Tuesday, 17 June 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 17.06.2025 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 17 June 2025

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक १७ जून २०२ सकाळी ७.१० मि.

****

·      राष्ट्रीय जनगणनेची अधिसूचना राजपत्रात प्रसिद्ध-एक मार्च २०२७ पासून होणार जातनिहाय जनगणनेला प्रारंभ

·      पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सायप्रसचा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान-हा १४० कोटी भारतीयांचा सन्मान असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन

·      नव्या शैक्षणिक वर्षाला प्रारंभ-चिमुकल्या विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव विविध उपक्रमातून साजरा

आणि

·      राज्यात मान्सून पुन्हा सक्रीय, पुढील दोन दिवसांत कोकणात बहुतांश ठिकाणी तर मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता

****

१६ व्या राष्ट्रीय जनगणनेची आणि पहिल्यांदाच होत असलेल्या जातनिहाय जनगणनेची अधिसूचना काल राजपत्रात प्रसिद्ध झाली. ही जनगणना भारताच्या स्वातंत्र्यानंतरची आठवी जनगणना असेल. देशभरात ३४ लाख प्रगणक आणि निरीक्षक, एक लाख तीन हजारांहून अधिक अधिकारी आधुनिक मोबाईल डिजिटल प्रणालीद्वारे या प्रक्रियेत सहभागी होणार आहेत. जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घरांची यादी, मालमत्ता आणि सुविधा या माहितीचं संकलन, दुसऱ्या टप्प्यात सामाजिक-आर्थिक आणि जातीय माहिती संकलन करण्यात येणार आहे. या प्रक्रियेमध्ये डिजिटल अॅप आणि स्व-गणनेची सुविधा देखील उपलब्ध करुन देण्यात आली आहे. देशातल्या बर्फाळ प्रदेशात एक ऑक्टोबर २०२६ पासून, तर इतर भागात एक मार्च २०२७ पासून जनगणना सुरू होणार आहे.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सायप्रसचा सर्वोच्च नागरी पुरस्कार, ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ मकारियोस-थ्री, नं सन्मानित करण्यात आलं. हा पुरस्कार म्हणजे १४० कोटी भारतीयांचा सन्मान असल्याचं मोदी यावेळी म्हणाले. पंतप्रधानांच्या या दौऱ्यात सायप्रसनं भारताच्या दहशतवादविरोधी भूमिकेला समर्थन जाहीर केलं. भारताला संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत स्थायी सदस्यत्वासाठी सायप्रसनं दिलेल्या पाठिंब्याबद्दल पंतप्रधान मोदी यांनी आभार मानले. दोन्ही देशांदरम्यान संरक्षण, उद्योग, आरोग्य, अपारंपरिक ऊर्जा या क्षेत्रातील सहकार्यावर वरिष्ठ पातळीवर चर्चा झाली.

****

गुजरातमधल्या अहमदाबाद इथं झालेल्या विमान अपघातातल्या ९२ मृतांची डीएनए चाचणी करण्यात आली असून, आतापर्यंत ४७ मृतदेह त्यांच्या कुटुंबीयांना सोपवण्यात आले आहेत.

दरम्यान, अपघातात मृत्युमुखी पडलेले गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्या पार्थिव देहावर काल राजकोट इथं शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्यासह अनेक मान्यवरांनी यावेळी उपस्थित राहून रुपाणी यांना श्रद्धांजली अर्पण केली.

****

येत्या २१ जून रोजी साजरा होणाऱ्या ११ व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाची देशभरात जय्यत तयारी सुरु आहे. यानिमित्त देशपातळीवरचा मुख्य कार्यक्रम विशाखापट्टणम इथं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होणार आहे.

दरम्यान, जागतिक योग दिनाच्या पार्श्वभूमीवर आकाशवाणी दररोज आपल्या श्रोत्यांसाठी एका आसनाविषयी माहिती देत आहे. छत्रपती संभाजीनगर इथल्या योग अभ्यासक डॉ मनिषा चर्जन यांनी शलभासनाविषयी दिलेली माहिती आज आपण जाणून घेऊया...

बाईट - डॉ मनिषा चर्जन, योगशिक्षक

****

आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे निघालेल्या शेगाव इथल्या संत श्री गजानन महाराजांच्या पालखीचं काल परभणी शहरात आगमन झालं. पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी पालखीचं दर्शन घेतलं. वारी विठोबाची, साथ आरोग्याची या अभिनव उपक्रमातर्गत परभणीच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून पालखी सोहळ्यातल्या वारकऱ्यांची आरोग्य तपासणी करून उपचार देण्यात येत आहेत. पालखीच्या मार्गावर ठिकठकाणी आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे.

हिंगोली जिल्ह्यातल्या नरसी नामदेव इथून संत श्री नामदेव महाराजांच्या पालखीनं काल पंढरपूरकडे प्रस्थान केलं. या पालखी सोहळ्यात शेकडो वारकरी सहभागी झाले आहेत. या पालखीचं पहिलं रिंगण आज हिंगोली शहरात होणार आहे.

मुक्ताईनगर इथली संत श्री मुक्ताबाईंची पालखी काल जालना जिल्ह्यात अंबडकडे मार्गस्थ झाली.

****

पैठण इथं संत एकनाथ महाराजांच्या नवीन चांदीच्या पालखी रथाचं आज सकाळी ११ वाजता खासदार संदिपान भुमरे यांच्या हस्ते पूजन होणार आहे. यानंतर भव्य मिरवणुक काढण्यात येणार असल्याची माहिती, नाथवंशज रघुनाथ बुवा गोसावी पालखीवाले यांनी दिली.

****

नवीन शैक्षणिक वर्षाला कालपासून प्रारंभ झाला. राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाच्या ठिकठिकाणच्या शाळांमध्ये शाळा प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांचं पहिल्या दिवशी स्वागत करण्याच्या उद्देशाने अनेक शाळांनी विविध उपक्रम राबवले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालघर जिल्ह्यातल्या दुर्वेस इथल्या पीएम श्री जिल्हा परिषद शाळेत प्रवेशोत्सव सोहळ्यात सहभागी घेतला. यावेळी त्यांनी विद्यार्थी आणि पालकांशी संवाद साधला. शाळेतली शिक्षण पद्धती आणि शिक्षणाबाबत विद्यार्थ्यांची जिज्ञासा याबद्दल मुख्यमंत्र्यांनी समाधान व्यक्त केलं. ते म्हणाले....

बाईट - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते यावेळ वृक्षारोपण करण्यात आलं. पालघर इथं प्रधानमंत्री धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियानांतर्गत धरती आबा लोकसहभाग मोहिमेचं आणि विविध विकास कामांचं उद्घाटनही त्यांच्या हस्ते झालं.

****

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत सातारा जिल्हा परिषदेच्या कोडोली इथल्या शाळेत तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे जिल्हा परिषदेच्या दौंड तालुक्यातल्या आलेगाव शाळेत उपस्थित राहून विद्यार्थ्यांचं फुलं देऊन स्वागत केलं.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात विविध शाळांमध्ये नवीन विद्यार्थ्यांचं फुलं, भेटवस्तू, मिठाई देत वाजत गाजत स्वागत करण्यात आलं. शहरालगत सातारा इथल्या केंद्रीय उच्च प्राथमिक शाळेत पालकमंत्री संजय शिरसाट यांनी विद्यार्थ्यांचं स्वागत केलं. महानगरपालिकेच्या अशोक नगर आणि ब्रिजवाडी इथल्या शाळेत इतर मागास वर्ग बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांच्या उपस्थितीत शाळा प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला.

**

परभणी जिल्हा परिषदेच्या सिंगणापूर इथल्या शाळेत जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी विद्यार्थ्यांचं स्वागत करून त्यांना गणवेश आणि पुस्तकं भेट दिली. गंगाखेड तालुक्यातही विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी वह्या, पुस्तकं आणि दप्तराचं वाटप करण्यात आलं. सजवलेल्या बैलगाडीतून विद्यार्थ्यांची मिरवणूक काढण्यात आली.

धाराशिव जिल्ह्यात कळंब तालुक्यात भाडशिरपुरा तसंच धाराशिव तालुक्यात तळवळा इथं जिल्हाधिकारी कीर्तीकिरण पुजार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मैनाक घोष, आमदार कैलास पाटील यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांचं पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आलं.

तुळजापूर नगरपरिषद प्राथमिक शाळेत नवीन विद्यार्थ्यांचं फेटे बांधून, फुलं आणि पेढे देऊन तसंच पावलांचे ठसे घेऊन स्वागत करण्यात आलं. पळसप इथं आमदार विक्रम काळे यांच्या उपस्थितीत प्रवेशोत्सव सोहळा साजरा झाला.

**

माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण यांनी नांदेड जिल्ह्यात भोकर इथं जिल्हा परिषद शाळेत चिमुकल्यांचं स्वागत केलं. नांदेड महापालिका आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांनी वसरणी इथल्या शाळेत, कंधार इथं आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी, तर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांनी हदगाव तालुक्यातल्या तामसा इथं विद्यार्थ्यांचं स्वागत केलं.

बीड इथं शालेय विद्यार्थ्यांचं गुलाब पुष्प देऊन, तसंच विविध शाळांमध्ये फुग्याची कमान लावून, ढोल ताशांच्या गजरात विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यात आलं.

लातूर जिल्ह्यात शिरूर ताजबंद जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी नवीन विद्यार्थ्यांचं गुलाबपुष्प देऊन स्वागत केलं.

लातूर जिल्ह्यातल्या खंडापूर गावात जिल्हा परिषदेच्या शाळेत गेले ६ महिने गणित आणि विज्ञान विषयाचे शिक्षक नसल्याच्या निषेधार्थ काल शाळेच्या पहिल्याच दिवशी ग्रामस्थांनी शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर घोषणा देत निदर्शनं केली.

****

नांदेड जिल्ह्यात किनवट तालुक्यातल्या जावर इथं काल प्रधानमंत्री धरती आबा जनजाती ग्राम उत्कर्ष अभियानाला सुरूवात झाली. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी जेनीत चन्द्रा दोन्तुला यांच्या हस्ते या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी शेतकऱ्यांना कृषी विभागामार्फत बियाणांचं आणि प्रमाणपत्रांचं वाटप करण्यात आलं.

****

प्रधानमंत्री आवास योजनेच्या सर्वेक्षणात १८ जून पर्यंत शेवटची संधी केंद्र शासनाने उपलब्ध करून दिली आहे. २०१८ च्या यादीत नाव नसणाऱ्या बेघर कुटुंब प्रमुखांनी गावातल्या ग्रामसेवकामार्फत या नवीन सर्वेक्षणात आपली नावे नोंदवावीत, असं आवाहन धाराशिव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मैनाक घोष यांनी केलं आहे.

****

राज्यात मान्सून पुन्हा सक्रीय झाला आहे. कोकणासह, मुंबई, नवी मुंबई, कोल्हापूर, सातारा या भागात काल पाऊस झाला. रत्नागिरी जिल्ह्यात काल मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं. येत्या दोन दिवसांत कोकणात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.

****

No comments: