Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 17 June 2025
Time 11.00 to 11.05 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १७ जून २०२५ सकाळी ११.०० वाजता
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज कॅनडातल्या
कानानास्किस इथं होणार्या जी 7 शिखर परिषदेत सहभागी
होणार आहेत. ते सलग सहाव्यांदा या परिषदेत सहभागी होत आहेत. कॅनडाचे पंतप्रधान मार्क
कार्नी यांच्या निमंत्रणावरुन पंतप्रधान कॅनडाला भेट देत आहेत. या दोन दिवसांच्या दौर्यात
ते अनेक द्विपक्षीय बैठकांमध्येही भाग घेतील. तसंच पंतप्रधान जी 7 देशांच्या नेत्यांशी, इतर आमंत्रित देशांच्या आणि आंतरराष्ट्रीय संघटनांच्या प्रमुखांशी ऊर्जा सुरक्षा, तंत्रज्ञान आनि नवोन्मेष, एआय -ऊर्जा संबंध आणि क्वांटम तंत्रज्ञान अशा विविध जागतिक मुद्यांवर विचारविनिमय
करतील.
****
सरकारनं देशाच्या विविध भागात
दोन हजार वाहन चालक प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय रस्ते
वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी काल दिल्लीत एका कार्यक्रमात बोलताना
ही माहिती दिली. देशातल्या दुर्गम आणि आदिवासी भागात ही प्रशिक्षण केंद्र सुरु करण्यात
येतील, यामुळे तरुणांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण होतील, असं गडकरी यांनी सांगितलं. देशात सध्या सुमारे २२ लाख वाहन चालकांची
आवश्यकता आहे, आणि या प्रशिक्षण केंद्रांमधून कुशल वाहन चालक तयार
होतील, असं ते म्हणाले.
****
जागतिक आरोग्य संघटनेकडच्या
लशींपैकी ७० टक्के लशी भारतात तयार होतात, अशी माहिती केंद्रीय रसायन आणि खत मंत्री अनुप्रिया पटेल यांनी दिली. इंडियन फार्माकोपिया
कमिशन म्हणजेच भारतीय औषध संहिता आयोगातर्फे नवी दिल्लीत आयोजित कार्यक्रमात त्या काल
बोलत होत्या. अमेरिकेत आयात होणाऱ्या जेनेरिक औषधांमधे १४ टक्के औषधं भारतात तयार झालेली
असतात. जगातल्या १५ देशांनी भारतीय औषध निर्मिती संहिता मानक म्हणून स्वीकारली आहे, असं त्या म्हणाल्या.
****
आदिवासींच्या जीवनात परिवर्तन
घडवण्यासाठी, धरती आबा अभियान एक चांगली संधी असून पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी या योजनेसाठी ८० हजार कोटी रुपये उपलब्ध करून दिले आहेत, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. पालघर जिल्ह्यातल्या
मनोरमध्ये प्रधानमंत्री धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियानांतर्गत धरती आबा लोकसहभाग
मोहिमेचा शुभारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते काल करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. राज्यातल्या ३२ जिल्ह्यातल्या पाच हजार
गावांमध्ये हे अभियान राबवलं जाणार असून त्यामध्ये पालघर जिल्ह्यातल्या ६५४ गावांचा
समावेश आहे. शासनाच्या १७ विविध विभागांच्या २५ योजना यामध्ये समाविष्ट करण्यात आल्या
आहेत.
****
पुणे जिल्ह्यात मावळ तालुक्यातल्या
कुंडमळा इथं गेल्या रविवारी जुना लोखंडी पूल तुटून घडलेल्या दुर्घटनेतल्या ५१ पर्यटकांना
सुरक्षित बाहेर काढण्यात आलं आहे. या घटनेत चार जणांचा मृत्यू झाला. जिल्हा प्रशासनाने
राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल, स्थानिक पोलीस, शिवदुर्ग संस्था, आपदा संस्था तसंच स्थानिक नागरिकांच्या सहकार्याने गतीने बचावकार्य केलं. सध्या
११ जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
****
राज्यातल्या प्रत्येक गरजू रुग्णाला
वेळेवर रक्त मिळावं, रक्ताचा तुटवडा निर्माण होऊ नये आणि रक्त वायाही
जाऊ नये यासाठी ‘नो शॉर्टेज, नो वेस्टेज’; हे धोरण अंमलात आणावं, असे निर्देश आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले. पुण्यात काल आरोग्य भवनात
झालेल्या राज्य रक्त संक्रमण परिषदेच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. उन्हाळ्यात आणि
सणासुदीच्या काळात रक्तदान शिबिरांची संख्या घटल्यामुळे रक्ताचा तुटवडा जाणवतो. ही
परिस्थिती लक्षात घेऊन राज्यातल्या सर्व गरजू रुग्णांना वेळेत रक्त उपलब्ध होण्यासाठी
नवीन धोरण उपयोगाचं ठरणार असल्याचं आबिटकर यांनी सांगितलं.
****
आषाढी वारीसाठी देहू इथून जगद्गुरु
संत श्री तुकाराम महाराज पालखीचं आज प्रस्थान होत आहे. या सोहळ्यात भाविकांच्या सोयीसाठी
आरोग्य विभागानं चार ठिकाणी बाह्यरुग्ण विभाग सुरू केले आहेत. देहू प्राथमिक आरोग्य
केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. किशोर यादव आणि डॉ. मेघा पडघने यांनी ही माहिती दिली.
****
तुळजापूर इथल्या श्री तुळजाभवानी
मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या कार्यासंदर्भात असलेलं धार्मिक अनुष्ठान काल पूर्ण झालं.
यावेळी होमहवन आणि अन्य धार्मिक विधी मंगलमय वातावरणात पार पडले.
****
साताऱ्यात होणाऱ्या ९९ व्या
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे
भोसले यांची एकमतानं निवड करण्यात आली आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे कोषाध्यक्ष
विनोद कुलकर्णी यांनी काल ही माहिती दिली.
****
आदिवासी विकास विभागातल्या शिक्षक
भरतीस विरोध करण्यासाठी विविध आदिवासी संघटनांच्या वतीनं बिऱ्हाड मोर्चा काढण्यात आला
आहे. नाशिकमध्ये काल रात्री मोर्चेकऱ्यांना सुरक्षित ठिकाणी नेणाऱ्या पोलिसांच्या व्हॅनला
आडगाव जवळ अपघात झाल्याने बारा आंदोलक जखमी झाले. पोलिस व्हॅनचालकाला अंदाज न आल्याने
व्हॅन एका दुभाजकावर धडकून हा अपघात झाला.
दरम्यान, धुळे, नंदुरबार आणि नाशिकसह
विविध भागातून बिऱ्हाड मोर्चासाठी आलेल्या आंदोलकांनी काल सायंकाळी सुमारे साडेचार
तास आडगाव जवळ रस्ता रोको आंदोलन केलं. त्यामुळे मुंबई - आग्रा महामार्ग ठप्प झाला
होता.
****
No comments:
Post a Comment