Wednesday, 25 June 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 25.06.2025 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date - 25 June 2025

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक २५ जून २०२ दुपारी १.०० वा.

****

एक्सिओम चार या अवकाश मोहिमेला आज प्रारंभ होत झाला. फ्लोरिडा इथल्या केनेडी स्पेस सेंटरवरून आज दुपारी बारा वाजून एक मिनिटांनी हे यान चार अंतराळ वीरांना घेऊन अंतराळात झेपावलं. भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांचा यामध्ये समावेश आहे. अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासाच्या अधिकृत संकेतस्थळावरून ही माहिती देण्यात आली. ४१ वर्षांनंतर पुन्हा एकदा भारताचा अंतराळवीर अवकाशात गेला आहे. ४१ वर्षांपूर्वी भारताचे अंतराळवीर राकेश शर्मा यांनी अवकाश भरारी केली होती.

राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांनी या अंतराळ मोहिमेला शुभेच्छा दिल्या आहेत. अंतराळ यानाच्या यशस्वी उड्डाणाबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.

शुभांशू शुक्ला यांनी जय हिंद, जय भारत असा संदेश देत या मोहिमेला प्रारंभ केला. ते म्हणाले की, माझ्या खांद्यावर असलेला तिरंगा ध्वज सांगत आहे की, सर्व भारतीय माझ्यासोबत आहेत.

केंद्रीय अंतराळ राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांचे अभिनंदन केले आहे. डॉ. सिंह म्हणाले की, हा भारतासाठी अभिमानाचा क्षण आहे.

****

संविधान हत्या दिवस आज पाळण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणीबाणीविरुद्धच्या लढाईत ठामपणे उभे राहिलेल्यांना अभिवादन केले. सोशल मीडियावरील एका पोस्टमध्ये, पंतप्रधान मोदी म्हणाले की, आज देश भारताच्या लोकशाही इतिहासातील एका काळ्या अध्यायाला पन्नास वर्षे पूर्ण करत आहे. पन्नास वर्षांपूर्वी आजच्या दिवशी भारतीय संविधानातील मूल्यांना बाजूला करण्यात आले. मूलभूत अधिकार निलंबित करण्यात आले. माध्यमांचे स्वातंत्र्य संपुष्टात आणले. आणि अनेक राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते, विद्यार्थी आणि नागरिकांना तुरुंगात टाकण्यात आलं होतं. आणीबाणीच्या काळात लोकशाहीचे रक्षण करण्यासाठी देशातील हजारो नागरिकांनी आपले जीवन समर्पित केले होते. त्यांच्या सामूहिक संघर्षामुळेच तत्कालीन काँग्रेस सरकारला आणीबाणीचा निर्णय मागे घ्यावा लागला आणि आणि नवीन निवडणुका घ्याव्या लागल्या. त्यावेळी जनतेने लोकशाहीविरोधी काँग्रेसचा मोठा पराभव केला.

****

भारतीय लोकशाहीतल्या काळ्या कालखंडाची अर्थात आणीबाणीची घोषणा होण्याला आज पन्नास वर्ष झाली. आणीबाणीच्या काळात कारावास भोगलेल्या कार्यकर्त्यांना आज राज्य शासनाकडून सन्मानपत्र देऊन गौरवलं जाणार आहे. बीड इथं आणीबाणी विषयक विविध घटनांवर आधारित प्रदर्शनाचं उद्घाटन जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या हस्ते आज संध्यकाळी पाच वाजता होणार आहे. जिल्हा परिषद मैदानावर भरवल्या जाणाऱ्या या प्रदर्शनात आणीबाणीशी संबंधित छायाचित्रांबरोबरच संक्षिप्त आणि माहितीपूर्ण मजकूर, घटनाक्रम, माहितीफलक यांची मांडणी केली जाणार आहे.

****

जम्मू-काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यातील केरी भागात नियंत्रण रेषेवर काल पाकिस्तानी दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न भारतीय सैन्याने हाणून पाडला. या कारवाईदरम्यान एक दहशतवादी मारला गेला आहे आणि एक जखमी झाला आहे. मारल्या गेलेल्या पाकिस्तानी दहशतवाद्याचा मृतदेह नियंत्रण रेषेजवळ पडला आहे. तर जखमी दहशतवादी पाकव्याप्त काश्मिरात पळून गेला. सुमारे तीन ते चार दहशतवाद्यांचा एक गट घनदाट जंगलाच्या आडून भारतात घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत होता. सुरक्षा दलांच्या जवानांनी तो हाणून पाडला.

****

ऑपरेशन सिंधू अंतर्गत आज सकाळी भारतीय हवाई दलाच्या विमानाने इस्रायलमधून २२४ भारतीय नागरिक परतले केंद्रीय. कामगार, रोजगार राज्यमंत्री शोभा करंदलाजे यांनी या नागरिकांचं स्वागत केलं. या मोहिमेच्या माध्यमातून आतापर्यंत ८१८ भारतीय नागरिक इस्रायलमधून मायदेशी परतले आहेत. भारतीय नागरिकांची सुरक्षा ही सरकारची प्राथमिकता असल्याचं परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.

तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टालिन यांनी परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांना इराणमध्ये अडकलेल्या तमिळनाडूच्या मच्छिमारांच्या सुरक्षित परतीसाठी तात्काळ राजनैतिक पावले उचलण्याचं आवाहन पत्राद्वारे केलं आहे. तामिळनाडूतील कन्याकुमारी, तिरुनेलवेली, थुथुकुडी आणि रामनाथपुरम जिल्ह्यातील ६५१ मच्छिमार सध्या इराणमध्ये आहेत.

****

कैलास मानसरोवर यात्रेत ४७ यात्रेकरुंच्या दुसऱ्या तुकडीने आज सकाळी नाथुला सीमा यशस्वीरित्या ओलांडली. गंगटोक आणि हवामानाशी जुळवून घेणाऱ्या केंद्रांमध्ये यात्रेकरुंना त्यांच्या वास्तव्यादरम्यान देण्यात आलेल्या अखंड व्यवस्था, काळजी आणि आदरातिथ्याबद्दल यात्रेकरूंनी एसटीडीसी, विविध विभाग आणि सिक्कीम सरकारचे मनापासून आभार मानत कृतज्ञता व्यक्त केली आहे.

****

कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या दोन दिवसात पावसाचा जोर वाढला आहे. पंचगंगा नदीचं पाणी यंदा पहिल्यांदाच पात्राबाहेर गेलं आहे. कोल्हापूर जिल्ह्यातले ३७ बंधारे सध्या पाण्याखाली गेले आहेत. राधानगरी धरण ६३ टक्के भरलं असून, धरणातून पाण्याचा विसर्ग सध्या भोगावती नदीपात्रात सुरू आहे. जिल्ह्यातले अनेक लघु पाटबंधारे प्रकल्प शंभर टक्के भरले आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातही पावसाचा जोर वाढला आहे. समुद्र खवळला असल्यामुळे मच्छिमार बांधवानी आणि नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. कुडाळ तालुक्यात वसोली गावात सोमवारी रात्री पुलावरून जाणारे दोन दुचाकीस्वार नदीच्या पाण्यात वाहून गेले. त्यापैकी एकजण वाचला असून दुसऱ्याचा शोध सुरू आहे.

****

No comments: