Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 20 June 2025
Time 11.00 to
11.05 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक
बातम्या
दिनांक २० जून २०२५ सकाळी ११.०० वाजता
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज बिहार आणि ओडिशाच्या दौऱ्यावर
आहेत. बिहारमध्ये सिवान इथं विविध पायाभूत सुविधाचं उद्घाटन आणि लोकार्पण
त्यांच्या हस्ते होणार आहे. यामध्ये रेल्वे प्रकल्प, वंदे
भारत एक्सप्रेस,
नमामि गंगे प्रकल्पांतर्गत सांडपाणी प्रक्रिया संयंत्रे आणि
प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना घरे आणि आर्थिक मदत दिली जाणार आहे.
ओडिशामध्ये भुवनेश्वर इथं राज्य सरकारच्या वर्षपूर्ती कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान
पंतप्रधान भूषवणार आहेत. यावेळी ते १८ हजार ६०० कोटींपेक्षा अधिक खर्चाच्या विविध
विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी करतील.
****
कैलास मानसरोवर यात्रेला आजपासून नाथुला खिंडीतून औपचारिक
सुरुवात झाली. सिक्कीमचे राज्यपाल ओम प्रकाश माथूर यांच्या हस्ते हिरवा झेंडा
दाखवून यात्रा रवाना झाली. पहिल्या तुकडीत ३६ यात्रेकरू आणि परराष्ट्र मंत्रालयाचे
२ अधिकारी सहभागी झाले आहेत. यंदा एकूण १० तुकड्या कैलास यात्रेसाठी नाथुलामार्गे
जाणार असून,
प्रत्येक तुकडीसाठी दहा ते ११ दिवसांचा कालावधी आहे.
****
जगदगुरु संत तुकाराम महाराज आणि संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर
महाराज यांच्या पालख्यांचं आज पुण्यात आगमन होणार आहे. या पालख्यांच्या
स्वागतासाठी पुण्यनगरी सज्ज झाली आहे. पुणे
जिल्हा प्रशासन आणि पुणे महापालिकेतर्फे वारकऱ्यांना आवश्यक
सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. पालख्यांच्या आगमनाच्या
पार्श्वभूमीवर आज पुण्यातले विविध २६ रस्ते वेगवेगळ्या वेळेत वाहतुकीसाठी बंद
ठेवण्यात येतील.
आषाढी वारीसाठी त्र्यंबकेश्वरहून पंढरपूरकडे निघालेल्या संत
निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीनं आज सकाळी बेलापूरहून राहुरीकडे प्रस्थान केलं.
या पालखी सोहळ्यात ६० हजारांहून अधिक वारकरी सहभागी झाले आहेत.
मुक्ताईनगर इथल्या संत श्री मुक्ताबाईंची पालखी काल बीड
जिल्ह्यात दाखल झाली. जिल्ह्याच्या हद्दीत प्रवेश करताचा मुक्ताईंच्या पादुकांना
गोदावरी नदीत स्नान घालण्यात आलं. या पालखीचं आज गढी इथल्या भवानी मंदिर परिसरात
रिंगण सोहळा होणार आहे.
शेगावहून निघालेली संत श्री गजानन महाराजांची पालखी देखील
काल बीड जिल्ह्यात परळी वैजनाथ इथं पोहोचली.
संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांची कर्मभूमी असलेल्या
तीर्थक्षेत्र नेवासा इथून ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी आषाढी पालखी दिंडीने
टाळ-मृदंगांच्या गजरात आणि हरिनामाचा जयघोष करत पंढरपूरकडे प्रस्थान केलं. नेवासा
बसस्थानकावर पालखी सोहळ्याचा पहिला रिंगण सोहळा हजारो भाविकांच्या उपस्थितीत पार
पडला.
****
महावितरण कंपनीतील लाईन स्टाफ कर्मचारी हे अत्यंत
महत्त्वाचं काम करणारे घटक असून, त्यांच्याशी संबंधित
प्रलंबित मागण्यांबाबत सकारात्मक विचार करून लवकरात लवकर निर्णय घेण्यात येईल, असं आश्वासन ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी दिलं. मुंबईत काल
यासंदर्भातल्या बैठकीत त्या बोलत होत्या. लाईन स्टाफ कर्मचाऱ्यांना सुरक्षा साधने
उपलब्ध करुन देण्यात येतील, तांत्रिक पदांचा स्वतंत्र
दर्जा,
वर्ग वेतनश्रेणीत आणि वेतन वाढ यासह विविध मागण्यांचा
सकारात्मक विचार करण्यात येईल, असं बोर्डीकर यांनी यावेळी
सांगितलं.
****
मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर
सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी २४ किलोपेक्षा जास्त वजनाचा गांजा जप्त केला. थायलंडमधून
तस्करी करून आणलेल्या या गांजाची बेकायदेशीर बाजारपेठेत अंदाजे २४ कोटी ६६ लाख
रुपये किंमत आहे. सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी या प्रकरणी तीन जणांना अटक केली. अंमली
पदार्थांची तस्करी करणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीचा या गुन्ह्यात सहभाग असल्याचं
प्राथमिक तपासात आढळून आलं आहे.
****
नवीन शैक्षणिक वर्षात पालकांनी आपल्या पाल्यांचा प्रवेश
केवळ शासनमान्य शाळांमध्येच घ्यावा, असं आवाहन लातूर जिल्हा
परिषदेच्या शिक्षण विभागाने केलं आहे. शासनमान्यता नसलेल्या शाळांचा शोध
घेण्यासाठी शिक्षण विभाग आणि लातूर जिल्हा परिषद यांच्या वतीनं २३ आणि २४ जून रोजी
शोधमोहीम राबवली जाणार आहे. पालकांना शाळेची शासनमान्यता तपासता यावी, यासाठी सर्व तालुका गटशिक्षणाधिकारी कार्यालयं आणि जिल्हास्तरावरील
शिक्षणाधिकारी कार्यालयात मदत केंद्र स्थापन करण्यात आली आहेत. जिल्ह्यातल्या
अनधिकृत शाळांवर नियमानुसार कडक कारवाई केली जाईल, अशी
माहितीही शिक्षण विभागाने दिली आहे.
****
लंडन इथं झालेल्या जागतिक ब्लिट्ज बुद्धिबळ अजिंक्यपद
स्पर्धेच्या उपांत्य फेरीत विजयी ठरलेली भारतीय बुद्धीबळपटू दिव्या देशमुख हिचं
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केलं. दिव्यानं या सामन्यात अग्रस्थानावर
असलेल्या होऊ यिफान हिला पराभूत केलं.
****
हॉकी इंडिया मास्टर्स कप स्पर्धेत गट क सामन्यात
महाराष्ट्रानं मणिपूरविरूद्ध ७-१ अशी आघाडी घेतली आहे. याआधी गट ब सामन्यात
हरियाणानं तमिळनाडू संघाचा ८-४ असा पराभव केला. तर ओडिशानं पंजाबचा १-३ असा पराभव
केला.
****
नाशिक जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीला
पूर आला आहे. जिल्ह्यातल्या गंगापूर, दारणा, नांदूर मधमेश्वर या धरणांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. आज सकाळी गंगापूर
धरणातून एक हजार १६० घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला.
****
No comments:
Post a Comment