Thursday, 19 June 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 19.06.2025 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date - 19 June 2025

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक १९ जून २०२ दुपारी १.०० वा.

****

रस्ते अपघातातल्या पीडितांसाठी रोखरहित उपचार योजना संपूर्ण देशात राबवण्यात येणार असून, त्यामुळे हजारो अपघातग्रस्तांचे प्राण वाचले जाण्याची शक्यता असल्याचं, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. यासंदर्भात आज नवी दिल्लीत झालेल्या बैठकीत ते बोलत होते. रस्ते अपघातांमध्ये मृत्यूचं प्रमाण कमी करणं, हे केंद्र सरकारचं सर्वोच्च प्राधान्य असल्याचं ते म्हणाले. या देशव्यापी योजनेची अंमलबजावणी अधिक प्रभावी करण्यावर भर देण्याची सूचनाही त्यांनी केली.

****

प्रसार भारती हे विश्वासार्ह माहितीचं आणि दर्जेदार मनोरंजनाचं माध्यम ठरावं, यासाठी आधुनिकीकरणाची गरज असल्याचं, प्रसारभारतीचे अध्यक्ष नवनीत कुमार सहगल यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत प्रसार भारती: अनलॉकिंग द पोटॅन्शिअल या विशेष सत्रात त्यांनी भारताच्या सार्वजनिक प्रसारकाच्या भूमिकेवर मतं मांडली. जनतेशी जोडलेलं राहून विश्वासार्हता टिकवणं हे प्रसार भारतीचं प्रमुख उद्दिष्ट असल्याचं ते म्हणाले.

****

ऑपरेशन सिंधू अंतर्गत उत्तर इराणमधून ११० विद्यार्थ्यांचं विमान आज पहाटे दिल्लीत पोहोचलं. इस्राईल आणि इराणमधल्या वाढत असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारतानं आपल्या नागरिकांना इराणमधून परत आणण्यासाठी ही मोहिम राबवली.

****

शासकीय योजनांच्या अंमलबजावणीचं सुक्ष्म नियोजन करुन योजनांचा लाभ पात्र लाभार्थीपर्यंत पोहचवण्याची सूचना, विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी केली आहे. ते काल छत्रपती संभाजीनगर इथं विभागीय आढावा बैठकीत बोलत होते. पेन्शन अदालत, आश्वासित प्रगती योजना, अनुकंपा तत्वावरील नियुक्त्या आदी आस्थापनाविषयक कामं गतीने मार्गी लावण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. प्रधानमंत्री आवास योजनेसह विविध योजनेअंतर्गत सुरू असलेली घरकुलांची कामं  येत्या १५ ऑगस्टपर्यंत पूर्ण करून संबंधितांना घरकुल वाटप करावं, उर्वरित घरकुलांची कामे दिवाळीपूर्वी पूर्ण होतील, याबाबत नियोजन करण्याची सूचना विभागीय आयुक्तांनी केली.

****

भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या केंद्रीय संचार ब्यूरो, जिल्हा प्रशासन, छत्रपती संभाजीनगर आणि भारतीय योग संस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पार्श्वभूमीवर आज छत्रपती संभाजीनगर इथं विशेष जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाअंतर्गत गारखेडा परिसरातल्या गजानन महाराज मंदिरासमोर आयोजित योग दिंडीचं उद्घाटन क्रीडा भारतीचे अध्यक्ष उदय कहाळेकर यांच्या हस्ते करण्यात आलं. कार्यक्रमात कहाळेकर आणि डॉ उत्तम काळवणे यांनी मार्गदर्शन केलं. शिवदर्शन सांस्कृतिक शाहिरी संच, छत्रपती संभाजीनगर यांच्या योग शाहिरीचं सादरीकरण तसंच योग प्रात्यक्षिकांचं सादरीकरण यावेळी करण्यात आलं.

****

बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांच्या अध्यक्षतेखाली काल अंबाजोगाई इथं जनसंवाद बैठक घेण्यात आली. नागरिकांच्या विविध शंका तसंच तक्रारींचं यावेळी निराकरण करण्यात आलं. नागरिकांच्या समस्या ऐकून घेण्यासाठी पोलिस अधीक्षक कार्यालयातल्या आपल्या दालनात दररोज दुपारी चार ते सहा दरम्यानचा वेळ राखून ठेवल्याचं काँवत यांनी सांगितलं.

****

बीड जिल्ह्यात केज तालुक्यातल्या मौजे बनसारोळा इथं काल छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर घेण्यात आलं. जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या हस्ते या शिबिराचं उद्घाटन झालं. यावेळी आयोजित जनता दरबारात उपस्थित नागरिकांनी त्यांच्या समस्या आणि प्रश्न मांडले. जिल्हाधिकाऱ्यांनी नागरिकांच्या समस्यांवर तात्काळ योग्य कार्यवाही करण्याचं आश्वासन दिलं.

****

रायगड जिल्ह्यात काल रात्रीपासून पुन्हा मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे सावित्री, पाताळगंगा, अंबा, उल्हास या नद्यांना पूर आले असून, रोह्यात कुंडलिका नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. जिल्हा प्रशासनाने सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुटी जाहीर केली आहे.

नाशिक मध्येही काल जोरदार पाऊस झाला. कळवण तालुक्यातल्या अर्जुन सागर प्रकल्पात जलसाठा वाढल्याने विसर्ग सुरू करण्यात आला आहे.

****

राज्यात कोकण, मध्य आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढला आहे. पुढील दोन-तीन दिवस मराठवाडा आणि विदर्भासह काही जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पाऊस होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला असून, हवामान विभागाने या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे. पालघर, ठाणे, रायगड, पुणे, सातारा, रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा असून, या जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यांमध्येही काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे.

मुंबईसह, कोकणात सागरी किनारपट्टीसाठी आज उच्च लाटांचा इशारादेखील हवामान विभागाने दिला असून, या दरम्यान लहान बोटींना समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. किनारपट्टीजवळील पर्यटन तसंच जलक्रीडा पूर्णतः थांबवण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती, राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने दिली आहे. 

****

No comments: