Regional
Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 18 June
2025
Time 7.10
AM to 7.20 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १८ जून २०२५ सकाळी ७.१० मि.
****
·
कृषी कृत्रिम बुद्धिमत्ता
धोरणाला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी - महावेध प्रकल्पालाही मुदतवाढ
·
राज्यात गेल्या वर्षीच्या
तुलनेत आतापर्यंत केवळ सरासरी आठ टक्के पेरण्या, सर्व प्रकारची खतं
उपलब्ध ठेवण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश
·
केंद्र सरकारच्या भरीव
उपाययोजनांमुळे गेल्या ११ वर्षांत आरोग्य सेवेत आमुलाग्र बदल
·
पैठणहून संत एकनाथ महाराज
पालखीचं आज पंढरपूरकडे प्रस्थान, हिंगोलीत संत नामदेव महाराजांच्या पालखी
सोहळ्याचं पहिलं अश्व रिंगण संपन्न
आणि
·
राज्यभरात पावसाची
विश्रांती - पुढच्या दोन दिवसांत जोरदार पावसाचा इशारा
****
महाराष्ट्र कृषी - कृत्रिम बुद्धिमत्ता, अर्थात
महाॲग्री-एआय धोरण २०२५ ते २०२९ ला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत काल मंजुरी
देण्यात आली. या निर्णयामुळे कृत्रिम बुद्धिमत्ता आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर
करून कृषी क्षेत्रात परिवर्तन घडवता येणार आहे.
केंद्र सरकारच्या वेदर इन्फॉर्मशन नेटवर्क डेटा सिस्टीम, अर्थात
WINDS प्रकल्पाअंतर्गत ग्रामपंचायत स्तरावर स्वयंचलित हवामान केंद्रांची उभारणी
करण्यासाठी महावेध प्रकल्पाला मुदतवाढ देण्यासही मंत्रिमंडळानं मान्यता दिली.
ट्रायबल इंडस्ट्रियल क्लस्टरसाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाला नाशिक
जिल्ह्यात मौजे जांबुटके इथं २९ हेक्टर ५२ आर जमीन देणं, आणीबाणीत
कारावास भोगलेल्या कार्यकर्त्यांच्या मानधनात दुपटीनं वाढ करणं, त्यांच्या
हयात जोडीदारालाही मानधन देणं तसंच विनाअनुदानित खाजगी व्यावसायिक शैक्षणिक
संस्थेत प्रवेशासंदर्भात अनिवासी भारतीयांच्या व्याख्येत बदल करणं आदी निर्णय
मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आले.
****
राज्यातल्या विविध भागात मोसमी पाऊस सक्रिय झाला असून, आतापर्यंत
सुमारे ११ पूर्णांक ७० लाख हेक्टर शेतजमीनीवर पेरण्या झाल्या असल्याची माहिती
मंत्रिमंडळ बैठकीत देण्यात आली. गेल्या वर्षीच्या तुलनेत हे प्रमाण केवळ सरासरी आठ
टक्के इतकं आहे. पाऊस चांगला झाला असल्याने खतांची मागणी वाढण्याची शक्यता आहे.
त्यामुळे सर्व प्रकारच्या खतांची उपलब्धता करुन ठेवण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस यांनी यावेळी दिले.
****
कृषी विभाग राज्याच्या विविध भागांमध्ये विशेष शॉपिंग मॉल्स
उभारण्याची योजना तयार करत असल्याची माहिती, कृषीमंत्री माणिकराव कोकाटे
यांनी दिली. सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्वावर उभारल्या जाणार असलेल्या या
मॉल्समधली पन्नास टक्के दुकानं खाजगी व्यापाऱ्यांना भाडेपट्ट्यावर देण्यात येणार
असून, उर्वरित दुकानं शेतकऱ्यांसाठी असणार आहेत.
****
राज्यात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीतले २५
वर्षापेक्षा जुने सर्व पूल,
साकव तसंच इमारतींचं स्ट्रक्चरल ऑडिट करून त्यांचा
वस्तुस्थितीदर्शक अहवाल तातडीने सादर करण्याच्या सूचना सार्वजनिक बांधकाम मंत्री
शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिल्या आहेत. ते काल मंत्रालयात याबाबतच्या बैठकीत
बोलत होते. आषाढी वारी मार्गावरील पुलांचीही तपासणी करण्यात यावी, वारीसाठी
मार्ग पूर्ण सुरक्षित राहील याची दक्षता घ्यावी, रस्त्यावरील
खड्ड्यांविषयी विभागाने सुरू केलेल्या ॲॅपचा प्रभावी वापर करावा अशा सूचनाही
मंत्री भोसले यांनी केल्या.
****
केंद्र सरकारने गेल्या ११ वर्षांच्या कार्यकाळात केलेल्या
भरीव उपाययोजनांमुळे आरोग्य सेवेत आमुलाग्र बदल झाले आहेत. ऐकूया याविषयी
अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून….
सेवा, सुशासन आणि गरीब कल्याण या तत्वांनी प्रेरित होऊन भारताने गेल्या दशकात उल्लेखनीय
परिवर्तन अनुभवलं आहे. त्यात प्रामुख्याने भारताच्या आरोग्य सेवेचा समावेश आहे. आयुष्मान
भारतसारख्या प्रमुख उपक्रमांनी जवळजवळ ५५ कोटी लोकांना आर्थिक संरक्षण दिलं. आहे. आयुष्मान
वय वंदना योजनेंतर्गत ७० वर्षं आणि त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना आरोग्य हमीचे योजनेचे
फायदे देण्यात आले आहेत. आयुष्मान भारत डिजिटल मिशनने आरोग्यसेवेचं आधुनिकीकरण केलं
असून ७८ कोटींहून अधिक आयुष्मान भारत आरोग्य खाती तयार झाली आहेत. आयुष्मान भारत अंतर्गत
येणाऱ्या आरोग्याशी संबंधित पायाभूत सुविधांच्या योजनेमुळे आरोग्य सेवेचा विस्तार झाला
आहे.
ई संजीवनी
योजनेच्या माध्यमातून रुग्णांना घरबसल्या वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला दूरस्थ पद्धतीने
घेणं शक्य झालं आहे.
जगभरात
कोविडची साथ पसरली असतानाही भारताने कोविड प्रतिबंधासाठी विमानतळावरची तपासणी, मास्क वापरण्याचं आवाहन, लॉकडाऊन जाहीर करणं,
टास्क फोर्सची स्थापना करणं तसंच लस निर्मिती पर्यंतची मजल मारली. कोविन
प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून कोविड लसीचे २२० कोटी डोस देण्याचा टप्पाही भारतानं यशस्वीपणे पार केला.
गेल्या
११ वर्षांच्या काळात सर्वांसाठी आरोग्य या तत्वावर सरकारनं आरोग्य सेवेचा विस्तार केला
असून आरोग्य सेवेच्या गुणवत्तेत सुधारणा घडवून आणली आहे.
****
येत्या आषाढी एकादशीला पंढरपुरात श्री विठ्ठल-रुक्मिणी
मंदिर समितीच्या वतीनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शासकीय महापूजेचं
निमंत्रण देण्यात आलं आहे. आषाढी एकादशीला पहाटे दोन वाजून वीस मिनिटांनी
मुख्यमंत्री आणि मानाचे वारकरी यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेची महापूजा
करण्यात येईल.
****
हिंगोली जिल्ह्यातल्या नरसी नामदेव इथल्या संत नामदेव
महाराजांचा पालखी सोहळ्याचं पहिचं अश्व रिंगण काल हिंगोलीच्या रामलीला मैदानावर
पार पडलं. १२ अश्वांच्या माध्यमातून पार पडलेल्या रिंगण सोहळ्याला हजारो
नागरिकांनी गर्दी केली होती. आज ही पालखी औंढा नागनाथ मार्गे रवाना होणार आहे.
दरम्यान, आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे निघालेल्या
दिंड्यांमध्ये अंध वारकऱ्यांची दिंडी लक्ष वेधून घेत आहे. वाशीम जिल्ह्यातून
निघालेली ही दिंडी सध्या परभणी जिल्ह्यातून मार्गक्रमण करत आहे. या वारीत पाच
महिलांसह एकूण पंधरा वारकरी आहेत.
****
पैठण इथं संत एकनाथ महाराजांची पालखी आज सायंकाळी
पंढरपूरकडे प्रस्थान करेल. दरम्यान, नव्याने घडवण्यात आलेल्या
नाथांच्या चांदीच्या पालखी रथाचं काल खासदार संदिपान भुमरे यांच्या पूजन करून
मिरवणूक काढण्यात आली. अनेक भाविक या मिरवणुकीत सहभागी झाले होते.
****
आंतरराष्ट्रीय योग दिन येत्या शनिवारी साजरा होत आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात या दिनाचा मुख्य कार्यक्रम ऐतिहासिक बीबी का
मकबऱ्याच्या प्रांगणात होणार आहे. सकाळी साडे सहा वाजता होणाऱ्या या कार्यक्रमात
योग प्रात्यक्षिकांचं सादरीकरण आणि सामूहिक योगासनं होणार असून, पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांचा संदेशही थेट प्रसारित केला जाणार आहे. या कार्यक्रमात अधिकाधिक
योग संस्थांनी आणि व्यायाम प्रेमी नागरिकांनी सहभागी व्हावं, असं
आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केलं आहे.
योगदिनाच्या पार्श्वभूमीवर आकाशवाणी आपल्या श्रोत्यांसाठी
दररोज एका आसनाविषयी माहिती घेऊन येत आहे. आज आपण, छत्रपती संभाजीनगर
इथल्या योगशिक्षक विद्या ताकसांडे यांनी दिलेली गोरक्षासनाची माहिती जाणून घेऊया...
बाईट
- योगशिक्षक विद्या ताकसांडे
छत्रपती संभाजीनगर इथं वंदेमातरम मैदानावर तीन दिवसीय योग
शिबीर घेण्यात आलं. अनेक नागरिकांनी या शिबीरात योगाभ्यास केला.
****
ऊसतोडणी कामगार महिलांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी 'आरोग्य
मित्र' उपक्रम राबवण्यात येईल,
असं,
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी
सांगितलं आहे. त्या काल छत्रपती संभाजीनगर इथं विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या
बैठकीत बोलत होत्या. बालविवाह रोखण्याची मोहिम प्रभावीपणे राबवण्याची सूचना चाकणकर
यांनी प्रशासनाला केली.
****
श्री क्षेत्र तुळजापूर इथं तुळजाभवानी मंदिर विकास प्रकल्प
येत्या तीन साडेतीन वर्षांत पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध असल्याचं, धाराशिवचे
पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी म्हटलं आहे. यासंदर्भात काल मंत्रालयात झालेल्या
बैठकीत ते बोलत होते. हा प्रकल्प गतीनं मार्गी लागण्यासाठी भूसंपादन, तांत्रिक
मान्यता आणि विविध निविदा प्रक्रिया, या तिन्ही गोष्टी समांतर
पातळीवर करण्यात याव्यात अशा सूचना सरनाईक यांनी दिल्या.
****
धाराशिव जिल्ह्यात ‘सॅटेलाईट स्किल सेंटर’ निर्माण
करण्याच्या प्रस्तावाला पुण्याच्या सिम्बायोसिस कौशल्य विद्यापीठानं मान्यता दिली
आहे. आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी ही माहिती दिली. या केंद्रामुळे युवकांसाठी
उद्योगानुकूल प्रशिक्षण,
जागतिक दर्जाचं कौशल्य आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीनं
रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असल्याचं पाटील यांनी सांगितलं.
****
शेतीच्या मशागतीच्या आणि पेरणीच्या या काळात बीड जिल्ह्यात
‘पोलीस आपल्या बांधावर‘,
हा उपक्रम सुरू करण्यात येणार आहे. या काळात संभाव्य
गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी हा निर्णय घेतला.
****
छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या वतीनं अतिसार नियंत्रण
मोहिमेला कालपासून प्रारंभ झाला. ३१ जुलैपर्यंत राबवण्यात येणाऱ्या या मोहिमेचं उद्दीष्ट, पावसाळ्यात अतिसारामुळे
होणारे संभाव्य बालमृत्यू रोखणं, हा आहे.
****
जालना - तिरूपती - जालना ही विशेष रेल्वे पुन्हा सुरू
करण्याचा निर्णय दक्षिण मध्य रेल्वेनं घेतला आहे. ही गाडी येत्या जुलै
महिन्यापासून दर सोमवारी सकाळी सात वाजता जालन्याहून निघणार आहे.
****
हवामान
राज्यभरात पावसाने काल विश्रांती घेतली. रत्नागिरी
जिल्ह्यात सर्व नद्यांची पाणीपातळीही इशारा पातळीच्या खाली आली आहे. मात्र अनेक
ठिकाणी रस्ते खचल्यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. दरम्यान, येत्या
दोन दिवसांत कोकण आणि मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने
वर्तवला आहे. रत्नागिरी,
पुणे, सातारा, कोल्हापूर तसंच
सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
****
No comments:
Post a Comment