Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 18 June 2025
Time 11.00 to
11.05 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक
बातम्या
दिनांक १८ जून २०२५ सकाळी ११.०० वाजता
****
भारत-अमेरिका व्यापार करार आणि भारत आणि पाकिस्तानमधल्या
मध्यस्थीबाबत अमेरिकेने अलीकडील लष्करी कारवाई थांबवण्यासाठी कधीही कोणत्याही
पातळीवर चर्चा केलेली नाही, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी
यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना स्पष्टपणे सांगितलं.
पंतप्रधान मोदी आणि ट्रम्प यांच्यात दूरध्वनीवर यासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती, परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांची दिली. या चर्चेत पंतप्रधान मोदींनी ऑपरेशन
सिंदूरबाबत माहिती दिली. लष्करी कारवाई थांबवण्याबाबतची चर्चा भारत आणि
पाकिस्तानमध्ये थेट दोन्ही सैन्यांमध्ये स्थापित केलेल्या विद्यमान माध्यमांनुसार
झाली आणि ती इस्लामाबादच्या विनंतीवरून झाली. भारताने कधीही तृतीय पक्षाची
मध्यस्थी स्वीकारली नाही आणि भविष्यातही अशी मध्यस्थी स्वीकारणार नाही, असं मोदी यांनी स्पष्ट केलं. भारत आता दहशतवादाला युद्धाच्या रुपातच बघत असून, ऑपरेशन सिंदूर अजुनही सुरुच असल्याचं, पंतप्रधान
म्हणाले. यासह इतर जागतिक घडामोडींवर उभय नेत्यांदरम्यान चर्चा झाल्याचं, मिस्त्री यांनी सांगितलं.
****
कॅनडामध्ये कनानास्किस इथं झालेल्या जी-7 संपर्क शिखर परिषदेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जी-7 नेत्यांसोबत प्रमुख जागतिक आव्हानं आणि सामायिक आकांक्षांवर फलदायक चर्चा
केली. बदलत्या जगातील सहभाग आणि परवडेल अशी क्षमता यांची खात्री करण्यासाठी ऊर्जा
सुरक्षितता,
तंत्रज्ञान, पायाभूत सुविधा आणि
गुंतवणूकीच्या भविष्यावरील जी-7 चर्चेत त्यांनी भाग घेतला.
आपल्या भाषणात पंतप्रधानांनी, शाश्वत आणि हरित मार्गानं
सर्वांसाठी ऊर्जा सुरक्षिततेची खात्री करण्याची गरज अधोरेखित केली आणि या
उद्देशासाठी आंतरराष्ट्रीय सौर आघाडी, आपत्ती प्रतिरोधक
पायाभूत सुविधा परिषद आणि जागतिक जैवइंधन आघाडी यासारख्या भारताच्या जागतिक
उपक्रमांवर सविस्तर चर्चा केली. दहशतवादाला प्रोत्साहन आणि पाठिंबा देणाऱ्यांवर
कठोर कारवाई करण्याची गरजही त्यांनी अधोरेखित केली. आपल्या दौऱ्याच्या पुढील
टप्प्यात पंतप्रधान क्रोएशियाला रवाना झाले.
****
अमरनाथ यात्रेच्या सुरक्षेच्या तयारीसाठी केंद्रीय गृहसचिव
गोविंद मोहन यांच्या अध्यक्षतेखाली काल श्रीनगरच्या पोलिस मुख्यालयात उच्चस्तरीय
आढावा बैठक झाली. यात्रेच्या सुरक्षेच्या दृष्टीनं यंदा विशेष व्यवस्था केली असून
निमलष्करी दलांच्या ५८० तुकड्या यात्रामार्गावर तैनात केल्या जाणार आहेत. अमरनाथ
यात्रा येत्या तीन जुलैपासून सुरु होत असून ती येत्या ९ ऑगस्टपर्यंत चालणार आहे.
****
जागतिक संगीत दिनानिमित्त येत्या २१ जून रोजी देशातला पहिला
सृजनशील आणि सांस्कृतिक रेडिओ महोत्सव तसंच महाराष्ट्र आशा रेडिओ गौरव पुरस्कार
सोहळा मुंबईत होणार आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री आशीष शेलार यांनी काल मुंबईत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. राज्याची सांस्कृतिक, ऐतिहासिक परंपरा जपण्याचं काम रेडिओनं केलं असून, देशाच्या
स्वातंत्र्यापासून ते महाराष्ट्राच्या निर्मितीपर्यंत सर्व ऐतिहासिक घटनांचा रेडिओ
साक्षीदार आहे,
असं शेलार यावेळी म्हणाले. रेडिओ या सशक्त माध्यमाची दखल
घेणं,
सांस्कृतिक कार्य विभाग आणि पर्यायाने राज्य शासनाच्या
विविध योजना,
उपक्रम यांची प्रचार प्रसिद्धी करण्यासाठी रेडिओ माध्यमांचा
वापर करणं हा या महोत्सव आणि पुरस्काराचं आयोजन करण्याचा हेतू असल्याचं शेलार
यांनी सांगितलं.
****
सत्तेसाठी भाजपासोबत जाणाऱ्यांचा विचार न करता नेतृत्वाची
नवी फळी तयार करु, असं ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी स्पष्ट
केलं आहे. ते काल पिंपरी चिंचवड इथं पक्षाच्या मेळाव्यात बोलत होते. कुणाशीही
संबंध ठेवू,
पण भाजपाशी संबंधित असलेले लोक काँग्रेसच्या विचारांचे असू
शकत नाहीत,
त्यामुळे अशा संधीसाधूपणाचं राजकारण आपल्याला प्रोत्साहित
करायचं नाही,
असं पवार
म्हणाले.
****
आषाढी वारीसाठी देहू इथून संत श्री तुकाराम महाराज पालखी
सोहळा आज दुपारी प्रस्थान ठेवणार आहे. या सोहळ्यासाठी सुमारे ५०० दिंड्या देहूत
दाखल झाल्या आहेत. त्र्यंबकेश्वर इथून निघालेली संत निवृत्ती नाथांची पालखी काल
अहिल्यानगर जिल्ह्यात पोहोचली. यावेळी पालखीचं मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात
आलं. हिंगोली जिल्ह्यातल्या नरसी नामदेव इथून निघालेल्या संत नामदेव महाराजांच्या
पालखी सोहळ्याचं पहिलं अश्व रिंगण काल हिंगोलीच्या रामलीला मैदानावर उत्साहात पार
पडलं.
****
नदी, नाल्यांच्या आरोग्याकडे
लक्ष देत आपला परिसर पाणीदार बनवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे, असं आवाहन जलतज्ञ डॉक्टर राजेंद्र सिंह यांनी काल सोलापूर मध्ये केलं.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात राष्ट्रीय सेवा योजना
विभागातर्फे पीएम उषा योजनेअंतर्गत चला जाणूया नदीला या विषयावर आयोजित एनएसएस
कार्यक्रम अधिकाऱ्यांच्या कार्यशाळेत ते बोलत होते.
****
जालना - तिरूपती - जालना ही विशेष रेल्वे पुन्हा सुरू
करण्याचा निर्णय दक्षिण मध्य रेल्वेनं घेतला असून, पूर्णा
- जालना - पूर्णा या अनारक्षित उन्हाळी विशेष गाडीलाही मुदतवाढ देण्यात आली आहे.
ही गाडी ३१ जुलैपर्यंत चालणार होती.
****
No comments:
Post a Comment