Thursday, 19 June 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 19.06.2025 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 19 June 2025

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक १९ जून २०२ सकाळी .०० वाजता

****

क्रोएशियाच्या दौरा आटोपून पंतप्रधान नरेंद्र मोदी मायदेशी रवाना झाले. अनेक उच्चस्तरीय बैठका झालेल्या या दौर्यामुळे भारत - क्रोएशियाच्या संबंधांमध्ये उल्लेखनीय सुधारणा झाली आहे. हा दौरा ऐतिहासिक झाला असून, मैत्री आणि व्यापक सहयोगाचा नवा अध्याय सुरु झाल्याचं पंतप्रधानांनी म्हटलं आहे.

****

ऑपरेशन सिंधू अंतर्गत उत्तर इराणमधून ११० विद्यार्थ्यांचं विमान आज पहाटे दिल्लीत पोहोचलं. इस्राईल आणि इराणमधल्या वाढत असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारतानं आपल्या नागरीकांना इराणमधून परत आणण्यासाठी ही मोहिम राबवली.

****

एकीकृत निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत सर्व केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना जुन्या निवृत्तीवेतन योजनेप्रमाणेच अंशदान आणि सेवानिवृत्तीचे इतर लाभ मिळणार आहेत. केंद्रीय कार्मिक, गाऱ्हाणी आणि निवृत्तीवेतन विभागाचे मंत्री डॉ. जितेंद्र सिंग यांनी ही घोषणा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारला ११ वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त नवी दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत काल ते बोलत होते. निवृत्तीवेतनधारकांच्या तक्रारींच्या निवारणासाठी राबवलेल्या तसंच कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणासाठी उपक्रमांचा उल्लेख सिंग यांनी केला. भ्रष्टाचारमुक्त आणि तत्पर प्रशासनासाठी केलेल्या उपाययोजनांबद्दल त्यांनी यावेळी माहिती दिली.

****

भारतात सर्व कायदेशीर, व्यावसायिक आणि डिजिटल प्रणालींमध्ये लवकरचं भारतीय प्रमाण वेळेचा वापर अनिवार्य करणार असल्याचं ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी म्हटलं आहे. त्यांच्या अध्यक्षतेखाली वेळेच्या प्रसारणाबाबतची परिषद काल नवी दिल्लीत झाली. कायदेशीर मापन कायद्याअंतर्गत लवकरच नियम सूचित केले जातील असं त्यांनी सांगितलं. राष्ट्रीय भौतिक प्रयोगशाळा आणि इस्रो यांच्या सहकार्याने हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे.

****

मतदारांना नोंदणी केल्यापासून १५ दिवसांच्या आत मतदान ओळखपत्र देण्याचा निर्णय निवडणूक आयोगानं घेतला आहे. मतदारांनी नोंदणी केल्यानंतर किंवा सुधारणा केल्यावर त्यांना त्यांचं ओळखपत्र लवकरात लवकर मिळावं यासाठी निवडणूक आयोगाने नवीन प्रणाली विकसित केली आहे.

****

फाल्कन 2000 जेट्सची निर्मिती नागपुरात होणार असून, यासंदर्भात डसॉल्ट एव्हिएशन आणि रिलायन्स एरोस्पेस लिमिटेड यांच्यात करार करण्यात आला. नागपूर, मिहानमध्ये होत असलेल्या या उत्पादनातून भारताच्या हवाई उत्पादन क्षेत्राला मोठा चालना मिळणार असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मेक इन इंडिया धोरणालाही चालना मिळेल. आत्मनिर्भर भारताच्या दिशेने हे अतिशय महत्त्वपूर्ण पाऊल ठरेल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

****

राज्यात दूध भेसळ रोखण्यासाठी लवकरच नवा कायदा अस्तित्वात येईल, अशी माहिती दुग्धविकास मंत्री अतुल सावे यांनी दिली. दुग्धविकास विभागाच्या १५० दिवसांच्या आराखड्याच्या अनुषंगाने काल झालेल्या बैठकीत ते बोलत होते. या बैठकीत दूध संघाच्या प्रतिनिधींनी अनेक सूचना केल्या. यामध्ये राज्यात दुधाला समान दर, एक राज्य एक ब्रँड, एक जिल्हा एक दूधसंघ तसंच एक गाव एक दूध संस्था स्थापन करण्याची मागणी प्रतिनिधिंनी केली. त्यावर सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे सावे यांनी सांगितलं.

****

शासकीय योजनांच्या अंमलबजावणीचं सुक्ष्म नियोजन करुन योजनांचा लाभ पात्र लाभार्थीपर्यंत पोहचवण्याची सूचना, विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी केली. ते काल छत्रपती संभाजीनगर इथं विभागीय आढावा बैठकीत बोलत होते. पेन्शन अदालत, आश्वासित प्रगती योजना, अनुकंपा तत्वावरील नियुक्त्या आदी आस्थापनाविषयक कामं गतीने मार्गी लावण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. प्रधानमंत्री आवास योजनेसह विविध योजनेअंतर्गत सुरू असलेली घरकुलांची कामं  येत्या १५ ऑगस्टपर्यंत पूर्ण करून संबंधितांना घरकुल वाटप करावं, उर्वरित घरकुलांची कामे दिवाळीपूर्वी पूर्ण होतील, याबाबत नियोजन करण्याची सूचना विभागीय आयुक्तांनी केली.

****

बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांच्या अध्यक्षतेखाली काल अंबाजोगाई इथं जनसंवाद बैठक घेण्यात आली. नागरिकांच्या विविध शंका तसंच तक्रारींचं यावेळी निराकरण करण्यात आलं. नागरिकांच्या समस्या ऐकून घेण्यासाठी पोलिस अधीक्षक कार्यालयातल्या आपल्या दालनात दररोज दुपारी चार ते सहा दरम्यानचा वेळ राखून ठेवल्याचं काँवत यांनी सांगितलं.

****

बीड जिल्ह्यात केज तालुक्यातल्या मौजे बनसारोळा इथं काल छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर घेण्यात आलं. जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या हस्ते या शिबिराचं उद्घाटन झालं. यावेळी आयोजित जनता दरबारात उपस्थित नागरिकांनी त्यांच्या समस्या आणि प्रश्न मांडले. जिल्हाधिकार्यांनी नागरिकांच्या समस्यांवर तात्काळ योग्य कार्यवाही करण्याचं आश्वासन दिलं.

****

रायगड जिल्ह्यात काल रात्रीपासून पुन्हा मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे सावित्री, पाताळगंगा, अंबा, उल्हास या नद्यांना पूर आले असून, रोह्यात कुंडलिका नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. जिल्ह्यात आज पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून, जिल्हा प्रशासनाने सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुटी जाहीर केली आहे.

****

No comments: