Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 24 June 2025
Time 11.00 to 11.05 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक २४ जून २०२५ सकाळी ११.०० वाजता
****
ऑपरेशन सिंधु अंतर्गत आतापर्यंत
दोन हजार दोनशे पंचाण्णव भारतीय नागरिकांना इराणमधून भारतात परत आणण्यात आलं आहे. आज
पहाटे दोनशे ब्याण्णव भारतीय नागरिक एका विशेष विमानानं दिल्लीत पोहचल्याची माहिती
परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ता रणधीर जैस्वाल यांनी दिली आहे.
****
इराण आणि इस्रायलनं संपूर्ण
युद्धबंदीवर सहमती दर्शविली असल्याचं, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. युद्धबंदी काही तासांत लागू
होईल, असं ट्रम्प म्हणाले. युद्धबंदी टप्प्याटप्प्याने
लागू केली जाईल. इराण युद्धबंदी सुरू करेल, त्यानंतर इस्रायल युद्धबंदी लागू करेल, असं ट्रम्प यांनी समाजमाध्यमावरील संदेशात म्हटलं आहे.
दरम्यान, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्धविरामाची घोषणा
केल्यानंतर शेअरबाजाराची सुरुवात चांगली झाल्याचं दिसून आलं. बीएसई निर्देशांकात ६३४
अंकांनी वाढ होऊन तो ८२ हजार ५३० वर सुरु झाला. तर, नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या निफ्टीमध्ये १९४ अंकांची वाढ झाली. निफ्टी २५ हजार १६६
अंकांवर पोहोचला. कच्च्या तेलाच्या किंमती कमी झाल्यानंतर आज रुपयाचे मूल्य ६५ पैशांनी
वाढून, ८६ रुपये १० पैसे इत एवढं झालं.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नवी
दिल्लीत, भारताचे दोन महान आध्यात्मिक आणि नैतिक गुरु, श्री नारायण गुरू आणि महात्मा गांधी यांच्यातल्या ऐतिहासिक संवादाच्या
शताब्दी समारंभाचा शुभारंभ करणार आहेत. भारताच्या नैतिक आणि सामाजिक जडण घडणीला आकार
देणारा त्यांच्यातला हा दूरदर्शी संवाद लोकांपर्यंत पोहोचावा, या उद्देशानं या समारंभाचं आयोजन करण्यात आलं आहे.
****
उद्या संविधान हत्या दिवस पाळण्यात
येणार आहे. २५ जून १९७५ रोजी देशात लागू झालेल्या आणीबाणीचं स्मरण करून, त्या काळात अमानुष कष्ट भोगलेल्या सर्वांना या दिवशी श्रद्धांजली
अर्पण केली जाते, असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
भारतीय अंतराळवीर शुभांशु शुक्ला
यांचा समावेश असलेल्या एक्सिओम चार या अवकाश मोहिमेची उद्या सुरुवात होणार असल्याची
माहिती अमेरिकेच्या अंतराळ संशोधन संस्था नासाच्या अधिकृत संकेतस्थळावर देण्यात आली
आहे. फ्लोरिडा इथल्या केनेडी स्पेस सेंटरवरून उद्या दुपारी बारा वाजून एक मिनिटांनी
या अंतराळवीरांच्या यानाचं प्रक्षेपण होणार आहे. यावर्षीच्या २९ मे ला सुरू होणार असलेली
ही मोहीम तांत्रिक अडचणींमुळे पाच ते सहा वेळा पुढे ढकलण्यात आली होती.
****
आदिवासी शेतकऱ्यांकडून धान खरेदी
करण्याच्या प्रक्रियेतल्या गैरप्रकारांना आळा बसावा, यासाठी महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळानं थेट शेतकऱ्यांच्या बांधावर
जाऊन पिकांची पाहणी करण्याचा निर्णय घेतला आहे. महामंडळाचे अधिकारी शेतकऱ्यांशी संवाद
साधून त्यांचे समुपदेशन करणार असून, त्यांच्या अडचणी दूर करणार आहेत.
****
केंद्र सरकारनं अधिकारी आणि
कर्मचाऱ्यांना युपीएस अर्थात एकीकृत निवृत्ती वेतन योजनेचा पर्याय निवडण्यासाठी आणखी
तीन महिन्यांचा अवधी दिला आहे. एनपीएस किंवा युपीएस पैकी कोणती निवृत्ती वेतन योजना
निवडायची हे आता येत्या ३० सप्टेंबर पर्यंत कळवता येईल.
****
भारताचे माजी फिरकीपटू दिलीप
दोशी यांचं सोमवारी रात्री लंडन इथे हृदयविकारामुळे निधन झालं. ते ७७ वर्षांचे होते.
उत्कृष्ट फिरकी गोलंदाज आणि यशस्वी हिंदी क्रिकेट समालोचक म्हणून ते लोकप्रिय होते.
प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये आठशे अठ्ठ्याण्णव बळी घेणाऱ्या दिलीप दोशी यांनी दोनशे अडोतीस
प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये त्रेचाळीस वेळा पाच बळी घेतले. एका सामन्यात दहा बळी घेण्याचा
विक्रम त्यांना सहा वेळा केला होता. भारतासाठी खेळण्याव्यतिरिक्त, दोशी यांनी देशांतर्गत क्रिकेटमध्ये तसंच परदेशी कौंटी क्रिकेटमध्येही
आपलं कौशल्य दाखवलं होतं. भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं दोशी यांना श्रद्धांजली वाहिली
आहे.
****
राजर्षी छत्रपती शाहू महाराज
यांच्या जन्मदिनी येत्या २६ तारखेला, सामाजिक न्याय दिनाच्या औचित्यानं, नांदेड इथं समता दिंडीचं आयोजन करण्यात आलं आहे. या समता दिंडीमध्ये जिल्ह्यातल्या
महाविद्यालयं आणि शाळांमधल्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवावा, असं आवाहन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे
यांनी केलं आहे.
****
नाशिक जिल्ह्यातल्या गंगापूर
धरणाच्या पाणलोट क्षेत्रात रविवारी मध्यरात्रीपासून पावसाचा जोर वाढून धरण ६१ पूर्णांक
८७ टक्के भरल्याने विसर्गात सोमवारी दुपारी दोन वाजता दुपटीनं वाढ करण्यात आली. ६ हजार
१६० क्युसेक इतका विसर्ग गोदावरीत करण्यात आल्यामुळे गोदावरीत पूरसदृश स्थिती निर्माण
झाली आहे. नाशिककरांचा पारंपरिक पूरमापक असलेल्या दुतोंड्या मारुतीची मूर्ती कंबरेपर्यंत
बुडाली असून, रामकुंडावरच्या गंगा-गोदावरी प्राचीन मंदिरालाही
पाण्याचा वेढा पडल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
दरम्यान, येत्या दोन दिवसात कोकण आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी, तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं
वर्तवली आहे.
****
No comments:
Post a Comment