Wednesday, 25 June 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 25.06.2025 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 25 June 2025

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक २५ जून २०२ सकाळी.०० वाजता

****

संविधान हत्या दिवस आज पाळण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणीबाणीविरुद्धच्या लढाईत ठामपणे उभे राहिलेल्यांना अभिवादन केले. सोशल मीडियावरील एका पोस्टमध्ये, पंतप्रधान मोदी म्हणाले की, आज देश भारताच्या लोकशाही इतिहासातील एका काळ्या अध्यायाला पन्नास वर्षे पूर्ण करत आहे. पन्नास वर्षांपूर्वी आजच्या दिवशी भारतीय संविधानातील मूल्यांना बाजूला करण्यात आले. मूलभूत अधिकार निलंबित करण्यात आले. माध्यमांचे स्वातंत्र्य संपुष्टात आणले. आणि अनेक राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते, विद्यार्थी आणि नागरिकांना तुरुंगात टाकण्यात आले होते.

पंतप्रधान म्हणाले की, आणीबाणीच्या काळात, देशभरातील विविध विचारसरणीच्या आणि सर्व स्तरातील लोकांनी भारताच्या लोकशाही रचनेचे रक्षण करण्यासाठी आणि स्वातंत्र्यसैनिकांनी ज्या आदर्शांसाठी आपले जीवन समर्पित केले होते ते जपण्यासाठी एकमेकांसोबत काम केले. त्यांच्या सामूहिक संघर्षामुळेच तत्कालीन काँग्रेस सरकारला आणीबाणीचा निर्णय मागे घ्यावा लागला आणि आणि नवीन निवडणुका घ्याव्या लागल्या. त्यावेळी जनतेने लोकशाहीविरोधी काँग्रेसचा मोठा पराभव केला.

****

भारतीय लोकशाहीतल्या काळ्या कालखंडाची अर्थात आणीबाणीची घोषणा होण्याला आज पन्नास वर्ष झाली. २५ जून १९७५ रोजी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आणीबाणी लागू करत असल्याचं जाहीर केलं होतं. आणीबाणीच्या काळात अमानवी वेदना सहन करणाऱ्या सर्वांचं स्मरण करण्यासाठी गेल्या वर्षीपासून संविधान हत्या दिवस पाळला जातो. आणीबाणीच्या या काळात मानवाधिकारांसाठीच्या लढ्यात प्राण अर्पण करणाऱ्या सर्वांना आज आदरांजली वाहण्यात येणार आहे. आणीबाणीच्या काळात कारावास भोगलेल्या कार्यकर्त्यांना आज राज्य शासनाकडून सन्मानपत्र देऊन गौरवलं जाणार आहे.

****

ऑपरेशन सिंधू मोहिमेअंतर्गत, काल रात्री उशिरा इराणमधील मशहाद इथून आणखी एक विशेष विमान २८२ भारतीय नागरिकांना घेऊन भारतात परतले. आतापर्यंत ऑपरेशन सिंधू अंतर्गत २ हजार ८५८ भारतीय नागरिकांना इराणमधून बाहेर काढण्यात आल्याचं या बाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

एक्सिओम चार या अवकाश मोहिमेला आज प्रारंभ होत आहे. अमेरिकेच्या अंतराळ संशोधन संस्था नासाच्या अधिकृत संकेतस्थळावरून ही माहिती देण्यात आली. फ्लोरिडा इथल्या केनेडी स्पेस सेंटरवरून आज दुपारी बारा वाजून एक मिनिटांने हे यान चार अंतराळ वीरांना घेऊन अंतराळात झेपावेल. भारतीय अंतराळवीर शुभांशु शुक्ला यांचा यामध्ये समावेश आहे. यावर्षीच्या २९ मे ला नियेाजित असलेली ही मोहीम तांत्रिक अडचणींमुळे आतापर्यंत अनेक वेळा पुढे ढकलण्यात आली होती.

