Sunday, 22 June 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 22.06.2025 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date - 22 June 2025

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक २२ जून २०२ दुपारी १.०० वा.

****

भारताकडून इस्राइल-ईराण युध्दाच्या पार्श्वभूमीवर ऑपरेशन सिंधू अंतर्गत जवळपास अकराशेहून जास्त भारतीयांना ईराणमधून सुरक्षित बाहेर काढण्यात आलं आहे. परराष्ट्र मंत्रालयानं या संदर्भात माहिती दिली आहे. त्यानुसार काल विशेष दोन विमानांनी जवळपास सहाशे जणांना नवी दिल्लीत आणण्यात आलं. नेपाळ आणि श्रीलंकेनं ऑपरेशन सिंधू अंतर्गत ईराणमधून त्यांच्या नागरीकांना आणण्यात भारतानं केलेल्या मदतीबद्दल भारत सरकारचं आभार व्यक्त केले आहेत.

****

जम्मू-काश्मीरच्या पहेलगाममध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्यात सहभागी आतंकवाद्यांना आश्रय देणा-या दोन जणांना राष्ट्रीय तपास यंत्रणा एन.आय.ए.नं अटक केली आहे. पहेलगाम परसरातल्या बतकोते भागातील परवेज अहमद जोथर आणि हील पार्क भागातील बशिर अहमद जोथर अशी अटक करण्यात आलेल्यांची नावं आहेत. या दोघांच्या चौकशीतून हल्ल्यात सहभागी तीन सशस्र अतिरेकी  पाकिस्तानी नागरीक होते आणि अतिरेकी संघटना लष्करे तोयबाशी संबंधित असल्याचं निष्पन्न झालं आहे. पहलगाम इथं गेल्या २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ निर्दोष पर्यटकांचा मृत्यू झाला तर १६ जण गंभीर जखमी झाले होते.

****

संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांच्या पालख्या आज  पुण्यातून हडपसरमार्गे पुढे पंढरपूरसाठी मार्गस्थ झाल्या. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी आज सकाळी सहा वाजता मार्गस्थ झाली. ही पालखी आज दिवेघाटमार्गे सासवडला जाणार आहे. तर,संत तुकाराम महाराजांची पालखी आज सकाळी साधारण सात वाजता मार्गस्थ झाली. संत तुकाराम महाराज पालखीचा मुक्काम आज लोणी काळभोर इथं असेल. श्री संत मुक्ताबाई पालखीचं आज बीड शहरात आगमन झालं. राज्यातल्या ८० शहरांतून चार हजार सायकलची दिंडी पंढरपुरमध्ये येऊन पोहोचली असून आज सायकल संमेलन होत आहे.

****

सोलापूर जिल्ह्यातल्या श्री क्षेत्र पंढरपूर शहराच्या महास्वच्छता अभियानाचा शुभारंभ आज पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते करण्यात आला. अभियानात एकाच वेळी सकाळी सात ते दहा या कालावधीत ४२ ठिकाणी स्वच्छता मोहीमेतून १४८  टन कचरा गोळा करण्यात आला. ही वारी पूर्वीची स्वच्छता असून वारीनंतरही स्वच्छता करण्यात येणार आहे. पालकमंत्री गोरे यांनी स्वच्छ चंद्रभागा, नमामी चंद्रभागा यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत असं आवाहन यावेळी केलं. पंढरपूर इथं येणा-या सर्वांना सर्वोच्च व्यवस्था प्रदान केली जाणार असल्याचंही त्यांनी नमूद केलं.

****

बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यात गहूखेल तांडा आणि सेवालाल लमान तांडा इथं काम करणा-या १५ बालकामगारांची पोलिसांनी सुटका केली आहे. यात नऊ मुली तर सहा मुलांचा समावेश असून त्यांच्याकडून जनावरांची राखण करण्यापासून ते धुणीभांडी आणि अन्य कामं करून घेतली जात होती. यातली दोन मुलं तिथून सुटका करून अहिल्यानगर शहरात पोहचल्यानंतर पोलिसांच्या चौकशीतून हा सगळा प्रकार समोर आला. पोलिसांनी सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीनं त्यांना सोडवलं आहे. सोडवण्यात आलेली सहा मुलं बीडच्या बालकल्याण समितीकडे तर नऊ मुली आर्वीच्या सेवाश्रम प्रकल्पात पाठवण्यात आल्या आहेत. या प्रकरणी आंभोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला जात असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

हिंगोली जिल्ह्यात वादळी वाऱ्यामुळं नुकसानग्रस्त क्षेत्राबाबतचा माहिती अहवाल शासनाला सादर करण्यात आला आहे. याबाबत जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी तातडीनं पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या होत्या. सदर अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर झाल्यावर संबंधीत शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पाच कोटी ७७ लाख रुपयांचा निधी अपेक्षीत आहे. कळमनुरीसह वसमत तालुक्यात नऊ जूनला  सायंकाळी आलेल्या वादळी वाऱ्यानं दीड हजार हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर केळी, पपईसह अन्य फळबागांचं नुकसान झालं होतं. प्रामुख्यानं कळमनुरी तालुक्यातल्या दिग्रस बुद्रुक, डोंगरकडा, सालापूर, रेडगाव, वडगाव, जवळा पांचाळ, भाटेगाव यासह अन्य गावांत वादळी वाऱ्यानं मोठं नुकसान झालं होतं. वसमत तालुक्यातल्या कुरुंदा, गिरगाव यासह परिसरातल्या अनेक गावांमधल्या पिकांचंही यावेळी मोठं नुकसान झालं.

****

राज्य भारत स्काऊट आणि गाईड संस्थेच्या दैनंदिन प्रशासकीय कामकाज तसंच संबंधीत निवडणूक प्रक्रीयेसाठी शासन नियुक्त चार सदस्यांच्या समितीमध्ये बीड जिल्ह्याच्या गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित यांचा समावेश करण्यात आला आहे. या समितीत पंडित यांच्यासह, विधिज्ञ विशाल पाटील, राजकुमार कौशिक आणि क्रीडा विभागाचे सहाय्यक संचालक मिलिंद दिक्षीत यांचा समावेश आहे.

****

भंडारा जिल्ह्यातल्या राष्ट्रीय गोसीखुर्द सिंचन प्रकल्पाच्या धरणातून जिल्हा प्रशासनाने ऐंशी क्युसेक-दशलक्ष घनमीटर पाणी सोडण्यास कालपासून सुरवात केली आहे. सध्या हा प्रकल्प तुडुंब भरलेला आहे.

****

भारत आणि इंग्लंड यांच्यात हेडिंग्ले इथं सुरु असलेल्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात तिसऱ्या दिवशी आज इंग्लंड संघ आपला पहिला डाव तीन बाद २०९ धावांवरुन पुढं सुरू करणार आहे.

****

No comments: