Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 24 June 2025
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती
संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २४ जून २०२५ सायंकाळी ६.१०
****
· अंदाज समित्यांनी अधिक कार्यक्षमतेने जबाबदारीचं पालन करावं-राष्ट्रीय परिषदेच्या
समारोप सत्रात राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचं आवाहन
· संविधान हत्या दिवस अर्थात आणीबाणीच्या
घोषणेला पन्नास वर्ष पूर्ण
· शक्तिपीठ महामार्गाला राज्य मंत्रिमंडळाची मान्यता-प्रकल्प आखणी तसंच भूसंपादनासाठी
वीस हजार कोटी रुपयांची तरतूद
आणि
· लिडस कसोटी क्रिकेट सामन्यात इंग्लंडच्या दुसऱ्या डावात उपाहारापर्यंत बिन बाद
११७ धावा
****
संसद आणि विधिमंडळाच्या अंदाज समित्यांनी अधिक कार्यक्षमतेने
जबाबदारीचं पालन करावं असं आवाहन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी केलं आहे. आज मुंबईत
अंदाज समित्यांच्या राष्ट्रीय परिषदेच्या समारोप समारंभात ते बोलत होते.
लोकसभेचे तसंच या परिषदेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी या परिषदेचा
समारोप करतांना, नवनवीन तंत्रज्ञान आणि data analysis चा वापर करून अधिक चांगलं काम करता येईल, असा विश्वास व्यक्त केला, संसदीय समित्या सरकारच्या विरोधी नव्हे तर पूरक म्हणून काम करतात, असं बिर्ला यांनी नमूद केलं. ते म्हणाले –
बाईट – लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला
****
भारतीय लोकशाहीतल्या काळ्या कालखंडाची अर्थात आणीबाणीची घोषणा होण्याला उद्या पन्नास वर्ष होत आहेत. २५ जून १९७५
रोजी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आणीबाणी लागू करत असल्याचं जाहीर केलं. आणीबाणीच्या काळात अमानवी वेदना सहन करणाऱ्या
सर्वांचं स्मरण करण्यासाठी हा संविधान हत्या दिवस पाळला जातो. यासंदर्भातला हा संक्षिप्त
आढावा –
आणीबाणीच्या
काळात, नागरी स्वातंत्र्याचं खच्चीकरण करून प्रसारमाध्यमांवर निर्बंध लादण्यात आले.
टीकाकार वृत्तपत्रांच्या जाहिराती रोखून सरकारने त्यांची गळचेपी केली, पत्रकारांना आपली
वृत्तपत्रं बंद करायला लावून तुरुंगात डांबण्यात आलं.
या
काळात सत्तेचं केंद्रीकरण झालं, आणि जयप्रकाश नारायण, लालकृष्ण अडवाणी, अटलबिहारी वाजपेयी, मोरारजी देसाई, मधु दंडवते यांच्यासह अनेक नेत्यांना अटक झाली. सरकारच्या या कारवाईवर मोठ्या
प्रमाणात टीका झाली. याविरोधातली आंदोलनं दडपण्यासाठी लोकांना आरोपांशिवाय ताब्यात
घेण्यात आलं आणि बेकायदेशीरपणे विविध कलमं लावण्यात आली. अंतर्गत सुरक्षा देखभाल
कायदा -मिसा हा कायदा त्यावेळी चर्चेत आला. या सर्व कारवायांमुळे आणीबाणीचा काळ हा
स्वतंत्र भारताचा सर्वाधिक काळा काळ ठरला.
मन
की बात या आकाशवाणीवरील कार्यक्रमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही आणीबाणीची
घोषणा भारतीय लोकशाहीवरील काळा डाग असल्याची भावना व्यक्त केली होती.
आणीबाणीच्या
काळात अनेक राजकीय चळवळी झाल्या, ज्यात गुजरातमधील नवनिर्माण आंदोलन, बिहारमधील जयप्रकाश
नारायण यांचं आंदोलन आणि जॉर्ज फर्नांडिस यांच्या नेतृत्वात झालेला रेल्वे संप
यांचा प्रामुख्याने उल्लेख केला जातो.
हातकड्या
आणि बेड्या घातलेला हात उंचावलेलं फर्नांडीस यांचं छायाचित्र हे आणीबाणीच्या
काळातील सर्वाधिक प्रसिद्ध असलेल्या छायाचित्रांपैकी एक आहे.
****
आणीबाणीच्या
काळातल्या तुरुंगवासाच्या काळ्या आठवणी आजही अनेक कार्यकर्त्यांच्या मनात ताज्या आहेत.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे बीड जिल्ह्याचे तत्कालीन कार्यवाह प्राध्यापक शरद हेबाळकर
यांनी आपल्या या आठवणींना उजाळा दिला.
बाईट - प्राध्यापक
शरद हेबाळकर
१८ महिन्यांच्या आणीबाणीच्या काळात मानवाधिकारांसाठीच्या लढ्यात
प्राण अर्पण करणाऱ्या सर्वांना उद्या आदरांजली वाहण्यात येईल. या निमित्तानं प्रत्येक
भारतीयाच्या मनात वैयक्तिक स्वातंत्र्य आणि लोकशाहीची ज्योत तेवत रहावी, तसंच नागरिकांना हुकूमशाही प्रवृत्तींशी लढा देण्याची प्रेरणा
मिळत राहावी, याकरता हा दिवस गेल्या वर्षीपासून
पाळला जातो.
****
राज्यातली साडेतीन शक्तिपीठं, दोन ज्योतिर्लिंगं आणि पंढरपूर तसंच अंबेजोगाई सहित १८ तीर्थक्षेत्रांना जोडणाऱ्या
शक्तिपीठ महामार्गाला आज राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. या प्रकल्पाच्या
आखणी आणि भूसंपादनासाठी वीस हजार कोटी रुपयांच्या तरतुदीलाही मंत्रिमंडळानं मंजुरी
दिली.
महाराष्ट्र नागरी पायाभूत सुविधा विकास कर्ज योजनेंतर्गत हडको
संस्थेकडून घेण्यात येणाऱ्या दोन हजार कोटींच्या कर्जाला शासन हमी देण्याचा तसंच त्यापोटीचं
हमी शुल्क माफ करण्याचा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला. यात छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या
पाणी पुरवठा प्रकल्पासाठीच्या ८२२ कोटी २२ लाख रुपयांच्या मागणीचा समावेश आहे.
याशिवाय सार्वजनिक क्षेत्रातल्या उपक्रम कंपन्यांसाठी महाराष्ट्र
कर, व्याज, शास्ती किंवा विलंब शुल्क यांच्या थकबाकीतील तडजोडीसाठी सुधारणा
विधेयक आणण्याचा, आदिवासी
शासकीय वसतीगृहांमधल्या विद्यार्थ्यांच्या निर्वाह भत्ता, शैक्षणिक साहित्य खरेदी भत्ता आणि आहार भत्त्यामध्ये वाढ करण्याचा निर्णयही आज
मंत्रिमंडळानं घेतला.
****
राज्य शासनाचे पत्रकारिता पुरस्कार आज जाहीर झाले. राही भिडे, सुधीर पाठक, भाऊ
तोरसेकर, विजय बाविस्कर आणि बाळासाहेब
जाधव या पाच पत्रकारांना लोकमान्य टिळक जीवनगौरव पत्रकारिता पुरस्कार जाहीर झाला आहे.
२०२१ चा अटलबिहारी वाजपेयी राष्ट्रीय पत्रकारिता पुरस्कार मंगेश वैशंपायन यांना जाहीर
झाला आहे. एक लाख रुपये, मानचिन्ह
आणि प्रशस्तीपत्र असं या पुरस्कारांचं स्वरुप आहे. या शिवाय गेल्या तीन वर्षांसाठीचे
पत्रकारिता पुरस्कारही आज जाहीर झाले.
****
शेतकरी कर्जमाफी तत्काळ लागू करणं, या मुद्यांसाठी माजी राज्यमंत्री बच्चू
कडू यांच्या नेतृत्वात येत्या पाच जुलैपासून ‘सातबारा कोरा करा’, या
पदयात्रेला सुरुवात होणार आहे. बच्चू कडू यांनी आज अमरावती इथे पत्रकार परिषदेत ही
माहिती दिली. शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत आपण स्वस्थ बसणार नाही, असा इशारा बच्चू कडू यांनी दिला आहे.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना वेळेत पीक कर्ज
उपलब्ध व्हावं, यासाठी गावपातळीवर पीक कर्जासाठी
शिबिरांचं आयोजन करावं, असे
निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले आहेत. आज बँक अधिकाऱ्यांच्या बैठकीत
त्यांनी हे निर्देश दिले.
दरम्यान, ‘अधिकारी:शेताच्या
बांधावरी’ या उपक्रमाअंतर्गत जिल्हाधिकारी स्वामी यांनी आज सकाळी कृष्णपूरवाडी आणि
कोलठाण या गावांतल्या शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या.
बीड जिल्ह्यात आमदार संदीप क्षीरसागर यांनी चौसाळा जिल्हा परिषद
गटातल्या वानगाव इथं भेट
देऊन ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेतल्या.
****
क्रिकेट
इंग्लंडमध्ये लिडस इथं सुरू असलेल्या कसोटी क्रिकेट सामन्यात
आज अखेरच्या दिवशी यजमान संघाच्या दुसऱ्या डावात बिन बाद ११७ धावा झाल्या आहेत. इंग्लंड
संघानं आज सकाळी कालच्या बिनबाद २१
धावांवरून खेळ पुढे सुरू केला. उपाहारासाठी खेळ थांबला तेव्हा यजमान संघाचे दोन्ही
सलामीवर अनुक्रमे ४२ आणि ६४ धावांवर खेळत होते.
****
माजी फिरकी गोलंदाज दिलीप दोशी यांचं काल रात्री लंडन इथे हृदयविकारानं
निधन झालं. ते ७७ वर्षांचे होते. क्रिकेट समालोचक म्हणूनही ते
लोकप्रिय होते. दोशी यांनी २३८ प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये ४३ वेळा पाच बळी घेतले.
एका सामन्यात दहा बळी घेण्याचा विक्रम त्यांनी सहा वेळा केला होता. भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं दोशी यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
****
हवामान
पुढचे दोन दिवस पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग
आणि नंदूरबार जिल्ह्यांना हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तर नाशिक आणि
पुणे जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी केला आहे. दरम्यान, नाशिक जिल्ह्यातल्या गंगापूर धरणातला विसर्ग कमी करण्यात आला आहे.
****
No comments:
Post a Comment