****

नांदेड जिल्हा प्राणी क्लेश प्रतिबंधक समितीमध्ये काम करण्यासाठी चार ते पाच सदस्यांची नेमणूक करायची आहे. या कामासाठी इच्छुक व्यक्तींनी येत्या तीस जूनपर्यंत जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्तांकडे विहित नमुन्यात अर्ज करावेत, असं आवाहन प्रशासनानं केलं आहे.

****

नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर इथल्या ब्रह्मगिरीवर दरड कोसळून दोन जण जखमी झाले. काल दुपारी हा प्रकार घडला. पर्यटक पायऱ्या चढत असतानाच, ब्रह्मगिरीवरून दगड पडल्याने नाशिक इथले विशाल गिरासे आणि त्यांच्या पत्नी जयश्री हे दोघे जखमी झाले. काही पर्यटक तातडीने बाजूला झाल्यानं सुदैवाने त्यांना दुखापत झाली नाही.

****

दरम्यान, नाशिक जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील लहान मोठ्या चोवीस धरणांमधील जलसाठा वाढला असून तो  एकूण क्षमतेच्या ४० टक्क्यांवर पोहोचला आहे. इगतपुरी आणि मालेगाव वगळता उर्वरित तेरा तालुक्यांमध्ये वार्षिक सरासरीच्या तुलनेत अधिक पाऊस झाला आहे,गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ३२ टक्के अधिक जलसाठा आहे. कालपासून पावसाचा जोर कमी झाल्याने गंगापूर धरणातील विसर्ग कमी करण्यात आला आहे.

****

छत्रपती संभाजीनगर-जळगाव राष्ट्रीय महामार्गावर रात्री ११ च्या सुमारास भरधाव कार दुभाजकाला धडकून उलटल्याने भीषण अपघात घडला. या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर, दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. काल रात्री ही घटना घडली. सय्यद मारुफ सय्यद माजेद, अरफात बागवान, रेहान सय्यद, अशी मृतांची नावे आहेत. तर सय्यद उजेफ व शेख शारीक हे दोघे गंभीर जखमी झाले.

****

शक्तिपीठ महामार्गाला राज्य मंत्रिमंडळ बैठकीत काल मान्यता देण्यात आली. या प्रकल्पाच्या आखणी आणि भूसंपादनासाठी वीस हजार कोटी रुपयांच्या तरतुदीलाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली.

****

संत एकनाथ महाराजांच्या पालखीनं, बीड जिल्ह्यात सर्वात खडतर म्हणून ओळखला जाणारा गारमाथ्याचा डोंगर काल पार केला. हटकरवाडी इथल्या ग्रामस्थांनी पालखीचं तोफांची सलामी देत स्वागत केलं. हा टप्पा पार करून देण्यासाठी हटकरवाडीचे युवक दरवर्षीप्रमाणे मुंबईतून आले होते.

दरम्यान, आषाढी वारीसाठी लातूर जिल्ह्यातून पंढरपूरला जाणाऱ्या आणि येणाऱ्या वारकऱ्यांच्या हलक्या आणि जड वाहनांना येत्या दहा जुलैपर्यंत पथकरातून सूट देण्यात येणार आहे. त्यासाठीचं पथकर सवलत प्रवेशपत्र लातूरच्या प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयातून घेता येणार आहे.

****

भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्रा याने ओस्ट्रावा गोल्डन स्पाईक स्पर्धेत सुवर्णपदक पटकावलं. नीरजने ८५ पूर्णांक दोन नऊ मीटर अंतरावर भाला फेकला, नीरजने गेल्याच आठवड्यात पॅरिस इथे झालेल्या डायमंड लीग स्पर्धेतही सुवर्णपदक मिळवलं होतं.

****

 

 

 

No comments:

Text - آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر‘علاقائی اُردو خبریں: بتاریخ: 15 اگست 2025‘ وقت: صبح 06:50 تا 07:00

  Regional Urdu Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 15 August-2025 Time: 09:00-09:10 am آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر علاقائی خبری...