Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 22 June 2025
Time 11.00 to 11.05 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक २२ जून २०२५ सकाळी ११.०० वाजता
****
संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम
महाराजांच्या पालख्या आज पुण्यातून हडपसरमार्गे
पुढे पंढरपूरसाठी मार्गस्थ झाल्या. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी आज सकाळी सहा वाजता
मार्गस्थ झाली. ही पालखी आज दिवेघाटमार्गे सासवडला जाणार आहे. तर,संत तुकाराम महाराजांची पालखी आज सकाळी साधारण सात वाजता मार्गस्थ
झाली. संत तुकाराम महाराज पालखीचा मुक्काम आज लोणी काळभोर इथं असेल. पुण्यात आगमन झाल्यानंतर
काल दिवसभर संत श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा भवानी पेठेतील पालखी विठोबा मंदिरात
तर तुकाराम महाराजांच्या पालखीचा नाना पेठेतील निवडुंगा विठ्ठल मंदिरात मुक्काम होता.
काल याठिकाणी दर्शनासाठी काही किलोमीटर पर्यंतच्या रांगा लागल्या होत्या. दोन्ही मंदिरांच्या
बाहेर भव्य मंडप उभारण्यात आला होता. श्री संत मुक्ताबाई पालखीचं आज बीड शहरात आगमन
झालं आहे. राज्यभरातून आषाढीसाठी अनेक दिंड्या पंढरपूरकडे येत आहेत. राज्यातल्या ८०
शहरांतून चार हजार सायकलची दिंडी पंढरपुरात येऊन पोहोचली आहे. पंढरपुरात आज सायकल संमेलन
होत आहे. सायकल स्वारांनी वारकरी परंपरेप्रमाणं सायकल वरून नगरप्रदक्षणा केली. केंद्रीय
मंत्री रक्षा खडसे, जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे, खासदार धैर्यशील मोहिते पाटील, आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील यांनी सायकल दिंडीचं उद्घाटन करून
दिंडीत सहभाग घेतला. आरोग्यमय भारत या राष्ट्रीय कार्यक्रम अंतर्गत या दिंडीमध्ये सायकल
सारख्या व्यायामाचं महत्व पटवून देण्यात आलं.
****
बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यात
गहूखेल तांडा आणि सेवालाल लमान तांडा इथं काम करणा-या १५ बालकामगारांची पोलिसांनी सुटका
केली आहे. यात नऊ मुली तर सहा मुलांचा समावेश असून त्यांच्याकडून जनावरांची राखण करण्यापासून
ते धुणीभांडी आणि अन्य कामं करून घेतली जात
होती. यातली दोन मुलं तिथून पसार होत अहिल्यानगर शहरात गेली, त्या ठिकाणी पोलिसांच्या चौकशीतून हा सगळा प्रकार समोर आला.
पोलिसांनी सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीनं त्यांना सोडव सोडवलं. आता सहा मुलं बीडच्या
बालकल्याण समितीकडे तर नऊ मुली आर्वीच्या सेवाश्रम प्रकल्पात पाठवण्यात आल्या आहेत.
या प्रकरणी आंभोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होत आहे.
****
कुस्तीपटूंनी राज्याला पुन्हा
एकदा ऑलिम्पिक स्पर्धेत अव्वल स्थान मिळवून द्यावं अशी अपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस यांनी काल नागपूर इथं व्यक्त केली. मुख्यमंत्री चषक राष्ट्रीय कुस्ती अजिंक्यपद
स्पर्धेचं उद्घाटन करताना ते बोलत होते. कुस्तीपटुंना पायाभूत सुविधा, प्रशिक्षणासह आवश्यक मदत करण्यात येईल असं आश्वासन फडणवीस यांनी
दिलं.
****
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यांच्या उपस्थितीत आज नागपूर इथं त्र्यंबक-नाशिक
सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त रस्ते विकासासंदर्भात बैठक होणार आहे.तसंच नागपूरच्या नागनदी
प्रदूषण प्रतिबंध प्रकल्पा बैठकीतही ते सहभागी होत आहेत. तर,सायंकाळी प्रधानमंत्री
आवास योजनेंतर्गत ‘स्वप्ननिकेतन’ सदनिकांचं हस्तांतरण-विविध विकास कामांचे लोकार्पण
त्यांच्या हस्ते नागपूर इथं होईल.
****
भारताच्या माया राजेश्वरन हिनं
जर्मनीत आयोजित आईटीएफ कनिष्ठ गट दोनशे, ग्लेफडबेक टेनिस स्पर्धेत महिला एकेरीचा किताब पटकावला आहे. सोळा वर्षीय मायानं
अंतिम फेरीत स्वित्झर्लंडच्या नोलिया मान्तान हिचा ६-२, ६-४ असा सहज पराभव केला. मायाचं हं एकंदर सातवं आईटीएफ कनिष्ठ
गट पारितोषिक आहे.
****
भारत आणि इंग्लंड यांच्यात हेडिंग्ले
इथं सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात तिसऱ्या दिवशी आज इंग्लंड संघ आपला डाव तीन
बाद २०९ धावांवरुन पुढं सुरू करेल. ऑली पोप शंभर धावांवर खेळत आहे. काल भारताचा पहिला
डाव ४७१ धावांवर आटोपला. भारतावर आघाडीसाठी इग्लंडला पहिल्या डावात अजुन २६२ धावा करायच्या
आहेत.
****
पत्रकारांचे प्रश्न तत्परतेनं
सोडवण्यासाठी शासन स्तरावर स्वतंत्र बैठक घेऊन त्यांच्या आरोग्याशी निगडीत सर्व प्रश्न
मार्गी लावण्यात येतील, अशी ग्वाही राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश
आबिटकर यांनी दिली आहे. कोल्हापूर इथं राज्य वृत्तपत्र आणि प्रसार माध्यम अधिस्वीकृती
समितीच्या दोन दिवसीय बैठकीच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. राज्यात अधिस्वीकृतीपत्रिका
असणारे पत्रकार कमी असून ही संख्या वाढायला
हवी, असंही ते म्हणाले.
****
राज्यात कोकण, घाटमाथ्यासह विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागात पावसाचा जोर
कायम आहे. दरम्यान, मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, लातूर आणि बीड या
चार जिल्ह्यांना हवामान विभागानं पिवळा बावटा जारी करत मध्यम स्वरुपाच्या पावसाचा इशारा
दिला आहे.
****
भंडारा जिल्ह्यातल्या राष्ट्रीय
गोसीखुर्द सिंचन प्रकल्पाच्या धरणातून जिल्हा प्रशासनाने ऐंशी क्युसेक-दशलक्ष घनमीटर
पाणी सोडण्यास कालपासून सुरवात केली. सध्या हा प्रकल्प तुडुंब भरलेला आहे. यावेळी मान्सून
पूर्ण क्षमतेनं सक्रिय असल्यानं, कधीही मुसळधार पावसाची
शक्यता आहे. सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये आणि वैनगंगेच्या खोऱ्यात तसंच आणि भंडारा जिल्ह्यातून
वाहणाऱ्या इतर नद्यांना मोठा पूर येण्याची शक्यता आहे. यामुळं भविष्यात पूरपरिस्थिती
निर्माण होऊ शकते. यामुळं संभाव्य पुरावर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि प्रकल्पात पाणी
साठवण क्षमता निर्माण करण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात
आला असल्याचं प्रशासनानं कळवलं आहे.
****
No comments:
Post a Comment