Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 17 June 2025
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती
संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १७ जून २०२५ सायंकाळी ६.१०
****
· कृषी कृत्रिम बुद्धिमत्ता धोरणाला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी-महावेध प्रकल्पालाही
मुदतवाढ
· राज्याच्या विविध भागांमध्ये विशेष शॉपिंग मॉल्स उभारण्याची कृषी विभागाची योजना
· केंद्रसरकारच्या भरीव उपाययोजनांमुळे गेल्या ११ वर्षांत आरोग्य सेवेत आमुलाग्र
बदल
· आषाढी एकादशीला पंढरपुरात विठ्ठल-रुक्मिणी शासकीय महापूजेचं मुख्यमंत्र्यांना निमंत्रण
आणि
· राज्यभरात पावसाची विश्रांती - पुढच्या दोन दिवसांत जोरदार पावसाचा इशारा
****
महाराष्ट्र कृषी-कृत्रिम बुद्धिमत्ता, अर्थात महाॲग्री-एआय धोरण २०२५ ते २०२९, ला आज राज्य मंत्रिमंडळानं
मंजुरी दिली आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात
आला. या निर्णयामुळे कृत्रिम बुद्धिमत्ता आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानाचा वापर करून कृषी
क्षेत्रात परिवर्तन घडवता येणार आहे.
केंद्र सरकारच्या वेदर इन्फॉर्मशन नेटवर्क डेटा सिस्टीम, अर्थात WINDS प्रकल्पाअंतर्गत ग्रामपंचायत स्तरावर स्वयंचलित हवामान केंद्रांची उभारणी करण्यासाठी
महावेध प्रकल्पाला मुदतवाढ देण्याचा निर्णयही आज मंत्रिमंडळानं घेतला.
ट्रायबल इंडस्ट्रियल क्लस्टरसाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास
महामंडळाला नाशिक जिल्ह्यात मौजे जांबुटके इथं
२९ हेक्टर ५२ आर जमीन देण्याचा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात
आला.
आणीबाणीत कारावास भोगलेल्यांच्या मानधनात दुपटीनं वाढ करण्याचा, तसंच त्यांच्या हयात जोडीदारालाही मानधन देणं तसंच विनाअनुदानित
खाजगी व्यावसायिक शैक्षणिक संस्थेत प्रवेशासंदर्भात, अनिवासी भारतीयांच्या व्याख्येत बदल करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.
****
कृषी विभाग राज्याच्या विविध भागांमध्ये विशेष शॉपिंग मॉल्स
उभारण्याची योजना तयार करत आहे. कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी ही माहिती दिली.
सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्वावर उभारल्या जाणार असलेल्या या मॉल्समधली पन्नास टक्के
दुकानं खाजगी व्यापाऱ्यांना भाडेपट्ट्यावर देण्यात येणार असून, पन्नास टक्के दुकानं केवळ शेतकऱ्यांसाठी असतील, असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
केंद्रसरकारने गेल्या ११ वर्षांच्या कार्यकाळात केलेल्या भरीव
उपाययोजनांमुळे आरोग्य सेवेत आमुलाग्र बदल झाले आहेत. ऐकूया अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून –
सेवा, सुशासन आणि गरीब कल्याण या तत्वांनी प्रेरित
होऊन भारताने गेल्या दशकात उल्लेखनीय परिवर्तन अनुभवलं आहे. त्यात प्रामुख्याने भारताच्या
आरोग्य सेवेचा समावेश आहे. आयुष्मान भारतसारख्या प्रमुख उपक्रमांनी जवळजवळ ५५ कोटी
लोकांना आर्थिक संरक्षण दिलं. आहे. आयुष्मान वय वंदना योजनेंतर्गत ७० वर्षं आणि त्यावरील
ज्येष्ठ नागरिकांना आरोग्य हमीचे योजनेचे फायदे देण्यात आले आहेत. आयुष्मान भारत डिजिटल
मिशनने आरोग्यसेवेचं आधुनिकीकरण केलं असून ७८ कोटींहून अधिक आयुष्मान भारत आरोग्य खाती
तयार झाली आहेत. आयुष्मान भारत अंतर्गत येणाऱ्या आरोग्याशी संबंधित पायाभूत सुविधांच्या
योजनेमुळे आरोग्य सेवेचा विस्तार झाला आहे. ईशान्येकडच्या राज्यांमध्ये एम्स रुग्णालयांची
स्थापना हे आरोग्य सेवेसाठी सरकारच्या वचनबद्धतेचं प्रतीक ठरलं आहे.
ई संजीवनी
योजनेच्या माध्यमातून रुग्णांना घरबसल्या वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला दूरस्थ पद्धतीने
घेणं शक्य झालं आहे.
जगभरात
कोविडची साथ पसरली असतानाही भारताने कोविड प्रतिबंधासाठी विमानतळावरची तपासणी, मास्क वापरण्याचं आवाहन, लॉकडाऊन जाहीर करणं, टास्क फोर्सची स्थापना करणं तसंच लस निर्मिती
पर्यंतची मजल मारली. कोविन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून कोविड लसीचे २२० कोटी डोस देण्याचा
टप्पाही भारतानं यशस्वीपणे पार केला.
गेल्या
११ वर्षांच्या काळात सर्वांसाठी आरोग्य या तत्वावर सरकारनं आरोग्य सेवेचा विस्तार केला
असून आरोग्य सेवेच्या गुणवत्तेत सुधारणा घडवून आणली आहे.
****
अहमदाबाद विमान अपघातातल्या १४४ मृतांची डीएनए चाचणीद्वारे ओळख
पटवण्यात आली आहे. त्यापैकी ८३ मृतदेह मृतांच्या कुटुंबियांना सुपूर्द करण्यात आले
आहेत. दरम्यान, या विमानाचे वैमानिक सुमीत सभरवाल
यांच्या मृतदेहाचा डीएनए जुळल्यानंतर त्यांचं पार्थिव त्यांच्या कुटुंबियांकडे सोपवण्यात
आलं. मुंबईत आज त्यांच्या पार्थिव देहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
****
ऊसतोडणी कामगार महिलांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी ‘आरोग्य मित्र’ उपक्रम राबवण्यात येईल, असं, राज्य महिला आयोगाच्या
अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी म्हटलं आहे. त्या आज छत्रपती संभाजीनगर इथं विभागीय
आयुक्त कार्यालयात झालेल्या बैठकीत बोलत होत्या. बालविवाह रोखण्याची मोहिम
प्रभावीपणे राबवण्याची सूचना चाकणकर यांनी प्रशासनाला केली.
****
येत्या आषाढी एकादशीला पंढरपुरात श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर
समितीच्या वतीनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शासकीय महापूजेचं निमंत्रण देण्यात
आलं आहे. आषाढी एकादशीच्या दिवशी, येत्या
सहा जुलैला, पहाटे दोन वाजून वीस मिनिटांनी
मुख्यमंत्री फडणवीस आणि मानाचे वारकरी यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेची सपत्नीक
शासकीय महापूजा करण्यात येईल.
****
दरम्यान, आषाढी
वारीसाठी पंढरपूरकडे निघालेल्या दिंड्यांमध्ये अंध वारकऱ्यांची दिंडी लक्ष वेधून घेत
आहे. वाशीम जिल्ह्यातून निघालेली ही दिंडी सध्या परभणी जिल्ह्यातून मार्गक्रमण करत
आहे. या वारीत पाच महिलांसह एकूण पंधरा वारकरी आहेत.
****
पैठण इथं संत एकनाथ महाराजांच्या चांदीच्या पालखी रथाचं आज खासदार
संदिपान भुमरे यांच्या हस्ते पूजन करण्यात आलं. या पालखीची पैठण नगरीतून मिरवणूक काढण्यात आली. टाळ मृदुंगाच्या
गजरात अनेक भाविक यात सहभागी झाले.
****
नाशिक जिल्ह्यातल्या त्र्यंबकेश्वर इथून निघालेल्या संत निवृत्तीनाथांच्या
पालखीनं आज अहिल्यानगर जिल्ह्यात प्रवेश केला, त्यावेळी पालखीचं मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलं. संगमनेर तालुक्यातल्या गोगलगाव
इथे या पालखी दिंडीचा आज मुक्काम आहे.
****
आंतरराष्ट्रीय योग दिन येत्या शनिवारी साजरा होत आहे. छत्रपती
संभाजीनगर जिल्ह्यात या
दिनाचा मुख्य कार्यक्रम ऐतिहासिक बीबी का मकबऱ्याच्या प्रांगणात होणार आहे. या दिवशी
सकाळी साडे सहा वाजता होणाऱ्या या कार्यक्रमात योग प्रात्यक्षिकांचं सादरीकरण आणि सामूहिक
योगासनं होणार असून, पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांचा संदेशही थेट प्रसारित केला जाणार आहे. या कार्यक्रमात अधिकाधिक
योग संस्थांनी आणि व्यायाम प्रेमी नागरिकांनी सहभागी व्हावं, असं आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केलं आहे.
योगदिनाच्या पार्श्वभूमीवर आकाशवाणी आपल्या श्रोत्यांसाठी दररोज
एका आसनाविषयी माहिती घेऊन येत आहे. आज आपण, छत्रपती संभाजीनगर इथल्या योगशिक्षक विद्या ताकसांडे यांनी दिलेली गोरक्षासनाची
माहिती जाणून घेऊ –
बाईट – विद्या ताकसांडे, योगशिक्षक
****
श्री क्षेत्र तुळजापूर इथे कुलस्वामिनी तुळजाभवानी मंदिर परिसराचा
विकास प्रकल्प येत्या तीन साडेतीन वर्षांत पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध असल्याचं धाराशिवचे
पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी म्हटलं आहे. यासंदर्भात आज मंत्रालयात झालेल्या बैठकीत
ते बोलत होते. हा प्रकल्प गतीनं मार्गी लागण्यासाठी भूसंपादन, तांत्रिक मान्यता आणि विविध निविदा प्रक्रिया, या तिन्ही गोष्टी समांतर पातळीवर करण्यात याव्यात अशा सूचना
सरनाईक यांनी दिल्या.
****
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या छत्रपती संभाजीनगर ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी
आमदार सतीश चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे
अध्यक्ष अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी आज मुंबईत चव्हाण यांना
नियुक्त पत्र दिलं.
****
राज्यभरात पावसाने आज विश्रांती घेतली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात
सर्व नद्यांची पाणीपातळीही इशारा पातळीच्या खाली आली आहे. अनेक ठिकाणी रस्ते खचल्यामुळे
वाहतुकीवर परिणाम झाला आहे.
सातारा जिल्ह्यात पाटण-चिपळूण महामार्गावरही रस्ता पाण्याखाली
जाऊन खचल्यानं वाहतूक पर्यायी मार्गावर वळवण्यात आली आहे.
मुंबई उपनगर जिल्ह्यात पाण्यात बुडून एकाचा आणि मातीच्या ढिगाऱ्याखाली
सापडून एका व्यक्तीचा मृत्यू झाला. तर विविध घटनांत सात व्यक्ती जखमी झाल्या आहेत.
दरम्यान, येत्या
दोन दिवसांत कोकण आणि मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला
आहे. रत्नागिरी, पुणे, सातारा, कोल्हापूर
तसंच सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी पुढले २४ तास ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
****
No comments:
Post a Comment