Saturday, 21 June 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक:21.06.2025 रोजीचे सकाळी: 06.15 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 21 June 2025

Time 6.15 AM to 6.25 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक २१ जून २०२ सकाळी ६.१५ मि.

****

·      ११वा आंतरराष्ट्रीय योग दिवस-आंध्रप्रदेशात विशाखापट्टणम इथं पंतप्रधानांच्या उपस्थितीत  मुख्य समारंभाचं आयोजन 

·      पुण्यात भव्य वारकरी भक्तीयोग उपक्रम तर मराठवाड्यात सर्वत्र योगाभ्यासाची जय्यत तयारी

·      नाफेड शेतमालाची थेट शेतकऱ्यांकडून खरेदी करणार-केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांची घोषणा

आणि

·      इंग्लंडविरुद्ध पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या पहिल्या दिवशी भारताच्या तीन बाद ३५९ धावा

****

११वा आंतरराष्ट्रीय योग दिवस आज साजरा होत आहे. आजच्या योग दिनाची संकल्पना ‘एक पृथ्वी, एक आरोग्यासाठी योग’, अशी आहे. आयुष मंत्रालयानं आज आंध्रप्रदेशात विशाखापट्टणम इथं आयोजित केलेल्या योग दिनाच्या मुख्य समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी होत आहेत. सांस्कृतिक मंत्रालयाच्या वतीनं देशभरातल्या १०० पर्यटन स्थळांवर योग दिन साजरा करण्यात येत आहे. या विशाल योगसंगम कार्यक्रमासाठी देश - विदेशातून १० लाखांहून अधिक योग अभ्यासकांनी नोंदणी केली आहे.

केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी योग ही एक जीवनशैली असून, योगाभ्यासाचा दैनंदिन जीवनात समावेश करण्याचं आवाहन केलं आहे....

बाईट – प्रतापराव जाधव, केंद्रीय आयुष राज्यमंत्री

**

मुंबईत मंत्रालयातील त्रिमुर्ती प्रांगणात काल ‘इन्स्टिट्युट ऑफ योगा’च्या सहयोगाने योगासनांची प्रात्यक्षिकं घेण्यात आली. तर पुण्यात राज्य सरकारच्या पुढाकाराने भव्य वारकरी भक्तीयोग उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या या उपक्रमात विद्यार्थी आणि योग अभ्यासकांसह वारकरीही योगसाधना करणार आहेत. नाशिक इथं महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठानं भव्य योग शिबीरांचं आयोजन केलं आहे.

****

योग दिनानिमित्त मराठवाड्यात आयोजित कार्यक्रमांबाबत माहिती देणारा हा वृत्तांत:

छत्रपती संभाजीनगर इथं योग दिनाचा जिल्हास्तरीय कार्यक्रम बिबी का मकबरा परिसरात होणार आहे. जिल्हा क्रीडा अधिकारी बाजीराव देसाई यांनी योग अभ्यासकांसह नागरिकांना या कार्यक्रमात सहभागी होण्याचं आवाहन केलं...

बाईट – बाजीराव देसाई, जिल्हा क्रीडा अधिकारी

 

जालना इथं जिल्हा क्रीडा संकुलात, नांदेड इथं पोलीस मुख्यालयाच्या कवायत मैदानावर, परभणी इथं प्रियदर्शिनी इंदिरा गांधी क्रीडा संकुलावर, हिंगोली इथं संत नामदेव पोलिस कवायत मैदानावर, लातूर इथं जिल्हा क्रीडा संकुलात, धाराशिव इथं श्री तुळजाभवानी जिल्हा क्रीडा संकुलातल्या बॅडमिंटन हॉलमध्ये, तर बीड इथं जिल्हा क्रीडा संकुलात योग दिनाचा मुख्य कार्यक्रम होणार आहे. सकाळच्या सत्रात होणाऱ्या या कार्यक्रमांमध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येनं सहभागी होण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे.

 

नागरिकांनी फक्त एका दिवसापुरताच योगाभ्यास न करता, दररोज योगासनं करण्याचं आवाहन माजी केंद्रीय मंत्री खासदार डॉ भागवत कराड यांनी केलं आहे...

बाईट – खासदार डॉ. भागवत कराड

 

आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पार्श्वभूमीवर आकाशवाणी दररोज आपल्या श्रोत्यांसाठी एका आसनाची माहिती घेऊन येत आहे. आज आपण, आमचे जालन्याचे वार्ताहर योग अभ्यासक बाबासाहेब म्हस्के यांनी दिलेली शीर्षासनाची माहिती जाणून घेऊ...

बाईट – बाबासाहेब म्हस्के, योग अभ्यासक

****

कृषी उत्पादनाच्या खरेदी प्रक्रियेतले मध्यस्थ दूर करून नाफेड लवकरच थेट शेतकऱ्यांकडून खरेदी करणार असल्याची घोषणा केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी केली आहे. आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त काल मुंबईत राष्ट्रीय परिसंवादात ते बोलत होते. शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाची योग्य किंमत मिळेल, असा विश्वास शहा यांनी व्यक्त केला. ते म्हणाले,

बाईट – अमित शहा, केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री

 

सहकार सूत्रावर आधारित विमा कंपनी तसंच दोन लाख नव्या प्राथमिक कृषी सहकारी पतसंस्था स्थापन करणार असल्याची माहितीही शहा यांनी दिली. केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या परिषदेला संबोधित केलं.

दरम्यान, गृहमंत्री शहा यांनी काल महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ॲग्रिकल्चरच्या नूतनीकृत मुख्यालयाचं तसंच सहकारी औद्योगिक वसाहतीच्या राज्यस्तरीय परिषदेचंही उद्घाटन केलं.

****

विविध ठिकाणाहून निघालेल्या संतांच्या पालख्या पंढरपूरकडे मार्गक्रमण करत आहेत. अमळनेरच्या संत सखाराम महाराजांची पालखी काल छत्रपती संभाजीनगर इथल्या चिकलठाणा परिसरात मुक्कामी होती. ही पालखी आज टाकळीमार्गे पंढरपूरकडे प्रस्थान करेल. शेगावच्या गजानन महाराजांच्या पालखी काल परळी इथं मुक्कामी होती, पालखीचं आज दुपारी अंबाजोगाई शहरात आगमन होईल, उद्या ही पालखी लोखंडी सावरगाव मार्गे पंढरपूरकडे रवाना होईल.

****

केंद्रीय संचार ब्‍यूरो आणि परभणी सायकलर्सच्या वतीने सायकल वारीचं आयोजन करण्यात आलं आहे. परभणी सायकलर्स वारीचं हे सातवं वर्ष असून, ही वारी परभणी ते पंढरपूर हे ३०० किलोमीटरचं अंतर दोन दिवसात पार करणार आहे. लातूर इथूनही १७५ जणांची सायकलवारी काल पंढरपूरकडे मार्गस्थ झाली. या वारीत महिलांचाही समावेश आहे.

****

क्रिकेट

कर्णधार शुभमन गिल आणि यशस्वी जैस्वालच्या शतकी खेळीच्या बळावर भारताने इंग्लंडविरुद्ध पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या पहिल्या दिवशी तीन बाद ३५९ धावा केल्या आहेत. के एल राहुल ४२, तर बी साई सुदर्शन शून्यावर तर जयस्वाल १०१ धावा करून बाद झाला, कालच्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा शुभमन १२७ तर ऋषभ पंत ६५ धावांवर खेळत होते.

****

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेने प्रभाग रचनेच्या प्रक्रियेला सुरुवात केली आहे. महापालिका आयुक्त जी श्रीकांत यांनी काल यासंदर्भात पाहणी केली. ही प्रभाग रचना अंतिम करून ती निवडणूक आयोगाकडे आठ जुलै पर्यंत पाठवायची आहे.

दरम्यान महापालिकेनं काल जालना रस्त्यावर असलेली अनेक वर्षांपासूनची दोनशेहून अधिक अतिक्रमणं जमीनदोस्त केली.

****

धाराशिव जिल्ह्यात १९ जुलै रोजी "हरित धाराशिव अभियान" राबवण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर सर्व ग्रामपंचायतींना १ जुलै रोजी विशेष ग्रामसभा आयोजित करण्याचे निर्देश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी दिले आहेत.

****

नांदेड जिल्हा नियोजन समितीने चालू आर्थिक वर्षासाठी ८१५ कोटी २० लाख रुपयांच्या तरतुदीला मंजुरी दिली, तर गेल्या वर्षातल्या सुमारे ७४९ कोटी रुपये खर्चाला मान्यता दिली. पालकमंत्री अतुल सावे यांच्या अध्यक्षतेखाली काल ही बैठक झाली.

****

हवामान

नाशिक जिल्ह्यात गंगापूर, दारणा, नांदूर मधमेश्वर या धरणांच्या पाणी पातळीत वाढ झाल्यानं पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. सध्या जायकवाडी धरणात १२ हजार घनफूट प्रतिसेकंद वेगाने पाण्याची आवक सुरू आहे.

येत्या दोन दिवसात मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता पुणे वेधशाळेनं व्यक्त केली आहे.

****

No comments: