Monday, 16 June 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 16.06.2025 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 16 June 2025

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक १६ जून २०२ सकाळी.०० वाजता

****

भारत सरकारने २०२७ मध्ये होणाऱ्या जनगणनेची आणि पहिल्यांदाच समाविष्ट झालेल्या जातीय जनगणनेची अधिकृत अधिसूचना आज राजपत्रात प्रसिद्ध केली. गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली काल दिल्लीत यासंदर्भातल्या तयारीचा आढावा घेण्यात आला. देशभरात ३४ लाख प्रगणक आणि निरीक्षक, एक लाख तीन हजारांहून अधिक अधिकारी आधुनिक मोबाईल डिजिटल प्रणालीद्वारे या प्रक्रियेत सहभागी होणार आहेत. जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घरांची यादी, मालमत्ता आणि सुविधा या माहितीचं संकलन, दुसऱ्या टप्प्यात लोकसंख्याशास्त्रीय, सामाजिक-आर्थिक आणि जातीय माहिती संकलन करण्यात येणार आहे. या प्रक्रियेमध्ये डिजिटल अॅप आणि स्व-गणनेची सुविधा देखील उपलब्ध करुन देण्यात आली आहे. देशातल्या बर्फाळ प्रदेशात एक ऑक्टोबर २०२६ पासून, तर इतर भागात एक मार्च २०२७ पासून जनगणना सुरू होणार आहे.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी सायप्रस, कॅनडा आणि क्रोएशिया या देशांच्या दौऱ्यावर असून, आज ते सायप्रसचे राष्ट्रपती निकोस क्रिस्तोदोलिदिस यांची भेट घेणार आहेत. त्यांनी लिमासोलमध्ये व्यापर विषयक परिषदेत सहभाग घेतला आणि उपस्थितांना संबोधित केलं. भारतात विविध स्तरावर सुरु असलेल्या अभियानांची त्यांनी माहिती दिली. दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात आज पंतप्रधान मोदी कॅनडाला जाणार असून, जी - 7 परिषदेत सहभागी होणार आहेत.

****

अहमदाबाद विमान अपघातात मृत झालेल्यांच्या नातेवाईकांचे डीएनएचे २५० नमुने घेण्यात आले आहेत. त्यापैकी ८० मृतदेहांचे डीएनए नमुने जुळले असून, आतापर्यंत ३३ मृतदेह कुटुंबांकडे सुपूर्द करण्यात आले आहेत.

दरम्यान, या घटनेत निधन झालेले गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचा डीएनए नमुना जुळला असून, त्यांच्या पार्थिव देहावर आज राजकोट इथं शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत.

****

राज्यात गणेशोत्सवादरम्यान पीओपी मूर्तींवरील बंदी उठली असून, आता मोठ्या गणेश मुर्त्यांच्या समुद्रातील विसर्जनाबाबतही शासन ३० तारखेपर्यंत आपली भूमिका न्यायालयात मांडेल, असं सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी स्पष्ट केलं. मुंबईत काल सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आणि गणेश भक्तांचा जाहिर मेळावा आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी शेलार यांनी ही माहिती दिली.

****

राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाचं महाबळेश्वर इथलं विभागीय गहू गेरवा संशोधन केंद्र अद्ययावत करण्याबरोबरच राज्यातल्या शेतकऱ्यांना अधिकाधिक सुविधा देण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचं, कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी म्हटलं आहे. महाबळेश्वर इथं नव्यानं उभारण्यात येत असलेल्या अतिथीगृहाचं भूमिपूजन केल्यानंतर ते काल बोलत होते. महाबळेश्वर इथल्या संशोधन केंद्रामध्ये गव्हाच्या रोगावर संशोधन सुरू असून आता स्ट्रॉबेरीच्या संशोधनाला देखील मान्यता मिळाली असल्याची माहिती कोकाटे यांनी दिली.

****

डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था - बार्टीच्या पीएचडी विद्यार्थ्यांना २०२२ नंतर फेलोशीप मिळाली नसल्यानं संशोधनात अडचणी येत आहेत. त्यामुळे फेलोशिपसाठी लवकर जाहिरात द्यायची मागणी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष कृती समितीनं बार्टीकडे केली आहे. फेलोशिपसाठीची जाहिरात लवकरात लवकर काढावी, या मागणीसाठी विद्यापीठ कृती समितीनं बार्टीचे महासंचालक सुनील वारे यांची भेट घेतली. महाज्योतीप्रमाणे सेट, नेट परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना बार्टीने विद्यावेतन द्यावं, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

****

अहिल्यानगर जिल्ह्यातल्या संगमनेर तालुक्यात कोल्हार घोटी महामार्गावर स्लीपर कोच बस आणि ट्रकची धडक होऊन झालेल्या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला, तर नऊ जण जखमी झाले आहेत. जखमींवर संगमनेर शहरातल्या खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

****

परभणी जिल्ह्यातल्या गंगाखेड इथं आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या अध्यक्षतेखाली महावितरणची बैठक पार पडली. वारंवार जीज खंडित होण्यासंदर्भात महावितरणच्या अधिकाऱ्यांनी नागरिकांच्या तक्रारीची दखल घेत प्रश्न सोडवावेत, अन्यथा अधिकाऱ्यांना अजिबात पाठीशी घालणार नाही, असा इशारा गुट्टे यांनी दिला. यावेळी वीज वाटप, भारनियमन, वीजबील विषयक तक्रारी तसंच नागरिकांच्या विविध अडचणींबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

****

उत्तर मॅसेडोनिया इथं झालेल्या डब्ल्यू टी टी कंटेन्डर स्कोप्जे टेबल टेनिस स्पर्धेच्या पुरुष दुहेरीच्या अंतिम सामन्यात मानव ठक्कर आणि मानुश शहा या भारतीय जोडीला पराभव पत्करावा लागला. दक्षिण कोरियाच्या जोडीने त्यांना सलग तीन सेटमध्ये ९-११, ७-११, ९-११ असं पराभूत केलं.

****

राज्यातल्या अनेक भागात मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झालं आहे. रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातल्या अनेक नद्यांना पूर आला असून, तीन नद्यांनी इशारा पातळी ओलांडली आहे. मुसळधार पावसामुळे दापोलीतून दाभोळला जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर झाड कोसळल्यामुळे वाहतूक काही काळ बंद झाली होती. संगमेश्वर तालुक्यात धामणी आणि संगमेश्वर परिसरातही पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.

पालघर जिल्ह्यातही आज सकाळपासून जोरदार पाऊस सुरु असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 01.01.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 01 January 2026 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत...