Regional
Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 25 June
2025
Time 7.10
AM to 7.20 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक २५ जून २०२५ सकाळी ७.१० मि.
****
·
भारतीय लोकशाहीतला काळा
कालखंड अर्थात आणीबाणीच्या घोषणेला पन्नास वर्ष पूर्ण
·
शक्तिपीठ महामार्गाला राज्य
मंत्रिमंडळाची मान्यता-प्रकल्प आखणी तसंच भूसंपादनासाठी वीस हजार कोटी रुपयांची
तरतूद
·
छत्रपती संभाजीनगर इथं एम
डी पावडरचा सुमारे अडीच किलो साठा जप्त
·
संत एकनाथ महाराजांची पालखी
गारमाथ्याचा खडतर डोंगर पार करून पंढरीकडे मार्गस्थ
आणि
·
भारताचा भालाफेकपटू नीरज
चोप्रा याला ओस्ट्रावा गोल्डन स्पाईक स्पर्धेत सुवर्णपदक
****
भारतीय लोकशाहीतल्या काळ्या कालखंडाची अर्थात आणीबाणीची
घोषणा होण्याला आज पन्नास वर्ष होत आहेत. २५ जून १९७५ रोजी तत्कालीन पंतप्रधान
इंदिरा गांधी यांनी आणीबाणी लागू करत असल्याचं जाहीर केलं होतं. आणीबाणीच्या काळात
अमानवी वेदना सहन करणाऱ्या सर्वांचं स्मरण करण्यासाठी गेल्या वर्षीपासून संविधान
हत्या दिवस पाळला जातो. यासंदर्भातला हा संक्षिप्त आढावा...
आणीबाणीच्या
काळात,
नागरी स्वातंत्र्याचं खच्चीकरण करून प्रसारमाध्यमांवर
निर्बंध लादण्यात आले. टीकाकार वृत्तपत्रांच्या जाहिराती रोखून सरकारने त्यांची
गळचेपी केली,
पत्रकारांना आपली वृत्तपत्रं बंद करायला लावून तुरुंगात
डांबण्यात आलं.
या
काळात सत्तेचं केंद्रीकरण झालं, आणि जयप्रकाश नारायण, लालकृष्ण अडवाणी, अटलबिहारी वाजपेयी, मोरारजी देसाई,
मधु दंडवते यांच्यासह अनेक नेत्यांना अटक झाली. सरकारच्या
या कारवाईवर मोठ्या प्रमाणात टीका झाली. याविरोधातली आंदोलनं दडपण्यासाठी लोकांना
आरोपांशिवाय ताब्यात घेण्यात आलं आणि बेकायदेशीरपणे विविध कलमं लावण्यात आली. मिसा अंतर्गत सुरक्षा देखभाल कायदा -मिसा हा
कायदा त्यावेळी चर्चेत आला. या सर्व कारवायांमुळे आणीबाणीचा काळ हा स्वतंत्र
भारताचा सर्वाधिक काळा काळ ठरला.
मन
की बात या आकाशवाणीवरील कार्यक्रमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही आणीबाणीची
घोषणा भारतीय लोकशाहीवरील काळा डाग असल्याची भावना व्यक्त केली होती.
आणीबाणीच्या
काळात अनेक राजकीय चळवळी झाल्या, ज्यात गुजरातमधील
नवनिर्माण आंदोलन,
बिहारमधील जयप्रकाश नारायण यांचं आंदोलन आणि जॉर्ज
फर्नांडिस यांच्या नेतृत्वात झालेला रेल्वे संप यांचा प्रामुख्याने उल्लेख केला
जातो.
हातकड्या
आणि बेड्या घातलेला हात उंचावलेलं फर्नांडीस यांचं छायाचित्र हे आणीबाणीच्या
काळातील सर्वाधिक प्रसिद्ध असलेल्या छायाचित्रांपैकी एक आहे.
****
आणीबाणी म्हणजे बहुपक्षीय लोकशाहीला एका व्यक्तीच्या
हुकूमशाहीत बदलण्याचं कारस्थान असल्याचं, केंद्रीय गृहमंत्री अमित
शहा यांनी म्हटलं आहे. काल दिल्लीत यासंदर्भातल्या एका कार्यक्रमात बोलतांना
त्यांनी हे मत व्यक्त केलं. ते म्हणाले...
बाईट
- केंद्रीय गृहमंत्री अमित शहा
****
आणीबाणीच्या काळातल्या तुरुंगवासाच्या काळ्या आठवणी आजही
अनेक कार्यकर्त्यांच्या मनात ताज्या आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे बीड
जिल्ह्याचे तत्कालीन कार्यवाह प्राध्यापक शरद हेबाळकर यांनी आपल्या या आठवणींना
उजाळा दिला...
बाईट
- प्राध्यापक शरद हेबाळकर
आणीबाणी काळातल्या मराठवाड्यातल्या मान्यवरांनी जागवलेल्या
आठवणी आपण आज सकाळी १० वाजून ४५ मिनिटांनी आमच्या केंद्रावरून सादर होणाऱ्या
प्रासंगिक या सदरात ऐकू शकता.
दरम्यान, आणीबाणीच्या या काळात
मानवाधिकारांसाठीच्या लढ्यात प्राण अर्पण करणाऱ्या सर्वांना आज आदरांजली वाहण्यात
येणार आहे. आणीबाणीच्या काळात कारावास भोगलेल्या कार्यकर्त्यांना आज शासनाकडून
सन्मानपत्र देऊन गौरवलं जाणार आहे.
****
राज्य शासनाचे पत्रकारिता पुरस्कार काल जाहीर झाले. एक लाख
रुपये, मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र असं या पुरस्कारांचं स्वरुप आहे. गेल्या तीन
वर्षांसाठीचे विविध पत्रकारिता पुरस्कारही काल जाहीर झाले.
****
शक्तिपीठ महामार्गाला राज्य मंत्रिमंडळ बैठकीत काल मान्यता
देण्यात आली. या प्रकल्पाच्या आखणी आणि भूसंपादनासाठी वीस हजार कोटी रुपयांच्या
तरतुदीलाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. या बैठकीत इतरही अनेक निर्णय घेण्यात
आले...
महाराष्ट्र
नागरी पायाभूत सुविधा विकास कर्ज योजनेंतर्गत हडको संस्थेकडून घेण्यात येणाऱ्या
दोन हजार कोटी रुपयांच्या कर्जाला शासन हमी देण्याचा, तसंच त्या पोटीचं हमी शुल्क माफ करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. यात
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा प्रकल्पासाठीच्या ८२२ कोटी २२ लाख
रुपयांच्या मागणीचाही समावेश आहे.
आदिवासी
शासकीय वसतीगृहांमधल्या विद्यार्थ्यांच्या निर्वाह भत्ता, शैक्षणिक साहित्य खरेदी भत्ता आणि आहार भत्त्यामध्ये वाढ करण्याचा निर्णयही
काल मंत्रिमंडळानं घेतला.
‘मुख्यमंत्री सौर ऊर्जा प्रकल्प २.०’ अंतर्गत एक हजार ७१ मेगावॅट क्षमतेचे
सौरउर्जा प्रकल्प राज्यात लवकरच कार्यान्वित होणार आहेत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल ही माहिती दिली. या प्रकल्पांमुळे
राज्यातल्या ३ लाख शेतकऱ्यांना लाभ होणार आहे.
****
छत्रपती संभाजीनगर इथं पोलिसांच्या अंमलीपदार्थ प्रतिबंधक
पथकाने सुमारे अडीच किलो एम डी पावडरचा साठा जप्त केला आहे. वाळुज परिसरात सापळा
रचून ही कारवाई करण्यात आली, पोलिसांनी दोन मालवाहू वाहनांसह एकूण एक कोटी ४३ लाख ६५ हजार रुपये किमतीचा
मुद्देमाल जप्त करत,
तीन जणांना अटक केली आहे.
****
संत एकनाथ महाराजांच्या पालखीनं, बीड
जिल्ह्यात सर्वात खडतर म्हणून ओळखला जाणारा गारमाथ्याचा डोंगर काल पार केला.
हटकरवाडी इथल्या ग्रामस्थांनी पालखीचं तोफांची सलामी देत स्वागत केलं. हा टप्पा
पार करून देण्यासाठी हटकरवाडीचे युवक दरवर्षीप्रमाणे मुंबईतून आल्याचं आमच्या
वार्ताहरानं कळवलं आहे.
दरम्यान, आषाढी वारीसाठी लातूर जिल्ह्यातून
पंढरपूरला जाणाऱ्या आणि येणाऱ्या वारकऱ्यांच्या हलक्या आणि जड वाहनांना येत्या दहा
जुलैपर्यंत पथकरातून सूट देण्यात येणार आहे. त्यासाठीचं पथकर सवलत प्रवेशपत्र
लातूरच्या प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयातून घेता येणार आहे.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना वेळेत पीक
कर्ज उपलब्ध व्हावं,
यासाठी गावपातळीवर पीक कर्जासाठी शिबिरांचं आयोजन करावं, असे
निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले आहेत. काल बँक अधिकाऱ्यांच्या
बैठकीत त्यांनी हे निर्देश दिले.
****
भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्रा याने ओस्ट्रावा गोल्डन
स्पाईक स्पर्धेत सुवर्णपदक पटकावलं. नीरजने ८५ पूर्णांक दोन नऊ मीटर अंतरावर भाला
फेकला, नीरजने गेल्याच आठवड्यात पॅरिस इथे झालेल्या डायमंड लीग स्पर्धेतही सुवर्णपदक
मिळवलं होतं.
****
क्रिकेट
लिडस कसोटी क्रिकेट सामना इंग्लंडने पाच गडी राखून जिंकला
आहे. भारतानं दिलेलं ३७१ धावांचं लक्ष्य यजमान संघाने पाच गड्यांच्या मोबदल्यात
साध्य केलं. इंग्लंडकडून १४९ धावा करणारा सलामीवीर बेन डकेटने सामनावीर ठरला. या
मालिकेतला दुसरा सामना आता येत्या २ तारखेपासून खेळवला जाईल.
****
लातूर शहरात गेल्या २ वर्षांपासून अनधिकृतपणे सुरु असलेल्या
नारायणा ई टेक्नो स्कुल या शाळेला शिक्षण विभागाने टाळं ठोकलं. शिक्षण विभागाची कोणतीही मान्यता नसतनाही ही शाळा सुरु होती.
****
हिंगोली जिल्हा आणि सत्र न्यायालयात काल आरोग्य तपासणी
शिबीर घेण्यात आलं. या शिबिराला मोठा प्रतिसाद मिळाल्याचं आमच्या वार्ताहरानं
कळवलं आहे.
****
हवामान
पुढचे दोन दिवस कोकणासह नंदूरबार जिल्ह्यांना हवामान
विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तर नाशिक आणि पुणे जिल्ह्यांना रेड अलर्ट
जारी केला आहे. दरम्यान,
नाशिक जिल्ह्यातल्या गंगापूर धरणातला विसर्ग कमी करण्यात
आला आहे.
****
No comments:
Post a Comment