Tuesday, 17 June 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 17.06.2025 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date - 17 June 2025

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक १७ जून २०२ दुपारी १.०० वा.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज कॅनडातल्या कानानास्किस इथं होणार्या जी 7 शिखर परिषदेत सहभागी होणार आहेत. ते सलग सहाव्यांदा या परिषदेत सहभागी होत आहेत. कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांच्या निमंत्रणावरुन पंतप्रधान कॅनडाला भेट देत आहेत. या दोन दिवसांच्या दौर्यात ते अनेक द्विपक्षीय बैठकांमध्येही भाग घेतील. तसंच पंतप्रधान जी 7 देशांच्या नेत्यांशी, इतर आमंत्रित देशांच्या आणि आंतरराष्ट्रीय संघटनांच्या प्रमुखांशी ऊर्जा सुरक्षा, तंत्रज्ञान आणि नवोन्मेष, एआय -ऊर्जा संबंध आणि क्वांटम तंत्रज्ञान अशा विविध जागतिक मुद्यांवर विचारविनिमय करतील.

****

जी सेव्हन देशांच्या नेत्यांनी इस्राईल - इराण दरम्यानच्या वाढत्या तणावासंदर्भात एक संयुक्त निवेदन जारी केलं आहे. मध्यपूर्वेत शांतता आणि स्थैर्य आणण्यासाठी प्रतिबद्ध असल्याचा पुनरुच्चार करत, या नेत्यांनी इस्राईलला स्वत:चं संरक्षण करण्याचा अधिकार असल्याचं आणि त्यासाठी इस्राईलला पाठिंबा असल्याचं या निवेदनात म्हटलं आहे. इराणला अण्वस्त्रं तयार करण्याची परवानगी कधीही मिळू नये, ही जी सेव्हन देशांची भूमिका या निवेदनात कायम ठेवण्यात आली आहे.

या तणावाच्या स्थितीत सामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेला महत्व असून, इराण हा देश या प्रदेशातल्या अस्थैर्य आणि दहशतीचं मूळ कारण असल्याचं या निवेदनात म्हटलं आहे. आंतरराष्ट्रीय ऊर्जा क्षेत्राचं नुकसान टाळण्यासाठी कारवाई करण्यास जी सेव्हेन देश तयार असल्याचंही या निवेदनात म्हटलं आहे.

****

दरम्यान, तेहरान शहरातल्या भारतीय विद्यार्थ्यांना त्या शहराबाहेर हलवण्याची व्यवस्था भारतीय दूतावासानं केल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयानं दिली आहे.

****

कोणत्याही देशाने एकतर्फी प्रतिबंधात्मक उपाय करण्याच्या विरोधात दर वर्षी चार डिसेंबरला आंतरराष्ट्रीय दिवस पाळण्याचा प्रस्ताव संयुक्त राष्ट्र महासभेनं पारित केला आहे. या प्रस्तावाच्या समर्थनात ११६ तर विरोधात ५१ मतं पडली, सहा देश या मतदानापासून दूर राहिले. युरोपियन संघ, ऑस्ट्रेलिया, ब्रिटन, जपान, कॅनडा आणि अमेरिकेनं या प्रस्तावाच्या विरोधात मत दिलं. एखाद्या राष्ट्राच्या एकतर्फी आर्थिक किंवा व्यापारसंबंधित अशा कृतीमुळे विकसनशील देशांचा आर्थिक आणि सामाजिक विकास बाधित होतो, म्हणून या प्रकारची कारवाई कोणी करू नये, असं या प्रस्तावात म्हटलं आहे.

****

थोर तत्वचिंतक, समाजसुधारक, शिक्षणतज्ज्ञ आणि स्वातंत्र्यसैनिक गोपाळ गणेश आगरकर यांची आज पुण्यतिथी आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आगरकर यांना आदरांजली वाहिली आहे.

****

पी एम उषा प्रकल्पाअंतर्गत प्राप्त निधीतून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातल्या पदव्यूत्तर विभागात आता ’स्मार्ट क्लासरुम’ तयार करण्यात येणार आहेत. विद्यापीठाच्या पदव्यूत्तर विभागांचं शैक्षणिक सत्र कालपासून सुरु झालं, त्या पार्श्वभूमीवर सर्व प्राध्यापकांच्या बैठकीत कुलगुरु डॉ. विजय फुलारी यांनी ही माहिती दिली. पदव्यूत्तर अभ्यासक्रमांच्या तासिका एक जुलैपासून सुरु होणार असून, सर्व विद्यार्थ्यांना ७५ टक्के हजेरी असल्याशिवाय परीक्षा देता येणार नाही. तसंच अभ्यासक्रम, परीक्षा आणि निकालाचं वेळापत्रक अत्यंत काटेकोरपणे पाळण्याचे आदेशही फुलारी यांनी दिले.

****

आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र सरकारनं सुरू केलेल्या प्रधानमंत्री धरती आबा जनजाती ग्राम उत्कर्ष अभियानात धाराशिव जिल्ह्यातल्या चार गावांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये परांडा तालुक्यातल्या तीन आणि धाराशिव तालुक्यातल्या एका गावाचा समावेश आहे. या गावांमध्ये येत्या तीस तारखेपर्यंत या मोहिमेबाबत जनजागृती मोहीम राबवण्यात येणार आहे. गेल्या वर्षीच्या दोन ऑक़्टोबरपासून देशभरात ही योजना सुरू करण्यात आली असून, आदिवासी जमातींचा आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक विकास करणं, हा या योजनेचा उद्देश आहे.

****

धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियानाला नंदुरबार जिल्ह्यातही सुरवात झाली. नंदुरबार पंचायत समितीच्या आवारात आज झालेल्या कार्यक्रमात जिल्हाधिकारी मिताली सेठी यांच्या हस्ते विविध योजनेतल्या लाभार्थ्यांना लाभाच्या दाखल्याचं वाटप करण्यात आलं. या योजनेअंतर्गत जिल्ह्यातल्या सहा तालुक्यांमधल्या ७१७ गावांचा समावेश करण्यात आला आहे. आदिवासी भागात ३० जून पर्यंत विविध ठिकाणी शिबीरं घेऊन योजनांची माहीती पोहोचवून लाभ देण्यात येणार आहे.

****

गोंदिया जिल्ह्यात या वर्षी झालेल्या सारस पक्ष्यांच्या गणनेत त्यांची संख्या वाढल्याचं दिसून आलं आहे. राज्यात गोंदिया जिल्ह्यात प्रामुख्यानं आढळून येणा-या पक्ष्यांच्या संख्येत गेल्या तीन चार वर्षात घट दिसली होती, मात्र वन विभागानं सारस पक्ष्याच्या संवर्धनासाठी केलेल्या विशेष प्रयत्नांमुळे या वर्षी त्यांची संख्या तेरानं वाढून आता छत्तीस पर्यंत पोचल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

No comments: