Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 18 June 2025
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती
संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १८ जून २०२५ सायंकाळी ६.१०
****
· जागतिक संरक्षण उत्पादन केंद्र म्हणून भारत स्वत:ची ओळख निर्माण करू शकतो-राष्ट्रपतींकडून
विश्वास व्यक्त
· येत्या १५ ऑगस्टपासून वार्षिक फास्टॅग पास सुरू करण्याचा रस्ते वाहतूक आणि महामार्ग
मंत्रालयाचा निर्णय
· पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना हिंदीची सक्ती रद्द- राज्य सरकारकडून शुद्धीपत्रक
जारी
आणि
· साहित्य अकादमीच्या बाल साहित्य पुरस्कार तसंच युवा पुरस्कारांची घोषणा
****
जागतिक संरक्षण उत्पादन केंद्र म्हणून भारत स्वत:ची ओळख निर्माण
करू शकतो, असा विश्वास राष्ट्रपती द्रौपदी
मुर्मू यांनी व्यक्त केला आहे. त्या आज नवी दिल्लीत राष्ट्रपती भवनात विविध विभागांच्या
परिविक्षाधिन अधिकाऱ्यांच्या तुकडीला संबोधित करत होत्या. संरक्षण परिसंस्थेत खाजगी
उद्योगांचे एकत्रीकरण करून देश स्वदेशीकरणाच्या प्रयत्नांना गती देऊ शकत असल्याचं, राष्ट्रपतींनी नमूद केलं.
****
येत्या १५ ऑगस्टपासून वार्षिक फास्टॅग पास सुरू करायचा निर्णय
रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयानं घेतला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी
आज समाज माध्यमावरच्या संदेशाद्वारे ही माहिती दिली. तीन हजार रुपये किंमतीचा हा पास
एका वर्ष कालावधी किंवा २०० फेऱ्या यापैकी आधी संपणाऱ्या मुदतीसाठी असेल. भाड्याने
घेतलेल्या वाहनांना ही सुविधा मिळणार नाही. यासाठीची लिंक लवकरच राजमार्ग यात्रा ॲप
आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, तसंच
रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या अधिकृत संकेतस्थळांवर उपलब्ध होणार असल्याचंही
गडकरी यांनी या संदेशात म्हटलं आहे.
****
राज्य शिक्षण मंडळाच्या मराठी आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये
इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना हिंदी भाषा ही तृतीय भाषा म्हणून अनिवार्य
नसल्याचं राज्य सरकारनं स्पष्ट केलं आहे. यासंदर्भात सरकारने शुद्धीपत्रक जारी केलं.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात वार्ताहरांशी बोलतांना याबाबत माहिती दिली, ते म्हणाले –
बाईट - मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस
आषाढी वारीसाठी देहू इथून संत श्री तुकाराम महाराज पालखी सोहळ्याने
आज दुपारी पंढरपूरकडे प्रस्थान केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पादुकांचं
पूजन झाल्यानंतर पालखी मार्गस्थ झाली. देहू इथं
संत ज्ञानेश्वर आणि संत नामदेव यांच्या भेटीच्या समूहशिल्पाचं
आणि संतसृष्टीचं उद्घाटन तसंच श्रीक्षेत्र टाळगाव इथं जगद्गुरू संत तुकाराम महाराज
संतपीठाच्या कलादालनाचं लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज झालं. उपमुख्यमंत्री
अजित पवार यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.
****
पैठण इथल्या संत एकनाथ महाराजांच्या पालखीनेही आज आषाढी वारीसाठी
पंढरपूरकडे प्रयाण केलं. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासह परिसरातल्या अनेक लहान मोठ्या
दिंड्या आणि शेकडो वारकरी या पालखी सोहळ्यात सहभागी झाले आहेत.
****
आषाढी वारी मार्गात कायमस्वरूपी सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्याच्या
सूचना सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी
दिल्या आहेत. त्या आज याबाबतच्या आढावा बैठकीत बोलत होत्या. वारकऱ्यांना आवश्यक सर्व
सुविधा उपलब्ध करून देण्याचं तसंच वारी काळात सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करून ही
वारी “स्वच्छ वारी, सुरक्षित
वारी, भक्तीमय वारी” करण्याचं आवाहनही
मेघना साकोरे-बोर्डीकर केले.
****
इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या वसतीगृहासाठी तातडीने योग्य
जागा निश्चित करून प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश या खात्याचे मंत्री अतुल सावे यांनी
दिले आहेत. सावे यांच्या अध्यक्षतेखाली विभागाच्या १५० दिवसांच्या आराखड्याबाबत बैठक
झाली, त्यात ते बोलत होते. २६ जिल्ह्यात
स्थापन केलेल्या या वसतीगृहांना भेटी देऊन, आवश्यक सुविधा उपलब्ध असल्याची खात्री करून घेण्याचे निर्देश सावे यांनी संबंधितांना
दिले आहेत.
****
साहित्य अकादमीनं वार्षिक बाल साहित्य पुरस्कार आणि युवा पुरस्कारांची
घोषणा आज केली. मराठी भाषेसाठी सुरेश सावंत यांच्या ‘आभाळमाया’ या कवितासंग्रहाला बाल साहित्य
पुरस्कार तर युवा पुरस्कार प्रदीप कोकरे यांच्या ‘खोल खोल दुष्काळ डोळे’ या
कादंबरीला मिळाला आहे.
****
केंद्र सरकारच्या गेल्या ११ वर्षांच्या कारकिर्दीत आंतरराष्ट्रीय
योग दिवस हा मैलाचा दगड ठरला आहे. यंदा येत्या शनिवारी आपण ११ वा आंतरराष्ट्रीय योगदिन
साजरा करत आहोत. भारतीय योगपद्धतीचा संक्षिप्त वेध घेणारा हा वृत्तांत –
योग
साधनेचा इतिहास भारताच्या प्राचीन संस्कृतीत खोलवर रुजलेला आहे. सिंधू-सरस्वती खोऱ्याच्या
संस्कृतीच्या अगदी प्रारंभीच्या काळात, एका अध्यात्मिक पद्धतीच्या रूपात सुरुवात झालेली योग साधना हळूहळू आत्म-साक्षात्काराच्या
दिशेने एक शिस्तबद्ध मार्ग म्हणून आणि त्यानंतर एका समृद्ध विद्याशाखेत विकसित झाली.
कालांतराने ही योग पद्धती वेद, उपनिषद आणि नंतर पतंजलीच्या योगसूत्रांमधून प्रवाहित झाली.
महाभारतातल्या
योगाच्या सखोल संदर्भांपासून ते स्वामी विवेकानंद आणि बी.के.एस. अय्यंगार यांच्यासारख्या
महान गुरुंनी १९ व्या आणि २० व्या शतकात केलेल्या पुनरुज्जीवनापर्यंत, योगसाधनेचा हा प्रवास एका प्राचीन परंपरेपासून
जागतिक जीवनशैलीपर्यंत विकसित झाला आहे.
२०१४
मध्ये, पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्रांच्या सभेला संबोधित करताना २१ जून हा आंतरराष्ट्रीय
योग दिन म्हणून साजरा करण्याचा प्रस्ताव मांडला. प्रचंड बहुमताने तो मंजूर झाला, आणि २१ जून हा दिवस जगभरात आंतरराष्ट्रीय
योग दिन म्हणून साजरा केला जाऊ लागला.
यंदा
शनिवारी आपण
११ वा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करत आहोत, "एक पृथ्वी- एक आरोग्यासाठी योग"
ही यंदाच्या योगदिनाची संकल्पना असून, ती एकता आणि कल्याणाचा संदेश देते. धर्म, वंश किंवा राष्ट्रीयत्व कोणतंही असो; योग साधना सर्वांनाच निरोगी, संतुलित आणि अर्थपूर्ण जीवनाचा मार्ग दाखवते.
योगदिनाच्या पार्श्वभूमीवर आकाशवाणी आपल्या श्रोत्यांसाठी दररोज
एका आसनाविषयी माहिती घेऊन येत आहे. आज आपण, छत्रपती संभाजीनगर इथले योगशिक्षक डॉ हेमंत झिळे यांनी दिलेली हलासनाची माहिती
जाणून घेऊ –
बाईट - डॉ
हेमंत झिळे, योगशिक्षक
****
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सर्व ग्रामपंचायतीमध्ये योगाभ्यास
सत्रांसह वृक्षारोपण, स्वच्छता
मोहीम आदी उपक्रम राबवण्यात येणार आहेत. विभागातल्या सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य
कार्यकारी अधिकाऱ्यांनी नागरिकांना या उपक्रमात सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे.
****
देशभरातल्या १२ विद्यार्थ्यांशी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र
प्रधान यांनी काल संवाद साधला. छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या इंदिरा नगर बायजीपुरा
शाळेतली दहावीची विद्यार्थिनी अंजली गायकवाड हिचा यात
समावेश होता. अंजलीने आपल्या रोबोटिक्स प्रकल्पाचं शिक्षणमंत्र्यांसमोर
सविस्तर सादरीकरण केलं. आपला हा अनुभव अंजलीने या शब्दांत मांडला –
बाईट – अंजली गायकवाड
****
बीड जिल्ह्यातल्या पेठ पोलीस ठाण्यानं तांत्रिक विश्लेषणाद्वारे शोध घेऊन मोबाईल चोरीच्या १३ प्रकरणांचा छडा
लावण्यात यश मिळवलं आहे. अंदाजे २ लाख ७८ हजार रुपये किंमतीचे मोबाईल हस्तगत करून, पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांच्या हस्ते तक्रारदारांना परत
करण्यात आले.
****
मोसमी पावसाने राज्यात पुन्हा जोर धरला आहे. हवामान विभागानं
आज रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा
आणि पुणे या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला असून, या सर्व जिल्ह्यांसह पालघर जिल्ह्याला हवामान विभागानं उद्या ऑरेंज अलर्ट दिला
आहे. राज्यात इतर ठिकाणी परिस्थिती सामान्य राहील, असा हवामान विभागाचा अंदाज आहे.
****
No comments:
Post a Comment