जाणार आहे.
****
योगदिनाच्या पार्श्वभूमीवर आकाशवाणी दररोज आपल्या
श्रोत्यांसाठी एका आसनाविषयी माहिती देत आहे. आज आपण छत्रपती संभाजीनगर इथले डॉ.
विवेक चर्जन यांनी दिलेली पश्चिमोत्तानासन विषयीची माहिती जाणून घेऊ या...
बाईट
- डॉ. विवेक चर्जन
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ११ वर्षाच्या यशस्वी
कार्यकाळात भारताने सेवा,
सुशासन आणि गरीब कल्याणाचा एक नवीन आर्दश उभा केल्याचं माजी
केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी म्हटलं आहे. ते काल जालना इथं पत्रकार
परिषदेत बोलत होते.
****
आमदार संजय केनेकर यांनी बीड इथं पत्रकार परिषदेत गेल्या ११
वर्षात केंद्र सरकारने केलेल्या कामांचा आढावा घेतला. देशाच्या विकासाचं श्रेय
भारतीयांना जात असल्याचं त्यांनी नमूद केलं.
****
बीड जिल्ह्यात, गेवराई तालुक्यात काल
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं छापा मारून अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवर कारवाई
केली. राक्षसभुवन इथं केलेल्या या कारवाईत सतरा लाख सहा हजार रुपयांचा मुद्देमाल
जप्त करण्यात आला.
****
आंतरराष्ट्रीय बालकामगार विरोधी दिनानिमित्त हिंगोली इथं
काल सरकारी कामगार अधिकारी कार्यालय, जिल्हा महिला बालविकास
अधिकारी कार्यालय,
जिल्हा बाल संरक्षण कक्षाच्या संयुक्त विद्यमानं
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली. अप्पर
जिल्हाधिकारी महेंद्र कुमार कांबळे यावेळी उपस्थित होते.
****
राज्यात २२ जुलै रोजी "शुद्ध देशी गाय संवर्धन
दिन" साजरा केला जाणार आहे. राज्य सरकारनं यासंदर्भात अधिसूचना जारी केली. या
निमित्त चर्चासत्रं,
प्रशिक्षण शिबिरं, प्रदर्शन आणि स्पर्धा
आयोजित केल्या जातील अशी माहिती, पशूसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी
दिली.
****
राज्यात विविध जिल्ह्यांत मुसळधार पाऊस सुरु आहे. रायगड
जिल्ह्यासह कोकणात जोरदार पाऊस सुरू असून नद्या
दुथडी भरुन वाहत आहेत. मुसळधार पावसामुळे मुंबई गोवा महामार्गावरची वाहतूक
विस्कळीत झाली होती. नाशिक शहरात काल दुपारनंतर मुसळधार पाऊस पडला. मध्यवर्ती
भागामध्ये रस्त्यांना नदीचं स्वरूप प्राप्त झालं होतं.
छत्रपती संभाजीनगर परिसरातही काल वादळी वाऱ्यांसह पावसाच्या
जोरदार सरी कोसळल्या येत्या दोन दिवसांत कोकणात बहुतांश
ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र,
मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान
विभागाने व्यक्त केली आहे. आज रत्नागिरी, रायगड
या जिल्ह्यांना रेड अलर्ट तर पालघर, ठाणे, पुणे, सातारा, कोल्हापूर, आणि
सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
****
No comments:
Post a Comment